उपेक्षित गंधर्व – महेंद्र कपूर

Mahendra Kapoor

रशियामध्ये राजकपूरचे लाईव्ह स्टेज शोज सुरु होते. तत्कालीन रशियातील ताश्कंदमधील एका शोमध्ये घडलेला हा किस्सा. शोच्या सुरुवातीला स्वतः राजनी ‘आवारा हुं’ आणि ‘मेरा जुता है जपानी’ सादर केले. महेंद्रकपूर हार्मोनियम वाजवत होते आणि राज गात होते. राजजींच्या गाण्याचे सेशन पूर्ण झाले अन ते विंगेतून स्टेजच्या मागे रेस्टरूममध्ये गेले. संयोजकांनी माईकचा  ताबा महेंद्रकपूरकडे दिला, त्याने १९६३ च्या ‘गुमराह’मधलं “चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये …” हे गाणं भन्नाट सुरात गायलं ! रशियन लोकांना स्वर आवडले पण गाणं कळालं नाही. खालून पुकारा झाला अन गाण्याचं भाषांतर करून सांगितलं गेलं ! ते ऐकून लोकांनी गाणं पुन्हा म्हणायला लावलं ! लागोपाठ तीन वन्स मोअर झाले. प्रेक्षकांचा गलका शिगेला पोहोचला तसे राजकपूर कोणाच्या गाण्याला लोक इतके बेहोष होऊन दाद देतायत हे बघायला विंगेत आले. त्यांनी पहिले की महेंद्र कपूर गातोय अन पब्लिकने ताल धरलाय !
गाणं संपलं की लगेच राज स्वतः माईक हातात घेऊन बोलते झाले की, “एका कपूरला हरवायला इथे दुसरा कपूरच यावा लागला ! जिओ महेंद्र !!”
स्टेज शोचे कार्यक्रम संपले आणि परतीच्या प्रवासात राज कपूरनी त्यांच्या मनातली खंत महेंद्रकपूरला बोलून दाखवली. ते म्हणाले की, ‘माझा आवाज अन माझ्यावरचे गाणे हे सगळे मुकेशच्या गायकीला सुट होणारे आहे, त्यामुळे मित्रा मी तुला माझे सोलो गाणे कधी दिले नाही, पण मी तुला शब्द देतो की माझ्या सहनायकाचे माझ्या सिनेमातले एखादे हिट गाणे मी तुला नक्की देईन !’या घटनेआधी राजच्या ‘जिस देश मे गंगा बहती है’मध्ये (१९६०) ‘है आग हमारे सीने में’ या गाण्यासाठी महेंद्रने अन्य मन्ना डे, मुकेश, लतादीदी आणि गीता दत्तच्या साथीत दिग्गजांच्या गायले होते. याच वर्षी आलेल्या ‘श्रीमान सत्यवादी’त देखील मुकेश आणि सुमन कल्याणपूरच्या साथीत ‘इक बात कहू’ हे गाणं गायलं होतं. तर त्या आधी (१९५९) आलेल्या ‘चार दिल चार राहे’मध्ये देखील मुकेश, मन्ना डे, मीना कपूर यांच्या साथीने ‘साथी रे भाई रे’ हे गाणं गायलं होतं. पण या तीनही गाण्यात महेंद्रकपूरचे अस्तित्व असून नसल्यासारखे होते. किंबहुना तो कोरसमधील एक आवाज बनून राहिला होता.

राजने असे म्हणताच आनंदाने सद्गदीत झालेल्या महेंद्रकपूरनी राजचे पाय धरले ते म्हणाले,’राजजी आपण मोठे शोमन आहात आपल्या ध्यानी मी राहिलो हेच खूप आहे, आपण मला विसराल तर नाहीत ना?’

महेंद्रकपूरने असे विचारताच ओठात शिलगावलेली जळती सिगारेट राजने  हातात घेतली अन जोरात आपल्या हातावर टेकवली ! स्वतःलाच चटका दिला !

तिथून परत आल्यावर आर.के.च्या महत्वाकांक्षी ‘संगम’मध्ये राजकपूरनी महेंद्रला त्यांच्या सहनायकाचे राजेंद्रकुमारवर चित्रित झालेले त्यांच्या अपोझिट व्हॉईसचे महत्वपूर्ण गाणे दिले – “हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा……….” या गाण्याने आणि ‘संगम’ने इतिहास घडवला !

बॉलीवूडचा इतिहास अशा अनेक पानांनी सजलेला आहे. त्या इतिहासातला महेंद्रकपूरचा छोटासा आलेख …

“सूर तेच छेडिता गीत उमटले नवे”, “रात्रीस खेळ चाले”, “सांग कधी कळणार तुला”, “हे चिंचेचे झाड दिसे मज”, “अंजनीच्या सुता” ही मराठी गीतं गाणारा अमराठी पंजाब दा पुत्तर महेंद्रकपूर ‘चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये …’ हे गाणं इतकं अप्रतिम गायला आहे की त्याला तोड नाही. १९६३च्या ‘गुमराह’मधील सुनीलदत्तवर चित्रित केलेलं हे गाणं यु ट्यूबवर तब्बल ३४ लाख लोकांनी पाहिले आहे यावरून या गीताची कालातीत लोकप्रियता ध्यानात यावी. महेंद्र कपूरची अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली पण महेंद्रकपूर त्याच्या गाण्याइतका वा त्याच्या समकालीन गायकाइतका लोकप्रिय झाला नाही, त्याबाबतीत तो कमनशिबी ठरला. अनेक भाषातून, विविध शैलीतून अन रागदारीपासून ते टीव्हीवरील मालिकांसाठीही त्यानं गायलं. आश्चर्य म्हणजे तिथेही त्याच्या आवाजाला यश मिळाले पण तुलनेत त्याचे म्हणावे तितके चीज झाले नाही. त्याच्या गायकीचे इंडस्ट्रीने खरे मोल कधी जाणलेच नाही अन त्याची टोटल रेंज कुणी एनकेच केली नाही असंच म्हणावं लागतं. मुजरा, कव्वाली, भक्तिगीत, प्रेमगीत,  भजन, बालगीत अन  सामाजिक आशयाची गंभीर गाणी अशी सर्व प्रकारची गाणी तो गात राहिला पण तो कुठल्या एका टिपिकल गायकीचा होऊन राहिला नाही.

स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं असेल का याचा अंदाज नाही मात्र त्याच्या काळात रफीचे युग होते याची त्याला जाणीव नक्कीच होती. रफीचे युग होते म्हणून इतर सर्वांची गायकी दुर्लक्षिली गेली असंही नव्हे ! त्याच्या मुळे इतर समकालीन सर्व गायक झाकोळले गेले असंही घडले नाही कारण रफीच्या साम्राज्यासमोर मुकेश, तलत आणि मन्नाडे यांनी आपलं अस्तित्व आणि स्वतंत्र शैली चांगल्या प्रकारे टिकवली होती. मग महेंन्द्रकपूरच्या वाट्यालाच हे भाग्य कसे आले असेल याचेही काही उत्तर मिळत नाही. रफी ऐन भरात असताना मन्ना डे, मुकेश व तलत यांना अविस्मरणीय गाणी दिलेली आहेत. उलट या तिघांचंही एक स्वतंत्र गायकीचे  विश्व होते जिथे इतर गायकांना प्रवेश निषिद्ध होता. दर्दभर्याल आवाजात गाणारा मुकेश, शास्त्रीय बाज हाच ज्याच्या गायकीचा कणा होता असा मन्ना डे, गझलसाठीचा तेंव्हाचा सर्वोत्तम आवाज तलतचा ! असं त्यांच्या गायकीचं ढोबळमानाने विश्लेषण करता येईल. मात्र महेंद्रकपूर अशा टिपिकल आयडेंटीटीच्या आरशात स्वतःला पाहू शकला नाही, तो सर्व पट्ट्यातून अद्भुत स्वर लावून गात राहिला अन त्याची स्वतःची अशी विशिष्ट साचेबद्ध शैली निर्माण झाली नाही, किंबहुना हीच गोष्ट त्याला नडलीअन त्याची उपेक्षा झाली. मास्टर ऑफ ऑल अँड जॅक ऑफ नन असं त्याच्या गायकीबद्दल म्हणता येईल !

महेंद्रकपूरची कोंडी याहून अधिक त्याच्या गायनाला रुपेरी पडद्यावर साकारणारया नायकांच्या माध्यमातून झाली !  रफी, किशोर, मुकेश हे बहुतांशी करून दिलीप, देव व राज या दिग्गजांसाठी गात राहिले गायिले. ह्या गायक -नायक जोडीचा रुपेरी योग महेंद्र कपूरच्या लेखी नव्हता. महेंद्र कपूरची लोकप्रिय ठरलेली गाणी ही मनोज कुमार (पूरब और पश्चिम, उपकार,क्रांती), सुनील दत्त (गुमराह, हमराज),राजेंद्र कुमार (गीत, संगम),  शशी कपुर (वक्त, प्यार किये जा), विश्वजीतसाठी (किस्मत) होती. इतरही अनेक ‘आऊट ऑफ फर्स्ट थ्री’ व्यतिरिक्त नायकांसाठी त्याने गायलेली गाणी हिट झाली, मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या या तिघांना त्याने क्वचित आवाज दिला ! महेंद्र कपूरला त्याच्या मनोजकुमार टाईपचा फायदा कमी झाला अन तोटा जास्त झाला.त्याचं “मेरे देश की धरती” रिलीज झालं अन तो मनोजचा आवाज बनून राहिला ! मनोजचा चित्रपट व महेंद्रकपूरचा आवाज हे समीकरण बनले.  मनोज कुमार स्वतः ‘भारत’कुमारच्या एककलमी शैलीत बंदिस्त झाल्याने महेंद्रचे अधिक नुकसान झाले अन त्याची इमेजही तशीच झाली. शिवाय मनोज कुमारला राज,देव आणि दिलीपचं ग्लॅमरस यश कधी मिळालं नाही, हीही रुखरुख राहिली.    महेंद्रकपूरने दिलीपसाबला आवाज दिला पण तोवर दिलीपसाबचा सुवर्णकाळ सरत आला होता. हे कमी की काय म्हणून महेंद्रकपूरचे सर्वाधिक नुकसान त्याच्या देशभक्तीपर गाण्याचा गायक या इमेजने झाले. त्याला तशीच गाणी येत गेली अन तो गायकीच्या शैलीच्या चौकटीत फ्रेम्ड होण्याऐवजी गाण्यांच्या प्रोटोटाईपमध्ये अडकला गेला अन लोकांनीही त्याला त्यात पसंद केले. पण इथेही रफी त्याच्या आधी ‘जहां डाल डाल पर …’ गाऊन गेल्याने त्याचे एकछत्री राज्य राहू शकले नाही ! या सर्व सरमिसळीमुळे महेंद्रकपूर स्वतःचा पडद्यावरील नायक, स्वतःची इमेज अन स्वतःची शैली ह्या गोष्टी कुवत अन गुणवत्ता असूनही निर्माण करू शकला नाही. म्हणून त्याला एक उपेक्षित गंधर्वच संबोधले तर त्यात वावगे नाही. माझ्या या वाक्यास काहीजण आक्षेप घेतील पण त्याच्या विविधांगी सरस, सुरेल गायकीकडे एक दृष्टीक्षेप जरी टाकला तरी त्याची प्रचीती येते.

त्याचं गायकीवरचे प्रेम त्याच्याच गाण्यात सांगायचे झाले तर “किसी पत्थरकी मुरत से मुहब्बत का इरादा है” असं होतं !  “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “आखोंमे कयामत के काजल”,“झुके जो तेरे नैना”,“तुम अगर साथ देनेका वादा करो”,“ऐ जाने चमन तेरा गोरा बदन”, “तुम्हारा चाहनेवाला, खुदा की दुनिया में”,“रफ्ता रफ्ता वो हमारे”,“मेरी जान तुमपे सदके एहेसान इतना करदो”, “दिल लगाकर हम ये समझे”,“छोडकर तेरे प्यार का आलम”,“संसार की हर शय का”, “बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी”,”लाखों है यहां दिलवाले”, “फकीरा चल चला चल”,  त्याचं महाभारतमधलं ‘अथ श्री महाभारत…’ पासून सुरु होत ‘यदा यदाही धर्मस्य..’वर चढत्या स्वरातलं गाणं ऐकणं हाही एक अविस्मरणीय अनुभव होता.

सर्वच त्याच्या मनासारखे घडत नव्हते असेही नव्हते, ओपी नय्यर सारख्या दिग्गजाने त्याला नेहमी काम दिले. तर संगीतकार रवी अन दिग्दर्शक बीआरचोप्रा नेहमीच त्याचे चाहते राहिले. मात्र त्याची आणखी एक गोची अशी झाली की त्याची अनेक हिट गाणी त्याच्या नायकांनी पाहण्याजोगी न ठेवता ती केवळ श्रवणीय राहतील याची पुरेपूर ‘दक्षता’ घेतली ! दुय्यम दर्जाचा अभिनय हे बहुधा त्यामागचे कारण असावे. पुढे किशोरदांनी राजेशखन्नावर ताबा मिळवला अन रफी-मुकेश- तलत यांचे साम्राज्य देखील किंचित डगमगले ! रफी – दिलीप, राज – मुकेश या जोडीत किशोर – राजेश ह्या अजरामर जोडीची भर पडली अन तिथून महेंद्रकपूरची वाट अधिकच बिकट झाली. या काळापासून त्यांनी प्रादेशिक भाषांत जास्त गायलं. मात्र हिंदीतही त्यांची हरेकवर्षी हिट गाणी येत राहिली पण त्यांचे खरे मूल्यमापन कधी झालेच नाही. पहाडी आवाजाचा अन खड्या गायकीचा गंभीर शैलीत गाणं म्हणणारा गायक इतकेच काय ते माप काही अपवाद वगळता सर्वच संगीतकारांनी त्यांच्या पदरात टाकले. कधी कधी गाण्यामधला महेंद्रकपूर लोकांच्या ध्यानी राहिलाच नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘हर दिल जो प्यार करेगा …’ हे मुकेश लता बरोबर त्याने गायलेले गाणे. इथे मुकेश – राज च्या कॉम्बीनेशनमध्ये महेंद्र – राजेंद्र पार झाकोळले जातात.

‘अश्विनी ये ना….’ या गाण्याला मराठी माणसाने अगदी मुक्त हस्ताने दाद दिली आणि गायकीच्या अखरेच्या टप्प्यात मराठीत गाणं गायल्यावरही ऊर फाटेस्तोवर किशोरदाचे अफाट कौतुक केले मात्र त्याआधीच्या तीन दशकापासून मराठीत एकाहून एक सरस गाणी गाणाऱ्या अमराठी महेंद्र्कपूरचे असे मनमोकळे कौतुक कधी मराठी इंडस्ट्री अन मराठी रसिकांनीही केले नाही.त्या उलट “शोधीसी मानवा जाऊनि मंदिरी…’ सारखी मोजकीच गाणी गाणाऱ्या रफीचेदेखील मराठी माणसाला कौतुक राहिले पण महेंद्रकपूरने त्याआधीपासून सुरेख गाणी देऊनही त्याचे मराठी माणसाला कधी अप्रूप का राहिले नाही हा प्रश्न राहतो. किशोर आणि रफी जसे अमराठी होते तसाच महेंद्रकपूरदेखील अमराठी होता पण त्याचे मराठी उच्चार इतके स्पष्ट अन शुद्ध होते की एक अमराठी गायक ही गाणी गातोय असं कधी वाटलंच नाही.”जीवनगाणे गातच रहावे”, “जिंकू किंवा मरू”, “धुंदीत गाऊ मस्तीत राहू”, “सजणी ग भुललो मी”, “गंगू तारुण्य तुझं बेफाम” “रात्रीस खेळ चाले” यातील खेळ या शब्दातल्या ‘ळ’चा उच्चार स्पष्टपणे करणारा हा गायक अमराठी कसा असेल असा प्रश्नही कधी कधी पडतो. हा ळ “गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला” मध्ये अधिक खुलला आहे ! त्याचप्रमाणे “वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं..” या गाण्यात त्यांचा ळ कार वेगळ्याच ढंगात घुमला ! इतके असूनही मराठी इंडस्ट्रीने महेंद्रकपूरपेक्षा किशोरदा अन रफींची भलावण जास्त केली !!  शिवाय त्याच्या दुर्दैवीपणाचे अनेक किस्से सातत्याने घडत गेले त्यामुळे त्याच्या कडून अनेक गाणी हिरावली गेली.

‘नवरंग’ सिनेमा १९५९ साली व्ही. शांताराम यांनी निर्माण केला होता. या सिनेमातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग राजकमल स्टुडियोत सुरू होतं. महेंद्र कपूर यांचं एका मोठ्या बॅनरच्या सिनेमातील ते बहुधा पहिलंच गाणं असावं आणि समोर आशा भोसलेसारखी नामांकित गायिका आणि फिल्म इंडस्ट्रीत दबदबा असलेले संगीतकार सी. रामचंद्र. एकूणच अशा रथीमहारथींच्या मध्ये नवखा तरुण गायक महेंद्र कपूर. बुजलेला, काहीसा चिंतेत. टेक सुरू होता. बहुधा ते गाणं असावं- ‘आधा है चंद्रमा रात आधी.’ रेकॉर्डिस्ट मंगेश देसाई आणि त्यांचे सहायक, महेंद्र कपूरचं गाणं ऐकत असताना वारंवार एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि वाकून वाकून काचेबाहेर काहीतरी पाहत होते. मंगेश देसाईंच्या चेहर्याचवरील त्रासिक भाव पाहून महेंद्र कपूर मनातून जरा चरकलाच होता आणि हिरमुसलाही होता. परंतु, त्याला कळत नव्हतं की नक्की आपलं काय चुकत आहे? म्युझिक रूममध्ये ‘अण्णा’ सी. रामचंद्र यांच्या ही गोष्ट लक्षात येताच ते थांबले आणि त्यांनी मंगेशजींना, ‘‘काय झालं, काय चाललं?’’ असा प्रश्नं केला. तेव्हा मंगेशजी म्हणाले की, ‘‘महेंद्रजींचा आवाज खूप कापतो आहे, त्यांच्या आवाजात कंप आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग होऊ शकणार नाही.’’ तेव्हा सी. रामचंद्र वैतागले आणि म्हणाले की, ‘‘कंप वगैरे काही नाही. तुम्ही तुमची कनेक्शन्स तपासून बघा, पोरगा मस्त तबीयतमध्ये गातोय्.’’ अण्णांनी हे फर्मान सोडताच मंगेशजी आणि त्यांच्या सहायकांची धावपळ झाली आणि त्यांनी कनेक्शन्स ‘चेक’ केली, तेव्हा खरोखरीच महेंद्र कपूरच्या मायक्रोफोनचं कनेक्शन सैलसर लागल्यामुळे त्याचा आवाज ‘व्हायब्रेट’ होत होता. ते पुन्हा नीट जोडून जेव्हा ‘टेक’ सुरू केला तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निःश्वा स सोडलाच, परंतु महेंद्र कपूरची धडधड ‘नॉर्मल’ झाली आणि त्याच्या जीवनातील एक अमूल्य संधी हुकता हुकता त्याच्या हाती पुन्हा गवसली. महेंद्र कपूरने पुढे म्हटलं की, ‘‘जर अण्णांंनी माझ्यावर तेव्हा विश्वाास ठेवला नसता तर मी कुठे असतो? माईकचं कनेक्शन ‘चेक’ केलं गेलं म्हणून मी वाचलो.’’

महेंद्र कपूरच्या बाबतीत असे संधी हुकण्याचे आणि गवसण्याचे आणखी काही किस्से घडले आहेत. ‘आदमी’ चित्रपटातील किस्सा. ‘न आदमीका कोई भरोसा’ हे गाणं मनोजकुमारसाठी प्रारंभी महेंद्र कपूरने गायलं होतं कारण मनोजकुमार स्वतःसाठी नेहमी महेंद्र कपूरलाच संधी देत असे. मधल्या काळात दिग्दर्शक भीमसिंग यांनी पटकथेत काही बदल केले, त्यानुसार ते गाणं मनोजकुमारऐवजी दिलीपकुमारसाठी उपयोगात आणावं, असा निर्णय झाला. परंतु, दिलीपकुमारसाठी महेंद्र कपूरचा आवाज योग्य वाटत नाही आणि स्वतः दिलीपकुमार रफीसाहेबांच्या आवाजाला प्राधान्य देत असल्याने ते गाणं पुन्हा नव्याने रफीसाहेबांच्या आवाजात नौशादजींनी ‘रेकॉर्ड’ केलं. अशा प्रकारे महेंद्र कपूरची एका सुंदर चाल व शब्द असलेल्या गाण्याची संधी हुकली.

‘वक्त’च्या टायटल साँगच्या वेळेस  बी. आर. चोप्रा आणि रफीमध्ये काही गैरसमज झाले होते, कारण  नया दौरच्या यशाबद्दल ओ.पी. नय्यर, बी. आर. चोप्रा आणि रफी यांच्यात काही तेढ निर्माण झाली होती. त्यामुळे ओ.पी. ने आणि बी. आर. चोप्रा यांनी रफीला गाणी न देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मधल्यामधे संगीतकार रवी यांची कोंडी  झाली कारण त्यांनी ते टायटल साँग भैरवीत गुंफलेले होते. या गाण्याकरिताही चोप्रांनी मन्नाडे उपलब्ध असूनही महेंद्र कपूरकडूनच गाऊन घ्यायचे ठरवलं. पण मोठ्या मनाच्या महेंद्र कपूरने रवींच्या मनातले भाव ओळखून विनंती आर्जवे करून या गाण्यासाठी रफीलाच पाचारण करायला लावलं. पुढे ते गाणं रफीच्या अनेक अजरामर गाण्यात गणले गेलं.

त्याच्यातल्या गुणी माणसाचा एक किस्सा असाही आहे, “बहारें फिर भी आयेंगी” या चित्रपटाच्या म्युझीक रिलीजला उपस्थितांनी महेंद्र कपूरची तारीफ केली. फक्त ओ.पी.नय्यर बोलून गेले की “मेरा रफी होता तो और भी मजा आता”. कुठलाही यशस्वी गायक हे ऐकून उलट प्रतिक्रिया देऊ शकला असता पण महेंद्र कपूरने कोणतेही आढेवेढे न घेता त्याला सहमती दर्शवत म्हटलं, “कहां रफीसाब और कहां मै”. आधी तो एक सृजन आणि संवदेनाशील व्यक्ती होता, नंतर एक गायक होता.

कोणी काहीही म्हणो, ‘निकाह’मधल्या “बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी…” ह्या गीताप्रमाणे त्यांच्या आयुष्यात गायकीची एक कसक आयुष्यभर त्यांच्या सवे राहिली हे खरे ! ‘तुम अगर साथ देने का वादा करो मै युही मस्त नग्मे लुटाता रहूं… ‘ असं तो रसिकांसाठी गायला अन रसिकांनी त्याला तितकी सकल साथ दिली नाही. त्याचे जीवनसूत्र मात्र काहीसे असेच राहिले की, “न मुह छुपाके जियो और न सर झुकाके जियो…..”

इतर गायकांच्या तुलनेत काहीशा उपेक्षित राहिलेल्या ह्या गुणी गायकाने अन त्याच्या अवीट गोडीच्या  गाण्यांनी आपल्या आयुष्यात काही क्षणांचा विरंगुळा दिला आणि आपण त्याची कदर करत नसू तर आपल्याला कृतघ्न म्हणणं काहीसं योग्य असेल, नाही का ?

— समीर गायकवाडAbout समीर गायकवाड 155 लेख
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…