नवीन लेखन...

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ८

थंडीच्या मोसमात गायींना आत बंदिस्त लाकडी गोठयांमधे घेत असतील, अशी माझी समजूत होती. पण पहिला हिमवर्षाव झाला आणि फार्मच्या जवळून जाताना बघितलं तर सार्‍या गायी नेहमीसारख्या बाहेर उभ्या!  त्यांच्या काळ्याभोर पाठींवर, पांढर्‍याशुभ्र बर्फाच्या झुली उन्हात चमकत होत्या. बर्फाचं, थंडीचं त्यांना काही विशेष अप्रूप असावं असं वाटत नव्हतं. पुढे पुढे मग या दृष्याचीही सवय झाली. फूटफूटभर साचलेल्या बर्फात गायी आरामात बसायच्या. थंडीच्या मोसमात त्यांच्या अंगावरचे केस देखील चांगलेच राठ झालेले असायचे, त्यामुळेच त्यांना फारशी थंडी वाजत नसावी. कधी उत्तरेकडून येणारे बर्फाळ वारे अगदीच भणाणू लागले किंवा फारच जोरदार हिमवादळ झालं, तर मग सार्‍या गायी एके ठिकाणी गोळा होऊन, एकमेकींना अगदी चिकटून उभ्या रहायच्या. एकमेकींच्या शरीराची ऊब मिळवत, तो सारा कळप, शून्याखाली १५-२० डिग्रीच्या त्या जीवघेण्या थंडीचा सामना करायचा. पुढे मग आम्ही जेंव्हा ‘March of the Penguines’ हा चित्रपट पाहिला, तेंव्हा अंटार्टिकाच्या हिमवादळात, नर पेंग्वीन आपापल्या पायांमधे अंड पकडून, एकमेकांच्या शरीराचा आडोसा आणि ऊब मिळवत हिवाळा कसा काढतात ते बघितलं, आणि सू सेंटरच्या गायींची आठवण आली.

सप्टेंबरमधे मका, सोयाबीन कापून घेतली, की आताआतापर्यंत घनदाट हिरवीगार असणारी शेतं एकदम उघडीवाघडी होऊन जायची.  जुलै ते सप्टेंबर या काळात, उंचच उंच वाढलेल्या मक्याच्या रोपांनी रस्त्याच्या बाजूला भिंती तयार झालेल्या असायच्या. त्याच्यापलीकडे घरं, फार्मस्‌च्या शेड्स वगैरे झाकून जायचं. त्यामुळे सप्टेंबरमधे कापणी झाल्यावर एकदम पुन्हा सर्व काही मोकळं मोकळं व्हायचं आणि क्षितीजापर्यंतची जमीन चहूबाजूंनी पूर्ववत डोळ्यांसमोर उघडत जायची. शेतजमीनीच्या मधे मधे चराऊ कुरणं असायची. त्यांच्यावर एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत गाई गुरं मस्तपणे चरत असायची. ऑक्टोबरच्या आसपास उन्हाळा संपून हिवाळ्याची पुसटशी चाहूल लागायला लागली की गवत पिवळं पडायला सुरुवात व्हायची. मग मोठमोठे कंबाईन हारवेस्टर्स आणून, हे पिवळं पडलेलं गवत कापून घेऊन, त्याच्या एखादं बॅंडेज गुंडाळून ठेवावं तशा मोठमोठया गोल गंजी करून ठेवल्या जायच्या. सबंध माळरानावर अशा पिवळ्या धमक गंजी पडून राहिलेल्या असायच्या. मग पुढे कधी तरी त्यातल्या लागतील तेवढया ट्रकमध्ये घालून आपल्या फार्मवर नेवून ठेवल्या जायच्या.

इथे फेसंट्स (phesant) फार. अफाट पसरलेल्या माळरानांवर हे रानटी कोंबड्यांच्या आकाराचे पक्षी इथे तिथे चरताना दिसायचे. नरांचे रंग आपल्या गावठी कोंबड्यांसारखेच आकर्षक. त्यामानाने माद्या साध्या कबर्‍या रंगाच्या. त्यांना फारसं उडता येत नाही आणि त्यांची शिकार हा इथला फार मोठा छंद आहे. मका चांगला तयार झाला आणि त्याची पानं किंचितशी सुकायला सुरुवात झाली की या फेसंट्सची मेजवानी चालायची. मक्याच्या दाट पिकामधे ते चांगलेच लपून जायचे. अचानक एखादी कच्च्या रस्त्यावरून जाणारी गाडी धुरळा उडवत जवळ आली, की रस्त्याकडेचा एखादा फेसंट पंख फडफडवत, जमिनीपासून जेमतेम ५-१० फूट उंचीवरून, गाडीच्या पुढ्यातून रस्ता ओलांडून पलिकडच्या शेतात नाहीसा व्हायचा. पिकं कापली की उघड्या माळरानावर हे फेसंट्स चटकन दिसून यायचे. बहुदा एक नर आणि तीन चार मादया एकत्र दाणे टिपताना दिसायच्या. गाडीचा आवाज आला की जमिनीवरून पंख पसरून थोडी पावलं धावत जायचे आणि मग धडपडत उडत, जेमतेम ५०-१०० फूट फडफडत जाऊन अल्लाद उतरायचे.

गावातून जाणारी रेल्वे लाईन, पुढे त्या विस्तीर्ण माळावर चांगलं मोठं चंद्रकोरीसारखं वळण घेऊन, शेतांच्या आणि मळ्यांच्या मधनं जायची. दिवसाकाठी थोडयाफार मालगाडया ये जा करायच्या. गावातून शेताकडे जाणारे दोन रस्ते रेल्वे लाईनला आडवे जायचे. त्यामुळे मालगाडी यायच्या वेळेला या रस्त्यांवरची छोटीशी गेट्स बंद व्हायची. या गेटसच्या बाजूचे लाल दिवे उघडझाप करून गाड्यांना येणार्‍या मालगाडीची सूचना द्यायचे. चांगल्या १००-१५० डब्यांच्या त्या मालगाडया, चंद्रकोरीच्या आकारात, माळरानाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पसरून जायच्या. कधी कधी निवांतपणे गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करावी, क्षितीजावरून येणारा इंजिनाचा ठिपका मोठा मोठा होताना बघावा, त्याच्या मागे दोरखंडासारखी वळवळत येणारी आणि अजस्त्र रूप धारण करणारी गाडी बघत रहावी, तिची चंद्रकोराकृती नजरेच्या टप्प्यात सामावून  घेण्याचा प्रयत्न करावा आणि मग दुसर्‍या दिशेला माळरान कापत क्षितीजापार जाणारी तिची आकृती बघत रहावी. माळरानावर चरणार्‍या काळ्या गायी, कधी तरी त्या धडधडत जाणार्‍या धुडाकडे बघायच्या आणि मग पुन्हा डोकी खाली करून निवांतपणे चरायला लागायच्या. रात्रीच्या शांततेचा भंग करून, अधे मधे मालगाडीची शिट्टी ऐकू यायची आणि तिच्या मागोमाग अस्पष्टसा धडधडाट, अंधाराला हलवून माळरानावर विरून जायचा.

उन्हाळ्यातली हिरवीगार कुरणं आणि शेतं, ऐन हिवाळ्यात बर्फाच्या पांढर्‍या दुलईत गुरफटून गेलेला आसमंत आणि या दोन टोकांच्यामधला, रुखा रुखा, कबर्‍या मातीचा आणि पर्णरहित झाडांचा रुक्षसा परिसर, अशी निसर्गाची तीन रंगातली, तीन रूपं इथे बघायला मिळायची. तिन्ही रूपं एकमेकांपेक्षा एवढी भिन्न की एक रूप पहाताना, इतर दोन रूपांची कल्पना देखील करतां येऊ नये.

कधी संध्याकाळी वेळ मिळालाच आणि फारच कडाक्याची थंडी नसली, तर आम्ही आमच्या फार्महाऊसच्या आसपास कच्च्या रस्त्यांवरून फिरायचो. सिद्धार्थ सायकल चालवत आमच्या मागे पुढे असायचा. सार्‍या आसमंतावर शांततेचं साम्राज्य पसरलेलं असायचं. एखाद्या फार्मच्या पुढ्यातून जाताना, गाईंचं हंबरणं ऐकू यायचं. क्वचित एखादी गाडी किंवा ट्रक धुरळा उडवत गेली की तो धुरळ्याचा ढग, त्या स्वच्छ हवेत थोडावेळ तरंगून नाहीसा व्हायचा. दूर गावातले थोडे फार दिवे दिसायचे. क्षितीजावर, ग्रेन एलेव्हेटर आणि धान्याच्या उंच कणग्या, अंधारात मिसळून जाण्याच्या बेतात असायच्या. मधेच मालगाडी शिट्टी वाजवत, आसमंत जागवून जायची. मातीचा, गवताचा, पिकांचा, गायींचा, असे संमिश्र वास वातावरणात भरून राहिलेले असायचे. आकाशात कुठे कुठे चुकार नक्षत्रं उगवत असायची. आणि १४ दशलक्ष वस्तीच्या, मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात जीवन काढलेलं एक मराठी कुटुंब, हजारो मैलांवरच्या या दूरदेशीच्या खंडप्राय देशाच्या मध्यावर, एका खेडेवजा गावकुसात आणि सर्वस्वी निराळ्या वातावरणात, पूर्णपणे अनभिज्ञ अशा रस्त्यांवर आपल्या पाऊलखुणा उमटवत असायचं.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..