नवीन लेखन...

खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर येतात ते इथल्या नारळी सुपारी , सुरुच्या बनानी नटलेले किहिम , नागाव, काशीद , मांडवा, चौल, कोरलई, नवगाव, आक्षी, सासवणे , थळ , वरसोलीचे . विस्तीर्ण समुद्र किनारे .

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे.

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी – उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले.

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभं रहातं ते सुंदर बिर्ला मंदिर , मराठीतला आक्षी गावातील शिलालेख, शिल्पकार श्री. करमरकरांचं सासवणे गावातील शिल्पालय आणि इतर प्रसिध्द मंदिरे.

अलिबागच्या रेवदंडा, चौल (चेऊल) , नागाव, आक्षी, वरसोली, थळ , किहिम , आवास या अष्टागरांविषयी आणि अलिबाग म्हणजेच पूर्वीच्या श्रीबाग विषयी आपण याआधी ऐकलं , वाचलं असेलच. नाही म्हणजे अलिबागला तसा बराच मोठा इतिहास आहे त्याविषयी लिहायचं म्हटलं तर लिहू तेवढे थोडेच. असो.

तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे परवा दि. १ मे च्या पूर्वरातीला आम्ही दादरहून जरा उशीरानेच निघालो ते दुर्गवीर प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थेच्या खांदेरी उंदेरी जलदुर्ग दर्शन मोहिमेसाठी. या मोहिमेचं नेतृत्व करत होती गीतांजली ताई लोकेगावकर . याआधीही तिने पद्मदुर्ग, खांदेरी उंदेरीच्या सफरी बर्याचदा केल्या आहेत. तर तिच्या परिचयात जास्त शब्द न दवडता मी पुढे सरकतो.

कान्होजी आंग्रे दिपस्तंभ

३० तारखेला रात्री साधारण पावणे बाराच्या सुमारास आम्ही २४ जणं बसने मुंबईहून अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झालो. पहाटे साधारण ४ वाजता आम्ही समुहातील अल्पेश पाटील या मित्राच्या अलिबागमधील घरी पोहोचलो. प्रवास म्हटला कि मला तशी झोप लागत नाहीच . गावात शिरलो तेव्हा बँजोचा आवाज येत होता. अल्पेशने सांगितलं गावात विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची यात्रा भरली आहे आणि त्याच यात्रेनिमित्त देवाची पालखी निघाली आहे तिचाच हा आवाज. मग काय गावची यात्रा जवळून पहाण्याची संधी कोण भटका सोडेल.

इतरांना झोपवून आम्ही तीन चार निवडक भटके देवळात गेलो. अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असणार्या विठुमाऊली अन् रखमाई माऊलीचं दर्शन घेतलं. पहाटेचे ४.३० वाजले होते. पालखी दारोदार जाऊन आरत्या अन् खणा नारळाचा मान
घेत होती. यात्रेतल्या दुकानदारांनी आपला बाजार आवरता घेतला होता. यात्रेत आल्याचं समाधान म्हणून कधी नव्हे ते पहाटे साडेचारला आम्ही आईसक्रिम खाल्लं. ते खाऊन झाल्यावर शरीराला क्षणभर आराम म्हणून अल्पेशच्या घरी अंथरुणावर विसावलो. साडेपाच वाजता गीतुताईने माझ्या नुकत्याच लागलेल्या झोपेवर आपल्या उठावाचा घाला घातला. मग काय नाईलाजाने उठावे लागले. आणि मग पहाटेचे प्रातःविधी लवकरात लवकर उरकत, गरमागरम कांदेपोहे अन् कोर्या चहाचा आस्वाद घेऊन सात वाजता आम्ही खांदेरीसाठी रवाना झालो.
बसमधनं जात असताना अल्पेश आम्हाला जवळच्या कुठल्या कुठल्या गावात वीरगळ कुठल्या अवस्थेत आहेत याची माहिती सांगत होता. रस्त्याच्या दुतर्फा फुललेला बहावा नजर सुखावीत होता.

बस थळच्या धक्क्यावर येऊन थांबली. धक्क्यावरुन चालत आम्ही आमच्या ठरवलेल्या बोटिपाशी पोहोचलो. एक एक करत सगळे बोटीत बसले. पुण्याहून आलेली काही मंडळी तिथे आमच्यात सहभागी झाली. समुद्राच्या लाटांना मागे सारीत त्यावर स्वार होऊन आमची होडी वेगाने अंतर कापीत होती. फेसाळत उसळणार्या लाटा बोटीवर आदळत होत्या. अंग भिजवीत होत्या. बोट भर समुद्रात होती. उसळणार्या लाटांनी सगळ्यांच्याच पोटात भितीचा गोळा आणला होता.तसं चेहऱ्यावर कुणी दाखवीत नव्हतं पण मनात धडकि भरलेली. उंदेरीला मागे टाकत थोड्याच वेळात बोट खांदेरीच्या धक्क्याला लागली तसा सगळ्यांनी सुटकेचा निस्वास टाकला. समोरच किल्ल्याची माहिती इतिहास फलक , किल्ल्यावरील वास्तूदर्शक नकाशा फलक लावला होता. ती वाचून झाल्यावर आम्ही किल्ल्यावरील वास्तू पहात त्यांची माहिती घेत घेत पुढे सरकत होतो.

मलाच काय आम्हा सार्यांनाच किल्ल्यात पोहोचताक्षणी खटकलेली गोष्ट म्हणजे किल्ल्यावरचा एक एक दगड मग तो तटबंदिवरचा असो , बुरुजावरचा असो वा एखाद्या वास्तूवरचा. किल्ल्यास भेटी दिलेल्या आधुनिक अंगी रंग रंगोटिची कला अवगत असणाऱ्या रोमिओंनी आपल्या नावांनी रंगवले होते. क्वाचितच एखाद दुसरा दगड त्यांच्या हातून सुटला असेल. तळीरामांनी मागे पुरावे म्हणून सोडलेल्या बीअर , क्वार्टरच्या बाटल्यांचा खच वेगळाच. इतिहासाच्या कैक लढायांचा , सुखद दुखद क्षणांचा साक्षीदार असलेला हा किल्ला अश्या तर्हेने विद्रुप केला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण पहात त्या रंगार्यांना तळीरामांना शिव्या हासडत आम्ही वेताळाच्या देवळाजवळ आलो. वेताळाचं दर्शन घेऊन मंदिराबाहेरचा शिलालेख पाहून आम्ही तिथले बुरुज, तटबंद्यांची रचना, बुरुजावरील तोफा, विहीरी पहात पहात द्विपगृहापाशी येऊन पोहोचलो. द्वविपगृहावरनं चहुकडे लक्ष ठेवता येतं. छान वाटतं होतं अगदी. द्विपगृहाची तिथल्तियाच एका व्यक्तिकडून माहिती घेऊन आम्ही खाली उतरलो. जवळच्याच एका झाडाच्या पारावर शिवशंभु महाराजांच्या प्रतिमा स्थापन करुन त्यांना फुले वहात, ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून मुजरा केला. गीतुताईने जमलेल्या सगळ्यांनाच किल्ल्याच्या इतिहासची थोडक्यात माहिती दिली. किल्ल्यावर लोह गुणधर्म असलेला दगडही पाहिला. त्यावर दुसऱ्या दगडाने आघात करताच आतून लोखंडाच्या भांड्याचा वाजवताना होतो तसा आवाज येतो. तो आणि किल्ल्यावर नव्याने वसवलेली सर्वधर्मीय देवांची देवालये पाहून आम्ही निघालो.

आता पुढचा प्रवास बोटिनेच उंदेरीच्या दिशेने. बघता बघता उंदेरीच्या जवळ जाऊन पोहोचलो खरे पण खराब हवामानामुळे आम्हाला बोट किल्ल्ल्याजवळ लावता आली नाही त्यामुळे प्रवेशद्वाराला समुद्रातूनच बोटीत बसल्या बसल्या मुजरा झाडीत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. भरती होतीच पण लाटांनी आता थोडं आवरतं घेतलं होतं. मगासचा उसळलेला समिंदर आता जरा शांत वाटत होता. बोट किनाऱ्यावर लागताच आम्ही सगळे बोटीतनं पुन्हा बसमध्ये बसलो. पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. या सगळ्या भुकेल्या कावळ्यांना शांत करण्याचं ठिकाण होतं थळमधील सप्रेंच निवासस्थान. त्यांच्या घरी पोहोचलो खरे पण तिथे गेल्यावर कळलं जेवणाला अजून किंचित अवकाश आहे.

मग त्याच घरातल्या सात्विकची सायकल घेऊन मी निघालो बघायला गावात अजून काय सापडतय का ते. तशी माझी ती जुनीच खोड. जवळच्याच एका राम मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक वीरगळ उभी दिसली. शेजारच्या महादेवाच्या मंदिरात पार्वतीची दुर्मिळ अशी बाल गणपतीच्या मस्तकी हात ठेऊन उभी असलेली मुर्ती दिसली. वीरगळ अन् त्या मुर्तीचे फोटो काढून मी पुन्हा सप्रेंच्या घरी आलो. जेवणं लागली होती. पोटोबाची क्षुधा शांत करून मी घरापाठच्या वाडीत शिरलो. बरेच बिटकि आंबे पडले होते ते गोळा केले. सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर प्रत्येकाने आपला परिचय करुन दिला. गीतुताईने तिची आणि दुर्गवीरची संस्थेची माहिती सांगितली .

हातात बराच वेळ शिल्लक होता. तो कुठे सत्कारणी लावायचा याचा विचार करता करता आम्ही सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळापाशी जाऊन पोहोचलो. पण आमच्या दुर्देवाने सदर स्थळाला बाहेरुन टाळे होते मग हिरमुसल्या मनाने बाहेरुनच कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा झाडत आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो. बसमध्येच एका काकांनी शिरढोण विषयी सुचवलं.

पनवेल आधी लिंगोबाचा सुळका गेला कि पुढे लागतं ते आद्य क्रांतिकारक श्री. वासुदेव बळवंत फडके यांचं गाव. त्यांचे आजोबा जवळच्याच कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार. गावात श्री .वासुदेव बळवंत फडके यांचा पुरातत्व खात्याने पुनर्रबांधणी केलेला वाडा , त्यांचे स्मारकवजा संग्रहालय आहे ते पाहिले. जवळच्याच तलावाशेजारील हनुमान मंदिराच्या आवारात त्यांच्या आजोबांची समाधी आणि शेंदूर फासलेली एक वीरगळ आहे . तिघांनाही नमस्कार करुन आम्ही फडके वाड्यासमोरील आमच्या परिचयाच्या गुहागर गावच्या खरे काकांच्या वाड्यात गेलो. इतरांनाही तो दाखवला. लिंगोबाचा डोंगूर, फडके वाडा, खरे वाडा, स्मारक पाहून सारेच सुखावले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हाॕटेलात गरमागरम चहा घेऊन मग आम्ही अखेर आपआपल्या घरांच्या दिशेने बसमार्गेच रवाना झालो.

दुर्गवीर संस्थेसोबतची माझी हि तिसरी दुर्गदर्शन मोहिम .पहिली दि. १ मे २०१५ रोजी बिरवाडीच्या किल्ल्यावर , दुसरी राज्याभिषेकदिनी रायगडावर आणि तिसरी हि १ मे २०१९ रोजीची खांदेरीवर सुखद सुखरुप पार पडली. सर्वांनीच मोहिमेत चांगलं सहकार्य केल्याबद्दल सार्यांचेच आभार. भेटू लवकरच पुढल्या मोहिमेत नव्या जुन्या दुर्गभटक्यांसोबत

— © चंदन विचारे.
https://www.facebook.com/chandan.vichare.1/
`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपचे सभासद 

 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 365 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..