नवीन लेखन...

अंगत पंगत

आदिमानवाच्या काळात माणूस जंगली प्राण्यांप्रमाणे मुक्त रहात होता. भटकंती करताना कंदमुळं खात होता. कालांतराने प्रगती झाली. तो व्यवस्थित जेवण करु लागला. ऋषिमुनीं आपल्या कुटीमध्ये मांडी घालून पत्रावळीवर भोजन करु लागले. रामायण, महाभारतातसुद्धा मांडी घालूनच सर्वजण भोजन करीत होते.

संतमंडळी, शिवाजी महाराजांच्या काळात देखील जेवण हे जमिनीवर बसूनच केले जात होते. दोनशे वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात देखील पंचपक्वांनांच्या जेवणावळी जमिनीवर बसूनच उठत होत्या.

इंग्रज आले आणि तेव्हापासून खुर्चीवर बसून टेबलावर डिशेस मांडून काटा चमचाने जेवणाची क्रांती झाली. हाॅटेलं सुरु झाली. तिथे टेबल खुर्च्या आल्या. तरीदेखील शहरात व खेड्यातली माणसं जमिनीवर बसूनच जेवण करीत होती.

लहानपणापासून आजपर्यंत आमच्या खेडेगावात जमिनीवरच मांडी घालून जेवण केले जाते. लग्न समारंभात जेवणाच्या अनेक पंगती उठायच्या. पारायणात महाप्रसादाचे जेवण देखील पंगतीनेच व्हायचे. पूर्वी खेड्यात शेणाने सारवलेली जमीन होती. आता सगळीकडे फरशी आहे.

पुण्यात आल्यावर सकाळी नाही जमलं तरी रात्रीचं सगळ्यांचं जेवण एकत्र बसून व्हायचंच.

काळ बदलत गेला. माणसं चाळीतून प्रशस्त फ्लॅटमध्ये रहायला गेल्यावर डायनिंग टेबलवर जेऊ लागली. आॅफिसमध्ये देखील टिफिनमधील जेवण टेबलावरच होऊ लागलं. लग्न समारंभात उभं राहून हातात बुफे घेऊन किंवा भोजनकक्षात टेबलावरच गोडधोड जेवण होऊ लागलं.
कधी सुट्टीत फिरायला बाहेर पडल्यावर भेळ, पाणीपुरी, दावणगिरी डोसा असे फास्ट फूड उभं राहूनच खाल्ले जाऊ लागले. माणसांची भोजन संस्कृतीच बदलून गेली. जमिनीवर बसून मांडी घालून जेवण करणं, जुनंपुराणं वाटू लागले.

इथंच मोठी चूक झाली. जुन्या जेवणाच्या पद्धतीमध्ये शास्त्र होते. याचा कुणीही विचारच केला नाही. जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या सतत होणाऱ्या हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यास मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त खाणं. टेबलाऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो. परिणामी अति खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत रहातं.
जेवताना मांडी घालून बसल्याने पाठीचे, कमरेतील व पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचन संस्थेच्या मार्ग सुधारतो. अशा पद्धतीने जेवल्यास मेंदू शांत होतो, जेवणात एकाग्रता राहते. मन चलबिचल होत नाही.

दिवसातून एकदा तरी एकत्र बसून टीव्हीवरील सिरीयल न लावता, गप्पा मारत जेवल्याने एकोपा वाढतो. दिवसभरातील शीण नाहीसा होऊन तणावरहित जीवनाचा आनंद मिळतो. या पद्धतीने जेवल्याने माणूस दीर्घायुषी होतो. अशी मांडी घालून बसलेली व्यक्ती जेवण झाल्यावर जर कशाचाही आधार न घेता उठू शकत असेल तर ती तिचे आयुष्य भरपूर आहे, असे समजावे.

मांडी घालून बसल्याने सांधेदुखी होण्याचं प्रमाण कमी होते. स्नायू लवचिक होतात. शिवाय मेंदूला होणारा रक्तपुरवठाही सुधारतो. मांडी घालून जेवण केल्याचे इतके फायदे असूनही आपण जर टेबलावरच जेवण करीत असलो तर आपले आरोग्य धोक्यात आहे, असे समजावे. अजूनही वेळ गेलेली नाही, आजपासूनच मांडी घालून गप्पा मारत एकत्र जेवण करा, तुम्हाला औषधाची कधीही गरज लागणार नाही…

– सुरेश नावडकर 
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..