नवीन लेखन...

भिकारी

Begging

कमल हसनच्या ‘पुष्पक’ नावाच्या संवादरहित चित्रपटातील एक प्रसंग मनोवेधक आहे. एका पुलावर बसलेल्या भिकाऱ्याला कमल हसन पाकीटातून एक रुपयाचं नाणं काढून दाखवतो.. नंतर त्या नाण्याला हवेत उडवून टाॅस करतो. हे पाहून तो भिकारी आपल्या थाळीतील रुपयाचं नाणं हातात घेऊन निरखतो.. नंतर तो पॅन्टच्या कडेला ठेवलेली नोट काढतो व कमलला दाखवतो.. त्यानंतर लागोपाठ तो शर्टाच्या दोन्ही बाहींच्या घडीतून, खिशातून, शर्टाच्या आतील चोरकप्यातून नोटा काढून दाखवत राहतो.. शेवटी तो बसलेल्या पोत्याची पुढची बाजू उचलून त्याखाली, जमवलेल्या नोटांचा ढीग कमल हसनला दाखवतो… आता कमलला तो भिकारी आपल्यापेक्षाही श्रीमंत असल्याची जाणीव झाल्याने तो त्याच्याकडे पाठ फिरवतो…एकही संवाद नसलेल्या या दृष्यामध्ये, रस्त्यावरचा सामान्य भिकारी ‘हिरो’ झालेला आहे…

भिकारी म्हटलं की, आपल्याला देवापुढे रांगेत बसलेले भिकारी आठवतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानधर्माला, फार महत्त्व आहे. दान केल्यावर पुण्य मिळतं, या भावनेने माणूस मंदिरातील देवाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आला की, आपल्या कुवतीनुसार भिकाऱ्यांना दान म्हणून पैसे देतो. इथे मंदिराबाहेर, भिकारी भीक मागतो ती आपल्या पोटासाठी व मंदिरात जाणारा भक्त देवाकडे भीक मागतो स्वतःच्या सुख समृद्धीच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी…

मंदिराच्या पुढे बसणाऱ्या अशा भिकाऱ्यांमुळे मंदिराच्या परिसराची, बजबजपुरी होऊन जाते. आठवड्यातील ठराविक वारांना या भिकाऱ्यांची संख्या वाढते. म्हणजे, गुरुवारी दत्त किंवा साईबाबापुढे.. शुक्रवारी देवीच्यापुढे… शनिवारी शनी, मारुतीपुढे व संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाच्या मंदिरापुढे त्यांची गर्दी ही दिसतेच. शनिवारी साडेसातीच्या त्रासातून सुखरुप सुटका व्हावी म्हणून कित्येक भक्त, दानधर्म करतात. भिकाऱ्यांना कपडे, केळी, बिस्कीटाचे पुडे, वडापाव किंवा काही खाद्यपदार्थही देतात. शनिअमावस्येला ही गर्दी, नेहमीपेक्षा जादाच झालेली असते.

मध्यंतरी वर्तमानपत्रात बालाजी देवस्थान येथील एका भिकाऱ्याची बातमी आली होती. हा भिकारी बालाजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मागे लागून त्यांना पैसे मागायचा. अशी त्यानं अनेक वर्षे भीक मागून जिंदगी घालवली. नुकताच त्याचा मृत्यू झाल्यावर पोलीसांनी त्याच्या झोपडीची झडती घेतली, तेव्हा लाखो रुपयांची रोकड त्यांना मिळाली. एवढे रुपये जवळ असताना, त्याला भीक मागणे सोडून द्यावे, असं कदापिही वाटलं नाही… कारण, काहीही कष्ट न करता, पैसे मिळविण्याचे त्याला जडलेलं ‘व्यसन’!!

पन्नास वर्षांपूर्वी शहरांतील गल्ली-बोळातून, भिकारी दारोदार फिरायचे. तेव्हा त्यांना पैशापेक्षा पोटाला भाकरी, शिळे अन्न मिळाले तरी समाधान असायचे. सकाळी व दुपारच्या वेळी गल्लीतून ‘अन्न वाढा ऽ माये’ अशी आरोळी देत जाणारे भिकारी माझ्या पिढीतील अनेकांनी नक्कीच पाहिलेले असतील.

मी जेव्हा १९७७ ला मुंबईला गेलो तेव्हा गेट वे ऑफ इंडियाच्या समोर परदेशातील पर्यटकांच्या मागे मागे फिरुन भिक मागणारे, अनेक भिकारी पाहिले. अरब देशांतील पर्यटक हे पैसेवाले, या समजुतीने त्यांना हे भिकारी वैतागून सोडत असत. काहीजण पैसे द्यायचे, काहीजण या भिकाऱ्यांचे फोटो काढायचे, त्यामुळे भारतदेशाची ओळख ही ‘भिकाऱ्यांचा’ देश होऊन, देशाची बदनामी होत असे..

मुंबईतील लोकल प्रवासात माणसांच्या गर्दीतही फरशीच्या दोन छोट्या तुकड्यांचा आवाज काढून ‘शिर्डीवालेऽ साईबाबाऽ’ म्हणत भीक मागणारी लहान मुलं किंवा माणसं हमखास दिसायची. या समस्येवर मुंबई महापालिकेने उपाय केलाही, मात्र त्याला यश आले नाही. सर्व भिकाऱ्यांना उचलून दुसऱ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली. मात्र काही दिवसांतच ते भिकारी पुन्हा शहरात आले व आपापल्या जागी भीक मागू लागले.

भीक मागणे म्हणजे, काहीही काम न करता लाचार होऊन कमाई करणे. मुंबईतील भिकाऱ्यांची मोक्याची ठिकाणं, ही ठरलेली असतात. दिवसभरात त्यांची भरपूर कमाई होते. रात्री फुटपाथवरच झोपून सकाळी पुन्हा कमाई सुरु. प्लॅटफॉर्मवर देखील हजारो भिकारी राहतात. तिथंच उघड्यावर त्यांचे संसार थाटलेले असतात.

माझे प्रभाकर निलेगावकर नावाचे एक मित्र आहेत. ते मुंबईला बॅंकेत नोकरीला होते, तेव्हा एक भिकारी महिन्यातून एकदा, चाळीस हजारांच्या रकमेचा ड्राफ्ट काढायला त्यांच्या बॅंकेत येत असे. तो ड्राफ्ट तो त्याच्या घरी केरळला पाठवत असे. त्याची भिक मागण्याची जागा मोक्याची असल्याने कमाई चांगलीच होती. पुढे त्याच्या मुलीचं लग्न एका उपवर भिकाऱ्याशी लावल्यानंतर त्याने आपली भीक मागण्याची जागा जावयाला हुंडा म्हणून, भेट दिली व स्वतः नवीन ठिकाणी जाऊन भीक मागू लागला.

काही भिकारी हे परिस्थितीने भिकारी होतात, काहीजण जन्मापासूनच भिकारी असतात.. आई-वडिलांचा वारसा ते पुढे चालवतात. काही जे अपंग असतात, अंध असतात..त्यांच्याकडे पाहून दया येते. मात्र धडधाकट माणसं भिकाऱ्याचं सोंग घेऊन भीक मागतात, तेव्हा त्यांची मनस्वी चीड येते. काही स्वाभिमानी अंध पती-पत्नी वजनाचं मशीन घेऊन रस्त्याच्या कडेला दिसतात, तेव्हा आवर्जून त्यांना पैसे देऊन स्वतःचं वजन पहाण्याची कोणाचीही इच्छा होते.

गेल्या दोन वर्षांपासून ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ हा उपक्रम चालविणारे पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनवणे सकाळी उठलं की, पुण्यातील मंदिर व मस्जिद परिसर गाठतात. तेथील भिकाऱ्यांची रुग्णसेवा करतात. त्यांच्यावर उपचार करुन त्यांचं भीक मागणं सोडणं, हा त्यांचा हेतू आहे. आतापर्यंत ४२ जणांनी या उपक्रमातून भीक मागणं सोडलेलं आहे. डॉक्टरांची ही समाजसेवा, इतरांनी त्यांचा आदर्श घेण्यासारखी आहे.

या कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमध्ये, कित्येक दानशूरांनी या भिकाऱ्यांना अन्नदान करुन माणुसकी जपलेली आहे. त्यांनी कोरोना होऊ नये म्हणून कोणतीही खबरदारी न घेता, कोरोनानं त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी कुठेही वाचनात किंवा ऐकिवात आलेली नाही…

पुन्हा ज्या प्रसंगाने लेखांची सुरुवात केली, त्या चित्रपटातीलच शेवटच्या प्रसंगाने सांगता करतो…’पुष्पक’ चित्रपटातील तो भिकारी जेव्हा फुटपाथवरच मरण पावतो, तेव्हा महानगरपालिकेची गाडी त्याचं प्रेत न्यायला येते. गाडीतील चार कर्मचारी त्याला उचलून नेऊ लागतात, तेवढ्यात जोराचा वारा येतो व तो ज्या पोत्यावर बसायचा ते पोते उडून त्याच्या खालील नोटा रस्त्यावर इतस्ततः पसरतात. ते पाहून कर्मचारी त्याचं प्रेत कडेला ठेवून नोटा पकडण्यासाठी धावून जातात व जमतील तेवढ्या नोटा खिशात कोंबतात… सबसे बडा रुपैय्या!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२७-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 399 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..