नवीन लेखन...

बायको नावाचे अजब रसायन

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!”
मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. चला, खूपच मनावर घेउुन काय करावे म्हटलं तरी हिलाच आवडत नाही. कारण आपण केलेले कामच त्या दर्जाचे असते. ओल्या कपडयाने साधा टीव्ही पुसला तरी मागे हुसेनच्या पेंटिंगसारखे फरकाटे ठेउुन जातो. एकदा पायात काहीतरी आले म्हणून निरखून पाहिल्यावर कळले की पेन्सिलच्या आत लीडच नाही. पेन्सिलवालेही फसवाफसवी करायला लागले असे म्हणत ती बिनलीडाची पेन्सिल कचर्‍याच्या डब्यात टाकली आणि घरातल्या अजून एका कामाला हातभार लावल्याचे समाधान घेतोय न घेतोय इतक्यात हिने कुठल्यातरी कारणावरून घर डोक्यावर घेतले. दरवाजा धरून ठेवायला जसा आडणा असतो तसे हिचे केस धरून ठेवायला लागणारे जे अवजार होते ते बिनलीडाची पेन्सिल समजून मी डस्टबिनमध्ये फेकले होते.
तेव्हापासून मी घरच्या कामाच्या भानगडीत पडत नाही. घरातली सगळी कामे हिच करते. घरच्या लक्ष्मीला हाउुसवाईफ म्हणणे म्हणजे तमाम गृहिणींचा घोर अपमान आहे. एका अल्लड किंवा बिनधास्त आयुष्य जगणार्‍या मुलीपासून हाउुसवाईफ होणे हे खूप मोठे स्थित्यंतर आहे. अतिशय सुखाचे आयुष्य आणि त्याचबरोबर स्वत:चे जन्मदाते आईबाबा सोडून लग्नाआधी साधी ओळखही नसलेल्या माणसाचा संसार फुलवायला त्या नवीन घरी आलेल्या असतात.
त्या घरी असतात म्हणूनच आपल्याला निवांतपणे आॅफिसमध्ये काम करता येते. नाहीतर आॅफिस सोडले तर आपला तसा काही उपयोगच नसतो. उदाहरणच पाहू, आपल्याच एरियातले लाईटबिल भरायचे आॅफिस नेमके कुठे असते हे आपल्याला माहित नसते. वाण्याला एकवेळ आपले नाव ठाउुक नसेल पण बायकोने फोनवरून सांगितलेले सामान तो गुमानपणे घरी टाकून जातो. इस्त्रीवाला तर दारात आल्यावर समोर उभा राहून स्माईल करणारा माणूस कोण आहे ते कळत नाही पण त्याला बघताच ती कपडयाचा ढीग त्याच्याकडे सोपवते. मोजून कपडे घेणे वगैरे सोपस्कार तोच पार पाडतो. पोरं तर चांगलं सांगूनही आपलं ऐकत नाहीत. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कोण माणूस? अशा नजरेने आपल्याकडे पहातात पण आई ओरडली तरी मुकाटयाने अभ्यासाला बसतात आणि कारटी आगाव झाली आहेत असं आपल्याला उगीचच वाटतं.
बाजारपेठ आणि आपला सबंध तसा पेपरातली बातमी वाचण्यापुरताच येतो. भाज्यांचे प्रत्यक्षातले भाव आपल्याला ठाउुक नसतात. कांदा तीस रुपये किलो म्हणजे महाग की स्वस्त हे तिला स्वच्छ विचारल्याशिवाय कळण्यास मार्ग नाही. मेथीची जुडी वीस रुपयाला झाली आहे ही बातमी ऐकल्यावर आपल्या भुवया उंचावल्या जातात.
“अहो असे काय बघताय? स्वस्त झालीये भाजी. महिन्यापूर्वी हीच जुडी तीस रुपयाला मिळायची.” अजून धक्कादायक माहिती मिळते.
“अगं एकेक रुपयाला माझी आत्या विकायची.”
“त्याला झाली वीस वर्ष.”
संभाषण समाप्त.
आपला नाष्ता, डबा, पोरांना उठवणं, त्याचं आवरणं, त्यांची शाळा यातले आपल्याला काही ठाउुकच नसतं. पण हिला ते अंगवळणी पडलेलं असतं. म्हणून बायकोची किंमत रोज कळत नाही. ती कुठेतरी गेल्यावर जेव्हा आपल्याच घरात एकटयाने रहायचा प्रसंग येतो तेव्हा सगळे समजल्यासारखे होते. सकाळी उठल्यावर दूधवाल्याने दूधच टाकले नाही म्हणून आपण त्याच्यावर चडफडतो. चार मजले उतरून वाण्याच्यातून आपण दूध घेउुन येतो आणि चहा करून पिल्यावर बाजूच्या काकी सकाळी टाकलेली दूधाची पिशवी आणून देतात. मग एक मांजर दूधाला सोकावलेले असल्याचे समजते आणि त्यासाठी आपल्या हिने दूधवाल्याला बाजूच्या काकींच्या कापडी पिशवीत दूध टाकायला सांगितलेले असते हे बॅकग्राउुंड मिळते.
पेपरवाला तिला ताई म्हणून हाक मारून पेपरचे बिल देउुन जातो. मग पैसे आल्यावर बरोबर लक्षात ठेउुन त्याचा व्यव्हार तीच मिटवते. कुणाचे काय, कुणाचे काय हे अक्षरश: आपल्या आवाक्याबाहेरचे असते. आपल्याला दिवसभर आॅफिसच्या एसीत बसून कंटाळा येतो आणि हिने दिवसभर घरात काम करून थकू नये अशी अपेक्षा करतो.
ती माहेरी गेली की घरातली आपल्याला हवी असणारी वस्तू शोधावी. ऐंशी टक्के मिळणार नाही. वाजवीपेक्षा जास्त असॉर्टेड असणारे वीस टक्क्यात बसतात. अहो लोकांना भात लावायचा कुकर सापडत नाही. मग फोन केला की “कशाला हवाय?” म्हणजे घरचा कुकर वापरून हा माणूस आत दगड वगैरे शिजवतो की काय ही त्यांना शंका!
“अगं सांग ना, भात टाकेन म्हणतोय.”
“हे बघा, एकच वाटी तांदूळ घ्या…”
“आधी कुकर कुठे आहे ते सांगितलंस तर घेईन.”
“आहे हो तिथेच.”
तिथेच म्हणजे घरात कुठेही! किचन, बेडरुम आणि हॉल सोडून किचनच्या बंद खिडकीच्या बाहेर ग्रीलमध्ये कुकर ठेवणारी गृहलक्ष्मी सापडल्यास आश्चर्य नसावे. हे लोक चिमण्या आणि कबुतरांना घरटी बनवायला उघडा कुकर ग्रीलमध्ये ठेवतात की काय कळत नाही.
“सापडला का?” वरून ही दमदाटी!
मग हिने फोनवरून सांगायचे आणि होम मिनीस्टरच्या कार्यक्रमातल्याप्रमाणे कसलाही मागमूस नसताना आपण ते शोधायचे ही मोहिम सुरु होते. कुठून अवदसा सुचली आणि भात बनवायला घेतला असे होउुन जाते. तो भात बनविण्यापेक्षा बाहेर जाउुन चायनिज खाल्लेले परवडले असे एक मन सांगत असते.
“आणि थोडंसंच मीठ टाका. नाहीतर टाकाल बचकभर.”
“हो गं.”
कसलातरी आवाज ऐकू गेल्यावर ती विचारते, “मिठाची बरणी नाही ना घेतली?”
“हो बरणीच घेतलीये.”
“वाटलंच मला. वेंधळेपणा नाहीच जाणार. अहो ती मोठया मिठाची बरणी आहे. ते नका टाकू.”
“मग कशाला आणलंय ते मोठं मीठ घरात?”
“जाउु दे हो. तुम्ही पण ना…ती पिवळ्या झाकणाची छोटी डबी मिळते का पहा कुठे.”
“आता त्यात काय आहे?”
“बारीक मीठ.”
“मला मोठं चालेल.”
आता मोठं मीठ (जे खारट असतं) आणि पिठ्ठी साखरेसारखं मॅग्नेशियम, आयोडीन वगैरे असणारं मीठ याच्या चवीत काय फरक आहे हे मला अजूनही उमजलेले नाही.
पण टीव्हीवरच्या सीरीयल पाहून घरोघरी प्रगती झालेली आहे. छोटया छोटया फॅन्सी आकाराच्या अनेक बाटल्या घरी आहेत. पिझ्झा खाताना बुच फिरवून तंबाखू किंवा तपकिरीसारखा तत्सम पदार्थ त्या पिझ्झ्यावर टाकायचा असतो तसाही एक प्रकार आमच्याकडे आहे. कधी फळे खायची म्हटलं की फळांच्या फोडी केल्या की अजून एक कसलातरी मसाला हिने घरी आणून ठेवला आहे तो घेणे सक्तीचे असते. नाहीतर घरी भांडणे होतात. सिंपल!
पण विदाउुट भांडणाचा संसार म्हणजे बिनमीठाच्या पक्वान्नाप्रमाणे असतो. खूप गोड पण ‘ती’ चव नाही. संसार म्हटलं की भांडण आली, भांडयांची आदळआपट आली, मध्ये मध्ये लुडबुडणारी पोरं आली, बायकोचा त्रागा, नवर्‍यावर विजय, माझा, तुझा, पोरांचा वाढदिवस, ते कमी की काय म्हणून लग्नाचाही वाढदिवस, विसरलेली गिफ्ट्स, मग रुसवे फुगवे आणि कसा का असेना गोड शेवट आला. कधी कधी हा लेकाचा शेवट लवकर यावा असे वाटत असते पण दोन्हीही उमेदवारांना आधी दुसर्‍याने माघार घ्यावी असे वाटत असते. काही चतुर उमेदवार तर भांडणाचे चिन्ह दिसताच पांढरे निशाण फडकवतात (हे पुरुषच असतात, ते वेगळे सांगायला पाहिजे का?)
त्यामुळे आम्हा सर्व वेंधळया पुरुषांना सांभाळून घेत संसाराचा गाडा चौखुर उधळत असला तरी व्यवस्थित हाताळून घरोघरी सुखी संसार करणार्‍या रणरागिणींना साष्टांग दंडवत!!

©विजय माने, ठाणे

http://vijaymane.blog

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..