नवीन लेखन...

झाडू ड्युटी… ( बेवड्याची डायरी – भाग २६ वा )

सरांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ..अगदी लहानपणा पासूनच्या घटना आठवत होतो ..अनेक घटनांमध्ये मला जाणवले की माझ्या आवडी निवडी ..माझ्या इच्छा ..वगैरेंबाबत मी खूप जागरूक असे ..एकदा लहानपणी मेथीची भाजी खाणार नाही म्हणून मी हटून बसलो होतो ..तर एकदा विशिष्ट रंगाचाच शर्ट विकत घ्यायचा म्हणून कपड्यांच्या दुकानात रडून गोंधळ घातला होता ..आईचा नेहमी मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात म्हणून आग्रह असे ..पालेभाज्या ..तसेच कारली ..दुधी ..मुळा ..भोपळा ..वगैरे भाज्या अजिबात आवडत नसत …एकदा घरी जेवणात मेथीची भाजी केलेली होती ..मी ती भाजी खाणार नाही म्हणून हटून बसलो ..मला वेगळी बटाट्याची भाजी करून दे म्हणून आईकडे हट्ट धरला ..आईने खूप समजावले ..सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ..आवडीनिवडी पेक्षा त्या भाज्यांमध्ये पोषक तत्वे कोणती आहेत ते पाहून भाजी खाल्ली पाहिजेत वगैरे समजावले ..मात्र मी तिचे अजिबात ऐकायला तयार नव्हतो ..शेवटी मी जेवत नाहीय ते पाहून तिने रात्री ११ वाजता मला वेगळी बटाट्याची भाजी करून दिली तेव्हा माझे समाधान झाले होते ..

पुढे मी एन.सी .सी च्या कँम्प मध्ये गेलो असताना ..माझ्या या भाज्यांच्या आवडीनिवडी मुळे मला जवळ जवळ उपाशी राहावे लागले होते …कारण तेथे सर्व भाज्या माझ्या नावडीच्या होत्या ..मी फक्त वरण पोळी खाल्ली होती तीन दिवस ..तेव्हा जाणवले होते की सर्व भाज्या खायची सवय आपल लावून घ्यायला हवी होती ..माझ्या मित्राकडे एक लाल रंगाचा शर्ट होता तो त्याला खूप .. शोभून दिसे ..मलाही वाटे असला शर्ट आपल्याला हवा ..जेव्हा दिवाळीत कपडे खरेदी साठी आम्ही सर्व कपड्यांच्या दुकानात गेलो तेव्हा मी मला तो विशिष्ट लाल रंगाचा शर्ट हवा अशी मागणी केली ..नेमका माझ्या मापाचा शर्ट तेथे उपलब्ध नव्हता ..थोडा आखूड होता ..तरीही मी तो आखूड लाल शर्टच घेणार असा हट्ट धरला ..मला सर्वांनी खूप समजावले ..मात्र मी रडारड सुरु केली ..शेवटी तो आखूड मापाचा शर्ट घेवून आलो ..जेमतेम दिवाळीत तो दोन दिवस वापरला ..धुतल्यानंतर तो अजूनच आखूड झाला नंतर तो शर्ट मी पुन्हा घातला नाही …शाळेत विशिष्ट प्रकारचे दप्तर हवे ..वह्या विशिष्ट कंपनीच्याच हव्यात ..वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी मी हटून बसत असे ..माझे सर्व मित्र दहावीनंतर कॉमर्सला गेले म्हणून मी पण घरचे सायन्स घे असा आग्रह करत असताना कॉमर्सलाच गेलो ..

नंतर अनेकदा आपण सायन्स घेतले असते तर बरे झाले असते असे मला वाटत राहिले ..अनेक घटना मला आठवत गेल्या ज्यात माझ्या इच्छा तसेच माझ्या आवडीनिवडी नुसार मी घरच्यांना वेठीला धरले होते ..त्यांच्या मानसिकतेचा विचार न करता ..ते आपले हितच बघत आहेत याचा विचार न करता केवळ स्वतच्या इछेचा ..स्वताच्या आनंदाचा विचार केला होता ..नोकरी लागल्यावर जेव्हा पहिल्या पगारात मित्रांनी पार्टी दिली तेव्हा ..मित्रांनी बियर घेण्याचा आग्रह केला ..आमच्या घरी कोणीही कधीच दारू किवा बियर वगैरे घेत नसे ..उलट माणसाला कोणतेही व्यसन नसावे हाच आग्रह असे वडिलांचा ..तेव्हा देखील मी वडिलांची शिकवण बाजूला ठेवून बियर घेतली ..घरी आल्यावर जेव्हा वास आला तेव्हा वडील रागावले ..मी वडिलांना माझ्या पिण्याचे समर्थन दिले ..आजकाल सर्वच पितात ..एखादे दिवशी घेतली तर इतके बोलायचे काही कारण नाही ..असा वाद घातला ..पुढे माझे पिणे वाढतच गेले ..तेव्हा देखील मी समर्थने देत गेलो ..वाद घालत गेलो ..कदाचित त्यामुळेच आज मला व्यसनमुक्ती केंद्रात यावे लगले होते ..पहिल्यांदाच मी स्वताच्या इच्छा बाजूला ठेवून घरच्यांच्या इच्छेला मान दिला असता तर मला व्यसन लागले नसते ..उत्तर लिहून झाल्यावर मी मोठा सुस्कारा सोडला ..

उत्तर लिहून डायरी माॅनीटर कडे द्यायला गेलो ..डायरी घेत मला म्हणाला ..विजयभाऊ आज उद्या तुमची झाडू ड्युटी लागली आहे ..तुम्हाला आता येथे एक आठवडा उलटून गेलाय ..तुमची तब्येतही चांगली आहे ..तेव्हा उद्या सर्व हॉल मध्ये ..सकाळी चहानंतर ..दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर झाडू मारण्याचे काम तुम्हाला करायचे आहे ..येथे उपचार घेणाऱ्या सर्वांनाच झाडू मारणे ..वार्ड सफाई ..जेवण बनवण्याची मोठी भांडी घसणे वगैरे प्रकारची कामे करावी लागत असत ..फक्त जे आजारी आहेत ..वृद्ध आहेत किवा इतर काही समस्या आहेत अश्यानच यातून सूट मिळे..तत्वतः हे मला मान्य होते ..मात्र प्रत्यक्ष माझी झाडू ड्युटी लागली आहे हे ऐकून मला कसेसेच झाले ..घरी कधीच मी असल्या कामांना हात लावला नव्हता ..

झाडू मारणे ..भांडी घासणे ..स्वैपाक करणे ..कपडे धुणे ..घराची साफसफाई करणे वगैरे कामे स्त्रियांनी करायची असतात ही एक चुकीची मानसिकता बनून गेली होती ..अलका माहेरी गेली की या मानसिकते मुळे मला खूप त्रास होई ..चारचार दिवस मी घरात झाडू मारत नसे ..ती येई तेव्हा घराचा अक्षरश: उकिरडा झालेला असे ..सगळीकडे कचरा ..अस्ताव्यस्त पडलेले माझे कपडे ..फ्रीज मध्ये उघडे ठेवलेले पदार्थ …चहा केलेली खरकटी भांडी ..नासलेल्या दुधाचे बाजूला ठेवलेले भांडे ..वगैरे पसारा पाहून ती खूप कटकट करत असे ..तिला सगळा पसारा आवरायला चारपाच तास लागत ..यावर मी तिला म्हणे तुला आपल्या घराची इतकी काळजी आहे तर मग माहेरी जावू नकोस .. मात्र ती माहेरी गेल्यावर मी सर्व साफसफाई नीट करत जावी असे मला वाटले नव्हते ..

माझा पडलेला चेहरा पाहून माँनीटर म्हणाला ..विजयभाऊ ही ड्युटी तुमच्याकडून काम करून घ्यावे म्हणून लावलेली नाहीय तर या जागेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी म्हणून ..तसेच आपला अहंकार कमी व्हावा म्हणून लावली जाते .. आपले घर स्वच्छ ठेवण्यात आपल्या कुटुंबातील स्त्रियांचा कसा वाटा असतो हे समजून त्यांची किंमत कळावी हा हेतू आहे ..कोणतेही काम हे हलक्या अथवा दुय्यम दर्जाचे नसते ..उलट अशी कामे केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो ..वेगवेगळ्या प्रकारची कामे केल्याने शरीराला व्यायाम मिळतो ..आपले मन स्वस्थ आणि शांत राहण्यास ही कामे मदत करतात ..त्याचं बोलण्याला मी मान डोलावून दुजोरा दिला …

( बाकी पुढील भागांत )

— तुषार पांडुरंग नातू

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..