नवीन लेखन...

स्वयंपाकघरातील वेळेचे नियोजन

ओट्याशी उभं राहिल्यावर स्वयंपाक करताना वेळेचे नियोजन करुन आपल्याला वेळ वाचविता येतो. हा वेळ वाचविला तो प्रत्यक्ष स्वयंपाक करताना. पण स्वयंपाक करायच्या आधी बरीच पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील बराच वेळ जातो. सकाळच्या वेळी हा वेळ पूर्णपणे वाचवता आला तर? फारच सुखाचं होईल. स्वयंपाकापूर्वीची बरीचशी तयारी आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. पाहाता पाहाता आपण सहजपणे करु शकतो. त्यासाठी भाजी मात्र आधी आणलेली असायला हवी. आता भाजी खरेदीचेही नियोजन करता येते. पण ते नंतर पाहू. भाजी आणलेली असल्यास रात्री निवडून स्वच्छ करुन ठेवता येते. गवार, फ्लॉवर सारख्या भाज्या आधी खुडून, चिरुन ठेवल्यास सकाळचा वेळ वाचतो.

मिरच्यांची देठ काढून ठेवावीत. कोथिंबीर निवडून धुऊन कोरडी करुन ठेवावी. तोच प्रकार पालेभाज्यांसंबंधात, सकाळी फक्त जिरुन भाजी करायला वेळ लागत नाही. लसूण, कांदे सोलून ठेवणे, दुसर्‍या दिवशी उसळ करायची असल्यास ती सुध्दा रात्री निवडून फ्रीजमध्ये ठेवता येते. ज्यांची सकाळी डब्यांची घाई असते त्यांच्यासाठी ही तयारी म्हणजे चार हात असल्याप्रमाणे मदतगार ठरते. डबे नसणार्‍यांसाठी देखील सोयीचे होते.

भाजीबाजारात जाऊन भाजी आणणे हा काय नियोजनाचा विषय आहे का? असे म्हणून कोणी हसेल देखील. मग तसे पाहिले तर कोणताच विषय नियोजनाचा नाही. कामं कशीही होतातच आणि दिवस कसाही पार पडतोच. पण कसेही हे ज्याच्या प्रकृतीला खटकते नियोजन त्यांच्यासाठी असते. कामं व्यवस्थितपणे, ठराविक वेळेत आणि गोंधळ न होता पार पडली तर त्यातील मानसिक समाधान फार मोठे असते. असो, हं ! तर भाजीचं नियोजन ! यासाठी एक छोटी डायरी करा ज्यात आठवडाभराचं नियोजन लिहिता येईल. घरातील लोकांची आवड, बाजारात, ऋतुमानानुसार उपलब्ध भाज्या यांचा विचार करा. सोमवार ते रविवार एकेका भाजीचे नाव लिहा. भाज्यांचे सात प्रकार खरेदी केले की, आज काय भाजी करु? असा आठवड्याचा भाजीचा विषय मनाला त्रास देत नाही. यात भाज्या निवडताना पहिल्या दोन दिवसांसाठी दोन पालेभाज्या नंतर तीन दिवस तीन फळभाज्या आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी कांदे, बटाटे किंवा डाळीचे वडे असे नियोजन केल्यास रोज भाजीबाजारात जायचा वेळ वाचेल. भाजीबरोबर रोज एखादी उसळ ठेवल्यास उत्तमच. ती कोणती ते ही लिहून ठेवावे. भाजी आणताना आठवडाभरासाठी मिरच्या, कोथिंबीर, आलं, लिंब, लसूण, टमाटा, काकडी हे ही आणावे. सर्व निवडून फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टकते. वेळेला प्रत्येक पदार्थ हाताशी मिळतो.

कढई किंवा पातेले खूप गरम झाल्यावर त्यात फोडणीसाठी तेल घालू नये. तेल जळण्याची शक्यता असते आणि गॅस वाया जातो तो वेगळाच ! गॅसवर कढई ठेवण्यापूर्वी त्यात फोडणीचे तेल घालून कढई गॅसवर ठेवावी. म्हणजे पहिल्या क्षणापासूनच कढई बरोबर तेल तापायला सुरुवात होते. तसेच रवा, दाणे, तीळ, पोहे भाजताना कढईत आधी पदार्थ घालून मग कढई किंवा पातेले गॅसवर ठेवावे. भाजी फोडणीस टाकल्यावर हलवून परतून त्यावर ताट झाकून भाजी शिजवून घ्यावी. भाजी लवकर शिजते. भाजी शिजताना गॅस मंद ठेवावा. मधून मधून पाण्याचा शिपका मारावा. एकदाच भरपूर पाणी घालून भाज्या शिजवू नयेत. तसेच कोणतीही पालेभाजी फोडणीस घातल्यावर त्यावर झाकण ठेवू नये. पालेभाजीचा रंग बदलतो. पालकासारखी भाजी मिनिटभर गरम पाण्यात घालून मग गार पाण्यात लगेच घालून पिळून पाणी काढून चिरुन किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन भाजी करावी. पालेभाज्या करताना शक्यतो भाज्या शिजवून त्या सर्व पदार्थ घालून शेवटी वरुन फोडणी घालावी. पोळ्या करताना पीठात थोडंसं मीठ घालून कणिक कोमट पाण्यात भिजवून अर्धा तास तशीच ठेवावी. पोळ्या करताना कणकेला तेल लावून चांगली मळावी. पोळी लाटताना वरुन कमीतकमी पीठाचा वापर करावा. पोळ्या संध्याकाळपर्यंत मऊ राहातात.

— सौ. निलिमा प्रधान

Avatar
About सौ. निलीमा प्रधान 21 Articles
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..