नवीन लेखन...

अनोखा भीमपलासी

आपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना “अचाट” असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे विचार वारंवार मनात येतात – या रागाची नेमकी ओळख काय? एका दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या संस्कृत ग्रंथात प्रत्येक रागाचे आणि पर्यायाने स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केल्याचे वाचायला मिळते परंतु त्याला शास्त्राधार फारसा मिळत नाही. अर्थात, परंपरेने निर्माण केलेले संकेत, संस्कार याचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या विचारांची ठेवण देखील याच अनुषंगाने होत असते. रागाचा समय, ही संकल्पना देखील याच दृष्टीकोनातून तपासून घेणे, गरजेचे आहे. असो, हा भाग सगळा “वैय्याकरण” या विषयाच्या अधिपत्याखाली येतो.
भीमपलास रागाचा विचार करता, याचे “औडव-संपूर्ण” स्वरूप तर लगेच ध्यानात येते. आरोहात, “रिषभ” आणि “धैवत” स्वर वर्ज आहेत तर अवरोही सप्तकात, सगळे स्वर लागतात. अर्थात, “कोमल निषाद” आणि “कोमल गंधार” हे स्वर या रागाची खरी ओळख ठरवतात. अर्थात’ “मध्यम” स्वराचा “ठेहराव” हे सौंदर्यलक्षण आहे. भीमपलास म्हटला की एक किस्सा वारंवार वाचायला मिळतो – बालगंधर्वांचा “स्वकुल तारक सुता” या गाण्यात आरोही स्वरातील “धैवत” स्वराचा वापर. भारतीय संगीत एका बाजूने शास्त्राला प्रमाणभूत मानणारे आहे पण तरीही कलाकार तितकाच तोलामोलाचा असेल तर “वर्जित” स्वराचा वापर करून, त्याच रागाची नवीन “ओळख” करून दिली जाते. हेच गाणे जरा विस्ताराने विचारात घेतले तर आपल्याला भीमपलास राग समजतो.
बालगंधर्व “लयकारी” गायक होते, हे फार ढोबळ वर्णन झाले. केवळ ताल आणि त्याची पातळी लक्षात घेतली तरी तालातील कुठलाही “कालबिंदू” चिमटीत पकडावा तसे ते नेमका पकडीत असत, तसेच मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. सुरावटींचा पुनरावतार असावा पण पुनरावृत्ती टाळावी, हे ध्यानात येते. एका मागोमाग एक आणि एका वेळेस एक स्वर घेणे, हे बहुतेक गायकांच्या बाबतीत संभवते परंतु एकाच वेळेस एका स्वराबरोबर इतर स्वरांच्या सान्निध्यात वावरणे, हे फार अवघड असते. वास्तविक हा भाग “श्रुती” या संकल्पनेत येतो. आवाज फार बारीक नव्हता पण लगाव नाजूक होता पण अस्थिरता नव्हती.
“स्वकुलतारक सुता” या गाण्यात बालगंधर्व नेमके याच पद्धतीने गायले आहेत. गाण्याच्या अगदी पहिल्या सुरांपासून नखशिखांत भीमपलास राग. या गायनातील “ताना”,”हरकती” इत्यादी अलंकार ऐकायला घेतले तर, मी जे वर मांडले आहे, त्याचीच सुयोग्य प्रचीती येऊ शकते. गायनात, तालाच्या प्रत्येक मात्रेबरोबर बालगंधर्व खेळ खेळत आहेत पण असा खेळ खेळताना, शब्दोच्चाराकडे चुकूनही दुर्लक्ष होत नाही आणि गायनाच्या क्रीडेत या गोष्टीला फार महत्व आहे. बरेचवेळा, बहुतेक गायक, गायनाच्या आहारी जाताना शब्दांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात पण असे बालगंधर्वांच्या बाबतीत अपवादात्मकरीत्या घडते.
आता आपण पंडित कुमार गंधर्व यांचा भीमपलासी विचारात घेऊया. ” ये ना, आज तू जानु रे” या रचनेत देखील आपल्याला, “ध, नि सा” अशी अफलातून स्वरसंगती ऐकायला मिळते. एकूणच कुमार गंधर्वांचे गायन म्हणजे रागाच्या व्याकरणावर किंवा क्रमवारतेकडे लक्ष न वेधता, रागाच्या भावस्थितीवर ध्यान केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्न असायचा. मघाशी मी म्हटले तसे, “वर्जित” स्वरांशी सलगी करून त्यांना, त्यांचा रागांत प्रवेश करवून, त्या रागाचे सौंदर्य आणखी वेगळ्या दृष्टीने वाढवायचे, असा गायनाचा बराचसा कल होता. रागाचे आलाप, बोल-आलाप, बोलतान आणि तान असा प्रवास त्यांना फारसा मान्य नव्हता. आवाज पातळ, टोकदार होता आणि लयीचे बारकावे टिपू शकणारा होता. तसे बघितले तर गायनात बरेचवेळा, “ग्वाल्हेर”,”जयपुर”,”किराणा” इत्यादी घराण्यांची गायकी दिसते आणि तरी देखील “भावगर्भता” आढळते. बरेचवेळा असे जाणवते, यांच्या गायकीवर “टप्पा” पद्धतीचा प्रभाव आहे. टप्पा चमकदार असतो, क्रमाक्रमाने सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन मग पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे आहे, हीच त्यांच्या गायकीचे खरी ओळख वाटते आणि हे सगळे या रचनेत आपल्याला अनुभवता येईल.
“है चांद सितारो में चमका तेरा बदन की
हर फुल से आती है  मेहेक तेरा बदन की
“है चांद सितारो मे चमका” ही थोडी अनवट, अप्रसिद्ध गझल मी इथे घेतली आहे. “अहमद हुसेन”,”मुहमद हुसेन” या जोडीने ही गझल गायली आहे. हल्ली गझल गायन म्हणजे “गायकी” असा एक प्रघात बनला आहे. सगळ्यांनाच तसे गायन करणे जमत नाही आणि बरेच वेळा तशा प्रकारचे गायन फार “वरवरचे” होते. गझल भावगीताच्या अंगाने देखील गायली जाऊ शकते – तलत मेहमूद याचे उत्तम उदाहरण. इथे देखील त्याच अंगाने गझल गायली गेली आहे.
अर्थात जरी भावगीताच्या अंगाने गझल गायली तरी, लयीचे वेगवेगळे बंध, वाद्यमेळातून चालीची खुमारी वाढवायची तसेच निरनिराळ्या हरकतीमधून “अवघड” गायकीचा प्रत्यय देता येतो. मोजकीच वाद्ये असल्याने, रचनेचा “कविता” म्हणून आस्वाद घेता येतो आणि रचना आपल्याला अधिक समृद्ध करून जाते.
आता लताबाईंचे एक अतिशय गाजलेले आणि तरीही दर्जाच्या दृष्टीने  अतुलनीय असे गाणे आपण ऐकायला घेऊया. भीमपलासी रागाची ओळख या गाण्यातून फार जवळून घेता येते.
“नैनोंमे बदरा छाये, बिजली सी चमके हाये
ऐसे में बलम मोहे गारवा लगा ले”.
सतारीच्या पहिल्याच सुरांतून आपण या रागाची ओळख करून घेऊ शकतो. गाण्याची चाल तर श्रवणीय नक्कीच आहे पण, गाण्यात अनेक “जागा” अशा आहेत, तिथे गायला केवळ हाच “गळा” हवा, याची खात्री पटते. “नैनो मे बदरा छाये” हेच ते गाणे. संगीतकार मदन मोहन आणि लताबाई यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत तरी या गाण्याची “लज्जत” काही और आहे.
गाणे जरा बारकाईने ऐकणे जरुरीचे आहे कारण, इथे प्रत्येक शब्दामागे किंवा ओळ संपताना अतिशय नाजूक, बारीक हरकती आहेत, ज्या केवळ चालीचे सौंदर्य वाढवीत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्ध करीत आहेत. राजा मेहदी अली या शायराची कविता आहे आणि कविता म्हणून देखील अतिशय वाचनीय आहे.  वास्तविक,मदन मोहन म्हणजे चित्रपटातील गझलेचा “बादशाह” अशी प्रसिद्धी आहे आणि तशी ती गैरलागू नाही पण तरीही प्रस्तुत गाणे त्या पठडीत बसणारे नाही आणि तसे नसून देखील अतिशय श्रवणीय आहे. या गाण्यावर खरे तर विस्ताराने लिहावे, अशा योग्यतेचे गाणे आहे.
मराठी गाण्यात एकूणच सोज्वळता अधिक आढळते आणि तसे ते संस्कृतीला धरून आहे परंतु काही गाण्यांत विरोधाभासातून उत्तम निर्मिती झाल्याचे दिसून येते. माडगूळकरांचे शब्द आणि बाबूजींची चाल, याचा या गाण्यात अतिशय सुंदर मिलाफ झालेला दिसतो.
“धुंद येथ मी स्वैर झोकितो” हेच गाणे मी इथे विचारात घेतले आहे. दोन अत्यंत विरुद्ध टोकाच्या भावनांची सुरेख चित्रे कवितेत वाचायला मिळतात. भीमपलासी रागाची अत्यंत समर्थ तसेच वेगळ्याच अर्थाचे अनुभूती हे गाणे देते.
“कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली;
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली”.
मघाशी मी “विरुद्ध टोकाच्या भावना” असे जे म्हटले ते याच ओळीच्या संदर्भात. माडगूळकरांच्या रचनेत, बरेचवेळा संस्कृतप्रचुर शब्द येतात जसे इथे “कनकांगी” हा आहे आणि काही वेळा, त्यांच्यातील न्यूनत्व दाखवण्याच्या मिषाने  पण, असे शब्द वापरणारे, माडगुळकर एकमेव कवी नव्हेत. एक मात्र नक्की मान्यच करावे लागेल, भावगीतासाठी लागणारी शब्दरचना जर का “गेयतापूर्ण” असेल तर चाल बांधायला हुरूप येतो. अर्थात, कवितेची चिकित्सा करणे, या लेखात अभिप्रेत नसल्याने, इथेच पुरे.
मराठीतील अप्रतिम भजन रचनांमध्ये “इंद्रायणी काठी” हे गाणे फार वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. या गाण्याची लोकप्रियता, इतकी वर्षे झाली तरी तसूभर देखील कमी नाही. किंबहुना, ही शब्दकळा माडगूळकरांची आहे की कुण्या संतांची आहे, इतका संभ्रम पडावा, इतकी गेयतापूर्ण आहे आणि कवी म्हणून हे माडगूळकरांचे निश्चित श्रेष्ठत्व म्हणावे लागेल.
“इंद्रायणी काठी, देवाची आळंदी,
लागली समाधी, ज्ञानेशाची”
अभंग वृत्तात नेमकी चपखल बसणारी रचना, संगीतकार पु.ल.देशपांडे यांच्या हातात आली आणि त्यांनी, चाल बांधताना, भीमपलास रागाचा “अर्क” म्हणावा, अशी सुरावट शोधून काढली आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या हाती दिली. आज या रचनेला जवळपास ५० वर्षे होऊन गेली तरी देखील चालीचा गोडवा जरा देखील कमी होत नाही. गाण्याला चिरंजीवित्व मिळते, ते असे. गाण्याच्या सुरवातीपासून या रागाची आठवण येते पण तरीही शास्त्रोक्त बाजू पडताळली तर रागापासून किंचित फटकून अशी या गाण्याची चाल आहे.
अशाच प्रकारचे एक सुंदर गाणे “नौबहार” चित्रपटात आहे. गाण्याची चाल भीमपलास रागावर निश्चित आहे तरीही गाणे म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.
“एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने  कोई”
अतिशय शांत चाल आहे. संगीतकार रोशन यांची चाल आहे आणि चाल बांधताना, शब्दांचे औचित्य सांभाळण्याची कसरत अप्रतिमरीत्या संगीतकाराने केली आहे. ही बाब वाटते तितकी सहजशक्य नसते. लताबाईंचा कोवळा,नाजूक आवाज या गाण्याला कमालीचा खुलवतो. भीमपलास रागाची हीच कमाल आहे. एकाबाजूने प्रणयी भावनेचा अत्युत्तम आविष्कार घडवतो तर दुसऱ्या बाजूने विरही भावनेची व्याकुळता देखील तितक्याच तरलतेने आविष्कृत करतो. भारतीय रागसंगीत फारच श्रीमंत होते, ते अशा वैविध्याने.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..