नवीन लेखन...

बलिदान देना होगा ! ‘सॅक्रेड गेम्स’

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्

( भगवद्गीता अध्याय ४ श्लोक ६)

भगवद्गीतेत या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात,”जेव्हा जेव्हा अधर्माची वृद्धी होऊन धर्माची हानी व्हायला लागते तेव्हा श्रीकृष्ण अवतार घेऊन प्रकट होतात आणि धर्माचे रक्षण करतात’.यातला धर्म म्हणजे नैतिकतेच्या मार्गावर चालणारा,शोषणमुक्त -अन्यायमुक्त असणारा समाज होय.यातला धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम किंवा कोणताही विशिष्ट धर्म नव्हे.नितीमूल्यांचं रक्षण करून सन्मानाने जगणं हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे असे यातून त्यांना सूचित करायचं आहे.गेल्या कित्येक शतकांपासून एका विशिष्ट वर्गाने धर्म आणि साध्या भोळ्या जनतेमधल्या संबंधाचं मूळ असणारं ज्ञान पोहोचवण्याचं माध्यम बनून यात स्वतःच्या संकल्पना समाविष्ट केल्या.विधानांचे गैरअर्थ लावून,संकल्पनांची मोडतोड करून,त्यात स्वतःच्या काही बाबी टाकून ते लोकांपर्यंत पोहोचवलं.जगातल्या कोणत्याही देशात पाहिलं मग अरब राष्ट्रातील ईराक-ईराण असो किंवा पॅलेस्टाईन-जेरूसलेम असो किंवा रशिया,अमेरिका किंवा जर्मनी ! धर्मसत्तेने राजसत्तेला झुकायला लावल्याचे दाखले संबंधित देशाच्या ईतिहासात आढळतात.

राजकीय रंग चढलेल्या धर्माच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेणारी सॅक्रेड गेम्स ही विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित असणारी वेबसिरीज ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी हा सीझन दिग्दर्शित केलेला असून कथा वरूण ग्रोवरने लिहिलेली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता यामुळे संपली पण क्लायमॅक्समधून नवीनच उत्सुकता प्रेक्षकांना लावण्याचे काम या सिरीजने केले आहे.बऱ्याच प्रेक्षकांची यामुळे निराशाही झाली.अनपेक्षित आशय ,मांडणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.आंबटशौकिन आणि मसालापटांचा प्रेक्षकवर्ग बऱ्यापैकी निराश झाला.पहिल्या सीझनशी विरोधाभास दर्शवणारी मांडणी,झाडाला फांद्या फुटाव्यात त्याप्रकारे विविध पैलूंची विविध सामाजिक-राजकीय संदर्भासहित मांडणी यांमुळे ही सिरीज विशेषत्वाने इंटेलिक्चुअल प्रेक्षकांसाठी बनवलीय यांचा अंदाज पहिलाच एपिसोड पाहून प्रेक्षकांना आला.सोशल मिडीयातून कमालीची नकारदर्शक प्रतिक्रिया सामान्य प्रेक्षकांकडून येऊ लागली.बऱ्याच लोकांना हा सीझन आवडला नाही.

धर्माविषयकचा दुसरा सीझन असणार आणि त्यात गायतोंडेच्या तिसऱ्या बापाच्या जीवनाविषयी सविस्तर दाखवले जाईल याचा अंदाज सर्वांना आला.लाईफ सर्कल दाखवणाऱ्या यंत्राच्या शोधापर्यंत सरताज पोहोचतो आणि तिथेच संपतो पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड.पहिल्या सीझनप्रमाणेच याही सीझनमध्ये पौराणिक कथेचे संदर्भ देणारी नावे आहेत.मत्स्य ,सिदुरी ,अपस्मार,बार्डो ,विकर्ण ,अज्राईल ,-टोरिनो आणि रॅडक्लिफ अशी नावे आहेत.पारंपरिक वेबसिरीजच्या मांडणीप्रमाणे पाश्चात्य वळणाचं संथ कथानक सुरू असतं.कथेत बऱ्याचशा कमतरता ,वैशिष्ट्ये ठळकपणे दिसतात.त्यासाठी कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही.

प्रख्यात गँगस्टर गायतोंडे हा तथाकथित राजसत्ता आणि गुन्हेगारीचं उदाहरण आहे.हळूहळू तो धर्मसत्तेकडे वळतो आणि त्याचा मार्ग ,उद्देश बदलत जातो आणि हा खेळ सर्वांपेक्षा मोठा आहे असं गायतोंडे का म्हणतो याची उकल होत जाते.वाईल्ड वाईल्ड कंट्रीज या ओशोच्या जीवनावर आधारित असणाऱ्या नेटफ्लिक्स सिरीजमधलं काही अंशी कथानक ,तसेच गार्बेज चित्रपटातील काही दृश्ये हे सर्व घटक यात आयात केलेले आढळतात.यामुळेच आपण या सिरीजचा कथेच्या पातळीवर पूर्णतः नवनिर्मिती म्हणून विचार करू शकत नाही.जर्मन सिरीज ‘डार्क’च्या संथ लयीचा प्रभावही संबंधित वेबसिरीज पाहताना जाणवतो.सिझनच्या दुसऱ्या भागात जर खरंच कथेला धार्मिक दहशतवादाकडे वळवायचं तर पहिल्या सीझनचा उद्देश फक्त मसाला कंटेट देऊन दुसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक निर्माण करण्यापुरताच होता का असा प्रश्न पडतो.शिव्या,बोल्ड सीन्स,हिंसा या कश्यप शैलीतील मांडणीमुळे आणि सेन्सॉरच्या प्रभावातून मुक्त असल्याने एक परिपूर्ण कलाकृती म्हणून प्रेक्षकांनी सॅक्रेड गेम्सकडे पाहिले.

कथेत गुरूजींचं गेम ऑफ थ्रोन्समधील ‘सेप्ट ऑफ बेलर’सारखं आश्रम आहे.हे आश्रम क्रोएशियात असलं तरी इथे हिंदू धर्मातील पौराणिक कथांवर प्रवचन दिले जातात.आयुष्याचं सुख,समाधान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं जुजबी आश्वासन दिलं जातं.ज्यातून धर्माच्या-अंधश्रद्धेच्या ढेऱ्या गेल्या कित्येक दशकांपासून पोसल्या जात आहेत.’धर्म ही अफूची गोळी आहे’ या उक्तीप्रमाणेच इथे गोची नामक एक अंमली पदार्थही आश्रमातील भक्तगणांना दिला जातो.त्यातून त्यांना तात्पुरती गुंगी येऊन स्वतःच्या भूतकाळातील चुका दिसायला लागतात.हिप्नोटिझमला धर्म आणि अध्यात्माची जोड देत,त्यात पुन्हा नशेली पदार्थाचं सेवन करायला लावून माणसाला पशू बनवायला लावून परत ‘अहं ब्रम्हास्मि’ म्हणायला लावणारं हे गुरूजीचं आश्रम आहे.गुरूजींनी 20 वर्षांच्या काळात ‘कालग्रंथ’ नावाचा ग्रंथही लिहिला आहे.जिथे नेमकं कोणत्या बाजूने नीतीमूल्ये – संस्कार आणि ज्याचा उद्देश म्हणून शेवटपर्यंत बोंबला झालायं अशी भारतीय परंपरा टिकून ठेवली जाते हेच समजत नाही.माणसाला आंधळं बनवून त्याला सत्याचा शोध करायला लावण्याइतपत हे सर्व भयानक आहे.

सतीयुगाला परत आणण्याबद्दलही बोलले जाते.ज्या भगवद्गीतेत ब्रम्हचर्याच्या पालनाबाबत आणि संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रमाविषयी लिहिले आहे त्याचा कसलाही उल्लेख न करता ! सेक्स हे दोन आत्म्यांचं देहाद्वारे घडणारं अंतर्बाह्य होणारं मिलन आहे ,तो एक व्यायाम आहे असं भंपक आणि बिनबुडाचं विधान कथेतील सर्वांना खुलेआम संभोग करायला लावणारा महंत म्हणतो.या आश्रमातून विविध आश्रमात अंमली पदार्थांची निर्यातही केली जाते.त्यासाठी गणेश गायतोंडेसारख्या पावरफुल गँगस्टरचा वापरही केला जातो.विविध चित्रपटात कॉमेडी आणि चरित्र भूमिकेत दिसणाऱ्या पंकज त्रिपाठींनी यात गुरूजींची भूमिका उत्तमपणे निभावली आहे.ज्याप्रकारे ते त्यांचं निरर्थक तत्वज्ञान त्यांच्या शैलीत झाडत असतात त्यामुळे पाहताना आपणही संमोहित होत जातो आणि ही प्रक्रिया एकंदरीत कशी घडते आणि कोणत्या प्रकारे घडते याचा प्रत्यय प्रेक्षकांना येत जातो.

आश्रमात घडणारे घोटाळे ,गैरकारभार हे आता नवीन राहिले नाही.ओशोच्या आश्रमातले काळे कारभार आपण सर्वांनी वाचले आणि पाहिले आहेत.गेल्यावर्षी 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर ‘वाईल्ड वाईल्ड कंट्रीज’ नावाने एक डॉक्युमेंटरी वेबसिरीजही आली होती.त्यात आचार्य रजनीश ऊर्फ ओशोची शिष्या माँ आनंद शिलांनी आश्रम सोडल्यावर दिलेल्या माहितीचा समावेश होता.ओशोने कशाप्रकारे वास्को कंट्रीमध्ये रजनीशपुरम समुदायाची निर्मिती केली ,त्यानंतर कशाप्रकारे तिथे आध्यात्मिक शांतीच्या नावावर ड्रग्ज पार्टीज आणि सेक्स क्लब चालवले जात होते हे यात दाखवले आहे.तशीच दृश्ये या सिरीजमध्येही दिसून येतात.याव्यतिरिक्त आसाराम बापू,बाबा राम रहीम,हरियाणातील सत्यपाल महाराज या सर्वांची उदाहरणे देता येतील.आश्रमात होणाऱ्या गैरकारभाराचे किस्से माध्यमांमुळे पाठ झाले आहेत.

‘मुल्क’ ,’शाहिद’ ,’हमीद’ ,’काफिर’ ही वेबसिरीज, या व विविध चित्रपट व वेबसिरीजमधून मुस्लिम समुदायांतील दहशतवादाच्या समस्या सखोलपणे मांडण्यात आल्या परंतु हिंदू धर्मातील आध्यात्मिक दहशतवादाला मांडण्याचा प्रयत्न त्यामानाने कमीच झाला.काही कमर्शियल चित्रपटात मात्र हास्यास्पद रितीने हे दाखवलं गेलं आहे.कौशिक मुखर्जीच्या(Q) गार्बेज या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या इंडी फिल्ममधूनही याबद्दल सविस्तर दाखवले आहे.त्यातलेही काही सीन्स यामध्ये दिसतात.पण विक्रम चंद्राच्या कथानकात आणि त्यात बरंचसं साम्य असल्याने आपण त्याला कथेतील पूर्णपणे उचल म्हणू शकत नाही.तर मांडणीत बरीचशी साम्यस्थळे दिसतात.लाल रंगांचा वापर ,डीप,डार्क आणि नॉईर वाटणाऱ्या थीम्स कथेला समर्पक वाटतात.गेल्या सीझनमध्ये गुन्हेगारीच्या शिखरावर असणाऱ्या गायतोंडेची कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीतून कशी जडणघडण झाली हे दाखवले गेले तर यात ननैतिक मार्गावर नेणाऱ्या अध्यात्माच्या नादी लागून त्याने कशाप्रकारे स्वतःचा आत्मविनाश करून घेतला हे यात दाखवले आहे.

बात्याच्या भूमिकेत असणारी कल्की कोचलीन तर लहान भूमिकेत असणारा अमेय वाघ हे नवीन चेहरे यात दिसतात.एका प्रसंगात गुरूजी संघर्षात्मक देशांचं उदाहरण देतात त्यात ते साऊथ व नॉर्थ कोरिया,इस्राईल व पॅलेस्टाईन यांचं उदाहरण देऊन शेवटी या पंगतीत भारत व पाकिस्तानला नेऊन बसवतात.परत याला ‘वॉर ऑफ सिविलायझेशन’ म्हणतात.परंतु तामसिक आणि सात्विकतेच्या रामायणात हरवलेले सर्व भक्त गुरूजींची पोकळ बडबड लावून ऐकत असतात.’तमस को तमस खतम करता है’ हे गुरूजीचं लॉजिक थेनॉसच्या पृथ्वीच्या संतुलनापेक्षाही हास्यास्पद वाटतं.जेनेटिक न्यूट्रिशन करण्यासाठी 9 वर्ष आहेत असे ते म्हणतात.अमेरिकेत आर्थिक संकट आहे,अरब वर्ल्ड मध्ये अन्नाचा तुटवडा आहे असे म्हणताना भारतातल्या धर्माच्या नावावर होणाऱ्या धंद्यावर ते मौन बाळगतात.कदाचित त्यांना यात तमस दिसत नसावा बहुतेक !

खोट्या आणि अपूर्ण माहितीला काही अंशी तुटक संदर्भाची आणि पौराणिक मायथॉलिजीची जोड देऊन लोकांचा मेंदू नियंत्रित करण्याचा,ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न असे बुवा बाबा करत असतात.स्वस्त डेटामुळे अभ्यासाची संकुचित मर्यादा होत आहे.एका दृश्यात एक मुलगा सरताजला म्हणतो “ईस्लाम धर्म 2000 वर्ष जुना आहे.’ तेव्हा सरताज म्हणतो ,”नव्हे, ईस्लाम धर्म 1400 वर्ष जुना आहे’ यावरून तरूणांची धर्माच्या नावावर चालणारी ब्रेनवॉशिंगची प्रक्रिया दिसून येते.अलीकडे भारतात मॉब लिचिंग व दलित अत्याचाराचं प्रमाण वेगाने वाढत आहे.अनुराग कश्यपही याविरोधात सोशल मीडियातून तर कधी सक्रिय कृतीतून आवाज उठवत असतो.या वेब सिरीजमधून त्याने हे उत्तमप्रकारे साधलंय.नरेंद्र दाभोळकरांची हत्याही मागे याच धार्मिक असहिष्णुतेमुळे झाली होती.ही धार्मिक असहिष्णुता हळूहळू आतंकवादाकडे झुकली जाते.सरताजसारख्या ईमानदार व्यक्तीची यासाठी आवश्यकता आहे.जो स्वतःचं काम आत्मनिष्ठेने करतो.

गुन्हेगारीच्या विश्वात आपलं साम्राज्य निर्माण करणारा गणेश गायतोंडे हा खलनायक सुशिक्षित नसल्याने त्याच्यात योग्य निर्णयक्षमता ,नैतिकता,विवेक नसतो.यामुळे गुरुजींच्या जाळ्यात तो सहज अडकतो.सरताजही यात फसणार असतो पण नैतिकता आणि योग्य निर्णयक्षमतेच्या जोरावर तो वेळीच सावध होतो.जी गोष्ट गायतोंडेच्या उशिरा लक्षात येते ती सरताजच्या लवकरच येते.त्याचे वडील दिलबागच्या बाबतीतही तेच घडते.यावरून निराळ्या पार्श्वभूमी आणि निराळ्या कौटुंबिक- सामाजिक वातावरणातून दोघांचं वर्तमान असं कसं आहे हे समजतं.गायतोंडेला सरताजच्या ईमानदारीवर ,कर्तव्यपरायतेवर असणारा विश्वास त्याला मुंबई वाचवण्याची जबाबदारी देण्यास भाग पाडतो.गायतोंडेचाही त्याच्यावर विश्वास असतो.परूळकर व भोसले हे भ्रष्ट व्यवस्थेची प्रतिके आहेत.व्यवस्था पोकळ करण्यास हातभार लावणारे घटकही आपण त्यांना म्हणू शकतो.

गायतोंडेला मुंबईमध्ये दबदबा करता आला पण स्वतःच्या बुद्धीचा सद्विवेकपणे वापर करता आला नाही. त्याला सुरूवातीपासून संभ्रमात टाकून भटकवण्याचा कट रचला होता.कुक्कू,सुभद्राचं बलिदान वाया गेल्यासारखं त्याला वाटायला लागलं.’सिर्फ त्रिवेदी बचेगा’ची उकल करण्यापर्यंत सरताजची सक्षमता दिसून आली.मुंबईत बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिदपर्यंत तो पोहोचला तेही कुठलीही अनावश्यक हिंसा त्याने केली नाही.पण कालग्रंथात कोड अनलॉक करण्याचा पॅटर्न आहे का हे पाहण्यासाठी तिसऱ्या सीझनची वाट बघावी लागणार आहे.

आपला समाज हा पूर्वग्रहदूषित असून धर्माचे राजकारण पुतळ्यांपासून ते टीकेपर्यंत अव्याहत सुरू असते.मनोरंजनाच्या लाटेतही प्रेक्षकांपुढे एखादा सामाजिक विषयाला ठेवण्याचं धाडक करणारा दिग्दर्शक आणि ती कलाकृती थोरच म्हटली पाहिजे.साहित्यासाठी सध्या बरेच वाईट दिवस असल्याने चित्रपट व नाटक हे काम करत आहेत.मग तो अनुभव सिन्हाचा ‘आर्टिकल 15’ असो किंवा ‘काफिर’ ही वेबसिरीज ; संबंधित दिग्दर्शक,कलाकारांना याचं श्रेय जाईलच.कारण खोट्या बलिदानाचं दर्शन घडवतानाही वास्तववादाला पोषक ठरण्याचं काम ‘सॅक्रेड गेम्स’सारखी वेबसिरीज करत असून ते नक्कीच स्वीकारार्ह आहे.

– ऋषिकेश तेलंगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..