नवीन लेखन...

भारतीय लोकशाही : दशा आणि दिशा – भाग १

(पूर्वार्ध)
भारतीय लोकशाही; दशा..

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी लोटला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लहान मोठ्या संस्थांनानी बनलेला हा उभा-आडवा देश, स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात एक अखंड देश म्हणून जगासमोर आला. ब्रिटीशांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी वारशात मिळाल्या, त्यात ‘लोकशाही’ नांवाची अप्रुपाची एक गोष्टही मिळाली.

विविध लहानमोठ्या आणि एकमेंकांमध्ये मैत्रीपेक्षा शत्रुत्वच्याच सीमा जास्त असलेल्या राज्या-संस्थानांच्या या देशात, स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राज्यपद्धती सुरू झाली. एक देश, एक संविधान, एक ध्वज असलेला भारत एकच राष्ट्र म्हणून जगाला माहिती झाला. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची आज ओळख आहे. भारत जगाच्या ज्या दक्षिण आशिया भागात येतो, त्या भागात असलेल्या इतर देशांच्या राजकीय परिस्थितीकडे पाहीलं, तरी त्यांच्या तुलनेत भारत लोकशाही टिकवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे असं दिसतं. पण खरंच तसं आहे का? इथे सर्वच आलवेल आहे का? की लोकशाहीच्या बुरख्याखाली काही वेगळंच सुरू आहे? मला पडलेल्या या प्रश्नाचं विश्लेषण आणि त्यावर उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न मी या दोन भागातल्या लेखांतून करणार आहे. या दोन भागांचं सामायिक शीर्षक एकच असलं तरी त्याची ‘भारतीय लोकशाही; दशा’ हा आपल्या लोकशाहीची सद्यस्थिती सांगणारा पूर्वार्ध आणि ‘भारतीय लोकशाही; दिशा’ हा आपल्या लोकशाहीची सद्यदशा सुधारण्यासाठी आपण मतदारांनी कोणत्या दिशेने विचार करायला हवा त्याची चर्चा करणारा उत्तरार्ध, अशी सोयीसाठी विभागणी केलेली आहे.

या लेखनात काही त्रुटी राहील्या असण्याची शक्यता मी नाकारत नाही कारण मी काही राजकारणाचा जाणकार नाही. तसंच या लेखांमधे एखाद्या मुद्द्याची पुनरावृत्ती असण्याची शक्यता आहे, कारण अशा प्रकारच्या लेखात हे टाळता येण्यासारखं नसतं..

हे खरंय, की स्वातंत्र्योत्तर काळात देशांतर्गत असलेल्या विविध संस्थानांच्या सीमा पुसल्या गेल्या आणि देशाला चहुबाजूने असलेली एकच सीमा मिळाली. आपल्या देशाला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळख मिळाली. १९४७च्या स्वातंत्र्य मिळालेल्या रात्री पं. नेहरुंनी “बहुत साल पहले हमने नियति से एक वादा किया था..” असं भावूक भाषण केलं होतं. हे भाषण भविष्यातल्या सोनेरी स्वप्नांचं असणं अगदी सहाजिक होतं. नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आनंदात, भविष्यात समोर उभ्या ठाकू शकणाऱ्या समस्यांची कल्पना त्याव्ळच्या राजकारण्यांना होती की नाही याचं आकलन आता होत नाही.

पुढे काही वर्षांनी संस्थानं विलीन होऊन आपापल्या भाषेची अस्मिता जागृत झालेले प्रांत निर्माण झाले. सुरुवातीला ताज्या ताज्या मिळालेल्या स्वातंत्र्याच्या कैफात ही नव्याने निर्माण झालेली संस्थानच आहेत आणि त्यांच्यातला सीमा आणि भाषा प्रश्न पुढे जटील होणार आहे याची जाणीव झालेली नव्हती. मुसलमानांना त्याच्या मागणी प्रमाणे पाकिस्तान देऊन टाकल्यानंतरही आपल्या देशातल्या मुसलमानांची धार्मिक समस्या पुढे किती अवघड होणार आहे याचीही कुणाला कल्पना नसावी. स्वातंत्त्रयप्राप्तीसाठी खांद्याला खांदा लावून लढलेल्या जाती-जमाती-पंथ आणि त्यांच्यातली उच्च निचतेची भावना अजून जागी झाली नव्हती. नुकतच मिळालेलं स्वातंत्र्य, त्यासाठी केल्या गेलेल्या कठोर संघर्षाच्या फळाचे गोडवे गाण्यात सर्वच मशगुल होते.

राजकीय स्तरावर सुरुवातीला देशात देशव्यापी म्हणता येतील असे काॅंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे केवळ दोनच राजकीय पक्ष होते. तर, पश्चिम बंगालातला फॉरवर्ड ब्लॉक, तामिळनाडूतला द्रमुक, काश्मिरातला नॅशनल काॅन्फरन्स, केरळातली मुस्लिम लीग, पंजाबातलं अकाली दल आणि काही दोन-चार राजकीय पक्ष त्या त्या राज्यात कार्यरत होते, पण त्यांची ताकद आणि प्रभाव मर्यादीत होता. देशात आणि राज्यांतही खऱ्या अर्थाने प्रभाव होता तो काॅंग्रेसचाच. देशाचा स्वातंत्र्य लढा मुख्यत: काॅंग्रेसच्याच नेतृत्वाखाली लढला गेल्याने आणि काॅग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं अशी लोकांची भावना (आणि कृतज्ञताही) असल्याने असं होणं अगदी सहाजिकच होत.

याचाच परिणाम म्हणून स्वातंत्र्यानंतर बराच काळ काॅंग्रेसने या देशावर अनभिषिक्त राज्य केलं. पुढे आणखी काही वर्षांनी स्वातंत्र्य लढ्याचा कैफ उतरायला सुरुवात झाली आणि इतका काळ काॅंग्रेस सोबत असलेल्या राजकीय व्यक्तीमत्वांना, काॅग्रेस चाखत असलेली सत्तेची फळं लक्षात येऊन, इतर पक्षांतही सत्तेपर्यंत जायच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागले. आता पर्यंत ब्रिटीश या सामायिक शत्रूविरुद्ध लढण्याचं लक्ष आतापर्यंत संपुष्टात येऊन काॅंग्रेस हा सामायिक राजकीय शत्रू ठरला आणि मग इथून पुढे भारतीय लोकशाहीची विटंबना व्हायला सुरुवात झाली.

लोकशाही मार्गाने काॅंग्रेसला सत्तेवरुन खेचायचं म्हणजे काॅंग्रेसच्या मतपेटीला खिंडारं पाडायची हे ओघानेच येत. मग मतदारांमधे भाषा-प्रांत-धर्म-पंथ यावरून भेद निर्माण करायचा अपरिहार्य मार्ग दिसू लागला. आणि इथपासूनच आतापर्यंत सख्ख्या बहिणींप्रमाणे सुखाने नांदणाऱ्या देशांतर्गत भाषा आणि प्रान्त एकमेकाचे हे एकमेकांचे शत्रू म्हणून एकमेंकासमोर उभे ठाकले. धर्मावरून लढाया आणि दंगली आपल्याला काही नविन नव्हत्या, परंतू आता मात्र त्यात राजकारणाने प्रवेश केला. जाती-जमातींना आपापल्या उच्च-निचतेच्या जाणीवा खुणावू लागल्या. हे कमी की काय म्हणून आहेरे आणि नाहीरे अशीही दरी निर्माण झाली. आणि यातील प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जाऊन त्या त्या गोष्टीचं रुपांतर मतपेटीत करण्याचा प्रयत्न होऊ लागला. जात-धर्म-भाषा-प्रांन्त-गरीब-श्रीमंत अशा प्रत्येकाची व्होटबॅंक तयार होऊ लागली आणि याचा अपरिहार्य परिणाम म्हणून, या सर्वांचा कैवार घेण्याचं नाटक वठवणाऱे अनेक राजकीय पक्ष या देशात निर्माण झाले. लक्षात घ्या, १९४७ च्या दरम्यान केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील येवढ्याच असलेल्या राजकीय पक्षांची संख्या जवळपास ५०-६० पटीने वाढली. सन २०१४ सावी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत देशभरात एकूण ४१८ राजकीय पक्षांनी भाग घेतला होता. यातील बहुसंख्य पक्ष जात, भाषा, धर्म, पंथ यांच्या पायावर उभे आहेत. राष्ट्रीयत्वाची भावना असलीच, तर ती लोकशाहीची तोंड देखल्या का होईना, पण लाज राखावी म्हणून असावी.

तिकडे बराच काळ सत्तेत राहिल्यामुळे सत्तेची ताकद आणि मधूर फळं काॅंग्रेसच्या लक्षात आली काॅंग्रेसनेही डिव्हाईड आणि रुलचं राजकारण सुरू केलं. हे असं करण्यात केवळ काॅंग्रेसच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्ष हिरिरीने पुढे येऊ लागले. जात-पात-प्रान्त-धर्म आदी भावनेने विचारशक्ती गमावलेल्या लोकांचे कळपच्या कळप आपापल्या वाटणाऱ्या (फक्त वाटणाऱ्याच बरं का..!) पक्षांच्या मागे उभे राहू लागले. ‘लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं सरकार’ हे लोकशाहीचं उदात्त वाटणारं तत्व मागे पडून ‘आपल्या लोकांचं आपल्या लोकांसाठी आणायचं आपल्या लोकांच सरकार’ अशी नविन विस्तारीत व्याख्या जन्म पावू लागली. वरतून कल्याणकारी वैगेरे वाटणारं राज्य ही कल्पना मागे पडू लागली आणि राजकारण हे लोकांसाठी केल्याचा देखावा करत केवळ सत्तेसीठीच होऊ लागलं आणि सत्ता फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच हे मुख्य तत्व झालं. देशातली काॅंग्रेसची सत्ता आणि वर्चस्व हळहळू कमी होऊ लागलं होतं, तरी संपुष्टात आलं नव्हतं.. काॅंग्रेसच्या कमी होणाऱ्या जागांवर विविध विरोधी तत्वाचे राजकीय पक्ष निवडून येऊ लागले होते. सत्तेसाठी त्यांची अनैतिक शय्यासेबत होऊ लागली होती. देशात अशा अनैतिक शय्यासोबतींना ‘आघाडी सरकार’ असं गोंडस नांव देण्यात आलं होतं आणि मुलामा होता कधीच न होऊ शकलेल्या लोककल्याणाचा..!

एव्हाना राजकारणातले बाकी सर्व प्रश्न मागे पडून जात आणि धर्म, भाषा आणि प्रान्त हे प्रश्न महत्वाचे ठरू लागले होते. आपापल्या जाती-धर्म-भाषांचा आधार घेऊन उदयाला आलेल्या पक्षप्रमुखांची नवी पिढी राजकारणात येऊ घातली होती. त्या त्या प्रांताची, भाषेची, जातीची, धर्माची अस्मिता जपण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षांनी कधीना कधी सत्तेची फळं चाखलेली होती आणि या देशातल्या लोकशाहीचा उपयोग स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी अनिर्बंधपणे आणि उत्तम प्रकारे करता येतो याची त्यांना सार्थ जाणीव झालेली होती आणि म्हणून विविध अस्मितांचा बागुलबुवा उभा करुन सत्तेसाठी आणि त्यातून येणाऱ्या काळ्या-पांढऱ्या संपत्तीचा ओघ फक्त आपल्या आणि आपल्याच घरीच कसा राहील याचा काळजी घेतली जाऊ लागली आणि भारताततल्या लेकशाहीत घराणेशाहीचा शिरकाव झाला. इथे भारतातील लोकशाहीने एक भयानक वळण घेतलं आणि जर का वेळीच आवरलं नाही, तर आता ती कुठे जाऊन आदळेल याची कुणालाही कल्पना नाही. आपली लोकशाही इथून पुढे ‘लेक’शाही झाली. पक्ष खाजगी पेढ्या झाले आणि आपण मतदार भांडवल..स्वहित मोठं झालं आणि ते साधण्यासाठी देशहीताचाही बळी द्यायला सर्वपक्षीय राजकारणी कमी करणार नाहीत, अशी भावना जनमाणसात तयार होऊ लागली..

सुरुवातीला ८ ते १० पर्यंत मर्यादीत असलेले राजकीय पक्ष गेल्या ७० वर्षात ६०- ७० पटीने वाढले आणि यातील बहुसंख्य पक्ष खाजगी कंपन्या आहेत. हे पक्ष वाढण्याचं वरवरचं कारण लोकसेवा हे असलं, तरी मुख्य कारण राजकारणात मिळणारा प्रचंड बेहिशोबी पैसा हे आहे. या पैशाचा हिशोब देण्याची गरज नसते. कुणी विचारायचं धाडस केलंच, तर मग ‘सिद्ध करून दाखवा’ हा परवलीचा मंत्र म्हणायचा. कारण सर्वसामान्यांच्या डोळ्यांना स्वच्छ दिसत असलेलं हे पुढाऱ्यांचं नागडं पाप, सिद्ध करताच येणार नसतं. सर्वच यंत्रणा भ्रष्चाचारात लडबडलेल्या, त्यामुळे कोण कोणासमोर काय सिद्ध करणार? सिद्ध करायला जातात आणि शुद्ध करुन घेतात असा सर्वांचा स्वार्थाचा नंगा नाच सर्वत्र चालू आहे. ‘क्लिन चिट’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ चारित्र्याचा दाखला असा घ्यायचा असला तर खुशाल घ्यावा, मी मात्र तो ‘स्वच्छ फसवणूक’ असाच घेतो. स्वातंत्र्यानंतर कुणा पुढाऱ्याला, अलिकडचे लालू आणि भुजबळ सोडल्यास, अवैध संपत्ती बाळगली म्हणून आजन्म तुरुंगवास झाल्याचं आठवतंय का?

राजकीय पक्षांच्या झालेल्या अनिर्बंध वाढीमुळे सत्तेचं वाटलं जाणं सहाजिकच होतं. कुणा एकाच सरकार येणं अशक्य असल्याने मग एकमेकांबरोबर अनैतिक शय्यासंबंध सुरु झाले (या शय्यासोबतींना ‘घोडेबाजार’ असं नांव देऊन प्रामाणिकपणात पहिला क्रमांक असणाऱ्या घोड्यांना का बदनाम केलं जातं हे मला कळत नाही.). वर ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो’ असं या शय्यासंबंधांचं उदात्तीकरणही सुरु झालं. गेल्या अनेक वर्षात असे अनेक निर्लज्ज संबंध आपल्या राजकारणात आपण पाहात आलो आहोत. सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा हिडीस तमाशा आपण उघड्या डोळ्यांनी आणि हताशपणे पाहात आलो आहोत. भारतातील कोणत्याही माणसाला त्याचं आजच्या राजकारणाविषयी मत विचाराल, तर पहिलं राजकारण्यांच्या आया-बहिणींच्या गुह्य अवयवांचा उद्धार करून, ‘वीट आलाय या राकारणाचा आणि राजकारण्यांचा’ हेच उत्तर ऐकायला मिळेल. अपवाद फक्त नेत्यांच्या फेकल्या उष्ट्यावर जगणाऱ्या आणि कणा हरवलेल्या त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांच्या व्यक्तीपुजेने आंधळ्या झालेल्या फाॅलोअर्सचा..

(पूर्वार्ध समाप्त..)

—  नितीन साळुंखे
9321811091

13 April 2018
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(उत्तरार्ध) भारतीय लोकशाही; दिशा..

https://www.marathisrushti.com/articles/bharateey-lokshahi-dasha-ani-disha-2/

 

 

 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..