नवीन लेखन...

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग १

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले.

“खांडेकर चाळ” नावाच्या एका इमारतीत काहीं मध्यम वर्गीय किंवा त्याहून खालच्या स्तरांतल्या लोकांची वस्ती रहात होती. तिथे श्री. रंगनाथ पै (पै-माम) आपली पत्नी सरीता आणि मुलगी लक्की यांच्यासह रहात होते. त्याच इमारतीत तळ मजल्यावर सावित्री, तिचा नवरा दत्ताराम खेर आणि मुलगा सुरेश असा परीवार रहात होता.

रंगनाथ पै हे “स्वामी विश्रांती गृह” नांवाच्या एका उडुपी हौटेलचे मालक होते. ऐन मोक्याच्या ठिकाणी होटेल असल्यामुळे ते भरभराटीत चालत होतं. पण त्यांच्या पत्नीची- सरिताची प्रकृती बरी रहात नसे. औषधोपचार, डौक्टर, इस्पितळ यावर खूप खर्च होत असे. सरीताच्या सुश़ृषेला आणि घरकामाकरतां पै माम नी त्याच बिल्डिंगच्या तळ मजल्यावर रहाणार्या सावित्री बाईची नेमणूक केली होती. सावित्री बाई सर्व कांही नीट सांभाळून घेत असे. सरीताची सुश़ृषा, स्वयंपाक, घरची साफसफाई, शिवाय ९ वर्षांच्या लक्कीला तयार करून शाळेत पाठवायला स्कूल बसपर्यंत नेणे, इत्यादि कामं करीत असे. सावित्रीचा ११ वर्षांचा मुलगा मदत करत असे. गणवेष घालून झाल्यावर लक्कीच्या पायांत सॅाक्स आणि बूट घालायला तोच असे.लक्की कॅान्व्हेण्ट शाळेत शिकत असे आणि सुरेश साध्या मराठी शाळेत जात असे. दोघांची मैत्री जमली. शाळा सुटल्यावर दोघे चैापाटीवर खेळायला जात.

त्यांचा आवडता खेळ म्हणजे ओल्या वाळूंत एकाने आपला एक पाय रोवायचा व त्यावर दोघांनी आपल्या हातांनी वाळू थापायची. नंतर अलगदपणे तो पाय काढून घ्यायचा. छानपैकी घर बनत असे. दोघे आनंदाने टाळ्या वाजवत. पाण्याच्या एका लाटेसरशी ते घर उध्वस्थ होई. मुलं घरी येत.

एकदा असेच वाळूत ती दोघं खेळत बसली होती. लक्कीने आपला डावा पाय ओल्या वाळूत रोवला होता आणि सुरेश आपल्या दोन्ही हातांनी वाळू थापत होता. लक्की आपल्या डाव्या हाताने वाळू थापत होती. खेळ ऐन रंगात आला होता.

“सुरू, तू माझ्याशी लग्न करशील का रे?” लक्कीच्या अचानक प्रश्नाने सुरेश गांगरला क्षणभर शांत राहून तो म्हणाला.
“आपण खूप लहान आहोंत.लोकं मोठे झाल्यावर लग्न करतात.”
“हो रे. आपण मोठे झाल्यावर लग्न करूंया.” ती भाभडेपणे म्हणाली. “तुला मी आवडते कां रे?” पुन्हा भाभडा प्रश्न. सुरेशला उत्तर सुचलं नाही. पण तरी तो “हो” म्हणाला.
“पप्पा म्हणतात- माझं लग्न होणारच नाहीं, कां तर मी कोणालाही आवडत नाही. मला नीट स्वयपाक करता येत नाही, केलेला स्वयपाक पंक्तीत नीट वाढता येत नाही, शिवाय मी डावखोरी. तुला चालेल?” तिने विचारलं. “तू माझ्यावर प्रेम करतोस कां? असं मी विचारणार नाहीं. कां, तर पप्पांनी सावित्री बाईंना मागे एकदा ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’असं म्हण्टलं म्हणून सावित्री बाईंनी त्याना थोबाडीत मारलं होतं.” लक्कीच्या बोलण्यावर सुरेश गप राहिला.

त्या दिवशी तो घरी उशीरा आला. आईला काळजी वाटली. “कां रे बाळा उशीर?” आईने विचारलं. “आई, मी लक्कीबरोबर वाळूंत खेळत होतो. आई, प्रेम म्हणजे काय?” त्याने प्रश्न केला. आईने उत्तर देण्या आधी त्याचे बाबा तिथे आले आणि मागचा -पुढचा विचार न करता त्यांनी सुरेशच्या थोबाडीत भडकावली. “ओठ पिळले तर दूध निघेल आणि प्रेमांत पडतो काय?” त्यांनी सुनावलं. गाल चोळत, रडत सुरेश आईच्या कुशीत शिरला. आईने ममतेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

बाबांचा राग शांत झाला. त्यानी आपल्या पोराला जवळ घेतलं. “हे बघ बाळा, आपण गरीब आहोंत. श्रीमंत बापाच्या मुलीच्या नादी नाही लागायचं “. जवळच एक आरशाचा तुकडा पडला होता. बाबांनी तो खिडकीतून येत असलेल्या चंद्राच्या प्रकाशात धरला. आरश्याच्या तुकडयात चंद्राचं प्रतिबिंब दिसत होतं. “हा चंद्र खरा, आरसाही खरा, पण हे चंद्राचं प्रतिबिंब खोट. माझ्या पोरा, खोट्याच्या नादी लागून फसू नकोस रे बाळा…” असं म्हणत त्यांनी मुलाला कवटाळलं. अश्रूंना वाट करून दिली.

सुरेशला काहीसं समजलं पण तरी बरंच काही समजलं नाहीं. तो त्याच अवस्थेत झोपला.

दुसरे दिवशी तो आईबरोबर पै माम च्या घरीं कामाला गेला. त्याने निश्चय केला आणि बेधडक पै माम समोर उभा राहिला.

“मला लक्कीशी लग्न करायचंय. माझं तिच्यावर प्रेम आहे.” पै माम नी पेपरांतून डोकं वर काढलं. सुरेशला वाटलं- पै माम थोबाडीत मारणार- पण ते खो खो हंसू लागले.

“Calf love- कोंवळं प्रेम” त्यांच्या या उद्गाराचा अर्थ त्याला कळला नाही. “म्हणजे माझं लग्न तिच्याशी होणार नाही?” पुन्हा भाभडा प्रश्न. यावर पै माम काहीं बोलले नाहीत पुन्हा हंसत राहिले. “तूं अजून लहान आहेस, बाळ!” ते म्हणाले. सुरेश तिथेच उभ्या असलेल्या लक्कीला सांगितलं. ” आपलं “calf love” म्हणून लग्न होणार नाहीं”

सरिता बिछान्यावर पडल्या पडल्या ऐकत होती.
“हे काय केलंस? त्या मुलाला उगीच निराश केलंस !” ती आपल्या पतीला ‘अरे तुरे’ म्हणे.
“हंग पळे, तौ कौणू, तागेल बापिस कौणू, ह्यै गोत्त नांं. आमी जी एस बी, मळ्येरी गौड सारस्वत ब्राह्मण.” त्याने कोंकणी भाषेत सुरुवात केली. सरिताने नजरेंने खुणावलं.
“तूं कोण होतास रे? एक साधा स्वैपाकी, गडी माणूस, माझ्या पप्पांनी तुला वर आणलं, माझ्याशी लग्न लावून दिलं.” हा घाव वर्मावर बसला. तरी पै माम पुढे म्हणाले,
“आत्ता त्यांची निराशा होईल पण पुढे ती दोघं मोठी झाल्यावर त्यांचं लग्न झालं नाही तर तो घाव त्याना सहन होणार नाहीं” सरीता गप राहिली.

सरिता जे म्हणाली ते खरं होतं.

३५ वर्षेांपूर्वी दामोदर शेणौय यांनी ‘स्वामी विश्रांती गृह’ या नांवाने होैटेल थाटलं. एक दूरची नातेवाईक ५ वर्षाच्या एका अनाथ मुलाला त्यांच्याकडे घेऊन आली. “ह्याक पळे” म्हणून त्याला सांभाळायची जबाबदारी तिने दामू आण्णांवर टाकली आणि ती निघून गेली. सुरुवातीला दामू आण्णांनी रंग्याला उष्टी भांडी घांसायला ठेवलं. हळू हळू त्याला स्वयंपाकाला ठेवलं. त्याला शिकायची आवड म्हणून नाईट स्कूलमध्ये घातला. तो मोठा झाल्यावर त्याला त्याच होटेलात मेेेैनेजर केला. त्यांची एकुलती मुलगी सरिता नेहेमी आजारी असे. तिला योग्य असा नवरा – तिच्याकडे लक्ष देणारा – आणि सालस म्हणून त्यानी रंगनाथची निव़ड केली. त्याला आपल्या धंद्यात भागीदार केला. कालांतराने त्यांच्या पश्चात रंगनाथ पै त्या हॅाटेलाचे मालक बनले. संसारात नीट लक्ष दिलं पण चार मुलं होऊन ती जगली नाहींत म्हणून त्या दोघांनी महालक्ष्मीच्या देवीला सांकडं घातलं. मुलगी झाली. तिला लक्ष्मी हे नांव ठेनलं. ती नीट वाढूं लागली.

“आई, जी एस बी म्हणजे काय, आपण कोण आहोंत ?” त्या रात्री सुरेशने आपल्या आईला विचारलं.

“तूं त्याची काळजी करूं नकोस” सावित्री बाईनी त्याला आपल्या कुशीत घेऊन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. “आपण कोण?” हा प्रश्न त्याने पुन्हा विचारला.
नाईलाज झाला म्हणून सावित्री बाईने सांगायला सुरुवात केली.
“आपण देवरुखचे- देवरुखे ब्राह्मण- आपलं आडनांव ‘देवरुखकर’ तुझ्या बाबांनी आडनांव बदलून ‘खेर’ असं केलं. पण तूं हे कोणाला सांगू नकोेस” सावित्रीबाईला अजून कांही सांगायचं होतं पण पोर झोपलं होतं.

दत्ताराम खेर हा मूळचा देवरुखचा. देवरुखे ब्राह्मण. त्यांचे पूर्वज देवरूख इथे पुरोहित म्हणून मानले जात. लोकांची श्रद्धा मंदावली, परंपरागत पैारोहित्यावर परीणाम झाला. दत्तारामच्या आजोबांनी मोटर कार, ट्रक – लैारी रिपेरिंगचं गैरेज उघडलं. दत्तूला त्यांत रस नव्हता. त्याने एस् टी. त ड्रायव्हरची नोकरी धरली. परळला नेमणूक झाली. पण कधी कधी रात्र पाळीला जावं लागत असे. दारूचं व्यसन लागलं. आपली जात कोणालाही समजूं नये म्हणून त्याने ‘खेर’ असंं बदलून घेतलं. साबित्रीला सुद्धा इतर घरांत हलकी करावी लागत म्हणून जात लपवावी लागे.

(क्रमशः)

— अनिल शर्मा 

Avatar
About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..