नवीन लेखन...

असामान्य व्यक्ती – डॉ. स्टीफन हॉकिंग

इंग्लंड मधे एक तरुण ऑक्स्फर्ड विद्यापीठात शिकत होता. त्याला गणित विषयात पदवी घ्यायची होती. पण त्या विषयाचे अध्यापन तेथे होत नसल्याने भौतिकशास्त्रात त्याने पदवी घेतली. तो तरुण कॅंब्रिज विद्यापीठात विश्वरचनाशास्त्र (Cosmology) या विषयात Ph.D. करण्यासाठी आला. एकविसाव्या वर्षी त्याने ट्रिनिटी कॉलेजमधे संशोधनाला सुरूवात केली.

त्या सुमारास त्याला शारीरिक हालचालीवर बंधन येत असल्याचे जाणवू लागले. दिवसेंदिवस हालचाली आणखी मन्द होऊ लागल्या. चाचण्यांच्या आधारे ALS (Amytrophic Lateral Sclerosis) चे निदान झाले. डॉक्टर म्हणाले, “तू आणखी अडीच वर्षाच्या वर जगणार नाहीस”.

ओळखलं कोण होती ती व्यक्ती?  नाही?

आणखी काही काळात त्याच्या शरीराचे स्नायू कमजोर झाले. इतके की तो चाकाच्या खुर्चीला जखडला गेला. आता नक्की ओळखले असेल तो कोण होता ते. होय. तो होता विद्यार्थी दशेतला स्टीफन हॉकिंग. पुढे जगप्रसिद्ध झालेला शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग.

आपण अडीच वर्ष जगणार हे कळल्यावर हॉकिंगने स्वत:ला संशोधनात झोकून दिले. ही सीमारेषा त्याने पार केली, Ph.D. मिळवली.  अभ्यास सुरू ठेवला. सुरुवातीला क्लिकर वापरु शकत असलेले त्याचे हात नंतर बधिर झाले. त्याच्या चकाच्या खुर्चीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी सुसज्ज केले गेले. गालाला संवेदना ग्राहक (सेन्सर्स) बसवून संगणकाशी संपर्क साधता येऊ लागला. ध्वनी संस्करण करून शब्दाना आवाजात रुपांतरित केले जाऊ लागले. ही उपकरणे व मदतनीस यांच्या साहाय्याने स्टीफन हॉकिंग बाह्य जगाशी संपर्क ठेऊ लागले. पंचाहत्तरीतसुध्दा त्यांचा मेंदू विलक्षण क्षमतेने काम करत होता. हॉकिंग दक्षिण धृवावर गेले आहेत. शून्यवत गुरूत्वाकर्षणाचा अनुभवही घेतला आहे. त्यांची पुढील मोहिम ही अंतराळ प्रवासाची ठरली होती. आहे की नाही कमाल?  हॉकिंगच्या म्हणण्यानुसार, “No one can resist the idea of a crippled genius”. ‘विकलांग असुनही अलौकिक बुद्धिमत्ता असणे’ ही कल्पना कोणी नाकारू शकणार नाही.

१९७४ मधे त्यांनी दाखवून दिले की, “मृत झालेल्या तार्‍यातून (Black Hole) प्रारण रूपात वस्तुमान बाहेर पडते”. याला ‘Hawking Radiation’ म्हणून ओळखले जाते.  या शोधामुळे हॉकिंग प्रसिद्ध (Celebrity) पावले. “आइनस्टाईन नंतरचा प्रतिभावान शास्त्रज्ञ” असे त्यांच्या बाबतीत म्हटले आहे. हॉकिंग म्हणतात, “मला कधी कधी असे वाटते की, मी जेवढा माझ्या कामासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच माझ्या चाकाच्या खुर्चीसाठी आणि व्यंगासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे का?” विज्ञान जगतात त्यांचे शोध ही त्यांची पहिली ओळख आहे. सर्वसामान्यांसाठी चाकाची खुर्ची हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. वैज्ञानिक दोन प्रकारचे असतात – प्रायोगिक आणि सैद्धांतिक. हॉकिंग हे दूसर्‍या प्रकारातले वैज्ञानिक आहेत. आइनस्टाइनचे सैद्धांतिक निष्कर्ष प्रायोगिक शास्त्रज्ञ १०० वर्षानंतरही सिद्ध करीत आहेत. असेच स्वरूप हॉकिंगच्या शोधांचेही आहे. ते सिद्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

स्टीफन हॉकिंगचे ‘A Brief History of Time’ हे पुस्तक ही त्यांची आणखी एक ओळख आहे. हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले तेव्हा फारच कमी समजले. आपल्याला काय कळले नाही याची मी लांबलचक यादी तयार केली. न समजलेल्या संकल्पना समजून घेण्याची मोहिम पूर्ण केली. नंतर मी वरील पुस्तक पुन्हा वाचले तेव्हा १२ वर्षे मधे लोटली होती. ह्या वेळेस मला ते पुस्तक खूपच सोपे वाटले.

दरम्यानच्या काळात माझी या विषयाची गोडी वाढत गेली. लंडनची Greenwich Observatory माझे पर्यटन स्थळ बनले. घराच्या खिडकीतून आकाशाकडे रोखलेला टेलिस्कोप माझा सखा बनला. लंडन येथे भरलेल्या European Astronomical Conference मधे चालू संशोधनाविषयी माहिती मिळाली. या सर्वांच्या जोडीला ब्रिटीश व अमेरिकन वाचनालयातील पुस्तकांचा खजिना होता. वास्तविक हा माझ्या शिक्षणाचा वा कामाचा (करियर) विषय नव्हता. मला हॉकिंगची कर्मभूमी पाहण्याचे वेध लागले. मी केंब्रिजला गेलो. जे पद न्यूटनने भूषवीले होते त्या ‘Lucasian Professor of Mathematics’ ह्या पदावर हॉकिंग होते. न्यूटनच्या काळची इमारत व त्यांची खोली पहिली.

हॉकिंग चे नवे ऑफीस म्हणजे DAMTP (Department of Applied Mathematics and Theoretical Physics) बिल्डिंग. तेथे जाण्याचा माझा उद्देश एकच होता. घरून ऑफीसकडे जात असलेली व्हीलचेअर वर बसलेली त्यांची मूर्ती दिसावी. पण हॉकिंग त्यावेळी भारतात आलेले होते. एक संधी हुकली होती. काही वर्षानी दुसर्‍या खेपेलाही हुकली. पण हॉकिंग व त्यांचे पूर्वसुरी यांच्या कर्मभूमीला माझे पाय लागले ही जमेची बाजू होती. त्यांचा एक जर्मन सहायक मला भेटला. एकमेकांची ओळख झाली. मी IIT मुंबई मधून गणित शिकल्याचे सांगितले. तो Cosmology चा विद्यार्थी होता. त्याने डॉ नारळीकर यांचा उल्लेख केला. ‘ब्लॅक होल’ या विषयावर त्याचे काम सुरू होते. त्यावर आमची  थोडी चर्चा झाली.

१६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात.

जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील? अज्ञात पातळीवर काही कारणमीमांसा असेल का? मला काही उलगडत नाही. आपल्याकडील एक घटना मला या संदर्भात आठवते. सन 1893 मधे अरविंदबाबू केंब्रिजमधून भारतात परत आले आणि तीनच महिन्यानंतर स्वामी विवेकानंद अमेरिकेला जाण्यासाठी बोटीत चढले, हिंदू धर्माचा प्रसार विदेशात करण्यासाठी एकाने प्रस्थान ठेवले पण त्यागोदर दुसर्‍याने भारतातील सूत्रे हाती घेतली होती, एकमेकांच्या नकळत. तीन महिने हे आपले मोजमाप, तीनशे वर्षे हेही आपल्या मापाने. पण त्या अज्ञात पातळीवर हा काळातला फरक नगण्य असु शकतो.

हॉकिंगने म्हटले आहे, “The universe is governed by the laws of science. The laws may have been decreed by God, but God doesn’t intervene to break the laws”. सृष्टीचे नियम बनविणारा जो कोणी असेल तो या नियमात ढवळाढवळ करीत नाही. ‘योगायोग’ ही मानवाने निर्माण केलेली संकल्पना आहे.

त्यांचा ‘मृत्यू’ (14 मार्च 2018) ही योगायोगाचीच घटना ठरली. आइनस्टाईनचा जन्मदिवस 14 मार्च. हाच दिवस ‘Pi Day’ म्हणून ओळखला जातो.

— रवि गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

6 Comments on असामान्य व्यक्ती – डॉ. स्टीफन हॉकिंग

  1. Is technology developed for Mr. Hoking to communicate developed further to many it available commercially? Or does it remain prohibitively expensive?

    • Hawking’s needs were very specific. Right from British accent to technical vocabulary. The wheelchair setup was a unique piece. Of course as you have pointed the innovation must have certainly been used in pieces and parts though expensive.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..