नवीन लेखन...

लाईफ ऑनबोर्ड

जहाजावरून परत आल्यानंतर जे कोणी ओळखीचे भेटतील त्यांचा पहिला प्रश्न , कधी आलास? आणि नंतरचा प्रश्न जो आपसुकपणेच विचारला जातो तो म्हणजे, मग आता परत कधी जाणार? त्याचप्रमाणे जहाजावर सुद्धा एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यावर जहाजपर नौकरी करने क्यूँ आया? हा ठरलेला प्रश्न.

खरं म्हणजे ह्या प्रश्नातून , बाहेर दुसरी नोकरी नाही का मिळाली आणि कशाला इकडे आयुष्य बरबाद करायला आला असे विचारण्याचा उद्देश असतो.

ज्युनियर रँक मध्ये असताना एकदा जहाजावर गेल्यावर पाच ते सहा महिने झाल्याशिवाय घरी यायला मिळत नव्हते आणि सिनियर रँक मध्ये आल्यावर तीन ते चार महिने मिळत नाही. सुट्टीच पण तसच पूर्वी पाच ते सहा महिने सलग सुट्टी घ्यायला मिळायची. तरीसुद्धा तीन ते चार महिने सलग सुट्टी एका वर्षात दोन वेळा मिळते. कामाचा त्रास आणि स्ट्रेस दोन्ही सहन करता येत पण घर आणि जवळच्यांपासून लांब राहणं नाही सहन करता येत. आपले संस्कार आणि कौटुंबिक वातावरण हे घरापासून लांब राहण्यासारखे नसतातच. घरापासून लांब कोणीही राहू शकेल पण जवळच्यांपासून नाही राहू शकणार. फार फार तर आठ ते दहा दिवस जमेल पण माहिनोंमहिने नाही राहवणार. खायला प्यायला आणि राहायला कितीही चांगलं मिळालं तरी जवळच्यांपासून लांब राहता येत नाही. ड्युटीचे तास संपले की जहाजावर प्रत्येकजण आपापल्या स्वतंत्र केबिन मध्ये जातात. सिनियर रँक मध्ये डे रूम आणि बेडरूम अशा दोन खोल्या तरी असतात पण खालाशांना आणि ज्युनियर ऑफीसर यांच्या केबिन या सिंगल सेल्फ कन्टेन्ट रूम अशाच असतात रूम मध्ये बेड सोबत एक टेबल, फ्रीज, एक सोफा आणि एक पोर्ट होल म्हणजेच खिडकी असते. ज्युनियर इंजिनीयर असताना एकदाच साडेआठ महिने आणि एकदा साडेसहा महिने याखेरीज पाच महिन्यांपेक्षा जास्त वेळ जहाजावर राहायची वेळ आली नाही. हल्ली तीन ते जास्तीत जास्त चार महिने एवढंच राहायला लागतं. पण जहाजावर चढल्यापासूनच दिवस मोजायला सुरवात होते केबिनमधल्या कॅलेंडरच्या पूर्ण झालेल्या दिवसावर काट मारल्याशिवाय चैन पडत नाही. जस जसे काट मारलेले दिवस आणि महिने वाढत जातात तस तसं बरं वाटायला लागतं. ज्या दिवशी काम नसेल किंवा कमी असेल तो दिवस अक्षरशः खायला उठतो. एक दिवस सुद्धा हात काळे झाल्याशिवाय जात नाही. उलट हात तेल किंवा ग्रीसमुळे काळे झाले नाही किंवा काम नसलं कि घरच्यांची आठवण जरा जास्तच येत राहते. मुलगी काय करत असेल मुलगा काय करत असेल या विचारांनी व्याकुळ व्हायला होत. सण आणि उत्सव आले की वाईट वाटतं. आनंदाचे आणि सुखाच्या क्षणांना मुकल्यासारखं वाटतं. घरात एखादं कार्य असलं आणि आपण जहाजावर असलो की आपल्याशिवाय कार्य उरकलं जातंय या कल्पनेने निराश व्हायला होतं. जवळ असलो कि जवळच्यांचा आपलेपणा जाणवत नाही. जवळच्यांचा आपलेपणा जाणण्यासाठी त्यांच्यापासून एकदा तरी प्रत्येकाने दूर आणि एकटं राहून बघितलं पाहिजे. घरादारापासून सहा महिने लांब राहणे म्हणजे घरादारापासून तुमच्या आयुष्यातले सहा महिने डिलीट केल्यासारखेच असतात.

कधी कधी हवामान खराब झाले की झोप लागत नाही. कधी कधी इंजिन मध्ये बिघाड झाल्यावर दुरुस्ती करून चालू केल्यानंतरही रात्रभर व्यवस्थित चालेल कि नाही या चिंतेने झोप लागत नाही. कधी रात्री एकसारखे इंजिन किंवा इतर माशीनरीचे अलार्म वाजत राहिल्याने झोप लागत नाही. कधी कधी जहाजावर येणारे इंस्पेक्शन किंवा ऑडिट पास होईल की नाही याच्यामुळे झोप लागत नाही. पण मुलांच्या आणि घराच्या आठवणीने जहाजवर आल्यापासूनच रोजची झोप उडालेली असते. अनेक देश आणि अनेक शहरं बघायला मिळतात ते सर्व एकट्याने बघताना आनंद मिळतो पण सुख नाही मिळत. खरं सुख हे आपल्या घरातच आणि आपल्या जवळच्यांमध्येच राहून मिळतं. जहाजावर येणारा प्रत्येक अधिकारी आणि खलाशी स्वतःच मन मारून आणि इच्छेविरुद्ध नोकरी करत असतो. त्याला मिळणारा पगार हे एकमेव कारण असतं ज्यासाठी तो स्वतःच घरदार सोडून येतो. माहिनाभरापासून जहाजाच्या फ्रीज रूम मध्ये गोठवलेले चिकन, मासे आणि भाज्या तसेच कुक बनवेल ते जेवण खाऊन दिवस काढावे लागतात. कुक चांगला असेल तर ठीक नाहीतर जेवणाचे खूप हाल होतात.

जहाजावरील जीवन आता पूर्वीसारखं राहील नाही पूर्वी एखाद्या बंदरात जहाज अनेक दिवस राहायचं त्यामुळे सगळयांना बाहेर जायला मिळायचं. ताण तणाव खूप कमी असायचे कारण इंस्पेक्शन ऑडिट वगैरेची फारशी भानगड नव्हती. पण हल्ली पर्यावरण रक्षण आणि पर्यावरणाचे कायदे व नियम एवढे कडक केले आहेत की प्रदूषणाच्या नावाखाली एखाद्या देशात कारवाई झाली की पहिले जेल मध्ये मग इतर चौकश्या अशी वेळ येते. पूर्वी कोणत्याही देशात बाहेर फिरण्यासाठी आडकाठी केली जात नसे. परंतु अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाल्यापासून सगळ्याच देशांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून जहाजावरून उतरू दिले जात नाही. बंदरात जहाज एक दिवसापेक्षा जास्त थांबत नाही कारण कार्गो लोंडिंग आणि डीसचार्जिंग खूप वेगात केलं जातं. जहाज म्हणजे एक चालत फिरता बॉम्ब असतो इंजिन रुम मध्ये तर स्टीम आणि गरम फ्युएल लाईन्स म्हणजे निखाऱ्यांसारख्या असतात स्पर्श झाला रे झाला की लगेच गंभीरपणे भाजायला होतं. एखाद्या स्टीम किंवा फ्युएल लाईन जवळून जात असताना ती फुटली किंवा लिक झाली तर त्यातून बाहेर उडालेल्या गरम तेलामुळे किंवा वाफेमुळे जीव गमावण्याची भीती असते. लाखो टन इंधन किंवा क्रूड ऑईलने भरलेल्या जहाजाच्या टाक्यांमधून सतत ज्वलनशील गॅसेस बाहेर येत असतात त्याचमुळे तेलवाहु जहाजाला चालत्याफिरत्या अणुबॉम्बची उपमा दिली जाते.

सोमालिया किंवा नायजेरिया या प्रांतातुन जातांना समुद्री चाच्यांची भीती असते. एवढ्या प्रगत काळात सुद्धा समुद्री चाचेगिरी होते कारण जहाज आणि इतर प्रगत राष्ट्रांप्रमाणे समुद्री चाच्यांचे गट सुद्धा प्रगत झाले आहेत. मागील काही वर्षात जहाज अपहरणाच्या घटना जरी कमी झाल्या असतील तरी भीती आणि दहशत अजून देखील कायम आहे. पूर्वी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यावर कंपनी वेळेवर घरी पाठवायची परंतु आता कॉस्ट कटिंग, व्हिसा आणि इतर प्रक्रिया पूर्ण करता करता कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊनसुद्धा महिनाभर जास्त वेळ जहाजावर थांबवण्यात येत. एवढं सगळं असूनसुद्धा जहाजावर काम मिळत नाही म्हणून लाखो रुपये फी भरून अभ्यासक्रम पूर्ण केलेले कितीतरी तरुण नोकरीची संधी मिळावी म्हणून धडपडत असतात. काहीजण तर एजंटला लाखो रुपये देऊन जहाजावर चढण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. जहाजावर नेहमी असं बोललं जात कि जहाज किसी के लिये रुकता नही. तुम्ही काम करा किंवा नका करू. तुम्हाला नसेल करायचं तर तुमच्या ऐवजी दुसरा कोणीही येईल आणि जहाज चालू ठेवील. जहाज कधी कोणासाठी थांबत नाही.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर,
कोन, भिवंडी,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..