नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग १२

नदीच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. टेकडीवर एक आंबामातेचे मंदीर होते. मंदिराकडे जायला डांबरी रास्ता होता आणि नदीच्या कडेने वर जाण्यासाठी पायऱ्या पण बांधलेल्या होत्या. खालून टेकडीकडे पाहताना हिरव्यागार डोंगरातून दिसणारा वर पर्यंत जाणारा नागमोडी रस्ता आणि ठिकठिकाणी बांधलेल्या कमानीतून वर जाणाऱ्या पायऱ्या यांचे खूपच मनोहारी दृष्य दिसत होते. मग सगळ्यांनी गाडी पायथ्याशी लावून पायऱ्या चढूनच मंदिरात जायचे ठरवले. थोड्याच वेळात ते मंदिरात पोहोचले.

मंदिराच्या गाभाऱ्यात सुबक अशी आंबामातेची मूर्ती होती. मंदिरातील वातावरण आणि देवीची मूर्ती पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले.

सगळे हात जोडून देवीसमोर उभे राहून मनोभावे प्रार्थना करत होते. आरूने देवीकडे ‘नील तिला जन्म-जन्मांतरीचा सोबती मिळो’ अशी प्रार्थना केली. डोळे उघडून तिने नीलकडे पहिले तर तो आरूकडेच पाहत होता. त्याला जणू आरूने देवीकडे काय मागितले हे कळल्यासारखे त्याने मान हलवत हाताने ‘तथास्तु’ केल्यासारखी खूण केली. नीलनेही देवीकडे हेच मागणे मागितले असणार याची आरूलाही मनोमन खात्रीच होती.

दर्शन घेऊन ते बाहेर आले. मंदिराबाहेर रेखीव असा प्रदक्षिणा मार्ग होता. प्रदक्षिणा मार्गावरून जाताना, मंदिर टेकडीवर असल्यामुळे, गावाचा आणि आजूबाजूचा रमणीय परिसर नजरेस पडत होता. गावाच्या चहू बाजूंनी लहान मोठ्या टेकड्या पसरलेल्या होत्या. अधून मधून थंडगार वाऱ्याच्या झुळुकी अंगावर शहारे आणत होत्या. मंदीर परिसरात निर्माण केलेल्या सुबक अशा बगिच्यातील झाडा-झुडुपांवर विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे आनंदाने डोलत होते. रंगीबेरंगी फुलपाखरे फुलांवर बागडत होती. वेगवेगळ्या फुलांचा एकत्रित असा मोहक सुगंध सगळीकडे दरवळत होता. सकाळचे कोवळे, स्वच्छ, सोनेरी उबदार ऊन सगळीकडे पसरले होते.

या सगळ्याचा आनंद घेत त्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या. बगिच्याच्या एका बाजूला गावातील देखावे पाहण्यासाठी लाकडी बाक ठेवण्यात आले होते. तिथून सर्व नजरा खूपच सुंदर दिसत होता. नील त्याच्याकडील कॅमेरामध्ये जास्तीत जास्त दृष्य टिपण्याचा प्रयत्न करीत होता.

तिरप्या पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे गावातून वाहत जाणाऱ्या नदीचे पात्र काही ठिकाणी ऊन्हामुळे चमकत होते, तर काही ठिकाणी निळ्या आकाशाचे प्रतिबिंब शांत नदीच्या पात्रात खुलून दिसत होते. काही ठिकाणी आजूबाजूच्या हिरव्या टेकड्यांच्या सावल्या पडल्यामुळे पाणी हिरवेगार दिसत होते. आरूला ह्या दृश्यांची फार मौज वाटत होती. टेकडीखाली नदीच्या काठाला कांही ठिकाणी गावातील महिला गप्पागोष्टी करत धुणी धूत होत्या. नदीच्या काठावरील दगड गोट्यांनी पसरलेल्या किनाऱ्यावर महिलांनी धुतलेल्या रंगीबेरंगी साड्या वाळत घातल्या होत्या, त्यामुळे काठावर खूप सारे रंग सांडलेत कि काय असे वाटत होते. धुणे धुवायला आलेल्या आयांबरोबर नदीवर आलेली मुले, नदीच्या पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत होती. कांही माणसे नदीच्या दुसऱ्या तीरावर त्यांच्या गुरांना पाणी पाजायला घेऊन आली होती. काही लोकं त्यांच्या गाई, म्हशी, बैल यांना आंघोळी घालत होते. कोणी गाड्या धूत होते. नदीच्या दोन्ही तीरांवर एकंदर लगबग चालू होती.

सभोवतालचा हा सारा नजारा पाहून सगळ्यांचीच मने खूप प्रफुल्लित झाली होती. तेवढ्यात नीलचे लक्ष नदीच्या वरच्या टोकाला असलेल्या उंचवट्याकडे गेले. तिथे दाट झाडीतून एखाद्या बुरुजासारखं काहीतरी डोकावत होतं. त्याने कुतूहलाने लताला विचारलं, “लता, त्या उंच भागावर, तो झाडीतून डोकावणारा बुरुज कशाचा आहे? तिथे एखादा किल्ला वगैरे आहे का?”

खरं तर मंदिर परिसरातून दिसणारी ही देखणी दृष्ये पाहत असताना, ते सगळे रंग, आकार, सुंदरता आपण आपल्या चित्रात कशी दाखवू शकू याची मनोमन सुंदर कल्पनाचित्रे रंगवण्यात लता दंग झाली होती. तिची अवस्था “कल्पनेचा कुंचला, स्वप्नरंगी रंगला ..” अशी झाली होती. त्यामुळे नीलच्या अचानक आलेल्या प्रश्नामुळे ती एकदम दचकून भानावर आली. “नील, तू काही विचारलेस का? Sorry, माझे लक्ष नव्हते.”

आरू म्हणाली, “बरोबर आहे दी, कुणीही हरवून जावे असेच वातावरण आहे इथले. अगं, नील तुला विचारात होता की, त्या उंच भागावर, तो झाडीतून डोकावणारा बुरुज कशाचा आहे? तिथे एखादा किल्ला वगैरे आहे का?”

लता म्हणाली, “अरे नील, तो किल्ला नाही, ती एक “गढी” आहे.
“Wow, भारीच की, पण ‘गढी’ म्हणजे नक्की काय असते.”

“‘गढी’ म्हणजे छोटासा किल्लाच तसा. गढीला साधारण ३५ ते ४० फूट उंचीचे बुरुज बांधलेले असतात. त्याचे खालचे बांधकाम दगडी असते आणि वरचे वीटांनी केलेले असते. तिच्या भिंती ६ ते ८ फूट जाडीच्या असतात. सर्व बांधकाम भक्कम असते. त्यामुळे ते अतिशय सुबक, रेखीव आणि देखणे दिसते. भव्य दरवाजा, सुबक कमान, घडीव दगडांच्या बाजू आणि वर विटांच्या बांधकामातील कमानीने सजलेला सज्जा असतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूच्या तटबंदीच्या भिंतीतून सज्जावर चढण्यासाठी दगडी पाय-यांचा जिना असतो, त्यावरून सहजपणे सज्जात जाता येते. सज्जावरून आजूबाजूच्या आतील आणि बाहेरील परिसरावर लक्ष ठेवता येते. बुरुज आणि तटबंदीवर भरपूर जंग्या असतात.”

“जंग्या म्हणजे?”

“जंग्या म्हणजे तटबंदी बांधतानाच त्याला छोटी छोटी छिद्र ठेवलेली असतात. त्यातून बंदुकीच्या साहाय्याने शत्रुवर गोळीबार करता येत असे किंवा बाणांचा वर्षाव करता येत असे. मधे मधे छोटी लोखंडी तावदानेही असत. त्यामुळे बाहेरचे पाहता येत असे, पण बाहेरून शत्रूने हल्ला केला तर आत उभ्या असलेल्या सैनिकाचे संरक्षणही होत असे. ती ‘गढी’

आपल्याच मालकीची आहे.”

“ती गढी तुम्ही बांधलीत?” नीलने विचारले.

“हो, आम्ही म्हणजे आमच्या पूर्वजांनी बांधली. माझे बाबा मला लहानपणी सांगायचे की, आमचे घराणे, जहागीरदार/सरदार घराणे होते. आमचे पूर्वज पूर्वी युद्धावर जात असत. तसेच या जहागिरीतील त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व गावं आणि रयतेचे संरक्षणाची जबाबदारी यांच्यावर असे. त्यावेळी या गढीचे बांधकाम करण्यात आले होते. खूप खूप वर्षांपूर्वी ती वापरात होती. गढीमध्ये प्रमुख सरदार, त्यांचे कुटुंबीय, महत्त्वाची अधिकारी लोकं, त्यांचे सहाय्यक, तसेच त्यांच्या दिमतीला असणारा नोकरवर्ग अशी लोकं त्या गढीत राहत असत. गढीमध्ये राहणाऱ्यांसाठी छोटे महाल, बंगल्या, घरे बांधलेली असत. त्यालाच जोडून नोकरवर्गासाठी छोटी छोटी घरे, झोपड्या बांधलेल्या असत. अधेमधे छोटे बगीचे, कारंजी यांनी सुशोभित केलेलं असे. जीवनावश्यक सर्व गोष्टींचा साठा इथे केला जात असे. शिवाय आठवड्यातून दोन दिवस इथे बाजार भरत अस. आजूबाजूच्या गावातून लोकं हरतर्हेच्या भाज्या, फळं, धान्य, कापडचोपड, खेळणी, अवजारे आशा खूप वस्तू विकण्यासाठी गढीत येत असत. पूर्वी धान्याची खूप मोठी कोठारे तिथे बांधलेली होती. गावांत काही संकट आले, पूर आला, दुष्काळ पडला तर अशा वेळी गावातील जनता गढीच्या आसऱ्याला येत असत. अशा प्रसंगी गढीतील कोठारात साठवलेली धान्य उपयोगी पडत असे.”

“अरे वा, म्हणजे स्वतः बरोबरच गावातील लोकांचाही विचार गढी बांधताना केला जात होता तर.”

“हो ना, जहागिरदार असले तरी आमच्या पूर्वजांनी कधीच हुकूमशाही वापरली नाही. कायम प्रत्येक गरजूंना मदत करणे त्यांनी आपले कर्तव्य मानले. पण काळाच्या ओघात सगळी शाही संस्थानं नष्ट झाली. सैन्य, लवाजमा, जहागीरदारी गेली. गढीवर राहणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. तिचा maintainance करणंही हळूहळु अवघड होऊ लागलं. मग माझ्या खापर पणजोबांनी गढी सोडून गावात राहायला येण्याचा निर्णय घेतला. गावात आमची भरपूर शेतजमीन आहे. मग त्यांनी आमच्या शेतजमिनीला लागून, आपण आत्ता ज्या वाड्यात राहतो आहोत तो वाडा बांधला आणि मग ते त्यांच्या सर्व कुटुंबासह इथे राहायला आले. मग गढीचा वापर कमी झाल्यामुळे तिकडे लोकांचे जाणेयेणे बंद झाले. आताशी फारसं कोणी फिरकतही नाही तिकडे.”

“ती गढी इतकी जुनी आहे, मग तिला ऐतिहासिक महत्त्व असेलच की, किंवा काही special असं वेगळेपण, ज्यासाठी हि गढी प्रसिद्ध होती असं काही?”

“हो तर, ऐतिहासिक महत्त्व तर आहेच. गढी ही नदीला लागून असल्यामुळे वाहतुकीसाठी नदीतून नावांचा उपयोग करून प्रवास केला जायचा. जवळ नदी असल्याचा फायदा हा होत असे की, गढीत लागणाऱ्या वस्तू नदीमार्गे गढीपर्यंत पोहोचवणे सोपे जात असे. याशिवाय व्यापारासाठी, दळणवळणासाठी पूर्वी घोडे, खेचरांच्या गाड्या, बैलगाड्या, मेणे यांचा वापर केला जाई. या गढीचे वेगळे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली गोष्ट म्हणजे गढीतील गोलमहाल आणि विहीर

“गोलमहाल म्हणजे?” आरूने विचारले, तीही हे सगळे पहिल्यांदाच ऐकत होती.

दी सांगू लागली ……

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..