नवीन लेखन...

निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक डॉ. व्हिविअन थॉमस

डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या जगप्रसिद्ध ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ ही उपचारप्रणाली विकसित करण्‍यात ज्‍यांचे मोलाचे योगदान आहे ते व्हिविअन थॉमस! थॉमस, डॉ. ब्‍लॅलॉक यांचे शल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान सहायक होते. चौतीस वर्ष डॉ. ब्‍लॅलॉक व थॉमस यांनी एकत्र काम केले. डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या कित्‍येक संशोधनांचा पाया थॉमस यांनीच रचला होता. थॉमस कृष्‍णवर्णी-आफ्रिकन वंशाचे होते. त्‍यामुळे त्‍यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असे. ब्‍लॅलॉक यांच्‍याइतकेच किंबहुना कांकणभर सरस असे शल्‍यचिकित्‍सेतील कौशल्‍य थॉमसकडे होते. त्‍यांच्‍या हाताखाली शिकून विद्यार्थी निष्‍णात शल्‍यचिकित्‍सक झाले, इतके त्‍यांचे कौशल्‍य होते. हृदयशल्‍यचिकित्‍सेतील महारथी डॉ. डेंटन कूली हे थॉमस यांचेच विद्यार्थी. थॉमस यांच्‍याबद्दल बोलतांना डॉ. कूली यांनी म्‍हटले आहे की ज्‍यांनी शस्‍त्रक्रिया कधीही पाहिलीदेखील नसेल असा मनुष्‍य देखील थॉमस यांच्‍याकडून शिकून उत्तम काम करू शकतो कारण एकच, व्हिविअन ते इतके सहज सोपे करतो की ते आम्‍हाला जमते. परंतु थॉमस यांना जिवंत रुग्‍णावर कधीच शस्‍त्रक्रिया करावयास मिळाली नाही.

गरीबी व वर्णभेद यावर मात करून, वेगवेगळ्या सामाजिक अडथळ्यांची शर्यत पार करून थॉमस यांनी मिळविलेल्‍या उत्तुंग यशाची ही कहाणी आहे. बुद्धिमत्ता, अफाट परिश्रम करण्‍याची क्षमता व चिकाटीच्‍या जोरावर हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात आपल्‍या कर्तृत्‍वाचा अमीट ठसा उमटविणार्‍या माणसाची यशोगाथा म्‍हणजे व्हिविअन थॉमस.

२९ ऑगस्‍ट १९१० रोजी लुईसिआना प्रांतातील न्‍यूइबेरिआ येथे थॉमस यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे आजोबा गुलाम होते. थॉमस यांना डॉक्‍टर होण्‍याची तीव्र इच्‍छा होती. परंतु १९२९ सालच्‍या मंदीमुळे त्‍यांना या स्‍वप्‍नास दूर सारावे लागले. त्‍याऐवजी डॉ. ब्‍लॅलॉककडे शस्‍त्रक्रिया-सहायक म्‍हणून त्‍यांनी कामास सुरुवात केली. पहिल्‍याच दिवशी डॉ. ब्‍लॅलॉक यांना एका श्‍वानावर प्रयोग करण्‍यास थॉमस यांनी मदत केली. थोड्याच दिवसांत थॉमस त्‍यांच्‍या कामात इतके निष्‍णात झाले की डॉ. ब्‍लॅलॉक येईपर्यंत थॉमस यांनी श्‍वानांवरील शस्‍त्रक्रिया करण्‍यास सुरुवात केलेली असे. व्‍हॅनडरबिल्‍ट विद्यापीठात थॉमस डॉ. ब्‍लॅलॉकच्‍या हाताखाली काम करीत. थॉमसच्‍या कामाचे स्‍वरूप व व्‍याप्‍ती कोणत्‍याही पोस्‍टडॉक्‍टरल संशोधकाच्‍या तोडीची होती परंतु त्‍यांना पगार मात्र साध्‍या हरकाम्‍याचा मिळत असे. तेव्‍हा जागतिक मंदी आली होती. थॉमस यांनी ज्‍या नॅशव्हिल बॅंकेत पैसे ठेवले होते ती मंदीमुळे बुडाली. अशा परिस्थितीत कमी पगाराची का असेना, नोकरी आहे याचेच थॉमस यांना अप्रूप होते.

थॉमस व ब्‍लॅलॉक यांनी ‘हेमरेज’ व ‘ट्रॉमा’ यावर बरेच संशोधन केले. दुसर्‍या महायुद्धकाळात या संशोधनाचा खूप उपयोग झाला. कित्‍येक जखमी सैनिकांचे प्राण वाचण्‍यास यामुळे मदत झाली. या संशोधनामुळे डॉ. ब्‍लॅलॉक यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. त्‍यानंतर ब्‍लॅलॉक यांनी रक्‍तवाहिन्‍या व हृदयावरील शस्‍त्रक्रियांच्‍या संदर्भात कामाला सुरुवात केली. मदतनीस अर्थातच थॉमस होते. १९४१ च्‍या सुमारास ब्‍लॅलॉकचे नाव सर्वतोमुखी झाले व जॉन हॉपकीन्‍सरुग्‍णालयामध्‍येत्‍यांना शल्‍यचिकित्‍सेचे प्रमुखपद देण्‍यात आले. तेव्‍हा थॉमस यांनी त्‍यांच्‍याबरोबर यावे म्‍हणून ब्‍लॅलॉकनी गळ घातली.

जेव्‍हा थॉमस, जॉन हॉपकिन्‍स येथे पोहोचले तेव्‍हा त्‍यांच्‍या असे लक्षात आले की यापूर्वी काहीच नाही असा तेथे वर्णभेद होता. कृष्‍णवर्णी लोक विद्यापीठात फक्‍त हरकामे गडी म्‍हणूनच नोकरीला होते. जेव्‍हा थॉमस पांढरा कोट घालून प्रयोगशाळेत येत तेव्‍हा अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या जात.

याच दरम्‍यान डॉ. ब्‍लॅलॉक यांना डॉ. टॉऊसिग भेटल्‍या. ‘टेट्रालॉजी ऑफ फॅलॅा’ म्‍हणजे जन्‍मतःच ज्‍या बालकांच्‍या हृदयाला छीद्र असते त्‍यामुळे त्‍या बालकांच्‍या शरीरावर निळसर झाक असते. या विकारास ‘ब्‍लू बेबी’ असेही संबोधिले जाते. डॉ. टॉऊसिग बालहृदयरोगतज्‍ज्ञ होत्‍या व त्‍यांच्‍याकडे या विकाराने ग्रस्‍त असे कितीतरी रुग्‍ण उपचारासाठी येत. त्‍यामुळे यावर तातडीने शल्‍यचिकित्‍सेद्वारे मार्ग काढण्‍यासाठी त्‍या उत्‍सुक होत्‍या. डॉ. ब्‍लॅलॉकना त्‍यांनी हा प्रश्‍न सांगितला. ब्‍लॅलॉकनी थॉमसची मदत घेतली. थॉमस यांनी पुढील दोन वर्षांत २०० श्‍वानांवर प्रयोग केले व ‘टेट्रालॉजी ऑफ फॅलॅा’ सदृश स्थिती तयार करण्‍यात ते यशस्‍वी झाले. त्‍यावरील शस्‍त्रक्रियाही त्‍यांनी विकसित केली. थॉमस यांनी ‘अॅना’ नावाच्‍या एका श्‍वानावर ही शस्‍त्रक्रिया करून दाखविली. ते पाहून डॉ. ब्‍लॅलॉक इतके प्रभावित झाले की, ‘हे तर ईश्‍वरी कृत्‍यच वाटते’ असे त्‍यांनी प्रशंसोद्गार काढले.

२९ नोव्‍हेंबर १९४४ रोजी एका १८ महिन्‍यांच्‍या बालकावर प्रथम ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. बालकांवर हृदयशल्‍यचिकित्‍सा करण्‍यास सुयोग्‍य अशी उपकरणे तेव्‍हा उपलब्‍ध नव्‍हती. थॉमस यांनी त्‍यावर देखील मार्ग काढला. प्रयोगशाळेत प्राण्‍यांवर काम करतांना ते ज्‍या उपकरणांचा वापर करीत त्‍यातील सुया, चिमटे यांचा त्‍यांनी प्रभावी वापर केला. शस्‍त्रक्रियेदरम्‍यान थॉमस, डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍या शेजारी एका लहानशा स्‍टुलावर उभे राहून सूचना देत होते. त्‍याचे कारण थॉमस यांनी ही शस्‍त्रक्रिया यापूर्वी शेकडो वेळा श्‍वानांवर केली होती तर ब्‍लॅलॉक यांनी फक्‍त एकदाच केली होती. यानंतर एका सहा वर्षांच्‍या मुलावर हीच शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. शस्‍त्रक्रिया पूर्ण होताक्षणीच त्‍याच्‍या अंगावरील निळसर झाक नाहीशी झाली. १९४५ च्‍या मे महिन्‍यात ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने’ (जामा) यावर एक लेख प्रसिद्ध केला. त्‍यात सारे श्रेय डॉ. ब्‍लॅलॉक व डॉ. टॉऊसिग यांनाच देण्‍यात आले. थॉमस यांचा उल्‍लेखही करण्‍यात आला नाही.

थॉमस यांनी कितीतरी शल्‍यचिकित्‍सकांना तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले. डॉ. डेंटन कूली यांच्‍यासारख्‍या हृदयशल्‍यचिकित्‍सेतील महारथींनी थॉमस यांचे ऋण मान्‍य केले; मुलाखतींमधून त्‍यांची प्रशंसा केली. असे असले तरी थॉमस ‘सहायक’च राहिले व तुटपुंज्‍या पगारावर काम करीत राहिले, इतका तीव्र स्‍वरुपाचा वर्णद्वेष तेव्‍हा अस्तित्‍वात होता. या संदर्भातील एक नित्‍य घटनाक्रम म्‍हणजे उत्‍पन्नास जोड देण्‍यासाठी थॉमस, ब्‍लॅलॉकच्‍या घरी समारंभात मदतीस जात. दिवसा विद्यापीठात ते ज्‍यांचे प्रशिक्षक असत त्‍या प्रशिक्षणार्थी व इतर शल्‍यचिकित्‍सकांपुढे ते अशा समारंभात ‘बारटेंडर’ म्‍हणून समोर येत. ब्‍लॅलॉक यांनी थॉमस यांच्‍यासाठी बरीच खटपट केल्‍यानंतर थॉमस यांच्‍या वेतनात वाढ करण्‍यात आली व विद्यापीठातील सर्वात जास्‍त वेतन मिळविणारे ते तंत्रज्ञ ठरले.

लहान असल्‍यापासून डॉक्‍टर होण्‍याचे थॉमस यांचे स्‍वप्‍न होते. बरीच वर्षे शल्‍यचिकित्‍सा-सहायक म्‍हणून काम केल्‍यावर त्‍या अनुभवाच्‍या आधारावर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्‍हणून त्‍यांनी प्रयत्‍न केले. मॉर्गन विद्यापीठाने त्‍यांना प्रवेश देण्‍याची तयारी दाखविली परंतु त्‍यांना सुरुवातीपासून अभ्‍यास करावा लागेल असे सांगितले. इतका अनुभव गाठीशी असूनही सुरुवातीच्‍या अभ्‍यासक्रमातून सूट देण्‍यास नकार दिला. हे सर्व पूर्ण होऊन डॉक्‍टरकीची पदवी मिळेपर्यंत थॉमस पन्नाशी गाठणार होते. त्‍यांनी प्रदीर्घ विचार करून डॉक्‍टर होण्‍याचा विचार रद्द केला.

ब्‍लॅलॉक यांच्‍याबरोबर थॉमस यांनी बरीच वर्षे काम केले. व्‍हॅनडरबिल्‍ट विद्यापीठात व नंतर जॉन हॉपकीन्‍स रुग्‍णालय येथे काम करीत असतांना वरिष्‍ठांशी ब्‍लॅलॉकनी प्रसंगी वादही घातला कारण त्‍यांना थॉमसच हवे होते. थॉमस यांना वेतनवाढ मिळावी म्‍हणूनही ब्‍लॅलॉकनी खटपट केली परंतु शोधनिबंध प्रकाशित करतांना अथवा इतरही ठिकाणी श्रेय देतांना थॉमस यांचा नामोल्‍लेखही टाळला. ब्‍लॅलॉकच्‍या निधनापर्यंत थॉमस त्‍यांच्‍यासोबत काम करत होते. पण त्‍यांच्‍यातील संबंध तणावपूर्ण झाले होते. १९६४ साली ब्‍लॅलॉकचे कर्करोगाने निधन झाले त्‍यानंतर १५ वर्षे थॉमस, जॉन हॉपकीन्‍स रुग्‍णालयात काम करीत होते. अखेरीस त्‍यांना ‘डायरेक्‍टर ऑफ सर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीज’ असा हुद्दा देण्‍यात आला. जॉन हॉपकीन्‍स येथील पहिले कृष्‍णवर्णी हृदयशल्‍यविशारद लेव्‍ही वॅटकीन्‍स यांनीव्हिविअन थॉमस यांच्याकडे प्रशिक्षण घेतले.व्हिविअन थॉमस वलेव्‍ही वॅटकीन्‍स यांनी‘ऑटोमेटिक इम्‍प्‍लांटेबल डिफिब्रिलेटर’वर काम केले. थॉमस यांनी जॉन हॉपकीन्‍स येथे ३७ वर्षे काम केले. १९७६ मध्‍ये त्‍यांना मानद डॉक्‍टरेट प्रदान करण्‍यात आली व शल्‍यचिकित्‍सा प्रशिक्षक म्‍हणून त्‍यांचा अध्‍यापकवर्गात समावेश करण्‍यात आला. इतकेच नव्‍हे तर जॉन हॉपकीन्‍स येथील चार वैद्यकीय महाविद्यालयांना, ज्‍यांनी वैद्यकशास्‍त्रात मोलाची भर घातली आहे अशांची नावे देण्‍यात आली; त्‍यामधील एका वैद्यकीय महाविद्यालयास थॉमस यांचे नाव देण्‍यात आले. २६ नोव्‍हेंबर १९८५ रोजी थॉमस यांचे निधन झाले. १९९० मध्‍ये त्‍यांच्‍या जीवनावरील लेखास राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. २००३ मध्‍ये त्‍यांच्‍यावरील चित्रफीत ‘पार्टनर्स ऑफ हार्ट’ प्रकाशित झाली. २००४ मध्‍ये एच.बी.ओ. तर्फे त्‍यांच्‍या जीवनावर आधारित ‘समथिंग द लॉर्ड मेड’ प्रकाशित झाला.

१९९६ सालापासून ‘कौन्सिल ऑफ कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सर्जरी अॅण्‍ड अॅनॅसस्थेटॉलॉजी’तर्फे थॉमस यांच्‍या स्‍मरणार्थ पुरस्‍कार देण्‍यात येतो. १९९३ सालापासून थॉमस यांच्‍या स्‍मरणार्थ ‘ग्लॅक्‍सोस्मिथक्‍लाईन पुरस्‍कृत शिष्‍यवृत्ती’ देण्‍यात येते.

— डॉ. हेमंत पाठारे व डॉ. अनुराधा मालशे

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..