नवीन लेखन...

लाघवी करस्पर्श (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४२)

मी तिचं नाव तेव्हा ऐकलंच नव्हतं पण माझ्या विचारांत ती मला लाघवी करस्पर्श म्हणूनच आठवते.
किती जादू होती तिच्या हातांत!
केवळ आश्चर्यकारक.
कधी आणि कुठे, हे महत्त्वाच नाही पण केव्हा तरी एकदा मी माझ्या भ्रमंतीमधे एका विरळ लोकवस्तीच्या जिल्ह्यातून जात असतांना अचानक रात्र झाली.
मी चालत जात होतो त्यामुळे आता ज्या गांवात मला पोहोचायचे होते, तिथे पोहोचणे शक्यच नव्हते.
आजच्या रात्रीपुरता जवळपास आसरा शोधणं भाग होतं म्हणून मी प्रथमच जे साधं छोटं घर दिसलं त्याच्या दरवाजावर ‘टक टक’ केलं.
मी जेव्हा त्या घराजवळ पोहोचलो तेव्हां संधिप्रकाश संपून काळोखी रात्र सुरू झाली होती आणि खिडक्यांना पडदे नसल्याने त्यांमधून दिसणारा मंद, प्रसन्न प्रकाश मला ह्या घरांत आराम आणि आनंद मिळेल याची खात्री देत होता.
मी ज्या मुख्य रस्त्यावरून पाय ओढत चाललो होतो त्यापासून ते घर थोडं आत होतं. घराला छोटंस कुंपण होतं.
मी बाजूला वळून कुंपणाच्या लाकडी बिजागराला कसंबसं लोंबकळत असलेलं छोटं फाटक ढकलून आंत घराजवळ गेलो.
ते फाटक परत बंद झाल्याचा आवाज येण्याच्या आधी मी घराच्या अंगणात पोहोचलो होतो आणि माझ्या येण्याची चाहूल लागलेली एक शिडशिडीत किशोरवयीन मुलगी माझी वाट पहात उभी होती.
दार बंद झाल्याचा आवाज झाला आणि जणू त्याचा प्रतिध्वनी यावा तसा कुत्र्याच्या तीव्र भुंकण्याचा आवाज आला आणि एखादं भूत वगैरे अचानक अवतरावं तसा एक मोठ्ठा कुत्रा अकस्मात तिथे उगवला.
मी तो जंगली कुत्रा नीट पाहू शकेन अशा अंतरावर होतो आणि मला दिसत होते की तो माझ्यावर उडीच घेण्याच्या पवित्र्यात होता.
त्याचं लांडग्यासारखं गुरगुरणं खरंच भयकारक होतं.
तो आता नक्की उडी घेणार असं वाटत असतांना एक हलका हात त्याच्या मानेवर फिरला व त्या मुलीने हलक्या आवाजात एखादा शब्द उच्चारला.
“घाबरू नका, तो कांही करणार नाही.” मला एक गोड, मंजुळ आवाज ऐकू आला.
मी थोडा पुढे आलो पण माझ्या मनांत त्या मुलीच्या त्या कुत्र्यावरील हुकमतीबद्दल शंका होती.
अजून त्या कुत्र्याच्या जाडजूड मानेवर तिचा नाजूक बालिश हात होता परंतु कुत्र्याने माझं तिथे येणं अद्यापही पसंत केलं नव्हतं आणि तो भूंकून असमाधान व्यक्त करत होता.
ती मुलगी हुकुमत गाजवणा-या आवाजात नाही तर अत्यंत लाघवी आवाजात पण आपली आज्ञा मानली जाईलच अशा खात्रीने कुत्र्याच्या मानेवर गोल हात फिरवत म्हणाली, “टायगर, आंत जा.” आणि क्षणात तो भयानक कुत्रा गुपचूप आत निघून गेला.
“कोण आहे तो?” आंतून कर्कश्श आवाज आला आणि कुत्र्याची जागा एका आडदांड माणसाने घेतली.
“कोण आहेस तू? कायं हवय तुला?” त्या माणसाने तिरस्कार आणि अडवणूक करणा-या स्वरात विचारलं.
त्या मुलीने आपल्या लाघवी करस्पर्शाने हलकेच त्या आडदांड माणसाचा हात दाबला आणि ती थोडी त्याच्याकडे झुकली.
मी विचारले, “इथून ……गांव किती दूर आहे?”
हा प्रश्न मलाच फार योग्य वाटत नव्हतां पण बोलायला सुरूवात करणे आवश्यक होते.
“………गांव म्हणतां! तें इथून सहा मैल दूर आहे.” तोच आडदांड माणूस म्हणाला पण आता त्याचा आवाज अतिशय सौम्य होता आणि मगासच्या अडवणूकीचा मागमूसही त्यात नव्हता.
मी म्हणालो, “बरंच दूर आहे तर! मी ह्या भागांत नवा आहे आणि मी चालत निघालो आहे. मला जर सकाळपर्यंत रहायला जागा द्याल तर फार उपकार होतील.”
त्या मुलीने हात वर नेऊन आता त्या माणसाच्या खांद्यावर ठेवल्याचे मला दिसले आणि त्याच्या अधिक जवळ गेली.
तो म्हणाला, “आत ये. बघू काय करता येईल ते?”
त्याचा आवाज आता पार बदलला होता.
तो मी त्या खोलीत प्रवेश केला.
तिथे उष्णतेसाठी एक छोटी शेकोटी होती.
शेकोटीजवळ बसलेले दोन गुटगुटीत मुलगे माझ्याकडे रागाने पहात होते.
मध्यम वयाची एक स्त्री टेबलाजवळ उभी होती.
मुलं मांजरीच्या पिल्लाबरोबर खेळत होती.
माझं नकारात्मक स्वागत करणारा तो आडदांड माणूस म्हणाला, “अग, तो प्रवासी आहे, त्याला आजची रात्र जागा हवी आहे.”
ती स्त्री माझ्याकडे संशयाने पहात म्हणाली, “आम्ही इथे हाॅटेल चालवत नाही.”
मी म्हणालो, “ते मला माहित आहे पण मला ……गांवला जायचे आहे आणि आता फार रात्र झाली आहे.”
तो माणूस म्हणाला, “थकलेल्या आणि चालत जाणा-या प्रवाशाला ते अशक्यच आहे. तेव्हा अधिक बोलण्यात कांही मतलब नाही. आपण त्याला झोंपायला जागा द्यायलाच हवी.”
एवढ्यामधे ती मुलगी अलगद कधी त्या स्त्रीच्या जवळ पोहोचली होती हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं.
ती त्या स्त्रीला हलक्या आवाजात काय बोलली तेंही मला ऐकू आलं नाही पण मी हे पाहिलं की बोलतांना तिचा लाघवी हात त्या स्त्रीच्या हातावर होता.
त्या करस्पर्शात काय जादू होती कुणास ठाऊक पण आता त्या स्त्रीच्या स्वरांतला तिटकारा जाऊन ती स्वागत करणा-या स्वरांत म्हणाली, “हो, …….. गाव इथून फार दूर आहे. आम्ही करू कांहीतरी सोय. तुम्ही जेवलात कां?”
मी म्हणालो, “नाही.”
अधिक कांही न बोलता त्या स्त्रीने एक भिंतीत बसवलेलं टेबल खाली आडवं केलं आणि त्याच्यावर भाकरी, चटणी, भाजी, लोणचं, पापड ह्यांनी भरलेलं ताट व एक दूधाचा प्याला ठेवला.
ही सर्व तयारी होत असतांना मला बारकाईने निरिक्षण करायला वेळ मिळाला.
मी वर्णन केलेल्या त्या मुलीच्या आणि घरांतील इतरांच्या मधे वरवर खूप फरक वाटत होता पण मला जाणवलं की ती स्त्री आणि मुलगी ह्यांच्यात साम्यही होतं.
त्या स्त्रीचा चेहरा आता टक्के टोणपे खाऊन रापलेला वाटत होता तरीही नक्कीच ती त्या मुलीची आई होती.
मी जेवायला सुरूवात केली तोच ते जमीनीवर बसलेले दोघे मुलगे आपापसात मोठ्या आवाजात भांडू लागले.
वडील मोठ्याने दरडावत एका मुलाला म्हणाले, “जगन, जा, आता जाऊन झोपा बघू.”
जगनला ते ऐकू न येण्याचा प्रश्नच नव्हता पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले.
वडील पुन्हा रागाने ओरडले, “ऐकलं ना मी काय सांगितलं ते? मुकाट्याने जा बघू आत.”
जगन कुरकुरत ओरडला, “मला नाही जायचं आत!”
वडिल पुन्हां म्हणाले, “मी सांगतो ना, निघ पाहू.”
पण दोन्ही मुलांनी आत जाण्यासाठी कांही हालचाल केली नाही.
जगनच्या चेह-यावर बंडखोरी स्पष्ट दिसत होती.
आता प्रकरण चिघळणार आणि मुलांना मार खावा लागणार असं वाटत असतांनाच बहीण, म्हणजे ती मुलगी, त्या मुलांजवळ गेली आणि वांकून दोघा भावांचे हात तिने हातात घेतले.
तीने शब्दही उच्चारला नव्हता पण ती मुलं आज्ञाधारक असल्यासारखी उठली. त्यांच्या चेह-यावरील हटवादीपणा झटकन मावळला आणि ती आत निघून गेली.
मी जेवण संपवल तेवढ्यात एक शेजारी आत आला.
तो घरच्या मालकाबरोबर राजकारणावर व बातम्याबद्दल बोलू लागला.
त्या चर्चेत संवादापेक्षा आपलं मत ठाम मांडणच जास्त होतं.
माझ्या मालकाचे विचार सुस्पष्ट नव्हते तर शेजारी शब्दबंबाळ आणि अघळ पघळ बोलणारा होता.
अशा चर्चेत नेहमी होतं, तेंच झालं.
माझा मालक थोड्याच वेळात चिडला व शेजा-याला अद्वातद्वा बोलू लागला आणि शेजारीही त्याच भाषेत अधिकच भडकवणारी उत्तरं देऊ लागला.
त्यावेळी मला पुन्हा त्या लाघवी करस्पर्शाचा साक्षात्कार झाला.
ती हलकेच कधी आपल्या वडिलांजवळ जाऊन पोहोचली होती, तेही मी पाहिलं नव्हतं पण आता तिचा हात हलकेच वडीलांच्या कपाळाला स्पर्श करून त्यांच्या केसांत हलकेच गोल गोल फिरू लागला होता.
तिच्या वडिलांचा आवाज हळू हळू खाली येत गेला व त्यातला कडवटपणा संपला. वाद चालूच होता.
जेव्हां जेव्हा वडिलांचा आवाज वाढत असे किंवा त्यांच्या तोंडून रागाने एखादा कडवट शब्द बाहेर येई, तेव्हा तेव्हा ती मुलगी आपला हात त्यांच्या केसांत हलकेच फिरवू लागे.
ते फारच छान दृश्य होतं.
मी ते पाहून, सर्वांच्या हृदयांना नकळत भारून टाकणा-या, त्या हलक्या करस्पर्शाच्या ताकदीचा विचार करून अत्यंत आश्चर्यचकीत झालो.
तिला तिथे उभी पहातांना ती परमेश्वराने माणसाच्या सहज भडकणा-या भावनांना शांत करण्यासाठी पाठवलेली शांततेची देवताच वाटत होती.
ती दुर्दैवाने चुकीच्या ठीकाणी होती.
उध्दट आणि भडक वृत्तीच्या लोकांकडे, ज्यांना अशा आर्जवी, सहज शांत करणा-या आणि क्षणात माणुसकी निर्माण करणा-या स्पर्शाची गरज आहे, त्यांचा मी विचार करत होतो.
त्या संध्याकाळी नंतरही मी अनेकदा त्या आर्जवी करस्पर्शाची आणि तशाच मृदू पण हुकूमी आवाजाची ती ताकद मी पहात होतो.
सकाळी न्याहरी झाली.
मी निघायच्या तयारीत होतो.
तेव्हा घरचा मालकाने मला अर्धा तास थांबायला सांगितलं.
थोड्या वेळाने त्यांची घोडागाडी कांही कामासाठी तिकडेच जाणार होती.
मीही त्यातून यावं, असं तो म्हणाला. मी आनंदाने त्याच आमंत्रण स्वीकारलं.
कांही वेळाने त्यांची गाडी घराबाहेरच्या रस्त्यावर आणली गेली.
मला गाडीत बसायला सांगण्यात आले.
मी गाडीत बसतांना घोड्याकडे नजर टाकली.
तो तट्टू चांगला सशक्त होता पण जरा नाठाळ वाटत होता.
जेव्हा मालक येऊन माझ्या बाजूला बसला तसं सर्व कुटुंब आम्हाला निरोप द्यायला बाहेर आलं.
लगाम हातात घेत मालक म्हणाला, “चल, मोती” आणि त्याने लगामाला हिसका दिला.
पण मोती जागचा हलला नाही.
मालक म्हणाला, “मोती, काय मस्ती आली कां?” आणि त्याने चाबकाचा आवाज मोतीच्या कानाजवळ काढला.
तरीही मोती ह्या दुस-या धमकीवजा विनंतीनेही हलला नाही.
तो तसाच अवज्ञा करून उभा राहिला.
मग मालकाने संयम सोडून पुढला कोरडा मोतीच्या पाठीवर ओढला.
लागल्यामुळे मोती जरा हलला पण त्याने पाय पुढे टाकला नाही.
मालकाने आणखी पाच सहा कोरडे ओढले पण मोती जागच्या जागीच उभा राहून मार खात होता.
मग घरातला गुटगुटीत मुलगा पुढे आला आणि मोतीच्या तोंडावरचा पट्टा पुढून धरून त्याला ओढू लागला. तोंडाने तो अशा वेळी वापरण्यांत येणा-या शिव्याही देऊ लागला.
मोतीने ह्या नव्या शत्रूला तोंड देण्यासाठी पाय जमिनीवर एका विशिष्ट कोनात रोवले व तो अधिकच हट्टाने उभा राहिला.
मुलाने मोतीच्या नाकावर ठोसा मारला व क्रूरपणे त्याचा लगाम पुढून खेचू लागला. त्याने कांही फरक पडला नाही.
मोती अशा उपायांना दाद देण्याच्या मन:स्थितीत नसावा.
आतून तो मधुर आर्जवी आवाज आला, “जगन, असा मारू नकोस त्याला.”
मी मान वळवली.
ती मुलगी फाटकातून बाहेर येतांना दिसली.
पुढच्या मिनिटाला तिने जगनचा हात धरून त्याला घोड्यापासून दूर केला होता.
त्या मुलाला दूर करायला तिने जराही ताकद वापरली नव्हती.
तिने त्याचा हात धरताच तो आज्ञाधारकपणे तिचे सगळे ऐकायला तयार होता.
त्याने तिला थोडासाही विरोध केला नव्हता.
मग तो मऊ हात मोतीच्या मानेवर जरा खाजवत होता आणि ती हलक्या आवाजात मोतीशी दोन शब्द बोलली.
मोतीचा सारा नाठाळपणा झटकन निघून गेला.
ती म्हणाली, “बिच्चारा मोती!”
मग त्याचा तोंडावरील पट्टा तिने पुढल्या बाजूने धरला व कृतक कोपाने म्हणाली, “बरं बरं! ए अडेलतट्टू, आता जा बाबांबरोबर!”
मोती आपली मान तिच्या दंडाला घासत होता.
तिच्या तोंडचे शब्द ऐकताच कान ताठ करून तो अशी सुंदर दौड करत निघाला की जणू कांही त्याने कांही हट्ट केलाच नव्हता.
जसे आम्ही निघालो तसा मी माझ्या बरोबरच्या मालकाला म्हणालो, “किती आश्चर्यकारक ताकद आहे त्या लाघवी करस्पर्शामधे!”
त्याने क्षणभर माझ्याकडे आश्चर्याने पाहिले मग माझ्या बोलण्याचा आशय त्याच्या लक्षात आला.
तो म्हणाला, “ती फार चांगली आहे. प्रत्येकजण आणि प्रत्येक गोष्ट तिच्यावर प्रेम करते.”
ते तिच्या ताकदीचं रहस्य होतं कां?
तिच्या अंतरंगाची ओळख तिच्या लाघवी करस्पर्शातून अगदी नाठाळ जनावरालाही होत होती कां?
तिच्या वडिलांचे सांगणे अर्थातच खरे होते.
तरीही मी तेव्हांपासून आतापर्यंत तिच्या हातातील जादूच्या ताकदीचा किती उपयोग होऊ शकला असता याची कल्पना करत असतो.
मी अशा ताकदीचा अनुभव इतरही कांही प्रेमळ आणि सद्गुणी व्यक्तींमधे घेतला आहे पण तिच्याइतका कधीच पाहिला नाही.
तिचं नाव मला माहित नसल्यामुळे मी तिला लाघवी करस्पर्श असंच म्हणतो. आपल्यापैकी किती कमी जण लाघवी करस्पर्श, नम्र शब्द, ह्यावर विश्वास ठेवतो. विशेषत: एखाद्या चांगल्या उद्दीष्टप्राप्तीसाठी बळकट इच्छाशक्ती मनांत बाळगून? अगदीच कमी जण, नगण्य.
तरीही जगांत अनेक चांगले मोठे बदल असेच गुपचूप, फार आवाज न करतां सुरूवातीला सामान्य वाटणा-या शक्तीच घडवून आणत असतात.
ह्या सर्वांत आपल्या सर्वांसाठी मोठा धडा नाही कां?

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – जेन्टल हॅंड

मूळ लेखक – मेरी रॉबर्टस राईनहार्ट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..