नवीन लेखन...

“मन’मोहना’ऽऽ, तू राजा ‘मनोरंजना’तला”

अभिनव कला महाविद्यालयातील रमेशचे जे मित्र होते, ते माझ्याशीही मित्रतेने वागायचे. त्यामध्ये मदन कुलकर्णी नावाचा एक अवलिया मित्र होता, तो रोज रमेशकडे येऊन रात्री उशीरपर्यंत गप्पा मारत बसायचा. तो बोलबच्चन असल्याने मी देखील त्यांच्यात सहभागी व्हायचो. मदनचा मोठा भाऊ, मोहन हा पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये नोकरीला होता.

मोहनच्या वडिलांचं, मनोहर (अण्णा) कुलकर्णी यांचं विजय थिएटरच्या तळघरात ‘मनोरंजन पब्लिसिटी’चं ऑफिस होतं. मनोहर कुलकर्णी, डॅडी लोणकर व नाना रायरीकर या तिघांनी मिळून ‘मनोरंजन’ची स्थापना केली. नाटकांसाठी थिएटर बुकींग, नेपथ्य, जाहिरात, लायसन्स अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारं पुण्यातील हे एकमेव ठिकाण होतं.

मोहन नोकरी सांभाळून अण्णांना मदत करीत होता. जेव्हा ‘मनोरंजन’च्या कामाचा व्याप वाढला, तेव्हा मोहनने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ नाट्यसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले.

इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, ‘मनी गोज टू मनी’ मात्र मोहनच्या बाबतीत ‘मनी गोज टू मोहन’ असं म्हणावं लागेल.. त्यासाठी त्याची कामासाठी असलेली चिकाटीही कारणीभूत आहे, काम पूर्ण होईपर्यंत तो स्वस्थ बसत नाही. कुणी नवीन नाट्यनिर्माता उभा रहात असेल तर त्याला मार्गदर्शन करतो. आजपर्यंत या क्षेत्रातील कित्येकांना, सहकार्य करुन त्यानं मोठं केलेलं आहे.

१९८१ पासून आम्ही छोटी मोठी डिझाईनची कामं करु लागलो. अशाच एका कामाच्या निमित्ताने ‘मनोरंजन’मध्ये पाऊल टाकलं आणि त्या ‘मनोरंजन परिवारा’चा मी आजीव सदस्य झालो…

‘मनोरंजन’मध्ये गेलं की, अण्णा, नाना रायरीकर, मोहन, वाघ, नेपध्याची कामं करणारी माणसं, मामा शेलार असे सर्वजण भेटायचे. मोहन डिझाईनचा मजकूर लिहून द्यायचा. चहा झाल्यावर मी निघायचो. डिझाईनच्या पाठपुराव्यासाठी वाघ भेटायला यायचे. कारण ते डिझाईन, पेपरला पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असायची. याच दरम्यान मोहनचं लग्न झालं. मी फोटोग्राफी करतो, हे मोहनला माहीत होते. त्याच्या मेहुणीच्या लग्नाचे फोटो काढण्याची जबाबदारी त्यानं माझ्यावर सोपवली. उद्यान प्रसाद कार्यालयात त्या लग्नाचे मी फोटो काढले.

काही वर्षांनंतर मोहनने विजय टॉकीजच्या जिन्याशेजारी छोटं ऑफिस थाटलं. तिथे अण्णा व मोहन बसू लागले. अण्णांची केबिन स्वतंत्र होती. ऑफिसमध्ये टीव्ही होता. आता मोहनकडे येणाऱ्या व्यक्तींच्या भेटीगाठी इथे वरतीच होऊ लागल्या. इथेच मी मराठी चित्रपटांचे, नाटकांचे, ऑर्केस्ट्राचे दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञांना पाहिलेले आहे.

खाली ऑफिसमध्ये काम करणारे वाघ, वयोमानानुसार निवृत्त झाले. ते काम पहाण्यासाठी मोहनने त्याची भाची, भारती आणि संगीता दहिभाते या दोघींची नेमणूक केली. दोघी दुपारी तीन वाजता दुचाकीवरून दैनिक सकाळ व इतर पेपरला जाहिराती देऊन यायच्या. काही वर्षांनंतर भारतीने ते काम सोडलं व वहिनी येऊ लागल्या. कधी मोहनची कन्या ऑफिसमध्ये येत असे.

मोहन सकाळी दहा वाजता ऑफिसमध्ये आल्यावर रात्री एखाद्या नाट्यमंदिराला भेट देऊन त्याला घरी जायला बारा वाजायचे. सकाळपासून त्याचा फोन सतत चालू होतो, ते झोपेपर्यंत. प्रत्येकाचे फोन घेऊन, फोन करणाऱ्याचे शंकानिरसन होईपर्यंत मोहन अखंड बोलत रहातो. रविवारी सुट्टी असली तरी त्याला घरात करमत नाही. तो ‘मनोरंजन’मध्ये येऊन बसतो. कुणाचा फोन आला की, लगेच गाडी काढून निघतो. कुणी सहकारी बरोबर असेल तर त्याला गाडी चालवायला सांगून हा मागे बसून फोन घेत राहतो.

आम्हा दोघांना बाहेर फिरताना पाहून, मोहन बोलू लागतो, ‘अरे दोघे एकाच वेळी का बाहेर पडता? कोणी कामासाठी ऑफिसवर आलं तर त्यानं काय कुलूप बघायचं? एकानं ऑफिसमध्ये बसावं, दुसऱ्यानं फिरुन यावं. कधी कुणाचं काम निघेल, ते आपण नाही सांगू शकत.’

काम मिळविण्यासाठी मी मोहन सोबत अनेकदा नामवंत व्यक्तींकडे गेलेलो आहे. एकदा आपटे रोडला सई परांजपेंच्या घरी गेलो होतो. तिथे त्यांची कन्या विनी परांजपे देखील होती. भांडारकर रोडला एका चित्रपटाच्या जाहिराती संदर्भात अमोल पालेकर यांच्या घरी गेलो होतो. मोहनच्या शिफारशीवरुन अनेक नाटकांची, कार्यक्रमांची कामं मिळाली. या क्षेत्रातील मान्यवरांच्या ओळखी झाल्या. दिलीप कोल्हटकर, मराठी चित्रपट निर्माते सतीश कुलकर्णी, विजय कोंडके, स्मिता तळवलकर, महेश मांजरेकर असे अनेक हस्ती ‘मनोरंजन’च्या ऑफिसमध्ये मला भेटलेल्या आहेत.

पूर्वी गणपतीच्या सीझनमध्ये ‘मनोरंजन’च्या ऑफिसमध्ये नाटकाचे प्रयोग घेणारांची गर्दी असायची. मोहनकडे नाटकांच्या,ऑर्केस्ट्राच्या, भावगीत कार्यक्रमांच्या पोस्टरच्या फाईल्स तयार असायच्या. त्यातून दहा दिवसांचे प्रयोग ठरायचे. मनोरंजन नाट्य संस्थेतर्फे नाटकांचीही निर्मिती व प्रयोग होत असत.
‌‌
मोहनला ऑफिसच्या जवळ रहाण्यासाठी फ्लॅट भाड्याने हवा होता. आमच्या ‘गुणगौरव’ बिल्डींगमध्ये तिसऱ्या मजल्यावरील परांजपे यांचा फ्लॅट मोहनला पसंत पडला. परांजपे यांनी त्या फ्लॅटसाठी मुंबईमधील त्यांच्या मुली-जावयाला भेटायला सांगितले. आम्ही दोघे त्यासाठी दोन वेळा मुंबईला एशियाडने जाऊन आलो. प्रवासात खूप गप्पा मारल्या. मजा आली. त्यानंतर काही वर्षे तो ‘गुणगौरव’मध्ये असल्यामुळे रोजच भेटायचा. आमच्या बिल्डिंगमधील जागा सोडल्यानंतर मोहन, माती गणपती जवळ रहात होता. नाटकाच्या तालमीला, प्रयोगाला, चित्रपटाच्या प्रिमियरला, प्रेस पार्टीला आमची हमखास भेट व्हायची.

मोहनने नारायण पेठेतील जागा सोडून तो एसपी कॉलेजच्या जवळ रहायला गेला. आम्ही ऑफिसवर साडेनऊपर्यंत असतोच. मोहन घरी जाताना ऑफिसमध्ये डोकवायचा, ऑफिसमध्ये बसलेलं कोणी त्याच्या ओळखीचं जर निघालं, तर गप्पांचा फड रंगायचा. कधी वहिनी माहेरी गेलेल्या असतील तर, मोहन व आम्ही दोघे टिळक रोडवरील ‘जयश्री’मध्ये जात असू. गप्पा मारत खाणं व्हायचं. कधी विजयानगर कॉलनीतील हॉटेलमध्ये जाऊन तवा पुलाववर ताव मारीत असू. खाणं झाल्यावर मसाला पानाची जबाबदारी माझ्याकडे असे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनानं सगळं जनजीवन विस्कळित झालं. लॉकडाऊनमुळे नोव्हेंबर पर्यंत सर्व व्यवसाय ठप्प झाले. याच दरम्यान अण्णांचं देहावसान झालं. अण्णा आजारी होतेच, मात्र लॉकडाऊन असल्यामुळे, त्यांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही. आता मोहनवर ‘मनोरंजन’ची जबाबदारी पडली.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात विजय टॉकीज बिल्डरने पाडण्यास सुरुवात केली. इतक्या वर्षांचं ‘विजय टॉकीज म्हणजेच मनोरंजन’ हे समीकरण काही वर्षांसाठी आता थांबलेलं आहे. तूर्तास मोहनने शास्त्री रोडला, लोकमान्य नगरमध्ये ‘मनोरंजन’चं तात्पुरतं ऑफिस थाटलेलं आहे. आम्ही वरचेवर भेटत होतो, तोपर्यंत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. सतत बडबड करणाऱ्याला, सतत धावपळ करणाऱ्याला एकाच ठिकाणी स्वस्थ व शांत बसायला सांगितल्यावर त्या माणसाची जी घुसमट होते, तशी आत्ता मोहनची होत असेल…

लवकरच कोरोना हद्दपार होईल आणि पुन्हा मनोरंजन पहिल्यासारखं चालू झाल्यावर खात्रीपूर्वक म्हणता येईल…

मन’मोहना’ऽऽ, तू राजा ‘मनोरंजना’तला…

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

३०-५-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..