नवीन लेखन...

इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर

इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी झाला. गोल्डा माबोविच म्हणजेच गोल्डा मायर या इज्रायलची “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जात असत. १९६९ ते १९७४ त्यांनी इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले. ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत “सर्वात आवडती (admired) स्त्री” म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डा यांचा जन्म तेंव्हाच्या रशियामध्ये (आता युक्रेन) झाला. त्या लहान असताना वडील नोकरीधंद्यासाठी अमेरिकेला गेले आणि लवकरच त्यांनी आपल्या कुटुंबाला तिथे बोलवून घेतले.

गोल्डा अमेरिकेतल्या मिलवॉकी शहरातील ज्युईश वसाहती मध्ये मोठी होऊ लागल्या. माध्यमिक शाळा संपल्यावर गोल्डा यांना उच्च माध्यमिक शिक्षणाकरता मात्र आईवडीलांकडून विरोध व्हायला लागला. लग्न करुन मुलीनं घर वसवावं अशी आईवडीलांची इच्छा तर पुढे शिकून शिक्षक व्हावं ही गोल्डा यांची इच्छा! शेवटी कंटाळून त्या आपल्या मोठ्या बहिणीकडे डेन्व्हरला पळून गेल्या. तिथे त्यांच्या कुटुंबाबरोबर राहून उच्च्माध्यमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इथ पर्यंत गोल्डा यांचा राजकारणाशी, प्रखर ज्युईश धर्मियांशी फारसा संबंध आला नव्हता, पण बहिण आणि तिच्या नवर्याचकडे ज्युईश अभ्यासक, धर्माभिमानी लोक येऊन चर्चांच्या, गप्पांच्या मोठ्या फैरी झडायच्या. त्यांचं बोलणं ऐकून, हळूहळू चर्चांमध्ये सहभागी होऊन गोल्डा झायऑनिझम कडे जास्त आकृष्ट होऊ लागल्या. डेन्व्हर मध्ये असताना त्या मॉरिसच्या, प्रेमात पडली. त्या काळात १९१७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलाखाली पॅलेस्टाईनची घोषणा केली.

जगभरातील ‘ज्यू लोकांसाठी त्यांची एक जागा / घर’ अशी ह्या पॅलेस्टाईनची संकल्पना होती (National Home for the Jewish people). त्यानंतर महिन्याभरातच लग्न झाल्यावर पॅलेस्टाईनला रहायला जायचं ह्या अटीवर गोल्डा यांनी मॉरिसशी लग्न केले. १९२१ साली दोघही पॅलेस्टाईनला रवाना झाले आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये खडतर रितीने जात होते. गोल्डा हळू हळू छोट्या पातळीवर झायॉनिझम आणि त्यासंदर्भातील कामांमध्ये स्वतःला व्यस्त करत होत्या. काम, दोन मुले, संसार ह्यामध्ये गोल्डा पारंपारीक ज्युईश पद्धतीने घर चालवायचा प्रयत्न करत होत्या. मॉरिस आधीपासूनच फार पारंपारिक ज्यू नव्हता. खटके उडायला लागले.

१९२८ मध्ये गोल्डा मुलांसकट कामाकरता तेल अविवला रवाना झाली आणि हळू हळू लग्न संपुष्टात आले. ह्यापुढे मात्र गोल्डा ज्युईश कष्टकरी लोकांकरता काम करणार्याह “Histadrut” ह्या संघटनेत झटपट एक एक पायरी चढत त्यांच्या पॉलिटीकल विभागची प्रमुख बनल्या. त्याकाळात दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. वर्ल्ड झायॉनिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये गोल्डा यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. ज्यूंच्या पुनर्वसनाकरता एकट्या अमेरिकेतून ५० मिलीयनपर्यंत देणग्या जमा केल्या. प्रखर धर्माभिमानी, देशभक्त आणि तेवढीच प्रभावी वक्ती अशी त्यांची प्रतिमा होती.

पुढे १९४८ साली इज्रायलची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान बेन-गुरीयन यांच्या मंत्रिमंडळात ‘मिनिस्टर ऑफ लेबर’ म्हणून गोल्डा यांची निवड झाली. स्वतंत्र झाल्या झाल्या शेजारी अरब राष्ट्रांनी इज्रायल वर हल्ला चढवला. ह्या धामधुमीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुस्लीम स्त्रीच्या पेहेरावात वेशांतर करुन सरहदी पलिकडे जॉर्डनच्या किंग अब्दुल्लला युद्धात भात घेऊ नका म्हणून विनवणी करायला गोल्डा गेल्या. नवीन सैन्याला लढायला शस्त्रास्त्र आणि पैशांची गरज होती तेंव्हा ती मागणी करायला गोल्डा तडक अमेरिकेला पोहोचल्या. १९५६ साली परराष्ट्र मंत्री म्हणून गोल्डा यांची नेमणूक झाली. इतर राष्ट्रांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे, औद्योगिक, तांत्रिक, मिलिटरी क्षेत्रात सहकार्याने काम करणे इत्यादी बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. १९६६ साली गोल्डा यांनी निवृत्ती पत्करायचे ठरवले.

शांत आयुष्य जगणे, कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करणे, तब्ब्येतीकडे लक्ष देणे इत्यादी गोष्टींकरता ही निवृत्ती आवश्यक होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. १९६९ झाली त्यावेळच्या पंतप्रधानांचे निधन झाले आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून तिच्या पक्षाने पंतप्रधानपदाकरता त्यांची निवड केली. ही त्यांची राजकीय कारकिर्दीची परमावधी होती. त्या लोकांची आवडती पंतप्रधान होती. देशात राजकीय स्थैर्य येत होते तेवढ्यात १९७३ मध्ये इजिप्त आणि सिरियाने इज्रायल वर अनपेक्षितपणे हल्ला चढवला (योम किप्पूर वॉर). निकराने प्रतिकार परत इज्रायलने हल्ला परतवला आणि शेवटी त्यांचा विजय झाला, त्यात २७०० इज्रायली सैनिक धारातिर्थी पडले. एका छोट्या राष्ट्रकरता ही जबर किंमत होती. स्वत:च्या मनचे ऐकण्यापेक्षा मिलिटरीचे ऐकून सैन्य आधीच सीमेपाशी न हलवल्याचा गोल्डा यांना प्रचंड पश्चाताप झाला पण वेळ गेली होती. सगळे देशवासी आता तिच्याविरुद्ध झाले होते. सैनिकांच्या मृत्यूंचे खापर तिच्यावर फोडले गेले आणि १९७४ साली गोल्डा यांनी राजीनामा दिला.

योम किप्पूरच्या युद्धमुळे झालेले सर्व दु:ख आणि पश्चाताप, लोकांनी नाकारल्यामुळे झालेला अपमान आणि उपमर्द ह्यामुळे खचलेली गोल्डा शेवटच्या काही वर्षात मात्र परत समाधानाने जगू शकली. काळ लोटला लोकांचा प्रक्षोभ कमी झाला आणि आधीच अतिशय लोकप्रिय असलेल्या गोल्डाला लोकांचे उदंड प्रेम मिळले. गोल्डा मायर यांचे ८ डिसेंबर १९७८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..