नवीन लेखन...

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग २

(संदर्भ : ‘लोकसत्ता’ दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील लेख)

भाग २

  • अभिमानाचा विषय आहे, तर गालिब यांच्या आयुष्यातील एका घटनेची चर्चा करणें योग्य ठरेल, जिचा उल्लेख गुलजार यांच्या लेखात आहे.

घटना थोडक्यात अशी की, गालिबना कॉलेजात नोकरी मिळत होती, ती त्यांनी ‘निव्वळ ईगोखातर’ (हे शब्द गुलजार यांच्या लेखातील ) स्वीकारली नाहीं.

या घटनेमागची कहाणी अशी आहे –

कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे  चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले. गालिबना जरी नोकरीत per se रस नव्हता, तरी नाइलाजास्तव आर्थिक कारणांमुळे ते तयार झाले. (म्हणजेच, त्यांनी या विशिष्ट नोकरीबद्दल ईगो बाळगला नव्हता, हें स्पष्ट आहे). नोकरीच्या पहिल्या दिवशी गालिब जेव्हां कॉलेजात गेले, तेव्हां त्यांची अशी अपेक्षा होती की, शिरस्त्याप्रमाणें प्रिन्सिपॉल स्वत: बाहेर येऊन आपल्याला भेटतील. त्यांनी, आपण आल्याचा निरोप प्रिन्सिपॉलला धाडला, तर  प्रिन्सिपॉलचा उलटा निरोप आला की त्यांनी (प्रिन्सिपॉलनें) गालिबनाच आंत येऊन भेटायला सांगितलें आहे. हें ऐकल्यावर गालिब उलट्या पावलीं माघारी गेले. नंतर इतरत्र भेट झाल्यावर प्रिन्सिपॉलनें पृच्छा केली की, ‘तुम्ही माघारी कां गेलात ?’.  गालिब म्हणाले, ‘नेहमी जेंव्हां मी तुम्हाला भेटायला येत असे तेंव्हां तेंव्हां तुम्ही स्वत: बाहेर येऊन मला भेटून आंत घेऊन जात असा ; मात्र या प्रसंगी तुम्ही बाहेर न येतां मलाच आंत येण्यांचा निरोप धाडलात. तें कां ?’ प्रिन्सिपॉल उत्तरले, ‘नेहमी, एक आदरणीय व्यक्ती म्हणून, एक मोठे शायर म्हणून, तुम्ही येत होतात, त्यामुळे मी स्वत: बाहेर येऊन तुमचें स्वागत करीत असे ; पण या वेळीं तुम्ही माझे मुलाज़िम म्हणून आलेला होतात, तर मग मी बाहेर येऊन तुमचे स्वागत कसें करूं ? म्हणून मी तुम्हांलाच आंत बोलावलें’ . त्यावर गालिब म्हणाले, ‘मला वाटलें होतें की या नोकरीनें माझी इज्जत वाढेल. इथें तर माझी इज्जत कमी होते आहे, खत्म होते आहे, हें मला स्पष्ट दिसतेंय् . मग अशी नोकरी मी कशी स्वीकारूं ?’.

आपण हें ध्यानात घेणें आवश्यक आहे की, मिर्झा गालिब हे खानदानी गृहस्थ होते. ‘मिर्झा’ ही कांहीं साधी उपाधि (पदवी) नव्हे. मिर्झा म्हणजे मीरज़ा. मीर हा शब्द ‘अमीर’चें लघुरूप (शॉर्टफॉर्म) आहे, आणि त्याचा अर्थ आहे सरदार, अग्रगण्य व्यक्ती. मीरज़ा ही पदवी शाही खानदानाच्या व्यक्तींसाठी वापरत असत. राजपुत्रांना मीरज़ा ही पदवी वापरली जात असे. शिवकालीन इतिहासात आपल्याला मिर्झा (मीरज़ा) राजे जयसिंह दिसतात. त्यांना औरंगज़ेबानें मीरज़ा ही मानाची (honourific) पदवी दिलेली होती. यावरून राजा जयसिंहांचें दरबारातील महत्व आणि मोठेपण अधोरेखित होतें. अशी मीरज़ा ही सन्मानाची पदवी बाळगणारे गालिब. त्यांना शायर म्हणूनही गालिब मान मिळत असे. बादशहा बहादुरशाह ज़फर याच्या दरबारातील मुशायर्‍यात गालिब यांना सन्मानाचें निमंत्रण असे. पुढे, बादशहाचे शायरीचे उस्ताद इब्राहीम ज़ौक़ यांच्या निधनानंतर गालिब यांना बादशहानें आपले  उस्ताद बनवलें होतें. कॉलेजचे प्रिन्सिपॉलही स्वत: गालिब यांना मानाची वागणूक देत असत, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे.

या पार्श्वभूमीवर, गालिब माघारी गेले  या घटनेत, बाब गालिबच्या-अपेक्षेच्या योग्यायोग्यतेची नसून, चालीरीतींबद्दलच्या-त्यांच्या-समजुतींनुसार-असलेल्या-त्यांच्या-अपेक्षेची, आणि त्यांच्या याआधीच्या अनुभवाची, पूर्ती न झाल्यामुळेच, गालिब यांनी ही कृती केली, हें  समजून घेणें आवश्यक आहे. आपल्याला स्पष्ट दिसून येतें तें असें की, गालिबच्या दृष्टीनें आपल्या खानदानी इज्जतीला महत्व होते ; मिंधेपणा गालिबना नको होता. अर्थात्, ही बाब ईगोची नव्हती, वृथाभिमानाची नव्हती, तर खुद्दारीची होती, स्वाभिमानाची होती.

-यासाठी आपण शिवाजी महाराजांचें उदाहरण पाहूं या. शिवाजी राजे आग्रा दरबारित औरंगजेबापुढे गेले तेव्हांचा प्रसंग बघा. निघण्यांपूर्वी मिर्झा राजांनी शिवाजी राजांना वचन दिलेलें होतें.  पुढे, दक्खन ते आग्रा या प्रवासात शिवाजी राजांची खातिरदारी होत गेली. या सर्वांमुळें, आपल्याला आग्यात कशी वर्तणूक मिळेल याबद्दल शिवाजी राजांची कांहीं अपेक्षा होत्या. त्यांना सुरुंग लागला तो आग्रा येथें पोंचतांच. मिर्झा राजांचा पुत्र रामसिंह हा सवत: त्याच्या स्वागताला येऊं शकला नाहीं. त्याच्या मुन्शीनें राजांचा मुक्काम एका सरायमध्ये टाकवला. दुसर्‍या दिवशीही त्यांची व रामसिंह यची जवळजवळ चुकामूकच झाली. शेवटी रामसिंह त्यांना दीवान ए खास मधील दरबारात घेऊन गेला, कारण तोंवर दीवान ए आम मधील दरबार संपलेला होता. त्या दरबारामधील शिष्टाचारांची व नियमांची कोणतीही कल्पना शिवाजी राजांना  आधी दिली गेलेली नव्हती. परिणामीं, जेव्हां त्यांनी पाहिलें की त्यांना जसवंइतसिंहाच्या मागील रांगेत उभे केलें गेलें आहे , तेव्हां त्यांचा परा चढणें स्वभाविकच होतें , कारण जसवंतसिंहाचा त्यांनी पराभव केलेला होता. थोडक्यात काय, तर मिर्झा राजांनी देली कल्पना आणि मार्गातील प्रत्येक ठिकाणीं झालेलें त्यांचें  स्वागत यावरून, ‘आपलें दरबारात कसें स्वागत होईल’ त्याबद्दल शिवाजी राजांनी जी अटकळ बांधली होती, तिला संपूर्ण छेद गेला.  त्यामुळें शिवाजी राजांनी, दरबारात दिली गेलेली खिल्लत धुडकावून लावली.

इथल्या शिवाजी राजांच्या वर्तनाला काय म्हणायचें , कारण? तो प्रश्न ईगोचा नव्हता, तर अपेक्षांचा होता.

तेंच गालिब यांच्या कॉलेजसंबंधी वर्तनाबद्दल म्हणतां येईल.

-वेगळ्या कारणासाठी कां असेना, पण अशा प्रकारची वर्तणूक मीही पाहिलेली आहे. कॉरपोरेट क्षेत्रातले एक गृहस्थ जर म्युच्युअली अपॉइंटमेंट ठरवून कुणाला भेटायला गेले, आणि ती दुसरी व्यक्ती त्या ठरलेल्या वेळीं तिथें हजर नसली, (आणि , खास करून, स्वत:च्या  absence बद्दल, अनुपस्थितीबद्दल, त्या दुसर्‍यानें कांहीं निरोपही ठेवलेला नसला), तर तें या गृहस्थांना अजिबात पसंत पडत नसे, आवडत नसे , (आणि ती भावना योग्यच आहे) . तरीही ते गृहस्थ कांहीं काळ त्या दुसर्‍या व्यक्तीसाठी थांबत , पण जर २५-३० मिनिटांमध्येसुद्धा जर ती दुसरी व्यक्ती आली नाहीं, तर ते गृहस्थ सरळ माघारी निघून जात.

अहो, हा प्रश्न ईगोचा नाहींच, तर तत्वाचा आहे. गालिबचें कॉलेजच्या नोकरीच्या संदर्भात तसेंच झालें. त्याबद्दल त्यांना व़ृथा दोष देणें योग्य नव्हे.

-जो कुणी माणूस स्वत: अशा प्रकारच्या प्रसंगातून गेलेला असेल, जिथें त्यानें स्वाभिमानाला अधिक महत्व महत्व दिलेलें असेल, अशा माणसाला हा मुद्दा लगेच पटेल ; इतरांना तो विचारान्तीं पटेल.

(पुढे चालू)

— IITian सुभाष स. नाईक   
मुंबई
मोबाईल : ९८६९००२१२६ , ९०२९०५५६०३.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in
वेबसाईट : www.subhashsnaik.com

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..