नवीन लेखन...

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता

Bhagwadgeeta From the Perspective of Science

भगवद् गीता या, सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी सांगितल्या/लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर आतापर्यंत हजारो विद्वानांनी भाष्य केलं आहे आणि अजूनही अनेक विद्वानांना निराळ्या दृष्टीकोनातून भाष्य करावसं वाटतं आहे. गीतेच्या  18 अध्यायात वेदोपनिषदांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीता म्हणजे अुपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं.

गीता लिहून सुमारे 5 हजार वर्षांचा काळ अुलटला आहे. या काळात, विशेषत: पंधराव्या-सोळाव्या शतकांपासून मानवानं विज्ञानात खूपच प्रगती केली आहे. पुराव्यासहीत, अनेक अध्यात्मिक संकल्पनांचं स्पष्टीकरण विज्ञानानं दिलं आहे. पृथ्वीवरील सजीवांची अुत्क्रांती, गेल्या 3.8 ते 3.5 अब्ज वर्षापासून होते आहे. सजीवांच्या अुत्क्रांतीचा शेवटचा टप्पा म्हणजे, या पृथ्वीवर मानवाचं अवतरण. सुमारे 8 लाख वर्षांपूर्वी, बिनशेपटीच्या, दोन पायावर चालणार्‍या माकडांच्या प्रजातीत (होमो अिरेक्टस) अुत्क्रांती होअून आदीमानव अुदयास आला (होमो सॅपिअेन, सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी) असं शास्त्रज्ञांनी, अुत्खनात सापडलेल्या मानवी अवशेषाच्या आधारे सिध्द केलं आहे.

सुमारे 15 ते 10 हजार वर्षांपूर्वी, जेव्हा मानवाला शेती आणि पशुपालनाची विद्या/तंत्र अवगत झालं तेव्हा, समूह, समाज, आणि कुटुंबं निर्माण झाली. पोटभर आहाराची सोय झाली. त्यामुळे मानवाला सभोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करायला आणि त्यापासून बरंच काही शिकायला वेळ मिळाला. मेदूचा विकास झपाट्यानं होअून तो तार्किक दृष्ट्या विचार करू लागला.

पृथ्वीवरील निसर्ग आणि आकाशातील चंद्र, सूर्य आणि तारे वगैरे पाहून त्याच्या मेंदूत पहिला विचार आला तो हा, की या सर्व वास्तव घटकांना कुणीतरी निर्माण केलं असणार आणि तोच या सर्वाचं नियंत्रण करीत आहे. हीच अीश्वराची संकल्पना. दुसरं महत्वाचं निरीक्षण म्हणजे, सर्व सजीव, त्यांच्या अिच्छेनुसार हालचाल करू शकतात. म्हणजे त्यांच्या शरीरात कोणतीतरी शक्ती, प्रेरणा, चेतना असली पाहिजे. ती चेतना शरीरातून निघून गेली की ते शरीर अचेतन होतं, मरतं. ही चेतना म्हणजेच सजीवांच्या शरीरातील आत्मा.

अीश्वर आणि आत्मा या संकल्पनांतूनच अध्यात्म अुदयास आलं. या संकल्पना मानवाच्या मेंदूत, फार फार तर 15 ते 10 हजार वर्षांपूर्वी आल्या. पण त्यापूर्वी कोट्यवधी वर्षे, या पृथ्वीवर सजीवांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते.

पृथ्वीच्या आयुष्यकाळातील 5 हजार वर्षे म्हणजे नगण्य काळ आहे. या काळात मानवाची शारीरिक अुत्क्रांती फारशी झाली नाही. त्यामुळे आपले पूर्वज विचारवंत आणि रुशीमुनी यांनी जे अनुभव घेतले तेच आपण आजही घेअू शकतो. त्यांच्या अितकी किंवा त्यांच्याहून जास्त बुध्दीमान व्यक्ती आजही जन्म घेअू शकतात, नव्हे जन्मलेल्याही आहेत. आपली मुलंमुली जेव्हा आणि जशी वयात येतात तशीच त्यांचीही मुलंमुली वयात येत होती. आपण ज्या मार्गानं प्रजनन करतो त्या मार्गानंच त्यांनीही प्रजनन केलं. ज्या मार्गानं आपलं अन्नपचन होतं तसंच त्यांचंही अन्नपचन होत होतं. त्यांच्या शरीरात जे अवयव होते तेच अवयव आजही आपल्या शरीरात त्याच जागी आहेत.

पृथ्वीवर जेथे जेथे मानवसमूह भरभराटीला आले तेथे तेथे त्यांच्या संस्कृती अुदयाला आल्या. मानवसमूहाची प्रगती, पृथ्वीवर, निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या काळी झाली. प्रत्येक संस्कृतीत विचारवंत माणसं जन्मली आणि त्यांनी समाजाच्या भल्यासाठी धर्माचरणं सांगितली. त्या काळची माणसं आपल्यापेक्षा फारशी निराळी नव्हती. आपल्यासारखीच होती. त्या माणसांनीच धर्मग्रंथ लिहीले. जनमानसावर या धर्मग्रंथांचा प्रभाव पडावा म्हणून त्यांना देवत्व बहाल केलं, त्यातील मानवी व्यक्तींना दैवी गुण चिकटविले, अतिशयोक्तीपूर्ण घटनांचा समावेश केला वगैरे. या सर्वांवर, धर्मभीरू व्यक्तींचा आजही विश्वास आहे.

आता पुन्हा गीतेकडे वळू या. गीतेतील सर्वच अध्यायात तत्वज्ञान सामावलेलं आहे. तरीपण काही महत्वाच्या अध्यायांचा अुल्लेख करावासा वाटतो. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो (अध्याय 2 ). कर्मयोग (अध्याय 3), ध्यानयोग, आत्मसंयम योग (अध्याय 4) विश्वरूप दर्शन योग (अध्याय 11) भक्तियोग, श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा (अध्याय 12),, क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग अर्थात प्रकृती-पुरुष विवेकयोग (अध्यय 13) मोक्षसन्यास योग (अध्याय 18 ) वगैरे.

गीतेवर भाष्ये केलेल्या असामान्य व्यक्ती म्हणजे आद्य शंकराचार्य (ज्ञानमार्ग), ज्ञानेश्वर माअुली (भक्तिमार्ग) लोकमान्य टिळक (गीतारहस्य, कर्ममार्ग) या मानल्या पाहिजेत. त्यांनी केलेल्या भाष्यांमुळे, सामान्य माणसाला, गीतेचं खरेखुरं ज्ञान झालं. प्रा. सोनोपंत दांडेकर यांनी ज्ञानेश्वरीवर, म्हणजे पर्यायानं गीतेवर, भाष्य केलं आहे. ज्ञानेश्वर माअुलींची मराठी आपल्याला कळावी म्हणून प्रा. सोनोपंतांनी आधुनिक मराठीत भाष्य केलं आहे .हरिद्वारचे श्रीस्वामी रामसुखदासजी आणि आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनीही रसाळ भाष्ये केली आहेत. ही सर्व भाष्ये अध्यात्माच्या दृष्टीकोनातून केली आहेत, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून नव्हे.

गीतेचं तत्वज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, असं आढळतं की, त्यात पुरेपूर विज्ञान सामावलेलं आहे. पण ते अध्यात्माच्या आवरणात झाकलं गेलं आहे. या आवरणाच्या आत डोकावलं तरच गीतेतील विज्ञान कळू शकेल. तोच प्रमाणिक प्रयत्न मी करणार आहे.

रुशीमुनी, महान तत्त्ववेत्ते आणि महान विचारवंत यांनी या विश्वाचं गूढ अुकलण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा, अध्यात्माच्या मार्गानं, प्रयत्न केला आहे. या मार्गानं जात असतांना, त्यांनी अनेक संकल्पना रूढ केल्या. अीश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, मोक्ष, सजीवांच्या जन्ममृत्युचे फेरे, पुनर्जन्म वगैरे वगैरे. या सर्व संकल्पना, अनुभूतीतून साकारल्या आणि त्या अमूर्त स्वरूपात आहेत. रुशीमुनींना विज्ञानाची जाणीव होती याचे अनेक पुरावे आहेत. पण ते ज्ञान, अध्यात्माच्या भाषेत सांगितल्यामुळे सामान्य माणसांना त्याची जाणीव झाली नाही असं मला वाटतं.

आता विज्ञानानं खूपच प्रगती केली आहे. विश्वाचं गूढ अुकलणं, सत्य जाणून घेणं, हाच विज्ञानाचाही अुद्देश आहे. अमूर्त स्वरूपात, विश्वाचा कोणताही घटक अस्तित्वात असू शकत नाही, अख्खं विश्वच मूर्त स्वरूपात असतं हा विज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे विज्ञानानं काढलेले निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळून आल्यास, कोणाही व्यक्तीला, केंव्हाही, कोणत्याही स्थानावरून आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात.

या विश्वात कोणतीही घटना किंवा कोणताही परिणाम, कारणाशिवाय घडत नाही (कार्यकारणभाव) आणि या कारणामागं कोणत्यातरी प्रकारच्या अुर्जेचा सहभाग असतोच असतो. हे कारण किंवा हा अुर्जेचा प्रकार समजला नाही तर ती घटना किंवा तो परिणाम, चमत्कार समजला जातो. पण ते खरं नाही. विश्व हाच, या विश्वातील अेकमेव चमत्कार आहे.

विज्ञानाचा दुसरा भक्कम पाया म्हणजे, या विश्वाचे वास्तव नियम कोणतीही व्यक्ती मोडू शकत नाही किंवा त्या नियमांचं अुल्लंघन करू शकत नाही. गुरुत्वाकर्षण बल, वीजचुम्बकीय बल आणि दोन प्रकारची अणुगर्भीय बलं, या चार भौतिक मुलभूत बलांमुळेच, विश्वाचे सर्व व्यवहार चालतात. विश्वात असलेल्या विज्ञानाच्या मानानं, शास्त्रज्ञांनी मिळविलेलं ज्ञान नगण्य आहे, याचंही भान शास्त्रज्ञांना आहे.

गीतेत सांगितलेल्या संकल्पनांना, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून काही स्पष्टीकरणं देता येतील असा माझा दृढ विश्वास आहे आणि तसं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

‘विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता’ या लेखमालेचा हाच अुद्देश आहे.

— गजानन वामनाचार्य

शनिवार 25 फेब्रुवारी 2017
शनिवारचा सत्संग : 14

 

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..