नवीन लेखन...

एक परीस स्पर्श (भाग – २३)

आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता. विजय आत्मपरीक्षण करू पाहत होता. त्याला वाटत होते त्याच्या दृष्टीने तो यशस्वी होता पण जगाच्या दृष्टीत नव्हता. त्याच्या आई वडिलांनाही तो अपयशी वाटतो. विजयच्या कारखान्याचा मालक त्याला काय करायचेत पैसे ? त्याचं कोण आहे ? त्याच तर लग्नही झालं नाही ! लग्न झालं नाही म्हणून पैसे लागत नाहीत ! हे त्या मूर्खाला कोणी सांगितले देव जाणे ? विजय आपल्या कुटुंबाची जबाबदारी वयाच्या सोळाव्या वर्षांपासून वाहत होता. आजही वाहत आहे….म्हणूनच तो आयुष्यात यशस्वीही होऊ शकला नाही आणि स्वतःसाठी बचतही करू शकला नाही. त्यात त्याच्या ह्या कारखान्याच्या मालकाने कधीही त्याला त्याच्या कामाचा योग्य मोहबदला दिला नाही. पण म्हणूनच तो ही आयुष्यात फार यशस्वी होऊ शकला नाही. जयराम शेठ नेहमी त्याच्या लग्नाविषयी विचारत ! त्यासाठी पैशाची मदत लागल्यास ती ही ते द्यायला तयार होते. ते अशिक्षित असतानाही त्यांनी एका कारखान्याचे चार कारखाने केले. एका घराची चार घरे केली. एका गाडीच्या तीन गाड्या केल्या, कामगारांच्या जे हक्काचे आहे ते द्यायला कधीही कसूर केली नाही. म्हणून ते आयुष्यात इतके यशस्वी झाले. त्या विरुद्ध विजयचा मालक आजही स्वतःच स्वतःची ओझी वाहत होता. फक्त विजय होता म्हणून त्याचा कारखाना सुरू होता. नाहीतर त्याच्या कारखान्यात तोच मालक आणि तोच नोकर अशी परिस्थिती निर्माण झाली असती. विजय त्याच्यातील गुणांमुळे खूप लोकांना प्रिय होता.  त्यात जयेशसारखे बरेच श्रीमंत व्यक्ती होते. विजयच खरं तर त्या कारखान्यातील पगारामुळे काही अडत नव्हतं पण आपण जे काम करतो त्याचे योग्य मानधन मिळायलाच हवे ! हे विजयच्या वडिलांचे म्हणणे होते. ते योग्य ही होते. विजयचा मालक एकदा असंही म्हणाला होता…तो जे काही शिकला ते येथेच शिकला ना ? त्यावर विजयच म्हणणं होतं मग त्याला पंचवीस वर्षात दुसरा विजय तयार करणे का जमले नाही ? त्याने तसा प्रयत्न केला नाही असे अजिबात नाही…त्याने तसा प्रयत्न बऱ्याचदा करून पाहिला होता. पण मुळात विजयकडे जी अचाट बुद्धी होती ती तो कोणाच्यात कशी निर्माण करणार होता. विजयची क्षमता त्यांच्यासारखी अनेक लोकं घडविण्याची होती. आणि तो निर्बुद्धी आपण त्याला फसवतोय या आनंदात आनंदी होत राहिला. म्हणूनच मागे राहिला… कोणालाही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप लोकांना सोबत घेऊन पुढे जावं लागतं…समाजात जितका मानसन्मान आज विजयला आहे तितका त्याच्या मालकालाही नाही…कारण एकच विजयला दुसऱ्याच्या सुखात सुखी होता येत होतं…

विजयला कोणी अन्न वाया घालविताना दिसले तर त्याला प्रचंड राग येतो. विजयच्या ताटात कधीच उरलेले अन्न नसते. कारण तो ताटात कधीच अधिकचे काही घेत नाही. त्यामुळे तो कोणाच्या लग्न समारंभाला गेला असता जेवणाच्या ताटात नेमकेच पदार्थ घेतो. ते ही कमी प्रमाणात ! घेतलेले तेवढेच खातो आणि निघतो. फुकटचे आहे म्हणून सर्व पदार्थ ताटात घेऊन नतंर खपत नाहीत.  म्हणून टाकून देणारे पाहिले की विजयच्या तळपायाची आग मस्तकात जाते.  आई गावी गेल्यावर  जर विजयवर जेवण करायची पाळी आली तर रात्रीचे जे उरेल ते तो सकाळी खातो. म्हणजे भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करून खातो. चपाती उरली तर तिचा चिवडा करून खातो. हो ! विजयला सर्व पदार्थ उत्तम करता येतात कारण त्याची आई नोकरी करायला लागल्यावर तो जेवण करायला शिकला. फक्त शिकला नाही तर उत्तम करायला शिकला. विजय या बाबतीत कधीच कोणावर अवलंबून राहिला नाही त्याच्या लहानपणी प्रसंगी त्याने भात फक्त तिखट मसाला आणि मीठ त्यात मिसळून खाल्ला होता. तर चपाती नुसता तिखट मसाला आणि  मीठ गोड्या तेलात त्याचा घोळ करून त्यासोबत खाल्ली होती. कित्येकदा आंब्याच्या कैरीचे बारीक तुकडे मीठ मसाल्यात घोळून त्यासोबतही चपात्या खाल्या होत्या.  काहीच नाही तर बऱ्याचदा त्याने फक्त कांद्या सोबत अथवा कांद्याच्या चटणीसोबत चपात्या खाल्ल्या होत्या. त्यापेक्षाही भारी म्हणजे पाटा – वरवंट्यावर वाटलेला मसाला चपातीला लावून खाण्यात एक वेगळीच  मजा त्याला वाटत असे. हो ! विजयला पाट्यावर वरवंट्याने मसाला वाटताही येत असे. त्यावेळच्या त्या अन्नाला जी चव होती ती चव विजयला पुन्हा कधीही अनुभवता आली नाही. अन्न मिळविण्यासाठी विजयला जी धडपड करावी लागली होती. ती धडपड विजय कधीच विसरणार नव्हता. देशात कित्येक लोकांना एका वेळच पोटभर अन्न मिळत नसताना आपण जर अन्न वाया घालवत असू तर त्याची प्रत्येकाला लाज वाटायला हवी ! विजयचे हे विचार फक्त अन्नाच्या बाबतीत नाही तर पाणी आणि विजेच्या बाबतीतही आहेत. शॉवर खाली अंघोळ केल्यामुळे खूप पाणी वाया जाते हे लक्षात येताच त्याने शॉवर खाली अंघोळ करणे बंद केले. घरातील सर्व बल्ब बदलून त्याजागी कमी व्होल्टेज असलेले एल. ई.डी बल्ब लावले.  विजय ज्या कारखान्यात काम करतो त्या कारखान्यात जिथे आणि जेवढ्या प्रकाशाची गरज आहे तेवढेच बल्ब सुरू ठेवतो . ते पाहून एक जण म्हणाला, तू तुझ्या मालकाचा खूप फायदा करतोस ? त्यावर विजय म्हणाला,” मी विजेची बचत त्याच्यासाठी नाही, तर  ! माझ्या देशासाठी करतो. म्हणूनच हल्ली विजय कोणाच्या समारंभांना जाणं टाळतो. विजय कधीही भांडाऱ्यात जेवत नाही कारण त्या भांडाऱ्यात जेवण वाया जायचे ते जातेच पण भांडाऱ्याचा मूळ उद्देश्य तो ही सार्थक होताना दिसत नाही कारण या भंडाऱ्यात हल्ली फक्त भरल्या पोटाचेच जेवतात पुण्य मिळावे म्हणून….

हल्ली सोशल मीडियावर एक पोस्ट सतत वाचायला मिळते ती म्हणजे तूळ राशींचे भाग्य बदलणार आहे.  पुढची अकरा वर्षे त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहणार वगैरे….विजय मनातल्या मनात म्हणाला, “निदान एक तरी चांगली पोस्ट वाचायला मिळाली नाहीतर सोशल मीडियावर सोसत नाहीत.  अशाच पोस्ट वाचायला आणि पाहायला मिळतात. हल्ली ! बातमी एकाची , फोटो एकाचा, कशाला कशाचा मेळ नाही. कालच विजयने एक पोस्ट पाहिली एका अभिनेत्रीने आपल्या काखेतील केस दाखवून फोटो काढला होता  त्याची बातमी झाली होती. आता यात बातमी कसली ? जेथे केस उगवतच नाहीत तेथे उगवले असते तर बातमी झाली असती. स्त्रियांच्या काखेतील केस हे पुरुषांच्या आकर्षणाचा विषय आहे. असे विजयने कोठेतरी वाचल्याचे त्याला आठवले. सोशल मीडियावर बातम्या पोस्ट करणारे जे कोणी त्यांना पत्रकारितेतला प ही माहीत नाही म्हणून ते या अशा बातम्या देतात. कोणाच्याही मृत्यूची खातरजमा न करता भावपूर्ण श्रद्धांजली… देऊन मोकळे होतात. या मूर्खाना फॉलो करणारे ते तर महामुर्ख ! भावपूर्ण श्रद्धांजली… तर देतातच त्यात भरीस भर म्हणून ती पोस्ट शेअर करतात. हे असे स्वयं घोषित पत्रकार कमावतातही बऱ्यापैकी या अशा फालतू बातम्या आणि पोस्ट टाकून…त्याला कारण आहे ? आजची पिढी पैसे कमावण्यापुरतेच पुस्तके वाचते. उरलेले जे वाचते ते सोशल मीडियावर…विजयला आठवते पूर्वी म्हणजे फोर जी यायच्या अगोदर बसमध्ये बसलेल्यांपैकी निदान दोन चार लोकांच्या हातात तरी वर्तमानपत्र दिसायचा पण आता कोणाच्याच हातात दिसत नाही. सर्वांच्या हातात मोबाईल आणि कानात एअरफोन असतात. मुलींच्या कानात जरा जास्तच असतात. एकदा बसमध्ये एका मुलीला विजय त्याला उतरायचे होते म्हणून तीनदा साईड प्लिज ! म्हणाला , पण तिला काही ऐकू गेलं नाही. मग वैतागून विजय तिला धक्का मारून पुढे गेला. नशीब ती म्हणाली नाही की ह्याने माझा विनय भंग केला नाही. त्या एअर फोनच्या नादात एकदा एक मुलगी गाडी खाली येता येता वाचली. त्या दिवशी विजय ज्या अपघातातून वाचला ! तेंव्हा जर त्याच्या कानात एअर फोन असते तर…विजय कधीच एअरफोन वापरत नाही….ते त्याच्या कानाला सहनच होत नाहीत. खरं तर विजय मोबाईलचा वापरच नाईलाज म्हणून करतो… एकीकडे लोक म्हणतात. मोबाईल जवळ नसेल तर लोकं वेडी होतात. विजय मोबाईल जवळ नसेल तेंव्हा शांत असतो. विजय त्याच्या गावी गेल्यावर मोबाईलचा वापर करतो तो फक्त फोटो काढायला…अर्थात सेल्फी…कारण त्याच्या सोबत तेंव्हा कधीच कोणी नसते….विजय फक्त सेल्फीतच सुंदर दिसतो…असे त्याचे प्रांजळ मत आहे… विजयच्या कारखान्यात काम करताना तो साधा रेडिओ ही लावत नाही… कारण त्याला एका वेळी एकच काम करायला आवडते. मुली मोबाईलवर काय बोलतात ? हा जगासाठी कुतूहलाचा विषय पण विजयच्या एका मित्राने काय बोलतात हे त्याला ऐकूनच दाखवले होते. एक तासाच्या बोलण्यात एक शब्दही कामाचा नव्हता. सारी बडबड निरर्थक होती…

— निलेश बामणे 

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..