मै कवी अंजान….. गीतोंका

मंडळी , सप्रे म नमस्कार !

आज तुम्हाला मी अशा एका कवीबद्धल सांगणार आहे की ज्याचं टोपण नावच दुर्दैवाने त्याचं विधिलिखित बनून गेलं !

२८ आॅक्टोबर १९३० रोजी वाराणसी येथील ओदार या छोट्याशा खेड्यात पं.शिवनाथ पांडे यांना एक मुलगा झाला — लालजी पांडे.स्वत: बँकेत असल्याने बी.काॅम होऊन मुलानेहि बँकेत नोकरी करावी हा वडिलांचा आग्रह व मुळातंच कवीचा पिंड त्यामुळे कवी व्हावं हि लालजीची इच्छा ! अखेर वडिलांशी भांडून लिख लिख के मर जाएँगे! ( पण अपयशी होऊन पुन्हा बनारसमधे पाऊल ठेवणार नाहि! ) असं निक्षून सांगत लालजी १०० ₹ ची नोट घेऊन मुंबईला आले.

बी.काॅम. झाल्यावर आज या दैनिकात तब्बल १३ वर्षं काम केलं.तेंव्हा बनारसमधे बरेच लालजी असल्याने त्यांनी अंजान या टोपण नावाने लिहायला सुरुवात केली.बनारस या पत्रिकेसाठीहि ते लेखन करीत.बनारस चे प्रमुख हरिप्रताप सिंह यांनी प्रेमनाथ—मधुबाला जोडीच्या बादलचे संवाद लिहिले होते.त्यांच्या सांगण्यावरुन मुंबईत आलेले अंजान ग्रॅन्टरोडच्या सुखानंद धर्मशाळेत राहिले.तेंव्हा प्रेमनाथ गोलकुंडा का कैदी हा चित्रपट निर्माण करत होता ( १९५४ ) व हरिप्रताप सिंह सहाय्यक दिग्दर्शक होते.प्रकाश सेठी गीतकार व पं.जगन्नाथ संगीतकार.पण काहि कारणाने प्रेमनाथशी बिनसले व दोघांनी हा चित्रपट सोडला.तेंव्हा प्रेमनाथने दत्ता डावजेकरांना संगीताची व अंजानना गीतांची जबाबदारी सोपवली.तेंव्हा अंजानने पहिलं चित्रपटगीत लिहिलं लहर ये डोले कोयल बोले झूम रहि फूलोंकी डाल जे सुधा मल्होत्राने गायलं व शहिदों अमर है तुम्हारी कहानी रफीने गायलं.या गाण्यात राजेन्द्रनाथसोबत माॅबसीनमधे अंजान पडद्यावरहि चमकले.

१०० ₹ नोट घेऊन निघालेल्या अंजानला योगायोगाने गीताबालीचा दुसरा चित्रपट मिळाला सौ का नोट— संगीतकार एस.मोहिंदर.
यानंतर चित्रपट मिळण्यासाठी अंजानना ७ वर्ष वाट पहावी लागली! मुंबईत आल्यावर ७ व्या दिवशीच गोलकुंडा का कैदी हा चित्रपट मिळालेल्या अंजानला ७ वर्षांनी चित्रपट मिळाला गोदान जो फक्त ७ आठवडेच चालला , पण गाणी मात्र तूफान गाजली : हिया जरत रहत दिन रैन — मुकेश , पिपरा के पतवा , होली खेलत नंदलाल बिरजमें — रफी आणि जाने कहाँ मेरा जिया डोले , आज गोरी पिया की नगरिया — लता … संगीतकार होते पंडित रविशंकर ( सतारवादक ).या सिनेमाने अंजानला भोजपुरी भैय्या टाईपची गाणी लिहिणारा अशी ओळख दिली.

परत ७ वनी बंधन या राजेश खन्नाच्या चित्रपटासाठी भोजपुरी गाण्यांची गरज निर्माण झाल्यावर कल्याणजी—आनंदजींनी अंजानला पाचारण केले व यातील बिन बदराके बिजुरिया कैसे चमके हे मुकेशचं गाणं खूप गाजलं.यानंतर अंजान — KA जोडी हिट ठरली व त्यांनी अनेक हिट गाणी दिली .तसंच दिग्दर्शक असलेले प्रकाश मेहरा स्वत: कवी होते ( दिल जलोंका दिल जलाके — जंजीर , सलामे ईश्क मेरी जाँ — मुकद्दरका सिकंदर , अपनी तो जैसे तैसे — लावारिस अशी अनेक गाणी प्रकाश मेहरांनी लिहिलीत ! ) त्यांचेहि सूर अंजानशु जुळले.त्यांनीहि संगीतकार बदलले पण गीतकार अंजान यांनाच ठेवलं !नंतर बप्पी लाहिरी युग सुरू झाल्यावर बप्पीने मायकेल जॅक्सनच्या अनेक रेकाॅर्डस् अंजानना दिल्यावर अंजाननी प्रेरणा घेत आय अँम अ डिस्को डान्सर लिहिलं व ते हिट झालं.मग अंजाननी यार बिना चैन कहाँ रे , हरि ओम हरि , तमा तमा लोगे , झूबी झूबी , गोरी है कलाइयाँ अशी गाणी लिहिली व दुसरीकडे छूकर मेरे मनको , तेरे जैसा यार कहाँ , तू रुठा दिल टूटा , ये दुनियाके बदलते रिश्ते अशी गाणीहि लिहिली.

आणखी वानगीदाखल हि गाणी पहा :

आपकी इनायतें आपके करम्
ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना
यशोदाका नंदलाला जगका उजाला है
आपके हसीन रुखपे आज नया नूर है
खई के पान बनारस वाला
ई है बंबई नगरिया तू देख बबुवा

स्वत: अमिताभने गंगा तटका बंजारा या अंजानच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करताना सांगितलं की माझ्या यशामधे अंजान यांच्या गीतांचा फार मोठा सहभाग आहे!

पण हाय रे दुर्दैवा , पुत्रकर्तव्याने मुलगा कवी समीर याने थाटामाटात हा समारंभ घडवून आणला तेंव्हा पक्षाघाताच्या आघाताने अंजान लोळागोळा व जवळजवळ कोमावस्थेत होतं ! आपल्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या प्रसंगापासुनहि लालजी अंजानच राहिले !

१३ सप्टेंबर १९९७ रोजी ते इहलोक सोडून गेले !

म्हणून आनंद बक्षींच्या अंजाना मधील गाण्यात थोडासा बदल केला तर कदाचित् अंजान यांचं ठुसठुसतं शल्य जाणवतं :
मैं कवी अंजान……गीतोंका

अशा या प्रतिभावान परंतू उपेक्षित कवीला सप्रेम कवीची मानवंदना व साश्रू नयनांची श्रद्धांजली !

© उदय गंगाधर सप्रेम—ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..