नवीन लेखन...

भीती

आम्ही नाही त्यातले म्हणत ….. नाकारलं कोणीही किती ….
तरी प्रत्येकाला वाटतंच असते ….. कसली ना कसली भीती ….

कोणाला वाटते छोट्या छोट्या गोष्टींची … तर काहींची मात्र मोठ्ठी असते भीती
परीस्थितीनुसार बदलत असली ….. तरी प्रत्येकाला असतेच कसलीतरी भीती ….

नाणं हवेत असताना एका संघाला असते….. “छापा” पडण्याची भीती ….
तर त्याच वेळेस प्रतिस्पर्ध्याना मात्र असते …. “काटा” पडण्याची भीती ….

प्रियकराला सतत वाटत असते …. प्रेयसीच्या “नकाराची” भीती…
ब्लड टेस्ट केलेल्या रुग्णाला ….. रिपोर्ट मधल्या “होकाराची” भीती

कृष्ण “प्रेमात” बुडालेल्या “राधेला” असते … “भान हरपण्याची” भीती
तर कृष्ण “भक्तीत” तल्लीन , “मीरेला” …. “भानावर येण्याची” भीती

पावसाची वाट बघणाऱ्या दुष्काळग्रस्तांना …… रणरणत्या “उन्हाळ्याची” भीती….
तर संसार वाहून गेलेल्या पूरग्रस्तांना असते…… कोसळणाऱ्या “पावसाची” भीती ….

“हातावर पोट” असणाऱ्या कष्टकरींना असते ….. जेमतेम “पोट भरण्याची” भीती …
“पोटावर हात” फिरवत ढेकर देणाऱ्या सुखवस्तूंना मात्र…. “पोट सुटण्याची” भीती

सहा फुटी मुलीच्या परिवाराला असते ….. “उंच जावई” शोधण्याची भीती
तर चार फुटी मुलाच्या कुटुंबाला वाटते …. “बुटकी सून” मिळण्याची भीती

परदेशी जाणाऱ्यांना Baggage checking मध्ये …. तुडुंब बॅगेचं “वजन कमी” करण्याची भीती
तर झिरो फिगरचा ध्यास घेतलेल्या महिलांना … diet मोडल्यावर “वजन वाढण्याची” भीती

पार्टीहून रात्री उशिरा घरी येणाऱ्या तरुण पिढीला …. आई वडिलांच्या “प्रश्नांची” भीती ….
तर कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या गुन्हेगाराला ….. साक्षीदारांच्या “उत्तरांची” भीती

शहरांत राहून हवे तेव्हढे “दिवे लावणाऱ्यांना “ …. गावाकडच्या किर्रर्र “अंधाराची” भीती
नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळाला … डोळ्यावर येणाऱ्या आगंतुक “प्रकाशाची” भीती

वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना असते …. सततच्या “एकटेपणाची” भीती
लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्यांना ….. दिवसेंदिवस वाढणाऱ्या “गर्दीची” भीती

रात्रभर रडणाऱ्या बाळाच्या हतबल आईला ….. रोज रोजच्या “जागरणाची” भीती
सोसायटीतल्या सभासदांना कायमच असते …. रात्रीचा वॉचमन “झोपण्याची” भीती

नाटक – सिनेमाला जाताना वाटेतल्या ट्रॅफिक मुळे ….. “सुरुवात” बुडण्याची भीती
अंतरीक्षयानाच्या उड्डाणानंतर शास्त्रज्ञांना …. मिशनचा “शेवट” यशस्वी होण्याची भीती

सतत हसत , हसवणाऱ्या विदुषकाला वाटते …. स्वतःच्या दुःखावरही “रडण्याची” भीती
नुकतीच नवीन कवळी लावलेल्या आज्जींना असते …. जोरजोरात “हसण्याची” भीती

निकालांच्या आधल्या दिवशी राजकारणी आणि विद्यार्थ्यांना ….. उद्याच्या “सूर्योदयाची” भीती
समुद्रकिनाऱ्यावर हातात हात घालून बसलेल्या युगुलाला …. समोरच्या “सूर्यास्ताची” भीती

वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना … असह्य अशा “जगण्याची” भीती
तर सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या पत्नीला …. पतीच्या “वीर मरणाची ” भीती

आत्ताच्या जुन्या पिढीतल्या पालकांना …. पाल्यांसमोरच्या “आभासी जगाची” भीती
तर स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्यांना … जगातल्या “भीषण वास्तवाची” भीती

सध्याच्या काळातली जगाची वाताहात बघून …. ..काहींना वाटते “घराबाहेर जाण्याची” भीती
तर कामानिमित्त जावंच लागणाऱ्यांना सतावते …… तो दुष्ट virus “घरात येण्याची” भीती

कधी वाटतं सगळ्यांनी , मनातल्या विचारांची ओंजळ …… करून टाकावी रिती …
कधी वाटतं सगळ्यांनी , मनातल्या विचारांची ओंजळ …… करून टाकावी रिती …

सोडून द्याव्यात सगळ्या चिंता …. आणि एकदाची नष्ट करून टाकावी ही सगळी भीती …
पण मानवी मन मात्र असतं भलतंच विचित्र …. त्याची आहे एक वेगळीच नीती

आता कसलीच भीती कशी बरं नाही वाटत आपल्याला … या विचाराचीही वाटू लागेल भीती
आता कसलीच भीती कशी बरं नाही वाटत आपल्याला … या विचाराचीही वाटू लागेल भीती

म्हणूनच ….
आम्ही नाही त्यातले म्हणत ….. नाकारलं कोणीही किती ….
तरी प्रत्येकाला वाटतंच असते ….. कसली ना कसली भीती ….

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..