नवीन लेखन...

फोर व्हिलर

मी लहान असताना आमच्या कडे एकावेळी सहा सहा बैल असायचे. संपूर्ण शेती मग ती पावसाळ्यातील भात शेती असो की भात कापणी नंतर भाजीपाल्याचा मळा असो शेतीची कामे बैलांना नांगराला आणि बैलगाडीला जुंपून केली जात असतं. हळू हळू तीन बैलजोड्या होत्या त्यातील एक एक जोडी कमी होत गेली. शेवटी शेवटी तर एकच बैल उरला होता. एक बैल काहीच कामाचा नसल्याने त्याला विकण्या शिवाय पर्याय नव्हता असे असूनही त्याला विकायची ईच्छा होत नव्हती. एकाच बैलाला काही वर्षे संभाळल्यावर बाबांच्या एका मित्राने त्याला विकत नेण्याची तयारी दर्शवली.

माझ्या आईच्या वडलांना, आमच्या नानांना बैलांविषयी आणि बैल गाडयांच्या शर्यतींबद्दल खूप प्रेम होते. मांडव्याला त्यांच्याकडे नेहमी एकतरी बैल जोडी असायचीच. वयाच्या सत्तरी ओलांडल्यावर सुद्धा ते स्वतः अलिबाग रेवस रस्त्यावर त्यांची बैलगाडी बेफामपणे भरधाव वेगात स्वतः हाकायचे. संपूर्ण अलिबाग तालुक्यात आमचे नाना म्हणजे मांडव्याचे माने गुरुजी यांची बैलजोडी आणि त्यांच्या बैलगाडी शर्यतीबद्दल चर्चा होत असे. आमच्या नानांनी पारितोषिक मिळावे म्हणून किंवा पैसे असलेल्या शर्यतींमध्ये कधीच भाग घेतला नाही. अलिबाग रेवस रस्त्यावर फक्त आणि फक्त हौस म्हणून ते इतर बैलगाडीवाल्यांशी शर्यत लावायचे आणि त्यांना हरवायचे. आमचे नाना त्यांचे बैल सहसा कोणाला कामासाठी देत नसतं. आमच्या नानांना कोणतेही व्यसन नव्हते, परंतु बैल विकताना ते निर्व्यसनी व्यक्तीला कधीच बैल देत नसतं त्याबद्दल त्यांना एका निर्व्यसनी व्यक्तीने विचारले असता त्यांनी त्याला सांगितलं की, निर्व्यसनी माणूस एकदा कामासाठी जुंपल्यावर माझ्या बैलांना क्षणभर सुद्धा आराम करू देणार नाही. तेच विडी ओढणारा किंवा तंबाखू खाणारा व्यक्ती त्याला तलफ आल्यावर तंबाखू मळेपर्यंत किंवा विडी ओढे पर्यंत पाच मिनिटं का होईना पण शांतपणे उभं राहू तरी देईल.

आमच्याकडील बैल माझ्या बाबांनीसुद्धा त्यांच्या सासऱ्यांच्या याच विचारांमुळे काम नसताना चार वर्षे सांभाळला आणि शेवटी त्यांचाच मित्र मागतोय म्हणून नाईलाजाने विकून टाकले.

परंतु हा बैल विकण्यापूर्वी शासकीय अनुदान घेऊन आम्ही एक पॉवर टिलर विकत घेतला होता. दोन चाकं आणि मागे एक लहान चाक असलेला पॉवर टिलर पावसाळ्यात चिखल करण्यासाठी आणि नंतर शेताच्या नांगरणी साठी खूप सोयीचा झाला होता. परंतु या पॉवर टिलर सोबत आम्ही शेतमालाची आणि दगड माती ने आण करण्याकरिता लागणारी ट्रॉली नव्हती घेतली.

माझे सोमैया कॉलेज मधून रडत रखडत बी ई मेकॅनिकल होऊन वर्षभरात काचेच्या बाटल्या तयार करण्यासाठी लागणारी मशीन बनवणाऱ्या कंपनीत दोन महिने , त्यांनतर काही दिवस एका कास्टिंग कंपनीत आणि जवळपास आठ महिने पनामा या ब्लेड बनवणाऱ्या कंपनीतून सुरु झालेले करिअर एक वर्षाच्या प्री सी ट्रेनिंग नंतर जहाजावर काम करणारा मरीन इंजिनियर म्हणून सेटल झाले होते. पहिल्यांदाच ब्राझील च्या कोस्टल शिपवर साडे आठ महिने पूर्ण करून आल्यावर पॉवर टिलर साठी ट्रॉली घेण्यासाठी शोधाशोध केली असता 2009 साली पॉवर टिलर साठी लागणाऱ्या ट्रॉलीची किंमत तीस हजारांच्या पुढे असल्याचे समजले. तसेच अशा ट्रॉली ह्या तीन ते चार वर्षांत गंज लागून किंवा वापरामुळे दुरावस्था होऊन टाकून द्याव्या लागतात अशा क्वालिटीच्या असतात असे कळले. शेजारील एका गावांत अशी ट्रॉली गंज खात पडून आहे अशी माहिती मिळाली. सहजच म्हणून ती ट्रॉली पाहायला गेल्यावर आपण सुद्धा अशी ट्रॉली बनवू शकतो असे वाटून गेले. बी ई मेकॅनिकल असूनही फॅब्रिकेशन आणि डिझाईन वगैरेचा काहीही अनुभव नव्हता तरीपण चला करून बघू या असा विचार केला आणि लागलो कामाला. भिवंडी शहराजवळ जुन्या फोर व्हिलर गाड्या तोडून त्यांचे पार्टस भंगारात विकणारे उद्योधंदे आहेत. टाटा सुमो या गाडीचा रिअर ऍक्सल म्हणजे टाटा सुमोची मागील दोन्ही चाके आणि त्यांची असेम्ब्ली ज्यावर गाडीची पूर्ण बॉडी बसवली जाते असा मागील दोन चाकांचा सेट, टायर आणि ट्यूब सह फक्त पाच हजारात मिळाला. त्यानंतर त्याच्यावर ट्रॉलीचा सांगाडा बनवण्यासाठी स्टील चे चॅनेल आणि अँगल्स एका भंगारवाल्याकडूनच स्वस्त भावात खरेदी केले. सगळे सामान गोळा करून झाल्यावर गरज होती ते जोडणाऱ्या एका वेल्डरची. फक्त सातशे रुपयात एका वेल्डर ने हे काम करून दिले आणि ट्रॉलीचा सांगाडा पूर्ण झाला. या सांगाडयावर आमच्या शेतावर तोडलेल्या मोठं मोठ्या झाडांपासून बनवलेल्या लाकडी फळ्या लावल्या. आमची बैलगाडी संपूर्ण पणे लाकडा पासून बनवलेली असल्याने आणि वर्षोनुवर्षे बैलगाडी जशी च्या तशी राहत असल्याने ट्रॉलीला सुद्धा लाकडी फळ्या लावायचा निर्णय योग्य आणि खूपच स्वस्त पडला. बारा ते साडेबारा हजारात माझी ट्रॉली तयार झाली. करून तर बघू या वृत्तीचा जहाजावर एवढा फायदा झाला की एखादी नुकतीच बंद पडलेली किंवा पहिलेपासून असलेली मशीनरी सहकाऱ्यांना सोबत घेऊन जुगाड करून सुरु करायची मग त्यासाठी जहाजावर स्पेअर पार्टस असो किंवा नसो बंद पडलेली मशीन किंवा पार्टस सुरु केल्याबद्दल वरिष्ठांकडून कौतुकाची थाप आणि कंपनी कडून प्रमोशनची व इन्क्रिमेंटची भेट न मागताच मिळत राहिली.

आता जवळपास बारा वर्षे होत आली त्या ट्रॉलीला, कापणी झाल्यावर शेतातून भाताचे भारे, मळणी झाल्यावर भाताने भरलेल्या गोणी तसेच दगड, माती, विटा, रेती असं कितीतरी सामान शेतांच्या बांधांवरुन, कच्च्या पक्क्या रस्त्यावरून आणि खाच खळग्यातून वाहून आणले आहे. एखाद दोन ठिकाणचे वेल्डिंग तुटले असेल ते रिपेरिंग करून आणि लाकडी फळ्या बदलून, स्टील प्लेट किंवा प्लायवूड वगैरे लावून सुमारे एक तपभर ऊन, वारा आणि पाऊस सहन करून कुठलेही तंत्रज्ञान, डिजाईन किंवा ड्रॉइंग नसताना मी बनवलेली आमची पहिली फोर व्हिलर आजही तिच्यानंतर आमच्या घरात आलेल्या दोन कार आणि तीन टेम्पो यांच्यासह दिमाखात उभी आहे.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B.E.(mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

1 Comment on फोर व्हिलर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..