नवीन लेखन...

डॉ. नॉर्मन शुमवे

हृदय-प्रत्‍यारोपणाच्‍या इतिहासात डॉ. नॉर्मन शुमवे यांचे नाव सोनेरी अक्षरांत लिहिलेले आहे. त्‍यांनी अमेरिकेतील स्‍टॅनफोर्ड येथील पहिले हृदय-प्रत्‍यारोपण केले. त्‍याआधी बराच काळ ते यावर काम करीत होते. या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्‍याचे श्रेय शूमवे यांच्‍याकडे जाते. डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी शुमवे यांच्‍याकडे हृदय-प्रत्‍यारोपणाचे प्रशिक्षण घेतले असे म्‍हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. मानवी हृदय-प्रत्‍यारोपणाची पूर्वतयारी करण्‍यासाठी शुमवे बरेच प्रयत्‍नशील होते. त्‍यांनी प्राण्‍यांवर, विशेषतः श्‍वान-हृदयांवर पुष्‍कळ काम केले होते. १९५८ मध्‍येच त्‍यांनी एका श्‍वानावर यशस्‍वीपणे हृदय-प्रत्‍यारोपणाची शस्‍त्रक्रिया केली होती. परंतु मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली नव्‍हती. शुमवे यांचे त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न चालू होते. एक दशकाहून अधिक काळ यावर काम केल्‍यावर दि. २० नोव्‍हेंबर १९६७ रोजी शुमवे यांनी असे जाहीर केले की, ते व त्‍यांचे सहकारी मानवी हृदय-प्रत्‍यारोपण करण्‍यास सक्षम असून योग्‍य दात्‍याची वाट पाहात आहेत. शुमवे यांची ही घोषणा जगभरात प्रसृत करण्‍यात आली. दक्षिण आफ्रिकेतील आकाशवाणीनेही यास प्रसिद्धी दिली. दुसर्‍याच दिवशी ‘साऊथ आफ्रिकन केप टाईम्‍स’ने असे वृत्त प्रसिद्ध केले की केप टाऊन येथील ग्रुटे शूर रुग्‍णालयातील डॉक्‍टरांचे पथक मानवी हृदय-प्रत्‍यारोपण करण्‍यासाठी सज्‍ज आहे. त्‍यानंतर ३ डिसेंबर १९६७ रोजी डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. अमेरिकेत न्‍यूयॉर्क येथे डॉ. अॅड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ यांनी देखील एका नवजात शिशूवरहृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. डॉ. बर्नार्ड यांनी केलेल्‍या शस्‍त्रक्रियेनंतर शुमवे यांनी ८ जानेवारी १९६८ रोजी  माईक कास्‍पेराक या पोलाद कारखान्‍यात काम करणार्‍या ४५ वर्षांच्‍या कामगारावर हृदय-प्रत्‍यारोपणाची शस्‍त्रक्रिया केली. शुमवे यांचा स्‍वभाव अतिशय बुजरा व प्रसिद्धीपराङ्मुख होता. डॉ. बर्नार्ड व डॉ. कॅन्‍ट्रोव्हिटझ यांच्‍या यशामुळे शुमवे यांना खरे तर हायसे वाटले. त्‍यांना प्रसिद्धीचा प्रकाशझोत नको होता. तो आपोआपच डॉ. बर्नार्ड यांच्‍याकडे वळल्‍यामुळे शांतपणे काम करून त्‍यावर शोधनिबंध प्रकाशित करता येईल अशी शुमवे यांची भावना झाली.

शुमवे यांनी त्‍यानंतर १९८१मध्‍ये जगातील पहिले हृदय व फुफ्फुस-प्रत्‍यारोपणही केले. ९ फेब्रुवारी १९२३ रोजी अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील कालामाझु या गावी शुमवे यांचा जन्‍म झाला. सुरूवातीस ते वैद्यकीय शिक्षण घेत नव्‍हते. त्‍यांनी १९४१ मध्‍ये जेव्‍हा मिशिगन विद्यापीठात प्रवेश घेतला तो कायद्याचे शिक्षण घेण्‍यासाठी. दोन वर्षे कायद्याचे शिक्षण घेतल्‍यावर ते लष्‍करात दाखल झाले. (तेव्‍हा दुसरे महायुद्ध चालू होते व सैन्‍यभरती जोरात होती.) लष्‍करात असतांना त्‍यांना एका कल-चाचणीत एक प्रश्न विचारण्‍यात आला. उत्तरासाठी दोन पैकी एका पर्यायाची निवड करावयाची होती. पर्याय होते १) वैद्यकीय शिक्षण  २) दंतवैद्यशास्‍त्र. शुमवे यांनी वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय निवडला. त्‍यानंतर लष्‍करातर्फे टेक्‍सास येथील बेलर विद्यापीठात एका विशेष कार्यक्रमांतर्गत त्‍यांना प्रवेश देण्‍यात आला. त्‍यानंतर शुमवे यांनी व्‍हॅन्‍डरबिल्‍ट विद्यापीठातून १९४९ मध्‍ये एम.डी.ची पदवी मिळविली. मिनेसोटा विद्यापीठात प्रशिक्षणार्थी म्‍हणून काम करीत असताना हृदयशल्‍यचिकित्‍सेत त्‍यांना विशेष आवड निर्माण झाली. त्‍यानंतर शुमवे यांनी दोन वर्षे वायुदलात काम केले व परत मिनेसोटा विद्यापीठात प्रवेश घेऊन हृदय-शल्‍यचिकित्‍सेत १९५६ मध्‍ये पी.एच.डी. मिळविली.

१९५८ मध्‍ये ते स्‍टॅनफर्ड येथे शल्‍यचिकित्‍सा प्रशिक्षक म्‍हणून रुजू झाले. त्‍यानंतर थोड्याच काळामध्‍ये स्‍टॅनफर्ड चे वैद्यकीय महाविद्यालय सॅनफ्रॅन्सिस्‍कोहून पावलोआल्‍टो येथे स्‍थलांतरित झाले. तेथील विस्‍तीर्ण प्रांगणात शुमवे यांना ‘कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सर्जरी’ (हृदयशल्‍यचिकित्‍सा) विभागासाठी प्रशस्‍त जागा उपलब्‍ध झाली.

डॉ. शुमवे पत्रकार परिषदेत बोलताना

१९५९ मध्‍ये शुमवे यांनी त्‍यांचे शल्‍यचिकित्‍सा सहायक रिचर्ड लोवर यांच्‍यासमवेत प्रथम एका श्‍वानाचे हृदय दुसर्‍या श्‍वानावर प्रत्‍यारोपित केले. तो श्‍वान शस्‍त्रक्रियेनंतर ८ दिवस जगला. अशी शल्‍यचिकित्‍सा करता येते हे त्‍यातून सिद्ध झाले. त्‍यानंतर ८ वर्षे शुमवे यांनी श्‍वानांवर शस्‍त्रक्रिया केल्‍या व हृदय-प्रत्‍यारोपण करण्‍याचे तंत्र विकसित केले. सरतेशेवटी १९६७ मध्‍ये त्‍यांना असे वाटले की मानवी हृदय-प्रत्‍यारोपण करण्‍यास ते सज्‍ज आहेत. ८ जानेवारी १९६८ रोजी शुमवे यांनी मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. या घटनेला जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. शस्‍त्रक्रिया चालू असतांना रुग्‍णालयाच्‍या बाहेर पत्रकारांची झुंबड उडाली होती. काही अतिउत्‍साही लोकांनी रुग्‍णालयाच्‍या भिंतीवरून उडी मारून शस्‍त्रक्रिया पाहण्‍यासाठी आत घुसण्‍याचाही प्रयत्‍न करून पाहिला. या पहिल्‍या हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रियेबद्दलची आठवण सांगताना शुमवे यांचे सहायक एडवर्ड स्‍टीवसन यांनी यथार्थ वर्णन केले आहे. ते म्‍हणतात की ज्‍या रुग्‍णाला नवीन हृदय बसवायचे होते त्‍याच्‍या शरीरातील हृदय काढल्‍यावर आम्‍ही क्षणभर त्या पोकळीकडे थोडेसे भयचकित होऊन पाहात राहिलो. ‘अरे बापरे! हे काय करून बसलो . . .’ असाही विचार मनात चमकून गेला. परंतु डॉ. शुमवे अतिशय स्थिरचित्त होते. ते शांतपणे म्‍हणाले मी सांगू शकत नाही. आता काळच काय ते ठरवेल. याबद्दल बोलतांना शुमवे यांनीही हाच कसोटीचा क्षण नेमकेपणाने टिपला. त्‍यांनी एक अतिशय ‘हृद्य’ आठवण सांगितली, ते म्‍हणाले, ‘आम्‍ही नवीन हृदय रुग्‍णाच्‍या शरिरात बसविले. पण सुरुवातीस काहीच घडले नाही. मग ईसीजी मशीनवर हळूहळू हालचाल दिसू लागली. हृदयाची स्पंदने जास्‍त जोरकस होऊ लागली आणि एकदम आमच्‍या लक्षात आले की आपण ‘तो’ टप्‍पा पार केला आहे’.

या क्रांतिकारी शस्‍त्रक्रियेनंतर शुमवे यांनी त्‍यांचे काम आणखी जोमाने चालू केले. १९९१ पर्यंत ते व त्‍यांच्‍या सहकारी पथकाने ६१५ रुग्‍णांवर ६८७हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केल्‍या. त्‍यापैकी काहींवर दोन वेळा शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. या शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍या. ८०% पेक्षा जास्‍त रुग्‍णांना पाच वर्षे किंवा त्‍याहून अधिक आयुष्‍य मिळाले. एका रुग्‍णाला तर २० वर्षे नवे जीवनदान  मिळाले.

त्‍या काळात अॅंटीरिजेक्‍शन औषधे नवीन होती त्‍यामुळे रुग्‍णाचे शरीर नवीन अवयव स्‍वीकारेल की नाही हे ठरविणे कठीण होते. तेव्‍हा शुमवे यांनी याविषयावर काम करण्‍यास सुरुवात केली. ‘सायक्‍लोस्‍पोरिन’चा वापर करण्‍यास शुमवे यांनी प्रथम सुरुवात केली. रिजेक्‍शनचा धोका होता, तसाच जंतुसंसर्गाचा देखील धोका होता. त्‍यावर मात करण्‍यासाठी शुमवे यांनी एक प्रणाली विकसित केली होती. ‘इम्‍यूनोसप्रेसिंग’ (नवीन अवयव शरीराने नाकारू नये म्‍हणून दिले जाणारे औषध) औषधाची मात्रा किती असावी यावर तेव्‍हा खल चालू होता. खूप कमी औषध दिले तर रुग्‍णाचे शरीर नवीन हृदय नाकारण्‍याचा धोका होता पण औषधाची मात्रा जास्‍त झाली तर ‘प्राणघातक जंतुसंसर्ग’ होण्‍याचा धोका होता. परंतु शुमवे यांनी विकसित केलेल्‍या प्रणालीत यातून मार्ग काढला होता. ते रुग्‍णाच्‍या हृदयात एक कॅथेटर घालून त्‍यातून अत्‍यंत सूक्ष्‍मप्रमाणात उतीचा भाग परीक्षणासाठी काढून घेत. त्‍यात जर का हृदय नाकारले जाण्‍याची लक्षणे दिसली तर ते औषधाची मात्रा वाढवीत असत. याद्वारे त्‍यांनी हृदय प्रत्‍यारोपित झालेल्‍या रुग्‍णांचा  मृत्‍युदर लक्षणीयरित्‍या कमी केला.

बोस्‍टन येथील जो. मरे (यांनी १९५४ साली पहिली मूत्रपिंड प्रत्‍यारोपणाची शस्‍त्रक्रिया केली, त्‍यांना त्‍यासाठी नोबेल पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले.) तसेच ब्रिटिश इम्‍युनॉलॉजिस्‍ट सर पीटर मेडवार (यांनाही नोबेल पारितोषित मिळाले) यांच्‍यापासून शुमवे यांनी प्रेरणा घेतली व प्रत्‍यारोपण- विशेषतःहृदय-प्रत्‍यारोपणावरकाम करण्‍यास सुरुवात केली. सर पीटर यांच्‍याबद्दल बोलतांना शुमवे नेहमी असे म्‍हणत की, ‘केवळ त्‍यांचा सहवास काम करण्‍यास उर्जा देतो. नवी प्रेरणा मिळते. विलक्षण बुद्धिवंत व तितकाच स्‍नेहार्द असा हा थोर शास्‍त्रज्ञ माझे प्रेरणास्‍थान आहे’.

शुमवे यांनी केवळ हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रियांचे तंत्रज्ञान विकसित केले, इतकेच नव्‍हे तर सहकारी ब्रुस रिट्झ यांच्‍यासमवेत १९८१ मध्‍ये पहिले हृदय व फुफ्फुस-प्रत्‍यारोपण केले. जाहिरातक्षेत्रात काम करणार्‍या श्रीमती मेरी गोल्‍हकी यांच्‍यावरील ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली. शस्‍त्रक्रियेनंतर त्‍या ५ वर्षे जगल्‍या. शुमवे यांनी ८०० हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रियांपैकी काही प्रत्‍यक्ष केल्‍या तर काहींमध्‍ये निरीक्षकाची भूमिका पार पाडली. १९६५ मध्‍ये ते स्‍टॅनफर्ड येथील हृदयशल्‍यचिकित्‍सा विभागाचे प्रमुख झाले; १९९३ मध्‍ये निवृत्त होईपर्यंतत्‍यांनी हे पद भूषविले. या काळात त्‍यांनी अध्‍यापन देखील केले. जगभरातील शल्‍यचिकित्‍सकांना प्रशिक्षण दिले. विपुल लिखाण केले. त्‍यांचे ४४७ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अतिशय विनम्र व प्रसिद्धीपराङ्मुख असे त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व होते.

विपुल सन्‍मान व पुरस्‍कारांनी त्‍यांना गौरविण्‍यात आले. त्‍यातील काही उल्‍लेखनीय पुरस्‍कारः-

१९७१ – रेने लेरिच प्राईज

१९७२ – टेक्‍सास हार्ट इन्सिट्यूटचे गौरव पदक व रे. सी. फिश अॅवॉर्ड.

१९७६ – सायक्‍लोस्‍पोरीनचा प्रभावी वापर हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रियांसाठी प्रथम करण्‍यासाठी स्‍कॉटलंड येथील एडिंबरो विद्यापीठाचा कॅमेरॉन पुरस्‍कार.

१९८२ –अमेरिकन हार्ट असोसिएशनचे गोल्‍डन हार्ट अॅवॉर्ड

१९८६ –मायकेल डिबाकी अॅवॉर्ड

१९८६ –टुलाने विद्यापीठाचा रूडॉल्‍फ मटास सन्‍मान

१९९४ –लिस्‍टर मेडल

 

इंटरनॅशनल सोसायटी फॉर हार्ट अॅण्‍ड लंग ट्रान्‍सप्‍लॅंटेशन यांच्‍यातर्फे दिल्‍या जाणार्‍या ‘जीवन गौरव’ पुरस्‍काराचे डॉ. शुमवे पहिले मानकरी होते.

— डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 

 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..