नवीन लेखन...

बोरिवली शिवनेरी, सद्भावना आणि मी…!

सुप्रसिद्ध लेखिका वसुंधरा काशिकर यांचं हे शिवनेरीतून मुंबई ते पुणे प्रवासातल्या अनुभवावर आधारित मनोगत वाचा…


मुंबईला मालाडच्या एका वाचक मंचातर्फे माझ्या ‘शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकावर एक कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी पावणे सातच्या शिवनेरीचं माझं रिझर्वेशन होतं. औंधला ब्रेमेन चौकात शिवनेरीचा स्टॉप आहे. मी पंधरा मिनिटं आधीच म्हणजे साडेसहाला स्टॉपवर पोहोचले. शिवनेरी अर्धा तास उशीरा म्हणजे सव्वासातला आली. जाताना मला दादरला उतरायचं असल्याने मी दादर शिवनेरीचं रिझर्वेशन केलं होतं. बरोबर सव्वा दहाला मी दादर इस्टला पोहोचले. माझं परतीचं रिझर्वेशन रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी मालाड इस्टहून होतं. मालाड वेस्टला माझं काम सव्वा सातला संपणार होतं. तिथून साधारण वीस मिनिट मालाड इस्टला जायला लागतात असं मला सांगितलं होतं. संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी मी उबर बुक करायला नेट ऑन केलं, तर गाडीला यायला अर्धातास वेळ दाखवत होतं. मग ओला बघितलं तिथेही परत तिच गत. मग विचार केला की ऑटोरिक्षा करावा. तोवर साडेसात झाले होते. अजूनही तसा भरपूर वेळ होता. ऑटो रिक्षा शोधू लागले. एकही रिक्षा मिळेना. प्रत्येक जण मालाड वेस्टला जायला नकार देत होता. अक्षरश: भिकाऱ्यासारखी मी प्रत्येक रिक्षावाल्यापाशी जाऊन त्याला मालाड वेस्टला सोडण्याची विनंती करत होते. जास्त पैसे घ्या पण चला असं सांगून बघितलं तरी एकही रिक्षावाला तयार होत नव्हता. जवळपास वीस मिनिटं मी वेड्यासारखी ऑटोरिक्षा शोधत फिरत होते. घामाघूम झालेली. आता आठ वाजत आले होते. माझ्यावरचा तणाव वाढत चालला होता. परत ओला बघितलं. नशिबानं साथ दिली. तीन मिनिटात ड्रायव्हर आला. त्याला सांगितलं, ‘’भैय्या, आठ बजकर बीस मिनिटपर गाडी छुटेगी. जल्दी चलो. घरमें मेरी पाच साल की बेटी राह देख रही है’’| हिरकणी एवढा मोठा किल्ला आणि तो ही अंधारात कशी उतरून खाली आली असेल याची अंधुकशी अनुभूती त्यावेळी आली.

कॅबवाला जोरात गाडी चालवू लागला. मध्ये हा ट्रॅफिक जाम. तरी त्याने मला १५ मिनिटात मालाड इस्टला पोहोचवलं. गाडीतून उतरून मी वेड्यासारखी धावत सुटले. पोहोचले तर गाडी यायची होती. हुश्श झालं. मालाड इस्टला पुष्पा पार्क इथून गाडी सुटते. पहिल्यांदाच मी मालाड इस्टहून गाडी पकडत होते. माझा समज तिथे शिवनेरीचा नीट असा बस थांबा असेल, तर कसचं काय…रस्त्यावर लोक उभे. धड लाईट नाही. खाजगी गाड्या वाटेल तिथे थांबत होत्या. मी तीन-चार जणांना विचारले की, शिवनेरी नेमकी कुठे थांबते. तर कोणालाही नीट सांगता आले नाही. मी शिवनेरीची वाट बघत उभी. १० मिनिटं झाले मी वाट बघत होते..आणि बोरिवली-स्वारगेट शिवनेरी माझ्या समोरून निघून गेली. एका क्षणात पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. गाडी सुटली तर त्यात काय एवढं… असा प्रश्न कोणालाही पडेल आणि तो खराच आहे, पण त्यात काय एवढं होतं, कारण घरी वाट पाहणारी मुलगी दिसत होती. बाकी मुंबईत मला रात्री दोन वाजता दार ठोठावून जाता येईल अशी अनेक हक्काची घरं आहेत.

एका क्षणात मग मी सुटलेली गाडी ऑटो रिक्षाने पकडण्याचा निर्णय घेतला. ऑटोवाल्याला म्हटलं, ती समोर जाणारी गाडी आपल्याला पकडायची आहे. तो ही लगेच तयार झाला. पण तो माझा वेडात घेतलेला निर्णय होता. शिवनेरीची गती तो ऑटो कसा काय गाठू शकणार? मला थोड्याच वेळात शिवनेरी पूर्ण दिसेनाशी झाल्यावर याची जाणीव झाली. मग त्याला मी म्हटलं चेंबूर मैत्री पार्क चला. कारण चेंबूर मैत्री पार्कला सगळ्या शिवनेरी थांबतात. ही गाडी सुटली तर तिथून नव्याने तिकीट काढून गाडी पकडू हा माझा विचार होता. त्याला काही कारणानं चेंबूरपर्यंत येणं शक्य नसल्याने त्याने मला अर्ध्यात सोडले आणि दुसरा रिक्षा करून दिला.

हा दुसरा रिक्षेवाला उत्तरप्रदेशचा होता. तीस-बत्तीस वर्षांचा तरूण होता. घड्याळात नऊ वाजले होते. त्याला मी सगळी परिस्थिती सांगितली. तो शक्य होईल तितक्या वेगाने रिक्षा चालवू लागला. चेंबूरहून गाडी पकडल्यावर परत पुढे तीन तास पुण्यात पोहोचायला लागणार होते. या दरम्यान माझा नवरा अभिजित याला सगळ्या परिस्थितीची मी फोनवर कल्पना दिली होती. त्याने शिवनेरीच्या कस्टमर केअरला फोन लावला होता. चूक एमएसआरटीसीची होती. माझं रिझर्वेशन होतं. मी वेळेत स्टॉपवर पोहोचले होते. पण ड्रायव्हरने गाडी न थांबवता पुढे नेली होती.

मग सांताक्रुझला पोहोचता पोहोचता मला शिवनेरीच्या ड्रायव्हरचा फोन. ‘’मॅडम तुमची गाडी सुटली. ही दुसरी शिवनरी आहे. तुम्ही कुठे आहात.’’? मी त्याला सांताक्रुझ सांगितलं. नीट ठिकाण सांगितल्यावर त्याने मला आहे-तिथेच उतरून थांबायला सांगितलं.

आता सव्वा नऊ वाजले होते. त्या ऑटोरिक्षा वाल्याला मी पैसे दिले. पैसे देऊन झाले तरीही हा थांबलेलाच. मी म्हटलं, ‘’भैय्या आप जाईये. आपको कोई दुसरी सवारी मिलेगी. यहाँ कितनी देर रूकोगे’’.

त्यावर तो रिक्षेवाला, ‘दिदी धंदा तो मैं जिंदगीभर कर लूंगा. मेरी बहन होती तो मै ऐसे छोडकर जा सकता था क्या.’

अक्षरश: डोळ्यात पाणी यायचं राहीलं. सव्वानऊ ते दहा असा पाऊण तास तो माझ्यासोबत उभा होता. बोलता बोलता त्याने सांगीतलं. त्याची बायको लोकलमधून पडून नुकतीच वारली होती. ऑटो चालवून त्याला निव्वळ नफा म्हणून हातात १५ हजार रूपये महिना पडत होता. त्यातले पाच हजार स्वत:साठी ठेवून तो घरी दहा हजार रूपये महिना पाठवत होता.

शिवनेरी आली. त्याने मला शिवनेरीत बसवल्यावरच तो गेला. शिवनेरी दिसल्यावर जीवात जीव आला. गाडीत चढले तर पाहते तो काय…अद्भूत, अविश्वसनीय परिस्थिती. अख्खी शिवनेरी रिकामी. रात्रीचे दहा वाजलेले. आगीतून जाऊन फुफाट्यात म्हणजे काय याचा अर्थ त्यावेळी कळला. निर्भया प्रकरण डोळ्यासमोर दिसू लागले.

मी दबकत दबकत कंडक्टरला विचारले, ‘का हो आज गाडी रिकामी’..

कंडक्टर- ‘मॅडम पावसामुळे असेल’.

त्यानंतर मग मी अभिजितला फोन लावला. जोरात कंडक्टर आणि ड्रायव्हरला ऐकू जाईल अशा पद्धतीने गाडीचा नंबर आणि ड्रायव्हरचा नंबर सांगितला. आयुष्यात पहिल्यांदा अशा अख्ख्या रिकाम्या गाडीत बसण्याचा अनुभव येत होता.

सकाळी पाच वाजताची उठलेली अक्षरश: दमून गेले होते. थकवा मागे पडून आता त्याची जागा आता तणाव आणि भीतीने घेतली होती. तरीही मी प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

ड्रायव्हरला गाडी मध्ये थांबवणार का असा प्रश्न विचारला. त्याने गाडी जेवणासाठी पंधरा मिनिटं थांबेल असे सांगितले. मला चहा घ्यायचा आहे असे मी त्याला सांगितले. झोपेने डोळे लागत होते. अचानक एके ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली. कंडक्टर खाली उतरला आणि पाहते तर काय, माझ्यासाठी हातात चहा घेऊन कंडक्टर माझ्या सीटजवळ…’’ताई, थकलेल्या दिसता घ्या चहा’’…पुन्हा मी रडवेली.

मग ड्रायव्हरशी गप्पा मारू लागले. ड्रायव्हरला तेरा हजार रूपये महिना पगार. म्हणाला, ‘मॅडम, दीड कोटीची गाडी मी चालवतो अन् मला पगार महिना तेरा हजार.’ ड्यूटी १० तास होते म्हणाला. रात्री २ वाजता पोहोचल्यावर परत साडेपाचला ड्यूटी लावली आहे सांगत होता.

तेवढ्यात त्याच्या बायकोचा फोन. तिने याला फोन लावायला सांगितला होता. याचा समज झाला की, तीच परत फोन करणार आहे. याचा फोन न गेल्याने ती नाराज झाली होती. मग एका हाताने गाडी चालवता चालवता तो तीला परोपरीने सांगत होता. ‘’अगं असं काय गं करतेस. मी मुद्दाम का करीन असं…येडी का काय गं तू…’’

इतकी मनधरणी सुरू होती याचा अर्थ नुकतच लग्न झालं असावं. त्यानंतर ‘तुम पास आये’ हे गाणं लागलं… हे गाणं बहुदा कंडक्टरला आवडत असावं. ड्रायव्हरने आवाज वाढवला. अन् कंडक्टरला म्हणाला…’घ्या हो तुमचं गाणं लागलं’…

खरं तर त्या दोघांशी खूप गोष्टी करण्याची इच्छा होता. पण अंगाचं मुटकुळं करून मी कधी झोपले कळलंच नाही. त्यानंतर जाग आली ती थेट ब्रेमेन चौक येता येता. नवऱ्याला फोन केला. तो गाडी घेऊन आधीच पोहोचला होता. दोन वाजले होते. गाडीतून उतरताना मी चहाचे दहा रूपये कंडक्टरला देऊ केले. त्यावर ‘’ताई तुमच्याकडून काय दहा रूपये घेऊ’’ असे म्हणत तो निरागस हसला. गाडीतून खाली उतरल्यावर रस्ता ओलांडून जेव्हा मी कारमध्ये बसले त्यानंतरच ड्रायव्हरने शिवनेरी पुढे नेली…

‘अंधेरी रात में साया तो नही हो सकता

ये कौन है जो मेरें साथ चलता है…’!

हा शेर परवाच्या दिवशी मी रात्री नऊ ते दोन या काळात जगले आहे.

हातावर पोट असणारा तो ऑटोचालक, जो माझ्यासाठी तासभर सवारी सोडून थांबला…मला चहा आणून देणारा हा कंडक्टर आणि मी नवऱ्यासोबत कारमध्ये बसली आहे याची खात्री केल्यावर शिवनेरी काढणारा ड्रायव्हर हे माझे कोण होते…

आता माझी वेळ आहे…लोकांचा चांगूलपणावरचा विश्वास वाढेल अशी कृती, वागणूक माझ्याकडून व्हायला हवी असं नकळत ते सांगून गेले आहे…

— वसुंधरा काशीकर

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..