नवीन लेखन...

दर्शनाचा लाभ

गणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात गेल्या चाळीस वर्षांत, दूरदर्शनवर ‘अष्ट विनायक’ हा मराठी चित्रपट न पाहिलेला माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कारण दरवर्षी हा अप्रतिम चित्रपट या दिवसांत दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरुनही हमखास दाखवला जातो आहे..

मराठी चित्रपट निर्माते, शरद पिळगांवकर यांनी १९७९ साली ‘अष्ट विनायक’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या कारकिर्दीतील, हा एकमेव सर्वोत्तम चित्रपट आहे. त्यावेळचा हा मराठीतील पहिला मल्टीस्टार चित्रपट!

सचिन सोबत वंदना पंडित ही अभिनेत्री होती. तिने केलेला हा एकच चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा, सांगली येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. पेपर मिलचे मालक बाळासाहेब, हे आपली पत्नी आजाराने अत्यवस्थ असताना देवाला पाण्यात ठेवून ती वाचावी म्हणून प्रार्थना करतात. मात्र ती वाचू शकत नाही, हे पाहून परदेशात शिकून आलेला सचिन नास्तिक होतो. तो देवाला मानत नाही. त्याची पत्नी, देवावर श्रद्धा असणारी असते. ती आजारी पडल्यावर अष्ट विनायक दर्शनाची इच्छा सचिनकडे व्यक्त करते. शेवटी तिच्या इच्छेप्रमाणे सचिन पत्नीसह ‘अष्ट विनायक यात्रा’ करतो…

तेरा मिनिटांचं हे गाणं तयार होताना, त्यामागे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, कॅमेरामन, गायक-गायिका, मान्यवर ज्येष्ठ कलाकार इत्यादींचं मोठं योगदान आहे!!
या चित्रपटासाठी शांता शेळके, शांताराम नांदगावकर, मधुसूदन कालेलकर यांनी गीतं लिहिली.. मात्र हे गाणं लिहिण्याचं भाग्य, जगदीश खेबुडकर यांच्याच वाट्याला आलं.. एके दिवशी रात्री, शरद पिळगांवकर यांनी, मुंबईत उतरलेल्या जगदीश खेबुडकरांना घरी नेऊन हे गाणं लिहिण्याची विनंती केली. खेबुडकर यांनी अष्ट विनायकांपैकी कोणत्याही विनायकाचे दर्शन घेतलेले नसताना, सरस्वतीच्या आशीर्वादाने त्या रात्रीच गीत लिहून पूर्ण केले व सकाळी रेकाॅर्डिंग केले..

जगदीश खेबुडकर यांनी लोककलेच्या माध्यमातून या गीताची रचना केली. यासाठी अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, शरद जांभेकर व चंद्रशेखर गाडगीळ यांनी पार्श्र्वगायन केलेले आहे.

पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर. यासाठी पडद्यावर संबळ वाजविणारा कृष्णकांत दळवी दिसतो. सचिन व वंदना पंडित श्रीमोरेश्वरचं दर्शन घेतात..

दुसरा गणपती, थेऊर गावचा चिंतामणी. त्याच्याबद्दल महिमा सांगताना, वासुदेवाच्या वेशभूषेत सूर्यकांत दिसतात..

तिसरा गणपती, सिद्धटेकचा सिद्धी विनायक. अशोक सराफ धनगराच्या वेशभूषेत विनायकाची महती सांगत, ढोल वाजवताना दिसतात..

चौथा गणपती, रांजणगावचा महागणपती. मराठमोळी उषा चव्हाण, महागणपतीची महिमा स्त्री गीतातून सांगताना झाडाखाली फेर धरते, फुगडी खेळते व झोकाही घेते..

पाचवा गणपती, ओझरचा विघ्नेश्र्वर. विघ्नेश्र्वराची आरती करताना इथं सोज्वळ आशा काळे दिसते..

सहावा गणपती, लेण्याद्रीचा गिरीजात्मज. या ठिकाणी अभिनेता सुधीर दळवी पोवाडा सादर करताना दिसतो..

सातवा गणपती, महडचा महागणपती. याचं वर्णन देखण्या रवींद्र महाजनीनं, गणातून ढोलकी वाजवून केलेलं आहे.

आठवा गणपती, पालीचा बल्लाळेश्वर. इथं आरती करताना शाहू मोडक व जयश्री गडकर शोभून दिसतात.. आरती पूर्ण होतानाच कंपनीचे मॅनेजर, शरद तळवलकर येतात आणि गणपतीची मूर्ती व कंपनीची कागदपत्रे सापडल्याचं सचिनला सांगतात..

अशाप्रकारे अष्ट विनायकाच्या दर्शनाने सचिनची पत्नी बरी होते, कंपनीवरचं संकट टळतं व सापडलेल्या मूर्तीसाठी मंदिर बांधण्याचं सचिन ठरवतो..

हा चित्रपट या गीतासाठी पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. मी नशीबवान आहे की, या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त माझ्या परिचयाचे आहेत, गुरुसमान कॅमेरामन गिरीश कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मला स्थिरचित्रणाचे काम करण्याची संधी मिळाली, श्रेष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचा कामानिमित्ताने, मला सहवास लाभला…

या चित्रपटानंतर देवीची साडेतीन शक्तिपीठे, दत्तगुरुंची स्थानं, बारा ज्योतिर्लिंग गीतांतून दाखविणारे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.. तरीदेखील अष्ट विनायकांचे दर्शन देणारा हा मराठीतील हा पहिला, मानाचा चित्रपट अविस्मरणीय असाच आहे…

© – सुरेश नावडकर ११-९-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..