नवीन लेखन...

लग्न; समस्या की समोसा?

‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे. विचारवंत आणि तत्ववेत्ते यांच्या ‘चिंता करीतो विश्वाची’ या अवस्थेतून हे ज्ञान प्राप्त झालं असावं, यात शंका घेण्यासारखं काहीच नाही. थोर व्यक्तींच्या या वचनाला कुठेतरी सत्याचा आधार असणार याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही..

मनगट आणि बुद्धी यांचा उपयोग आपापल्या वकुबाने सगळेच करत असतात. सगळेच नरपुंगव मनगटाचा वापर बुद्धीने करतात असं नाही, परंतू मनगट हीच बुद्धी मानणारे मात्र बरेच जण आढळतील. बुद्धी आणि मनगट यांचा समान मात्रेत वापर करणारे मात्र फार तुरळक असतात. हे बहुतेक देवासारखे असतात. देव कसा, आहे असं सर्वजण समजतात पण तो दिसत कुणालाच नाही, तसं.

पण जीवनात अशीही काही क्षेत्र असतात, की जिथं या दोघांचाही वापर करता येत नाही. ‘लग्न’ हे असंच एक क्षेत्र. आता ‘मनगट आणि बुद्दी’ यांचा वापर करुन जगातील सर्व समस्या सोडवता येतात हे तत्व मांडणाऱ्या विचारवंतांनी ‘लग्न’ केलं होतं की नाही, हे खात्रीलायक समजत नाही. हे वाक्य जर खरंच स्वामी विवेकानंदांचं असेल, तर त्यांनी मात्र लग्न केलेलं नव्हतं हे सर्वांना माहित आहे. आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी ‘मनगट आणि बुद्दी’ यांचा वापर करुन जगातील सर्व समस्या सोडवता येतात, असं म्हटलं असावं. परंतु वाक्य विवेकानंदांच आहे म्हटल्यावर त्यावर गंभीरपणे विचार करणं ओघानेच येतं. विचारांती मी या वाक्याशी अर्ध सहमत झालो.. ‘लग्न’ हे आयुष्यातलं एकमेंव क्षेत्र असं आहे, की जिथे बुद्धी कामाला येत नाही आणि मनगट तर नाहीच नाही. बुद्धी, अपरिपक्व आणि पूर्णपक्व अशी दोन्ही प्रकारची, तर चक्क शरणागती पत्करताना दिसते. लग्नाची नव्याची नवलाई ओसरली, की कुठे बुद्धी गहाण ठेवली नि लग्न केलं, असं बऱ्याच जणांना, विशेषत: पुरुषांना वाटतं. हे जाहीररित्या कबूल करण्याची डेअरींग, अगदी जीवघेणी खेळ खेळणारी पोलादी मनगटेही करणार नाहीत, पण खाजगीत मात्र बरेचजण याची कबूली देतील. त्यामुळे मनगटावर बोलण्यासारख काहीच नाही. हां, बुद्धीचा थोडा वापर करता येऊ शकतो, पण तीचं अकलेत रुपांतर करून. केवळ बुद्धीने या समस्येवर मार्ग नाहीच काढता येत. म्हणून मी विवेकानंदांशी अर्धाच सहमत झालो होतो.

बुद्धी आणि अक्कल हे दोन्ही शब्द जरी आपण एकाच अर्थाने वापरत असलो, तरी त्यात एक सूक्ष्मसा, परंतु अत्यंत महत्वाचा फरक आहे. बुद्धी जन्मजात आणि सर्वांनाच असते, अक्कल मात्र काही काळाने आणि अनुभवाने येते (येतेच असंही नाही). या अकलेचा वापर करून लग्न समस्येचा सामोसा करून खाता येतो. मनगट मात्र अगदीच कुचकामी. मनगटाचा उपयोग फार तर लग्न विधीनंतरचे पिवळे धागे (ह्यांना खोडा म्हटलं तर चालेल का?) बांधायला कामी येत असावं. ‘खोडा’ ह्या शब्दावरून मला दुर्गाबाई भागवत आठवल्या. त्यांना एका आदिवासी बाईने सांगितलं होतं, की जगातल्या प्रत्येक बाईला नवरा म्हणून कुठचं न कुठचं जनावर मिळतं (हा लेख वाचणाऱ्या स्त्रियांनी आपलं खरं मत नोंदावाव). कुणाला रेडा मिळतो, कुणाला बैल तर कुणाला आणखी कुठले तरी चार पाय मिळतात. त्या बाईला गाढव मिळालं होतं. माणसं फार कमी बायकांना मिळतात, असं त्या भाबड्या आदिवासी बाईने दुर्गाबाईना सांगितलं होतं. (संदर्भ – ऐसपैस गप्पा दुर्गा बाईंशी- लेखिका प्रतिभा रानडे). ह्या वाक्यानेही मला बरच काही शिकवलं. आमच्याकडे पोटात पाय असलेली गोगलगाय फार फार आवडते..गाढवासारखी लाथा झाडण्याचीही भिती नाही.

आता मी जे माझं चिंतन मांडणार आहे, ते ‘लग्न ही समस्या आहे’ असं समजणाऱ्यांसाठी आहे (असं न समजणारे खरच अस्तित्वात आहेत?). लग्नाळू, नुकतच लग्न झालेल्या पहिल्या टप्प्यातील आणि आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्यांसाठी नाही. कारण या तिन अवस्थांपैकी, पहिल्या टप्प्यात वयापुढे अक्कल गहाण पडलेली असते आणि तिसऱ्या टप्प्यात अक्कल आलेली असते, पण सवयीने परावलंब्त्व आलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना लग्न ही समस्या आहे असं वाटलं, तरी ते तसं कबूल करू शकत नाहीत. अशांना माझी सहानुभूती आहे. म्हणजे माझं चिंतन वैवाहिक आयुष्याच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या लोकांसाठी आहे. पुन्हा हे पुरुषांसाठीच आहे, कारण स्त्री मनाचा थांग प्रत्यक्ष जग नियंत्यालाही लागलेला नाही, तिथे माझ्यासारख्या क्षुद्र अज्ञान्याची काय कथा..?

लग्न झाल्यानंतरच्या काही वर्षांनी नव्याची नवलाई ओसरली, की आपल्याला अक्कल नाही असं सुरुवातीला आडून आडून आणि त्यानंतर लगेचच काही वर्षांनंतर चक्क तोंडावरही ऐकायला येऊ लागतं. सुरुवातील हे ऐकल्यावर राग येतो, पण शेपटी फुगवून फिस्कारणाऱ्या मांजरीपुढे (इथे मिशा वजा करुन चित्र डोळ्यांसमोर आणावं) बोका जसा दूर जाऊन शेपटी जमिनिवर आपटत गुमान गुरगुरत बसतो, तसं करण्याशिवाय पर्याय नसतो. हे ज्याला कळले, तो बुद्धिमान पुरुष. अनेक नरपुंगव आपल्याला अक्कल नाही असं म्हटल्यावर आकाश पाताळ एक करतात, पण ‘पातळा’वर त्याचा ढिम्म परिणाम होत नाही. बुद्धिमान पुरुष मात्र जात्याच मिळालेल्या बुद्धीचा वापर करून मांजरीच्या या फिस्कारण्यात ज्ञान शोधतात आणि ‘आपल्याला अक्कल नाही’ ह्या ज्ञान प्राप्तीची नम्रपणे कबुली देऊन टाकतात. ज्ञान माणसाला नम्र बनवते ते असं (वाटल्यास माझं फेसबुक किंवा व्हाट्सॲपचं स्टेट्स पाहावं.) जाहीर करून टाकतात. इथे बुद्धी वापरण्याची बुद्धी फार म्हंजे फार कमी जणांना होते. मला झालीय.

तसं, जगातील कोणतही लग्न हे नवरा-बायकोच्या एकमेकांविषयी असणाऱ्या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असतं. आपल्याला एकदा का अक्कल नाही हे कबुल करून समोरच्या पक्षाचा तसा (गैर)समज करून देण्यात आपण एकदा का यशस्वी झालो, की मग लग्न ही समस्या न राहता सामोस्यासारखी चटकदार चीज होऊन जाते. हा ताण मॅनेजमेंटसारखा व्यवस्थापनाचा प्रकार आहे. इथे बुद्धीचा वापर चतुराईने करावा लागतो. भले भले इथेच चुकतात आणि समस्या गळ्यात घेऊन बार मध्ये शिव्या (स्वत;लाच) देत घुट घेत बसतात. ज्या संसारात नवऱ्याला स्वत:चं मत नाही, तो पृथ्वीतलावरचा सर्वात सुखी संसार आहे असं समजण्यास काहीच हरकत नाही..सर्वच सुखी दिसणाऱ्या दिसणाऱ्या संसाराचे हे गुपित असावं, हे मला माझ्या लग्न या विषयावरच्या चिंतनातून मिळालेंलं सार्वकालिक सत्य ज्ञान आहे. जे बुद्धी आणि मनगट याचा वापर करतात, त्यांच्या घरात मात्र भारत –चिन सिमेसारखी न सुटणारी समस्या निर्माण होते.

अक्कल वापरून चटकदार सामोसा गळ्याखाली उतरवून ढेकर द्यायचा, की टकलावर समस्या घेऊन फिरायचं, हे ठरवायला अक्कल कमी येते, बुद्धी नाही.. ‘उस मियां बिबी मे इतनी अच्छी दोस्ती है, की शादी भी उनका बाल बांका नही कर सकी..!! या विनोदी वाक्यातला खोल गंभीरपणा ज्यांना समजला, ते यशस्वी नवरे.

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..