नवीन लेखन...

हवालदाराची खेळी (कथा)

डब्ल्यू डब्ल्यू जेकब च्या ‘The Constable’s Game’ या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर

उत्तर कोलकात्यातील बारासात गाव. बिल्डिंग ब्लॉक्स फॅक्टरीतला कामगार बिधन पाल त्याच्या घरात जेवणाच्या खोलीत बसला होता. पारुलचं, म्हणजे त्याच्या बायकोचं जेवण संपलं नव्हतं. थंडगार पडलेल्या जेवणाचं ताट तसंच टेबलावर होतं, पण ती जागेवर नव्हती. बिधननं तिच्या ग्लासातलं पाणी पिऊन पालथ्या पंजाने ओठ पुसले आणि आरोळी दिली, “पारो, ये बघू आत आता आणि जेवून घे……ए, पारो, ऐकलंस का? चल ये नाही तर मी दार बंद करून टाकीन आणि तू राहशील बाहेर.”

आपल्याच तिरकस बोलण्यावर खूष होऊन बिधन हसला. खिशातून पाकीट काढून एक सिगारेट शिलगावली आणि बाहेरच्या खोलीत गेला. पारो खिडकीतून बाहेर डोकावत उभी होती शेजारच्या घरात नवा भाडेकरू येणार होता – पोलीस हवालदार सोमेंदु दासगुप्ता – त्याचं फर्निचर गाडीतून उतरवून घेतले जात होते ते बघत.

“ये आत आता नाही तर मी कडी लावून टाकीन दाराला आतून आणि तू राहशील बाहेरच. असं शेजाऱ्याच्या सामानाकडं निरखून बघणं बरोबर नाही. गैर आहे.”

पारुलबाईनी या धमकीची अजिबात दखल घेतली नाही. खिडकीच्या तावदानाला नाक टेकवून बाहेर बघणं चालूच ठेवलं. आता जाड काच असलेलं एक टेबल काळजीपूर्वक गाडीवरून उतरवून घरात नेलं गेलं. नवा शेजारी हवालदार सोमेंदु दासगुप्ता स्वत: देखरेख करत उभा होता.

“आणखी काय नि किती सामान येणार आहे आहे कोणास ठाऊक ! एखादा पियानोही असेल कदाचित त्यात.” बिधन एक कटाक्ष टाकत तिरसटपणे बोलला.

“अय्या खरंच की. बाजाची पायपेटीच आहे आता उतरवतायत ती. ते काय त्तिचे पाय दिसतायत ट्रकमध्ये.” पारुल चित्कारली.

आता बिधननं स्वत: खिडकीजवळ जाऊन बघितलं. आणि मग म्हणाला, “पारो, मी तुला सकाळी सांगितलं होतं आपल्या घरातली डबडी आणि कबाडसामान त्याच्या अंगणात फेकायला ते फेकलं होतंस का?”

“हो, टाकलं की ! त्यातले तीन डबे त्यानं उचलून घरात नेले. मी ऐकलं, ‘आपल्याला रंगासाठी नाही तर आणि कशासाठी तरी उपयोगाला येतील’ असं त्याच्या बायकोला म्हणाला ते.” पारुलनं उत्तर दिलं.

“हं, अशी चिंधीचोरी करतात म्हणून तर बाजाच्या पेट्या घेऊ शकतात हे असले पोलिसवाले.” बिधन पुन्हा तिरसटपणाने म्हणाला, “दुसऱ्याच्या वस्तू अशा हडप करतात लेकाचे. पण… मी तुला बिनकामाची डबडी टाकायला सांगितली होती. मं तू चांगली कशाला फेकलीस? बिनडोक कुठली!”

पारुलबाईनी काही उत्तर दिलं नाही. ट्रकवाल्यानं काळजीपूर्वक उतरवून हलकेच फुटपाथवर ठेवलेल्या पायपेटीकडे भारावून गेलेल्या नजरेनं बघत राहिल्या. सोमेंदु हवालदारानं सगळ्या बाजूनी तिची पहाणी केली. त्याच्या बायकोनं तेवढ्यातल्या तेवढ्यात तिचं झाकण उचलून बघितलं आणि दोनतीन पट्ट्या दाबून आवाजही काढला.

“भंपक बया,” पारुलबाईनी अर्धवट वळून उद्गार काढला. “सटवीची बोटं बघा कशी जून चरबट गाजरासारखी आहेत ती!”

“पारो, अग, कहर म्हणजे पोलीसवाल्यानं आपल्या या कॉलनीत, त्यातसुध्दा माझ्या शेजारला येऊन रहावं ? मोठा अपराधच आहे हा. थांब, आधी त्याचा तो पियानो फोडून टाकतो आणि मग त्याचं टक्कुरं. दोन दिवस, बस् दोन दिवसात इथनं पळून जातोय की नाही बघच तू.” बिधन म्हणाला.

“का पण? का जाईल तो?” पारुलनं विचारलं.

“का? बघशीलच तू, जिणं हराम करून टाकीन मी त्याचं म्हणून. बारासातमध्ये ही वसाहत सोडून दुसरीकडंही कितीतरी जागा असतील रिकाम्या. माझ्या शेजारी नको कुणी पोलीसवाला.”

नंतरचा संपूर्ण आठवडा बिधनचा मेंदू फक्त पोलिसाला कसा हुसकवायचा याचा विचार कर करून हैराण झाला. पोलीसवाला रहायला आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बिधनच्या अंगणात रोज रिकामी डबडी पडलेली दिसायची. त्याच्या ओळखीचीच होती ती सगळी. मग तीच डबडी पुढचे तीन दिवस या अंगणातून त्या अंगणात अशी ये जा करायला लागली. कधी कधी तर दिवसातून तीनतीनदा असा प्रवास व्हायचा त्यांचा. एके दिवशी संध्याकाळी बिधन बाहेर जाण्याच्या तयारीत बूट घालून नाड्या बांधत असताना थड्ड असा आवाज करून एक चेपलेली, गंजकी बादली त्याच्या अंगणात पडली. पाच मिनिटांनी हवालदार सोमेंदु दासगुप्ता सूर्यास्त बघायला म्हणून त्याच्या घरातून बाहेर आला तेव्हा बिधननं त्याला खडसावलं तर तो म्हणाला, “मी ऐकला होता बुवा आवाज काही तरी पडल्याचा.”

“तूच तर टाकलंस ते.” बिधन गुरगुरला.

“नाही बुवा. मी आणि माझी बायको, तिचा धाकटा भाऊ उत्पल नि त्याची बायको आलेत त्यांच्याबरोबर आत चहा घेत बसलो होतो.” सोमेंदुने आरोप नाकारत ठासून म्हटले आणि वर हसत म्हणाला, “खरं सांगू का? तू जर नीट बघितलंस तर दिसेल की ती बादली काही अगदीच टाकाऊ नाही. तुझ्यापुरतं पाणी राहील त्यात.”

बिधन चरफडत घरात गेला. बदला कसा घ्यायचा या विचाराने तो बराच वेळ अस्वस्थ राहिला. पारुलकडून काही सुचवलं जाणार नाही हे ओळखून तो मग बाहेर पडला आणि नेहमीच्या मित्रांच्या कंपूकडे गेला. कंपूतल्या सगळ्यांचं मत पडलं की हवालदाराला चांगला धडा शिकवायला पाहिजे, परंतु कोणाकडेही हमखास यशस्वी होईल अशी योजना नव्हती.

“चार लोकात त्याचं हसं होईल असं काही तरी करायला पाहिजे, पोलीसवाल्याना आपली अशी कुचाळकी केलेली पसंत पडत नसते.” एक मित्र म्हणाला.

“पण कसं?” बिधननं विचारलं.

“आरे त्यात काय? हजार मार्ग आहेत त्यासाठी.” तो मित्रच बोलला.

“एक तरी सांग ना लवकर.” बिधन.

पण कुणाकडूनही काहीच ठोस उपाय सांगितला गेला नाही.

पुढचा आख्खा आठवडा बिधननं अस्वस्थतेत घालवला, हवालदाराचा पाणउतारा कसा करता येईल याचा विचार करत. आणि तोपर्यंत त्याच्या अंगणात पडलेली डबडीही पडून राहिली तशीच. हवालदार सोमेंदु मधून मधून त्यांच्याकडं नजर टाकून जायचा.

एक दिवशी अचानक खुलून आलेल्या चेहऱ्यानं बिधन पारुलला म्हणाला, “पारो, अगं तो रॉयबाबू भेटला होता आज मला, तो काय म्हणाला माहित आहे? तो म्हणतो की पोलीसवाल्यानं कुणा सभ्य गृहस्थाच्या घरात, बोलावलं असल्याशिवाय, पाउल टाकायचं नसतं.”

“मग? त्याचं काय? तुम्ही तर शेजाऱ्याला कधीच आपल्या घरात बोलावणार नाही.” चेहरा निर्विकार, मख्ख ठेवून पारुलनं विधान केलं.

“पारो, जरा डोकं वापर. न बोलावता आपला शेजारी पोलिसवाला घरात घुसला आपल्या तर त्याच्यावर सरकारी चौकशीला तोंड द्यायची वेळ येईल.” बिधन तिच्या मख्खपणाची कीव करत म्हणाला.

“पण तो कशाला येईल आपल्या घरात न बोलावता?”

“नक्की येईल, तू मोठ्यानं किंचाळलीस तर……… तुझी ती कपडे वाळत घालायची काठी कुठं आहे?” डोळा मिचकावत बिधन बोलला.

“ देवा रे, वेडबीड लागलंय की काय तुम्हाला?” पारुल घाबरून म्हणाली.

“ ऐक, तू आपल्या बेडरूममध्ये जा, मी येईन आणि काठीनं आपल्या गादीवर जोरजोरात फटके मारीन, तू नुसतं किंचाळत ओरडायचं, ‘नको नको, मारू नका, मारू नका’ म्हणत. तुझ्या किंकाळ्या ऐकून हवालदार नक्की धावत येईल तुला वाचवायला. मी बाहेरच्या दाराला आतली कडी नाही लावणार. ढकलल्याबरोबर उघडावं म्हणून. शिरलं काही डोक्यात?”

पारुलनं विचार करण्यात बराच वेळ घालवला. बिधनचा संयम सुटायच्या बेतात आला असताना अनिच्छेनंच पारुल उठली आणि आत जाऊन काठी घेऊन आली. म्हणाली, “काय बडवताय ते नीट बघून बडवा. नाही तर कराल माझाच खून…… आणि हो, मारायला सुरुवात करायच्या आधी आपल्यात वादावादी व्हायला हवी न?”

“होय तर. तू मला शिव्या देत रहा कचकून कशावरनं तरी.” बिधन म्हणाला आणि दोघंही मग बेडरूममध्ये गेले.

पारुलनं शेजारच्या घराच्या लागून असलेल्या बेडरूममधला कानोसा घेऊन हवालदार आणि त्याची बायको आत असल्याची खात्री करून घेतली आणि मग हळूहळू चढत्या आवाजात बिधनला त्यानं केलेल्या, न केलेल्या चुकांबद्दल नावं ठेवायला सुरुवात केली. एरवी नवऱ्यासमोर आवाज काढू न शकणाऱ्या तिनं मग नवरा, सासू एवढंच नव्हे तर धाकट्या नणंदेचाही उध्दार करायला मागे पुढे पाहिलं नाही. तिच्या त्या कर्कश्श आवाजातली लाखोली ऐकून बिधनला तर खरोखरच तिला फटकावून काढावं असं वाटायला लागलं. पण लगेच भानावर येऊन “आता गप्प बसतेस की देऊ दोन तडाखे” म्हणत त्यानं पलंगावरल्या गादीवर काठीनं तडाखे मारले. पारुल स्वर टिपेला नेऊन किंचाळली मारली, “आयाई ग, हैवाना, जीव घेतोस काय माझा. अरे कुणी तरी थांबवा, थांबवा ह्या सैतानाला.” बिधन कानोसा घेत हलकेच म्हणाला, “हालचाल होते आहे ग शेजारच्या घरात.” पारुलने परत एकदा किंकाळी फोडली, “मेले मेले, वाचवा कुणीतरी.”

आणखी थोडं गादीला धोपटल्यानंतर बिधन पुटपुटला, “बहिरा आहे की काय हा पोलीसवाला!”

इतक्यात पलिकडून हवालदाराचा आवाज आला, “अरे ए, अरे, गप्प बसव की तिला. केव्हापासून किंचाळते आहे, एक क्षणभरसुध्दा डोळा नाही लागत तिच्या या केकाटण्यामुळं.”

बिधननं काठी टाकली आणि पारुलला म्हणाला, “भेकड आहे. यायला घाबरतोय लेकाचा. पारो, ओरड आणखी जोरानं.”

त्यानं परत काठी हातात घेतली, पारुलनंही पुन्हा पुन्हा केकाटायला सुरुवात केली. पण दमल्यामुळं आता त्यात काही दम राहिला नव्हता. निराश होऊन बिधन तो ‘शंभरटक्के अक्सीर इलाज’ थांबवायचा विचार करत होता इतक्यात धाडकन् बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. “आला वाटतं एकदाचा” बिधन बोलला. खुषीत येऊन दोघांनी परत नाटकाला सुरुवात केली न केली एवढ्यात बेडरुमचा दरवाजा ढकलून कोणीतरी आत आलं. पारुलचा भाऊ होता तो, बिप्लव. आल्याआल्या त्यानं एक जोराचा गुद्दा बिधनच्या पाठीत हाणला आणि त्याला खाली पाडत ओरडला, ”माझ्या बहिणीवर हात उगारतोस? मारशील? मारशील तिला पुन्हा? घे, हे घे.” आणि पुन्हा दोनतीन रपाटे लगावले त्यानं बिधनला.

पारुलनं बिप्लवला मागे खेचत थांबायला सांगितलं आणि म्हणाली, “बिपुदा, अरे नाटक होतं ते. बाकी काही नाही. बघ, मला कुठं लागलंय का? नाही न?”

“नाटक? नाटक हं?” बिप्लव उद्गारला. बिधननं मग सगळा खुलासा केला.

“आजवर मी ऐकलेला सर्वात उत्तम विनोदी किस्सा आहे हा.” हसून हसून डोळ्यात आलेलं पाणी पुसत बिप्लव म्हणाला.

“ठीक आहे, ठीक आहे. जा आता तुझ्या घरी.” बिधन गुरकावला.

“बिधनदा, मी जातोच आहे. पण बाहेर बरीच माणसं उभी आहेत तमाशा बघायला, आणि कितीतरी घरांमध्ये जाग आलेली दिसतेय त्यांच्या खिडक्यातनं दिसणाऱ्या दिव्यांवरून. बरं झालं काही जखमा न होता आटपलं ते. चला, मी निघतो.” अजून हसू आवरायचा प्रयत्न करत बिप्लव गेला.”

तो गेल्यानंतर बाहेरचं दार बंद करायला गेलेला बिधन मात्र हवालदार सोमेंदु आपल्या क्लृप्तीला फसला नाही म्हणून खंत करत राहिला. पारुल बेडरूममध्ये गेली ते त्याच्या लक्षातही आलं नाही.

“अरे देवा, पलंग तर मोडला की हो.” पारुल म्हणाली.
“मग? लाकडी फर्निचर काय तू मरेपर्यंत टिकणार असं वाटतं की काय तुला? चल, खालीच झोप आता.” आत येत बिधन धुसफुसला. पारुलनं मुकाट्यानं अंथरूण जमिनीवर पसरलं आणि चादर ओढून क्षणार्धात घोरायला लागली.

सकाळी जेव्हा कामावर जाण्यासाठी बिधन बाहेर आला तेव्हा त्याला सोमेंदु हवालदार सिगारेट फुंकत अंगणात उभा असलेला दिसला, बिधनचीच वाट बघत असल्यासारखा.

“या या बिधनमोशाय, मी रात्री तुमचा आवाज ऐकला काल. काय मोठ्यानं किंकाळ्या येत होत्या हो ऐकायला !”

“तुला काय करायचय? नसत्या चांभारचौकशा करू नको.” बिधन तिरसटपणाने बोलला.

हवालदारानं बिधनकडं रोखून बघितलं आणि तसंच एकेरीवर येत म्हणाला, “बायको झोडपत होती वाटतं तुला? तसाच किंचाळत होतास. असा मार खाण्यापेक्षा बारासात पोलीस स्टेशनवर येऊन तक्रार कर तिची. मीच असेन तिथं. लॉकअपमध्ये टाकू तिला. काय?”

“तक्रार तुझीच केली मी तर काय होईल?” बिधननं हवालदाराला डिवचलं.

“दोन महिने, कदाचित तीन महिनेसुद्धा….. तू आत जाशीन, आणि तिथं मी धुलाई करीन तुझी ती वेगळीच.” खंवचट हसत हवालदार बोलला.

“शिपुरड्या, तू बाहेर ये मग दाखवतो तुला काय ते.” मुठी वळत बिधननं हवालदाराला धमकावलं.

“आलो असतो, पण ते गैरकानुनी होईल. त्यापेक्षा तुझ्या मेव्हण्यालाच बोलावून घे नं. तो वाचवेल तुला बायकोपासून.” हवालदारानं टोमणा मारला आणि हसत हसत आपल्या घरात गेला.

बिधन पुटपुटत पुटपुटत कामावर गेला. संध्याकाळी जेव्हा कामावरून परत आला तेव्हा त्याला हवालदार त्याच्या अंगणात पत्र्याची डबडी, दगडगोटे, विटांचे तुकडे वापरून अंगणातली पायवाट नीट करत असलेला दिसला. बिधनला बघून म्हणाला, “तुझ्या बायकोनं सकाळी दिले हे डबे. बरे उपयोगाला आले. ही वाट छान आखता आली त्यांच्यामुळं.” आणि आपल्या कामात गर्क झाला. काय उत्तर द्यायचं ते न सुचून बिधन फक्त ‘ह्हं’ असा तुच्छता ध्वनित करणारा उद्गार काढून आणि एक सिगारेट पेटवून आपल्या घराच्या दाराला टेकून उभा राहिला. ‘यानं आता फुलझाडं लावावीत इथं,’ त्याच्या मनात विचार आला.

आणि खरंच की, आठवड्याभरात सोमेंदु हवालदाराच्या अंगणात गुलाब, झेंडू, मोगरा अशी वेगवेगळी रोपं लावलेली दिसली. बिधनच्या डोक्यात आता त्या फुलबागेचा विचार घोळायला लागलं.

दुसऱ्या दिवशी बिधन सकाळी लवकर उठला आणि ‘शेजाऱ्याची बाग पावसाची वाट बघत असल्यासारखी मरगळलेली दिसते आहे’ असा शेरा पारुलकडं मारून कामावर निघून गेला. कामावर असताना आज त्याचा मूड मनावरचं दडपण उतरल्यासारखा चांगला होता. त्या दिवशी तो कामावरून जरा लवकरच बाहेर पडला. पण घरी न जाता मित्रांच्या अड्ड्यावर जाऊन त्यानं वेळ घालवला. तिथून तो शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या एका अगदी जवळच्या मित्राच्या घरी गेला. त्याच्याकडंच जेवून मध्यरात्रीच्या सुमाराला तो घराच्या वाटेला लागला.

बारासातच्या परिसरात पोचला तेव्हा रात्रीचे बाराचे टोले वाजायला सुरुवात झाली. बारावा टोला वाजून विरतो न विरतो तोच समोर आला सोमेंदु हवालदार.

“ए, बिधन, थांब थांब. मला बोलायचंय तुझ्याशी.” हवालदार म्हणाला.

“माझ्याशी बोलायचंय? काय? कशाबद्दल?” – बिधन

“माझ्या बागेतल्या फुलझाडाचा सत्यानाश केलंस तू. का?” – सोमेंदु

“फुलझाडं?” आपल्याला काहीच समजत नसल्यासारखं दाखवत बिधननं विचारलं, “कुठली फुलझाडं?”

“एss…. नाटक करू नकोस. तू काल रात्री माझ्या अंगणात शिरून माझी झाडं उपटून टाकलीस.”

“जबान सांभाळून बोल हां, सांगून ठेवतो,” बिधननं बजावलं. “अरे मला स्वत:ला फुलझाडं आवडतात. मग मी असं कसं करेन? पण खरंच तू एवढ्या नीटपणे लावलेली तुझी झाडं मेली? की उगाच माझ्याशी भांडण उकरायचंय म्हणून बोलतोयस?”

“अरे वा, काय पण आव आणतोयस निरागसपणाचा! थांब, तुझ्याविरुध्द तक्रार नोंदवून तुला आतच टाकायला लावतो आता.”

“हो का? काय रे, मी हे कधी केलं असं तुझं म्हणणं आहे ?” बिधननं प्रश्न केला.

“कधी केलंस ते तुलाच माहिती. नक्की वेळ काय ते महत्वाचं नाही.”

“नाही कशी? माझ्यासाठी महत्वाचं आहे जाणून घेणं,” बिधन ठासून म्हणाला. “कारण बिप्लव, माझ्या बायकोचा भाऊ काल रात्री आला होता आमच्याकडे मुक्कामाला. रात्रभर तब्येत ठीक नव्हती बिचाऱ्याची. विचार जाऊन त्याला हवं तर, म्हणजे तुझी खात्री होईल मी नाही हे काम केलं ते.”

“मी जर पोलिसात नसतो नं तर तुला असा बेदम चोपला असता की जन्माची अद्दल घडली असती तुला.” हवालदार बोलला.

‘अरे, तू पोलिसात आहेस म्हणून, पोलीस नसतास तर, आईशप्पथ, मीच तुझा खून केला असता.” बिधननं सुनावलं.

“माझ्या फुलझाडांचा केलासच खून तू……” सोमेंदु हवालदारानं अचानक बिधनशी धक्काबुक्की सुरु केली. बिधनचा कोट धरून त्याला खाली पाडलं. आणि मग दोघांची झटापट सुरु झाली ती जवळजवळ दहा मिनिटं चालली. दोघेही जेव्हा दमले तेव्हाच थांबले. बिधनचा कोट फाटला होता आणि त्याच्या डोक्यावरची टोपी चुरगळली होती. नाकातून रक्त येत होतं. सोमेंदुची अवस्थाही तशीच होती. हेल्मेट चेपलं होतं, युनिफॉर्मवर रक्ताचे आणि चिखलाचे डाग पडले होते. दोघानीही एकमेकांकडं बघितलं आणि दोघांची अवस्था सारखीच आहे हे बघून शस्त्रसंधि अंमलात आणायचा निर्णय घेतला.

सोमेंदुनं हेल्मेट उचलून घेतलं आणि म्हणाला, “चल निघ, जा माझ्यासमोरून मी माझं मन बदलायच्या आत. नाहीतर परत सुरुवात करीन. आणि लक्षात ठेव, आपल्यात झालेल्या मारामारीबद्दल कुणाकडही एक अक्षरही बोललास ना, तर तू आहेस आणि मी आहे.”

“मला वेड लागलेलं नाही जाहिरात करायला.” बिधननं उत्तर दिलं आणि घराच्या दिशेने जायला निघाला. हवालदाराला बडवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं, सोमेंदुनं लाईटच्या खांबाखाली उभा राहून युनिफॉर्म ठीकठाक केला, हेल्मेटचा चेप जमेल तितका काढला आणि ते डोक्यावर ठेवून बारासात पोलीस स्टेशनची वाट धरली. युनिफॉर्मची वाट लागलेलीच होती, शर्टाचं दोऱ्याला लोंबकळत असलेलं एक बटन तुटून खाली पडलं ते त्यानं उचलून खिशात टाकलं. गस्तीच्या बीटवरून कुणाही गुन्हेगाराला पकडून न नेण्यातल्या अपयशाची काय सबब इन्स्पेक्टरला सांगायची हा विचारही त्याला आता सतावायला लागला. एवढ्यात कसला तरी गलका ऐकू यायला लागला.

हवालदार सोमेंदु जवळजवळ पळतच आवाजाच्या दिशेने निघाला. ‘पोलीस, पोलीस’ अशा आरोळ्या आता स्पष्ट ऐकू यायला लागल्या. एका वळणानंतर त्याला माणसांचा जमाव एका मोठ्या घराच्या फाटकापाशी असलेला दिसला. इतरही काही माणसं त्याच दिशेने जात होती. हवालदार तिथं पोचला.

‘आला, पोलीस आला, उशिरा का होईना, आला खरा.” त्या घराचा मालक छद्मीपणानं बोलला.

थकलेल्या सोमेंदुनं फाटकाच्या खांबाच्या आधाराने दम घेतला. घरमालक पुढं म्हणाला, “ते चोरटे त्याs दिशेने पळाले, तुम्हाला दिसले नसतील ना हवालदारसाहेब?” इतक्यात घराचा दरवाजा कुणीतरी उघडला तेव्हा आतून आलेल्या दिव्याच्या उजेडात सोमेंदुचा अवतार लोकांच्या नजरेत आला.

“अरे? तुम्हाला दुखापत झालीय का? काय झालं?” एकानं विचारलं.

“होय” धापा टाकत हवालदार सोमेंदु बोलला. आणि आणखी थोडा वेळ मिळावा म्हणून त्यानं आपल्या खिशातून शिटी काढून फुंकली.

घरमालकानं जास्ती माहिती पुरवायचा प्रयत्न केला, म्हणाला, “तीन होते साले चोर, त्यातला एक माणूस भक्कमसा होता, त्याला मी ओळखू शकेन पण बाकीच्या दोघांचे चेहरे नाही दिसले.”

सोमेंदुच्या तल्लख मेंदूत आता एक कल्पना आली. त्यानं पुन्हा एकदा शिटी जोराने फुंकली. नंतर विचारलं, “काय काय सामान नेलं त्यांनी?”

“काही नाही, मला जाग आली आणि माझ्या दरडावण्यामुळं पळाले लगेच.”

हवालदारानं एक आवंढा गिळला आणि म्हणाला, “मी आशुतोष घोष रस्त्यावरून येत होतो तर तिघंजण पळत येताना दिसले या केएनसी रोडवरून. संशय आल्यामुळं मी अडवलं त्याना तिठ्ठ्यावरच आणि त्या जाड्या चोराला धरलं. पण मग तिघानी मिळून माझ्यावर हल्ला केला हो. मी झटापट केली त्यांच्याशी पण तिघांपुढे मी एकटा कमीच पडलो ना. मला धरून ढकललं त्यांनी तर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथच्या दगडावर डोकं आपटून मी बेशुध्द झालो. शुध्द आली तोवर ते तिघेही पळून गेले होते.” इथं सोमेंदुनं हेल्मेट काढून डोक्यावर पडलेली खोक दाखवली. कुणी सहानुभूती दाखवली, कुणी पाठ थोपटली. इतक्यात बारासात पोलीस स्टेशनमधले सबइन्स्पेक्टर ज्योतिर्मोय आणि इन्स्पेक्टर शुभंकर चौधुरी तिथे आले. त्यांनी सोमेंदु हवालदाराची चौकशी केली. सोमेंदुनं परत आपली कथा ऐकवल्यावर इन्स्पेक्टर चौधुरी म्हणाले, “वेल डन, हवालदार दासगुप्ता! तू पोलीसधर्माला जागून कर्तव्यात कसूर केली नाहीस. आता चौकीवर जा आणि तुझा सविस्तर लेखी रिपोर्ट दाखल कर.”

जबर जखमी असल्याची बेमालुम बतावणी करत सोमेंदु मनातल्या मनात त्या तीनही चोराना पोलिसाना न सापडण्यासाठी शुभेच्छा देत बारासात पोलीस स्टेशनकडे गेला. आणि अर्थात, ते पकडले गेले तरी पोलिसाचा जबाब गुन्हेगारांच्या जबाबापेक्षा जास्त विश्वसनीय मानला जाईल याची त्याला खात्री होतीच.

पोलीस स्टेशनमध्येही त्यानं रिपोर्टात आपली ‘कथा’ रंगवून दिली. डोक्याच्या जखमेवर मलमपट्टी, बँडेज इत्यादी सोपस्कार झाल्यानंतर त्याला चार दिवसाची सुट्टी दिली गेली, पुढचे दोन तीन दिवस झाल्या घटनेबद्दल वाच्यता करू नकोस असं सांगण्यात आलं. पण बंगाली दैनिक ‘बर्तमान पत्रिका’ मध्ये ‘बहादूर हवालदार’ या शीर्षकाखाली एक कॉलमभर मजकूराचा लेख छपून आलाच. सोमेंदु मात्र लोकांसाठी ‘संपर्काबाहेर’ राहिला.

बिधननं दैनिक बर्तमान पत्रिकाचा तो अंक पाहिला आणि लेख वाचला, परत परत वाचला. काहीतरी गोम आहे यात असं त्याला ठामपणे वाटलं. पण विचारणार कुणाला? हवालदाराचं घर तर बंद होतं. बिधनची उत्सुकता तर अस्वस्थतेत रूपांतरित झाली. आणि मग आठवड्यानंतर जेव्हा त्याला सोमेंदु हवालदार अंगणात आलेला दिसला तेव्हा घाईघाईनं मधल्या कुंपणावरून डोकावून त्याला तिरसट आवाजात विचारलं, “कसली घरफोडी होती रे?”

“अरे वा. सुप्रभात बिधन पाल. काय म्हणतोस?”

“घरफोडीचं काय? चोरांशी झटापट केलीस म्हणे तू?”

“का? तुला काय वाटतंय? खोटं आहे ते?”

“नक्कीच! चोर तुला दिसले यावरच माझा विश्वास नाही.”

सोमेंदु उठला आणि शांतपणे म्हणाला, “बिधन, जा. बऱ्या बोलानं घरात जा तू.” पण बिधनला आता खुमखुमी आली होती पुन्हा भांडण उकरून काढायची. सोमेंदुवर खोटारडेपणाचा शिक्का मारत म्हणाला, “खोटारडा आहेस तू. चोरांनी नाही, मीच बडवला होता तुला. तुझं ते टोपडं चेपलं मी, तुझं टक्कुरं फोडलं मी. पण त्या वर्तमानपत्रवाल्याकडं चोरांशी झटापट करून शौर्य गाजवल्याची फुशारकी मारलीस.”

“आज सकाळी सकाळी हातभट्टीची मारलीस काय रे? जा गप घरात.”

“म्हणजे? शिपुरड्या, तुला काय म्हणायचंय? मी नाही बडवलं तुला?”

सोमेंदु जवळ आला आणि बिधनच्या डोळ्याला डोळा भिडवून शांतपणे म्हणाला, “तू काय बोलतो आहेस तेच मला समजत नाही.”

बिधन काही तरी बोलणार होता इतक्यात सोमेंदु पुढं बोलला, “हां, आता त्या तीन चोरांपैकी जाडाजुडा असलेला चोर तू असलास तर शक्य आहे. मला त्याचा आणि तुझा आवाजही एकच वाटतोय. बोल. तू होतास तो? सांग म्हणजे आत्ताच्या आत्ता तुला चौकीत नेऊन गुदरतो.”

हळूहळू बिधनच्या बथ्थड डोक्यात प्रकाश पडायला लागला. सोमेंदु हवालदार पुढं म्हणाला, “तुझ्याच उंचीचा होता तो. म्हणजे बघ, ठरव काय ते नक्की…..आणि हो, तुझ्या भल्यासाठी सांगतो, तू आता माझ्याकडं जे बोललास ते दुसऱ्या कुणाकडं बोलशील तर गोत्यात तूच येशील.”

बिधन घाईघाईनं म्हणाला, “नाही, नाही! आईशप्पथ! मी कुणाकडं काही बोलणार नाही.”

“म ठीक आहे. तसंही मला माझ्या शेजाऱ्याचं काही वाईट करायचं नाही आहे. पण अरे हो, तू काही इथून पुढं माझा शेजारी नसणार आहेस म्हणा.” हवालदार बोलला.

“म्हणजे?” बिधननं बुचकळ्यात पडून विचारलं.

“म्हणजे असं, की आता मला या साधारण वस्तीत तुझ्यासारख्या दीड दमडीच्या माणसाच्या शेजारी रहायची गरज नाही. त्या रात्री दाखवलेल्या शौर्याबद्दल मला बढती मिळाली आहे असिस्टंट सबइन्स्पेक्टर म्हणून. गुप्ता कॉलनीतला सरकारी फ्लॅटही दिलाय मला. आणि हो, तुझा आभारी आहे मी बिधन पाल. तू आणि ती चोरी, यामुळंच मला ही बढती इतक्या लवकर मिळाली. नाहीतर वर्षानुवर्षं वाट बघायला लागते लोकाना.”

कुत्सितपणानी हसत हवालदार….छे, छे, असिस्टंट सबइन्स्पेक्टर…. सोमेंदु दासगुप्ता घरात शिरला. बिधन पाल अवाक् होऊन बघतच राहिला.

— मुकुंद कर्णिक

*****

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

1 Comment on हवालदाराची खेळी (कथा)

  1. The Constable’s Move या नावानेही जेकबची मूळ कथा इंटरनेटवर मिळू शकते.

Leave a Reply to मुकुंद कर्णिक Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..