नवीन लेखन...

घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा…

मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय?, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय… अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.

घराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.

आठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता… डबा खाल्ला का? सगळा का संपवला नाही? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? होमवर्क दिले का? अभ्यास कसा चालूय? सर काय म्हणाले? आता जायचे असेल हुंदडायला? या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी…! एखादा सिनेमा आवडला का? त्याची स्टोरी काय होती? त्यात तुला काय आवडले? मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का? अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच… हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात? किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात?

आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय… असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.

त्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.

औरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते?

मुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो?

पालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुकच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात… अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत…! हे थांबायला हवे.

मुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो… साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे…

— अतुल कुलकर्णी
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..