नवीन लेखन...

चित्रपती वी.शांताराम

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट पहाण्यासाठी , अभ्यासासाठी बराच वेळ मिळत आहे. चित्रपट पहात वेळ कधी आणि कसा निघून जातो तेच कळत नाही. पूर्णतः त्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित असतं. अभ्यास करीत असताना बऱ्याच लेजेन्ड्सचे चित्रपट , माझ्या पहाण्यात आले. त्यापैकी हे नाव सर्वात महत्त्वाचे मला वाटलं. खरं सांगायचं तर हे नाव सर्वश्रुत आहे. आतापर्यंत त्यांनी बनविलेले सगळेच चित्रपट खूप गाजले. त्यांची नावं आपण जाणून घेऊच पण तत्पूर्वी त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.

१८ नोव्हेंबर १९०१ साली व्ही. शांताराम यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. व्ही. शांताराम यांचंं पूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे असंं आहे. शिक्षणात त्यांना फारशी रूची नव्हती. त्यांना नकला करायला खूप आवडायचंं ,

पुढे ह्याच कलागुणामुळे ते नकलाकार म्हणून नावारूपास आले. त्यांना अनेकदा रंंगमंचावर नकला करण्यासाठी सांगितलंं जाऊ लागलंं. एकदा अशीच नक्कल करत असताना त्यांना गोविंंदराव टेंबे यांनी पाहिलं आणि त्यांनी व्ही. शांतारामांंना गंधर्व नाटक मंंडळी या त्यांच्या , गणपतराव बोडस आणि बालगंधर्वांच्या नाट्यसंस्थेत भरती करुन घेतलं. परंंतु इथे भर्ती झाल्यावर त्यांना पहिल्याच दिवशी एका गोष्टीचा फार मोठा धक्का बसला. त्यांना,आपल्याला ना गाता येत आणि ना आपल्याला संगीतातल्या गोष्टींचंं ज्ञान आहे ही गोष्ट ध्यानात आली. हा काळ संगीत नाटकांचा असल्याने संंगीताचं ज्ञान नसणंं हे शांतारामांसाठी वाईट बाब ठरली. नाटकांमधून जरी त्यांनी काम केलं असतं तर फार फार तर ते एक जुनिअर आर्टिस्ट किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करु शकले असते. या गोष्टीचं त्यांना फार वाईट वाटलं आणि एका वर्षानंतर ते घरी परतले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही नाट्यक्षेत्रात प्रवेश केला नाही. आपण एक वर्ष वाया घालवलं या गोष्टीची त्यांच्या मनाला टोचणी लागून राहिली आणि ते पुन्हा शाळेत जाऊ लागले.

वी. शांतारामांची घरची परिस्थीती तशी बेताचीच होती. त्यांचे वडील हे एक छोटेसे दुकानदार होते. आपल्या होणार्‍या तुटपुंज्या कमाईला आधार म्हणून ते नाटक मंडळींना रात्रीच्या खेळांसाठी पेट्रोमॅक्सच्या गॅसबत्त्या भाड्याने देत असत. पुढे शांंतारामांचे शिक्षणात लक्ष लागेनासं झालं आणि घरची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. अखेरीस त्यांच्या परिवाराचा मित्र असणार्‍या एका व्यक्तीने त्यांना रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी लावून दिली. या काळात शांतरामांनी खूप कष्ट करुन सुपरवाईझरचं मन जिंकलंं. सुपरवाईझरने स्वतंत्र स्वरुपात एका छोट्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. इथे त्यांचा पगार वाढून दिवसाला बाराआणे इतका झाला पण ते वर्कशॉपमध्ये झालेल्या एका गंभीर दुर्घटनेमुळे पुढे जास्त प्रगती करु शकले नाहीत. त्या दुर्घटनेत त्यांच्या उजव्या हाताची दोन बोट जखमी झाली आणि त्याच्या खूणा अखेरपर्यंत त्यांच्या बोटांवर राहिल्या.

कालांतराने घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नोकरीच्या शोधात असताना आपल्यामध्ये अजूनही कलेबद्दल प्रेम जिवंत आहे ,हे त्यांच्या ध्यानात आलं. त्याचक्षणी त्यांच्या डोक्यात त्यांचे मावसभाऊ बाबुराव पेंढारकर यांचं नाव आलं. त्यावेळी ते मशहूर महाराष्ट्र फिल्म कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होते. शांताराम त्यांच्याकडे नोकरी मागायला गेले. इथे त्यांंची , त्यांच्या भविष्यातल्या गुरुंशी गाठ पडली. ते होते प्रसिद्ध फिल्मकार, चित्रकार बाबुराव कृष्णराव मेस्त्री उर्फ बाबुराव पेंटर.

ज्यावेळी शांताराम त्यांंच्याजवळ पोहोचले , त्यावेळी बाबुराव कॅन्व्हासवर चित्र रेखाटत होते. त्यांंनी फक्त कॅन्व्हासच्या समोरुन त्याच्या मागे उभ्या असलेल्या शांतारामांना डोकावून पाहिलं आणि काहीही न बोलता ते पुन्हा आपल्या चित्रात मग्न झाले. त्यावेळी बाबुराव पेंढारकरांनी आवाज देऊन त्यांना विचारलं की , “काय मग , ठेवायचं का ह्याला कामाला?” त्यावेळी समोरुन फक्त “हूं” असं उत्तर मिळालं आणि शांतारामांना नोकरी मिळाली.

१९२७ साली महाराष्ट्र फिल्म कंपनीने एक महत्वपूर्ण ऐतिहासिक चित्रपट बनवला ज्याचं नाव होतं “नेताजी पालकर” जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. ह्या चित्रपटाच्या संंपूर्ण दिग्दर्शनाची जबाबदारी बाबुरावांनी , वी. शांतारामांवर सोपवली. तशीही त्यांच्या कारकिर्दीला आधीपासून सुरुवात झालीच होती , ह्या चित्रपटामुळे त्यांना दिग्दर्शनाचा अधिक अभ्यास करता आला.

काहीतरी वेगळं करण्याच्या त्यांच्या साहसी वृत्तीमुळे १ जून १९२९ रोजी त्यांंनी आणि त्यांच्या चार साथीदारांनी मिळून “प्रभात फिल्म कंपनी” ची मंंगळवार पेठ , कोल्हापूर येथे स्थापना केली.

ह्या नावाखाली त्यांनी अनेक चित्रपटांचे निर्मीती तसेच दिग्दर्शनाचं कार्य केलं. १९२९ – १९३२ या कालखंडात प्रभात सिनेमाच्या नावाखाली ६ मूकपटांची निर्मिती केली गेली. नंतर १९३२ साली आजच्या काळातही सुस्थितीत जतन केला गेलेला चित्रपट “अयोध्येचा राजा” या बोलपटाची निर्मिती करण्यात आली. १९३२ – १९३४ या दोन वर्षांत प्रभात सिनेमाने ६ बोलपटांची निर्मिती केली. पुढे १९३४ साली प्रभात सिनेमा कंपनी पुण्यात स्थलांतरीत करण्यात आली. १९३४ – १९५७ हा प्रभातचा पुण्यातील कालखंड ठरला.

प्रभात मध्ये मोठं व्यावसायिक यश मिळाल्यावर १९४२ साली वी. शांताराम तिथून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या आई – वडीलांच्या नावावरुन “राजकमल कलामंदिर स्टुडीओ” ची स्थापना केली.

६९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर ३० ऑक्टोबर १९९० साली त्यांचा मृत्यु झाला. त्यावेळी ते मुंंबईत वास्तव्यास होते. पुढे त्यांना मानवंदना म्हणून २००१ साली भारतीय टपाल खात्याने त्यांचं छायाचित्र असलेलं टपाल तिकीट छापलं.

वी. शांतारामांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी प्रसिद्ध असलेल्या चित्रपटांची सूची खालीलप्रमाणे :

१) अमर भूपाळी (मराठी)

२) अयोध्येचा राजा (मराठी)

३) अमृत मंंथन

४) चंद्रसेना (१९३१ आणि १९३५)

५) धर्मात्मा 

६) दो ऑंखें बाराह हाथ

७) डॉ. कोटणीस की अमर कहानी

८) गीत गाया पथ्थरों ने 

९) गोपालकृष्णा 

१०) जल बिन मछली नृत्यबिन मछली 

११) झनक झनक पायल बाजे 

१२) माणूस (मराठी)

१३) कुंकू (मराठी) 

१४) पिंजरा (मराठी)

वी. शांतारामांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले त्यापैकी महत्वाचे पुरस्कार म्हणजे –

१) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – १९५७ झनक झनक पायल बाजे 

२) सर्वोत्कृष्ट चित्रपट – १९५८ दो ऑंखें बाराह हाथ 

३) दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८५)

४) पद्मविभूषण (१९९२)

आदित्य दि. संभूस.

(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

संदर्भ :- गूगल आणि विकीपिडीया

फोटो :- V. Shantaram Motion Picture Scientific Research and Cultural Foundation.

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..