नवीन लेखन...

चाबहार बंदर एक सक्षम पर्याय 

अफगाणिस्तान मध्य आशिया देशांशी सामरिक, आर्थिक संबंधांसाठी चाबहार बंदर एक सक्षम पर्याय 

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे सर्वांनाच माहिती आहे. आता भारतानेदखील याच नीतीचे अनुसरण करत पाकिस्तानला तगडा झटका दिला आहे.  भारताने पाकिस्तानचे उत्पन्नाच्या व व्यापाराच्या पातळीवर एक अघात केला आहे. पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानबरोबरील पाकीस्तानी व्यापार घटून निम्म्याच्याही खाली आला आहे कारण भारताचे आक्रमक परराष्ट्र धोरण.

दहशतवाद्यांना पाळून, त्यांना पोसणार्या पाकिस्तानला चहूबाजूंनी घेरण्याची मोहीम भारताने हाती घेतली व त्याची चांगली फळेही दिसत आहेत. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा आणि समर्थन मिळत असतानाच आता पाकिस्तानला अफगाणिस्तानने चांगलाच दणका दिला आहे. दोन्ही शेजारी देशांमधील द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर्सवर होता, तोच आता दीड अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला आहे. दोन्ही देशांतील व्यापारघटीमध्ये सर्वात मोठी भूमिका भारताच्या सहकार्याने इराणी सागरकिनार्यावर उभारण्यात आलेल्या चाबहार बंदराने वठवली आहे.

चाबहार बंदराच्या संचालनाची जबाबदारी भारतने स्वीकारली

देशभरात निवडणुका असताना इराणमध्ये घडणारा घटनाक्रम भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्वाला नवे आणि मोलाचे वळण देणारा ठरत आहे. सोमवारी इराणच्या चाबहार येथील शाहीद बेहेस्ती बंदराच्या संचालनाची जबाबदारी भारत सरकारच्या ‘इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेड’ या कंपनीने स्वीकारली. भारत, अफगाणिस्तान आणि इराण या तीन राष्ट्रांनी आपले समुद्री मार्गही निश्चित केले. आता या मार्गावरून होणारी वाहतूक या तिन्ही देशांसाठी समृद्धीची नवी दालने खुली करणारी ठरेल.

भारत अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठे निर्यात केंद्र

भारताला अफगाणिस्तानपर्यंत जाण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आडकाठी आणत असे. यावर तोडगा काढण्यासाठी भारताने इराणमार्गे अफगाणिस्तानात मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. भारताने यासाठी इराणच्या चाबहार बंदरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आणि इराण ते अफगाणिस्तानपर्यंत रस्तेमार्गाचीही निर्मिती केली. परिणामी इराणच्या चाबहार बंदरातून भारताला थेट अफगाणिस्तानात जाण्याचा व अफगाणिस्तानला रस्तेमार्गाने थेट समुद्रापर्यंत येण्याचा पर्याय खुला झाला व पाकिस्तानला त्याची जागाही दाखवून देता आली. आता इराण चाबहार बंदराला अफगाणिस्तानशी जोडण्यासाठी रेल्वेमार्गाचीही उभारणी करत आहे. काही महिन्यांपूर्वीच भारताने चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानला १.१ दशलक्ष टन गहू आणि २००० टन मसूर डाळीची निर्यात केली होती. सोबतच दोन्ही देशांनी २०१७ साली हवाई वाहतूक मार्गही स्थापित केला होता. अफगाणिस्ताननेही गेल्याच महिन्यात इराणच्या चाबहार बंदरामार्गे भारतात निर्यातीला सुरुवात केली होती.

 

अफगाणिस्तानने याआधी ५७ टन सुकामेवा, कापड व वस्त्रे, कार्पेट आणि मिनरल प्रॉडक्ट्ससह २३ ट्रक पश्चिम अफगाणिस्तानातील जारंज शहरातून इराणच्या चाबहार बंदरातून भारताकडे रवाना केले होते. तिथून पुढे ही खेप मालवाहू जहाजाच्या साहाय्याने मुंबई बंदरापर्यंत पोहोचली. २०१८ मध्ये अफगाणिस्तानची भारतातली निर्यात ७४० दशलक्ष डॉलर्स होती आणि भारत हे अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठे निर्यात केंद्रही ठरले. दुसरीकडे सर्वच बाजूंनी जमीन आणि जमीन असलेला तसेच प्रदीर्घ काळापासून युद्धग्रस्त असलेला अफगाणिस्तान अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी परकीय बाजारपेठांशीही संपर्क साधत आहे.

ग्वादर बंदरात मालाची नेआण अतिशय कमी

इराणमधील चाबहार बंदर जिथे आपल्या पूर्ण क्षमतेने काम करताना दिसते, तिथेच पाकिस्तानच्या समुद्री हद्दीतील ग्वादर बंदरात मात्र मालाची ने-आण अजूनही अतिशय कमीच असल्याचे पाहायला मिळते.

चीनच्या प्रचंड कर्जाच्या मदतीने बलुचिस्तानमधील ग्वादर येथे या बंदराची निर्मिती करण्यात आहे परंतु, आगामी ४० वर्षापर्यंत चिनी कंपनीलाच ग्वादरच्या उत्पन्नातील ९१ टक्के वाटा मिळेल तर पाकिस्तानला फक्त ९ टक्के. याव्यतिरिक्त हा ४० वर्षांचा बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर-बीओटी करार आहे, जो की तांत्रिकदृष्ट्या भाडेपट्ट्यापेक्षा निराळा आहे. याचाच अर्थ येत्या ४० वर्षांपर्यंत पाकिस्तान ग्वादर बंदरावर हक्क गाजवू शकत नाही, तर भारताने बांधलेल्या चाबहार बंदरामुळे व्यापार वाढल्याचे दिसतेच. सोबतच इराण, अफगाणिस्तान व भारताचाही फायदा होत आहे.

चाबहार बंदराच्या विकासात अफगाणिस्तानही सामील

भारत, इराण आणि अफगाणिस्तानच्या सहकार्याने इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्यात आले. या दोन्ही देशांशी व्यापार वाढवण्यासाठी भारताने चाबहार बंदरातील जेट्टी आणि तेथील आर्थिक क्षेत्रात उद्योगधंदे, खासकरून लोखंड शुद्धीकरणाचा कारखाना उभारायचे काम हाती घेतले. भर तिन्ही देशांतील व्यापार सुलभीकरणावर आणि व्यापारवृद्धीवर होता. यापूर्वी अफगाणिस्तानशी असणारा भारतीय व्यापार हा प्रामुख्याने पाकच्या कराची बंदरामार्गे होत असे. मुंबई बंदरापासून ते कराचीपर्यंत जलवाहतूक आणि नंतर कराचीतून रस्तेमार्गाने हा माल अफगाणिस्तानात पोहोचविला जायचा. भारतासह अफगाणिस्तानचेही पाकिस्तानशी संबंध दिवसेंदिवस खराब होत गेले आणि त्याचा परिणाम व्यापारावरही झाला. यामध्ये प्रामुख्याने नुकसान अफगाणिस्तानचे झाले. कारण, कराचीचा मार्ग बंद केल्यास भारताशी व्यापाराचा इतर सोयीचा मार्ग नव्हता. त्यामुळे इराणच्या चाबहार बंदराच्या विकासात अफगाणिस्तानही सामील झाला.

भारतानेही या मार्गावर रस्तेमार्ग आणि रेल्वेमार्ग विकसित करण्यास आर्थिक साहाय्य दिले. त्याच्याच परिणामस्वरूप पाकिस्तानला पूर्णपणे डावलून अफगाणिस्तान-भारत या नव्या व्यापारी मार्गाला इराणमधील चाबहार बंदरातून १७ मार्चला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

जलमार्गाबरोबरच हवाईमार्गानेही अफगाणिस्तान ते भारत मालवाहतूक 

जलमार्गाबरोबरच हवाईमार्गानेही अफगाणिस्तान ते भारत ही मालवाहतूक केली जाते. २०१७ मध्ये हवाईमार्गे मालवाहतुकीतून व्यापाराचे प्रमाण हे ७४० दशलक्ष डॉलर इतके होते. अफगाणिस्तानची काबूल, कंदाहार, हेरत ही शहरे, भारताच्या मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या तीन शहरांशी हवाई मालवाहतुकीसाठी जोडली गेली आहेत. हवाईमार्ग हा परवडणारा नसतो. सागरी मार्ग हा वाहतुकीसाठी जगातला सर्वात स्वस्त मार्ग म्हणून ओळखला जातो.

हा बंदरमार्ग अफगाणिस्तानसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असून देशाला आर्थिक स्थैर्याकडे नेणारा ठरू शकतो. सीपेक प्रकल्प पूर्ण झाल्यावर चीनच्या शिनजियांग प्रांतातून थेट रस्तामार्गाने चीनला ग्वादर बंदरातून अरबी समुद्रात प्रवेश करणे सहज शक्य होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करु पाहणार्या चीनला व्यवसाय-व्यापाराच्या व्यापक संधी उपलब्ध होतील.

इराणचे चाबहार आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील अंतर हे जेमतेम ७० किमी इतकेच आहे. यावरून या दोन्ही बंदरांचे केवळ व्यापारीच नव्हे, तर सामरिकदृष्ट्या महत्त्वही अधोरेखित होते. पण, एकीकडे चाबहारशी निगडित संपूर्ण सहकार्य इराण आणि अफगाणिस्तानकडून भारताला लाभत असताना, दुसरीकडे मात्र बलुचिस्तानात सीपेक प्रकल्पाचा विरोध आणि चीनचा रोष दिवसागणिक वाढताना दिसतो.

 चीनच्या वाढत्या प्रभावाला पर्याय

चीनच्या वाढत्या प्रभावाला पर्याय म्हणून या बंदराच्या संचालनात रशिया, मध्य आशिया व युरोपला जोडणारे दुवेही यातून निर्माण होऊ शकतात. दहशतवाद व जिहादी चळवळींचे केंद्र म्हणून निर्माण झालेल्या देशाचे अर्थकारण पूर्ण बिघडून गेले आहे. चाबहारच्या निमित्ताने अफगाणिस्तानमध्ये निरनिराळ्या आर्थिक हालचालींना सुरुवात होईल. पर्यायाने चाबहार हे त्याच्याशी संबंधित सगळ्याच देशांसाठी मोठा आधार ठरू शकते.आशियातील निरनिराळ्या राष्ट्रांना परस्परांशी असलेले संबंध नव्याने पुनर्स्थापित करण्याची संधी यातून निर्माण झालेली असेल.

आशिया व युरोपला जोडणाऱ्या महामार्गाला पर्याय

हा सगळा प्रवास भारतासाठी सोपा नाही. शाहीद बेहेस्ती बंदराच्या विकासासाठी इराणने पाकिस्तान व चीनलाही आमंत्रण दिले होते.  मात्र, इराणच हळूहळू या आमंत्रणापासून दूर गेला. चीनच्या आततायी महत्त्वाकांक्षा, स्थानिक राजकारण्यांना फूस लावून त्यांना आपल्याकडे वळविण्याची चीनची वृत्ती, यामुळे श्रीलंका, मालदीव सारख्या देशात निर्माण झालेले राजकीय अराजक जगासमोर आहे. त्यामुळे भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकडेच या मंडळींचा कल निर्माण होत आहे. चाबहारमार्गे भारताचा व्यापार हळूहळू पसरू लागला की, अफगाणिस्तान गुजरातला बंदरमार्गे जोडला जाऊ शकतो. यात पुन्हा इराण आणि रशियाचे थांबे लाभू शकतात. यातून ओमान-इराण असाही एक मार्ग निर्माण होऊ शकतो. भारताने आपले प्रयत्न चालू ठेवले, त्याचाच हा परिणाम आहे. यामुळे जे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा लाभ सगळ्यांनाच मिळू शकतो. अमेरिकेने इराण व अफगाणिस्तान सीमेलगत रेल्वेमार्ग टाकण्यासाठीही संमती दर्शविली आहे. चीनच्या आशिया व युरोपला जोडणाऱ्या महामार्गाला पर्याय म्हणून हे सारे पर्याय समोर आले आहेत. सारे जग यानिमित्ताने भारताशी जोडले जाणार आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..