नवीन लेखन...

औषधी बिब्बा वृक्ष

औषधी बिब्बा वृक्ष

आपल्या मराठी एक म्हण आहे. कामात बिब्बा घालणे म्हणजे चांगल्या कामात अडथळा आणणे. कारण काटा टोचला किंवा पायाला कुरूप झाले तर त्यासाठी बिब्ब्याचे तेल वापरतात. त्यासाठी बिब्बा चमच्याच्या किंवा पळीच्या टोकावर टोचून मेणबत्तीवर धरल्यावर त्याच्या उष्णतेने जे तेल निघते ते गरम असतानाच त्याचा चटका कुरूप झालेल्या ठिकाणी किंवा काटा मोडलेल्या ठिकाणी देतात. हा चटका इतका गरम असतो की रोगी ओरडायलाच लागतो. पण रोगी बारा तासात ताठ मानेने न लंगडता चालायला लागतो. इतका हा उपाय जालीम व रामबाण आहे.
अशा या वृक्षाबद्दल या लेखातून माहिती घेऊया.

बिब्बा (शास्त्रीय नाव: Semecarpus anacardium) बिब्बा, भिलावा, बिबवा, इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व ॲनाकार्डिएसी या कुळातला पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन भारतीय ग्रंथांत ‘भल्लातक’ या नावाने बिब्ब्याचा उल्लेख आला आहे; त्यावरून हे झाड भारतीय असावे.

बिब्बा हे नाव वृक्षासाठी आणि फळांसाठीही वापरतात. फार पूर्वीपासून या फळाच्या सालीतील रस कपड्यांवर खुणा करण्यासाठी वापरण्यात आला आहे. म्हणून बिब्बा वृक्षाला इंग्रजी भाषेत ‘मार्किंग नट ट्री’ हे नाव पडले आहे भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो.

पूर्वीच्या गावगाड्यातील प्रत्येक घरा-घरात आढळणारा हा औषधी गुणधर्म असलेला बिब्बा बीज घरातील गाडग्या-मडक्यात हमखास पहायला मिळत असे. आज्जीबाईच्या बटव्यात तर याला मानाचे स्थान होते. असा हा बिब्बा अलीकडच्या काळात बऱ्याच जणांच्या खिजगणतीतही नसावा. याचे आश्चर्य वाटते.

कोकण पट्ट्यातील डोंगररांगा आणि मला माहित असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर तसेच कराड तालुक्यातील दक्षिण भागातील डोंगररांगा आणि इतर पडीक मोकळ्या रानात या बिब्ब्याची झाडे पहावयास मिळतात. पुण्याजवळच्या भोर तालुक्यात सुद्धा बिब्ब्याचे भरपूर वृक्ष आहेत.

अन्य भाषांतील शब्द:

कानडी – केरू. गेरकायी
गुजराथी – भिलामू किंवा भिलामो
फारसी – हब्बुल्कल्ब
संस्कृत – अग्निमुखी, आरुष्क, भल्लातक, वातारी, वीरवृक्ष, शैलबीज.
हिंदी – भिलावा, भेला, बिलारन

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची ९-१२ मी. (क्वचित १५ मी.) उंच व १.२५ मी. घेराचा, पाने वरून चिवट व गुळगुळीत आणि पाठीमागून थोडेसे केस असल्याने खरबरीत असतात. हा मध्यम आकाराचा, पानझडी वृक्ष ईस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया व भारत येथे आढळतो. भारतात हिमालयाच्या बाह्य परिसरात सतलज ते सिक्कीम आणि उष्ण भागात साधारण सर्वत्र व पूर्वेस आसामपर्यंत तो आढळतो; मात्र त्याची लागवड फारशी होत नाही.पानांचे आकारमान मोठे म्हणजे लांबी १५ ते ४० सेंटीमीटर असून ती टोकाकडे गोलाकार असतत. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. त्यास डेख फारच छोटे असते. बिब्याच्या झाडाला काजूप्रमाणे बोंडफळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. या बोंडाला बिंपटी, बिबुटी किंवा बिंबुटी म्हणतात. बोंडामध्ये खाद्य गर असतो, त्याला गोडांबी म्हणतात. गोडांबीत काजूप्रमाणेच तेल असते, मात्र ते बिब्ब्यात असते तसे झोंबरे नसते.

त्याची साल गर्द भुरी, खरबरीत असून वेड्यावाकड्या तुकड्यांनी सोलून निघते; अंतर्साल धागेदार; कोवळे भाग, फुलोरा, पानांचे देठ व खालची बाजू लवदार असते. पाने साधी, मोठी (१७-६० X १०-३० सेंमी.), एकाआड एक, चिवट व व्यस्त अंडाकृती (टोकाकडे रुंद व गोलसर), आयत असून त्यांवर शिरा दोन्ही बाजूंस स्पष्ट दिसतात; ती फेब्रुवारीत गळतात व मेमध्ये नवीन पालवी येते. फुले हिरवट पांढरी व पिवळसर, लहान, एकलिंगी अथवा द्विलिंगी फुलोऱ्यावर पावसाळ्याच्या शेवटी येतात; स्त्री-पुष्पांच्या मंजऱ्या पुं-पुष्पाच्या मंजऱ्यांपेक्षा आखूड असतात. पुष्पस्थली (देठाच्या वरचा भाग) फुगीर, मांसल, शेंदरट पिवळी (सु. २ सेंमी. लांब) असून तीवर आठळीयुक्त फळ नोव्हेंबर-फेब्रुवारीत येते; ते पिकल्यावर काळे, गुळगुळीत, साधारण तिरकस व अंडाकृती, २.५ सेंमी. लांब व कठीण असते. फुलाची संरचना व इतर सामान्य लक्षणे ॲनाकार्डिएसीमध्ये (आम्र कुलात) वर्णिल्याप्रमाणे असून काही लक्षणांत आंब्याशी व काजूशी याचे साम्य आढळते कारण हे तिन्ही वृक्ष एकाच कुलातील आहेत. बिब्ब्याच्या फुलात केसरदले ५-६, किंजले ३ व किंजपुट ऊर्ध्वस्थ असतो. फळात बी एक, लोंबते व चिकट सालीचे असते. बियांची जननक्षमता फार थोडी असल्याने बी लवकर पेरावे लागते. रोपांना हिमतुषार व मूळकूज यांमुळे हानी पोहोचणे शक्य असल्याने जपावे लागते. पूर्ण वाढ झालेले जुने खोड तोडून राखलेल्या खुंटापासून नवीन वाढ चांगली होते. बिब्ब्याच्या वृक्षाचे लाकूड भुरकट पांढरे असून त्यात कधी पिवळट रेषा दिसतात; ते नरम व काहीसे जड परंतु फारसे टिकाऊ नसते.

औषधी उपयोग:

प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः कोकणात विविध रोगांसाठी तात्काळ गुण देणारे बिब्ब्यासारखे दुसरे रसायन, औषध नाही, अशी सर्वाचीच परम श्रद्धा आहे. औषधात बिबुट्या, गोडांब्या व बिब्बे वापरतात. बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. बिब्ब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. त्याच्या वापराने पुरुषांचे वीर्य चटकन वाढते. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीच्या माणसाने कदापि वापरू नये. जेव्हा त्याल नाइलाजाने बिब्बा किंवा बिब्बा घटकद्रव्य असलेले औषध वापरायचे असेल, त्याने आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेवणातील मीठ संपूर्णपणे टाळावे, म्हणजे बिब्ब्यातील दाहक तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत, त्रास होत नाहीत. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले तर बिब्बा चांगला मानवतो.

एखाद्या रुग्णाला डोक्यात चाई झाल्यास त्या भागाच्या बाजूला सभोवताली भरपूर तूप लावून चाई असलेल्या भागास बिब्ब्याचे तेल लावल्यास दोन ते चार दिवसांत खात्रीने नवीन केस येतात. ज्या मंडळींना शौचास चिकट होत असेल, त्यांच्यासाठी मिठाचे पथ्यपाणी पाळून सेवन केलेले भल्लातकहरीतकी चूर्ण गुण देते. ज्यांना कायम दूषित पाणी नाइलाजाने प्यावे लागते, ते भोजनोत्तर भल्लातकासव घेतात. पावसाळय़ात खराब पाणी नाइलाजाने प्यावे लागल्यास बिब्बा हे घटकद्रव्य असलेल्या संजीवनी गोळ्या भोजनोत्तर घेतात..

इतर औषधी उपयोग:

खोडाला खाच पाडून जहाल व साधारण चिकट रस (डिंक) मिळतो. त्यापासून रोगण करतात. कठिण फळाच्या सालीत कडू, जहाल, काळसर व विषारी तेल (३३%) असते; त्यामुळे कातडीवर फोड येतात; ते संधिवात, मुरगळणे, लचकणे व कुष्ठीन गाठीवर बाहेरून काळजीपूर्वक लावतात. फळाचे चूर्ण कृमिनाशक व गर्भपातक असून डिंक गंडमाळा, संसर्गजन्य रोग व तंत्रिका दौर्बल्य यांवर वापरतात. बिया खाद्य असून बियांचे तेल गोड, खाद्य, पथ्यकर व औषधी असते. फार पूर्वीपासून फळाच्या सालीतील तेल कपड्यावर खुणा करण्यास धोबी लोक वापरतात.
पक्व पुष्पस्थली (बिब्बोटी) खाद्य असून सुकविलेल्या बिब्बोट्यांच्या माळा बाजारात मिळतात; त्या स्तंभक (आकुंचन करणाऱ्या) असतात. पक्व फळांतील तेलाचा रंग, रोगणे व प्लॅस्टिक आणि तत्संबंधीच्या उद्योगांत बराच उपयोग केला जातो. ह्या तेलाला व्यापारात ‘भिलावन शेल लिक्विड’ (बीएसएल) म्हणतात. त्यापासून फिनॉल मिळतात. ती विशेष रासायनिक प्रक्रियेने फळातून काढतात. बीएसएलपासून उद्स्फोटक नसलेले (फोड न आणणारे) घन किंवा अर्धघन प्रकारचे रेझीन मिळविण्याच्या प्रक्रिया उपलब्ध झालेल्या आहेत; हे रेझीन व्हार्निश, एनॅमले, रंगलेप, जलाभेद्य पदार्थ इ. बनविण्यास आधारभूत ठरले आहे. भिलावन रेझीनवर आधारित अशी अनेक पृष्ठलेपने उपलब्ध झाली आहेत. धातूवर घडवून आणलेले लेपन फारच गुळगुळीत, कठीण, चिवट, असून त्यावर हवेचा, उकळत्या पाण्याचा आणि सामान्य कार्बनी विद्रावकांचा (विरघळविणाऱ्या पदार्थांचा) परिणाम होत नाही. बीएसएलच्या साहाय्याने कापड जलाभेद्य करता येते किंवा कापडास, कागदास व जाड पुठ्ठ्यास कृत्रिम चामड्याचे रूप देता येते. आसंजके, अग्निरोधक आणि कीटकनाशक लेप, कीटकनाशके, पूतिरोधके (पू तयार करणाऱ्या सूक्ष्मजंतूंची वाढ खुंटविणारे पदार्थ) यांसारख्या पदार्थांचे उत्पादनही बीएसएलच्या आधारे केले जाते. निर्मलके (मळ काढून टाकणारे पदार्थ), तणनाशके, अग्निरोधक प्लॅस्टिके, उष्णतारोधक रंगलेप, नरम व कठीण रबर-माल इत्यादींच्या उत्पादनातही बिब्ब्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या उपयोग केला जातो.

बियांतील मगजात प्रतिशत जलांश ३.८, प्रथिन २६.४, मेद ३६.४, तंतू १.४, इतर कार्बोहायड्रेटे २८.४, खनिजे ३.६ आणि दर १०० ग्रॅममध्ये कॅल्शियम २९५ मिग्रॅ., फॉस्फरस ८३६ मिग्रॅ., लोह ६.१ मिग्रॅ. असतात; तसेच त्यात थायामीन, रिबोफ्लाविन, निकोटिनिक अम्ल ही जीवनसत्त्वे असतात. ह्या तेलाचा उपयोग लाकडाच्या रक्षणाकरिता व गाड्यांच्या आसाला लावण्याच्या वंगणाकरिता करतात; नावांच्या फळ्यानाही तेल लावतात.

बिब्ब्याच्या वृक्षाचे लाकूड नरम व काहीसे जड परंतु फारसे टिकाऊ नसते. स्वस्त व हलके सजावटी सामान, खोकी, आगपेट्या, वल्ही व जळण अशा विविध प्रकारे ते उपयोगात आहे. लाखेच्या किड्यांना पोसण्याकरिता हे वृक्ष उपयुक्त असतात.

कापड रंगविण्यासही तेल वापरतात. फळ तिक्त, उष्ण, कृमिनाशक असून जलोदर, गाठी, चामखिळी, दमा, तीव्र संधिवात, अपस्मार, कंडू इ. विकारांत गुणकारी असते. लोणी, दूध, वेदनाहारक तेले यांसह फळांचा रस पोटात घेणे श्रेयस्कर असते. कर्करोगात फळांचा रस फायदेशीर ठरला आहे. कमरदुखीत बिब्बा दुधात उकळून घेणे गुणकारी असते. अंकुशकृमीवर बिब्बा उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

आयुर्वेदिक औषधे:

संजीवनीवटी, भल्लातकहरीतकी, भल्लातकासव ही बिब्ब्यापासून बनलेली आयुर्वेदिक औषधे आहेत.
बिब्ब्याची फुले:

बिब्बा दाभणास टोचून गोड्या तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलाची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्या रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो.बिब्ब्यापासून तयार केलेली औषधे खोकला, दमा, अपचन, यकृतवृद्धी, सूज व व्रण या विकारांवर अत्यंत गुणकारी समजली जातात. वल्ही आणि काडेपेट्या बनविण्यासाठी बिब्ब्याचे लाकूड वापरतात. बिब्बा वृक्षावर लाखेचे कीटक चांगले पोसले जातात. बिब्ब्याच्या तेलाचा उपयोग कीडनाशक आणि कीडप्रतिबंधक म्हणून व्हॉर्निशामध्ये करतात. फळे मुख्यत: औषधी उपयोगासाठी गोळा केली जातात. ती विषारी असून त्यावर योग्य प्रक्रिया न करता वापर केल्यास अधिहर्षता (ॲलर्जी) होऊ शकते. वनीकरणासाठी व वृक्ष लागवडीसाठी हा एक उत्तम बहुगुणी वृक्ष आहे.

रोपवाटिका आणि लागवड:

बिब्ब्यांची परिपक्व फळे झाडाखालून जमा करावीत. फळांचा आकार मोठा असतो. रंगाने गर्द काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत. सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 15 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्यानंतर बी पिशवीत पेरावे. 5 X 8 इंच आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार करता येतात.

रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 X 2 X 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन त्यात लावावी. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत, हिरवळीचे खत आवश्‍यकतेनुसार टाकावे. लागवड मध्यम, हलक्‍या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्‍यकतेनुसार पाणी, खत, तण व्यवस्थापन करावे.

पाच-सात वर्षांत झाडे फळे येण्यास सुरवात होते. सद्यःस्थितीत फळे 50 ते 60 रु. प्रति किलो दराने विकली जातात. लागवडीसाठी राष्ट्रीय औषधी अभियान, रोजगार हमी योजनांमधून अनुदान प्राप्त होते. यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव कृषी विभागाकडे देणे आवश्‍यक आहे.

बिब्ब्याचे खेडेगातल्या जीवनाशी नाते :

बिब्ब्याचा खेडेगावातील जनतेशी फार जवळचा संबंध आहे. पूर्वी दिवस उगवायला डोक्यावर पाट्या घेऊन गळयात धोतर किंवा लुगड्याचा

धडपा बांधून त्यात झोपलेल्या तान्हया बाळाला पाठीवर टाकून सुया-पोती विकणाऱ्या नऊवारी लुगड्याला ‘दंड’ घालून कासुटा घातलेल्या कोकणी बायका, ” ये काकू ? ये मावश्ये ? ” अश्या मोठमोठ्याने हळ्या मारत वेशीतून वाड्या-वस्त्यांवर प्रवेश करायच्या, तेव्हा प्रथम त्यांचे स्वागत हे पाळीव कुत्री करायची. मग त्या बायकांच्या हळ्या आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा कालवा ऐकून सगळ्या आळीची पोरं-पोरी जागी व्हायची, आणि डोळे चोळतच कालव्याच्या दिशेने पळत सुटायची. ” ओ, आमच्या आयनं बोलावलंय? ओ आमच्या आळीला चला? ओ आमच्या अंगणात बसा? ओ आमच्या सोप्यात बसा? ” म्हणून त्या बायकांच्या विनवण्या करत असायची. त्या बायकांच्या टोपलीत सुई, दाबन, तोडे, वाळे, मनगट्या, लबरी कडे, वगैरे वगैरे साहित्याबरोबरच या बिब्याचा ही मुख्यता समावेश असायचा.

तर अश्या या कोकणी बायकाकडून आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्याकी त्यात चार-पाच बिब्यांचा ही समावेश असायचा. मग त्या बायकांना कालवण असेल तर कालवण नसेल तर चटणी भाकरी देऊन पाठवले जाई. असे ही बिब्बे शेतकऱ्यांना कधी आणि केव्हा लागतील याचा नेम नसायचा. म्हणून ते बिब्बे करंड्यात, बारक्या गाडग्यात किंवा घराबाहेर असणारया भिंतीच्या देवळीत सुरक्षित ठेवले जात. याचे ही कारण असे की लहान मुलांच्या हाती हा बिब्बा चुकून लागू नये. कारण चुकून बिब्बा लहान मुलाने तोंडात घातला तर बिब्ब्याच्या तेलाने त्या मुलाचे तोंड उतू जाते. त्यालाच ‘बिब्बा उतला’ असे म्हटले जायचे.

असा हा बिब्बा पूर्वी खूप उपयोगी होता. जनावरांना एखाद्याची नजर लागू नये. तसेच जनावराला ‘बाहेरवाश्याचे’ (भूत बाधा) होऊ नये म्हणून, बैलांच्या गळ्यातील कंडयात तसेच गाई, म्हैस, शेळी व्यायला झाली म्हणजे तिच्या गळ्यातील कंडयात हा बिब्बा मानाने विराजमान व्हायचा.

बिब्बा व आदिवासी लोक:

जंगल संपत्ती असल्याने आदिवासी किंवा स्थानिक लोकांना बिबव्याची फळे चार पैश्याचा आधार देऊन जातात. साधारण बिबव्याच्या झाडाची फळे ही दिवाळीच्या वेळेला पिकायला सुरुवात होते. काजूसारखी येणारी पिवळसर केशरी बोंडे असलेल्या फळाचे काळसर बिब्बे काढून त्या फळाच्या माळा तयार करून ते खुंटीला वाळवण्यासाठी अडकवून ठेवतात. मग अश्या वाळलेल्या फळांच्या माळा जवळपासच्या आठवडी बाजारात किंवा शहरात विकावयास येतात. चवीला तुरट आणि रुचकर असणारे हे फळ पिष्ठमय असते. कच्चे पिवळसर फळ खाल्ले तर घश्यात खवखव सुरू होते. त्यामुळे पिकल्यानंतरच खाणे योग्य होते.

बहुपयोग बिब्ब्याचे:

बिब्बा फळांपासून काळा रंग मिळतो. कपड्यावर घट्ट बसतो. धोब्याकडे कपड्यांवर नावे टाकण्यासाठी आणि गोंदणासाठी हा रंग वापरला जातो. म्हणून यास इंग्रजीत “मार्किंग नट’ म्हणून संबोधले जाते. पूर्वी कपड्यांना रंग देण्यासाठी वापर केला जात असे. सद्यःस्थितीत “वॉर्निश’ “पेंट’ बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये बिब्बा तेलाचा वापर केला जातो.

बिब्बा फळात जे रसायन असते, त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जातो. निवडणुकीत बोटावर मार्किंग करण्यात येणारी शाईही बऱ्याचदा बिब्ब्यापासून बनविली जाते. बिब्बा फळांत मोठ्या प्रमाणात “फिलॉल’ रसायन असते. त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, रंगनिर्मितीसाठी केला जातो.

अर्धवट वाळलेले तेल लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लाकडांना लावले जाते. गाड्यांच्या ऍक्‍सलला वंगणासाठी तेलाचा वापर होतो. या वृक्षांचा उपयोग लाखेचे किडे वाढविण्यासाठी केला जातो. टॅन, टॅनिन काढण्यासाठी फळांचा वापर केला जातो.

आयुर्वेदासारख्या औषधी पद्धतीत अनेक औषधी बिब्बा फळांपासून बनविल्या जातात. बिब्बा वापरण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्‍यक असते.

संदर्भ :
1. Chopra, R. N.; Nayar, S. L.; Chopra, I. C.; Glossary of Indian Medicinal Plants, New Delhi, 1956.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
लेखक: ज. वि. जमदाडे
शं. आ.परांडेकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
०९/०८/२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 73 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on औषधी बिब्बा वृक्ष

  1. बिब्बा म्हटले की पाठ दुखत असल्यास हमखास चटका देऊन लावतात तो लेप आठवतो. तसा बिब्बा औषधी व बहुउपयोगी आहे. लेखकाने फारचं कष्ट घेऊन व अभ्यासू न माहिती दिलेली आहे. सगळ्यांने जरुर वाचावा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..