नवीन लेखन...

…आणि स्वप्न सत्यात उतरले

२० एप्रिल २०१६. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. प्रियांका, शर्वरी आणि केतकीला अनेक कामे करायची होती. मलाच कोणतेही काम नव्हते. अनेक विचार मनात येत होते. पण मी स्वतः ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कार्यक्रमापूर्वीचा रियाज केला. वय झाल्यामुळे माझी आई कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हती. तिचा आशीर्वाद घेऊन मी तीन तास अगोदरच गडकरी रंगायनतला पोहोचलो. कारण मला या वास्तूचे देखील आशीर्वाद घ्यायचे होते. वादक मित्र एक एक करून पोहोचू लागले. तसे हास्यविनोद सुरू झाले. कार्यक्रमाचे टेन्शन कमी करण्याचा तो एक उत्तम उपाय आहे. सात वाजता आम्हाला स्टेजचा ताबा मिळाला. आमच्या टीमने ताबडतोब स्टेज सजावटीचे काम सुरू केले. स्मरणिका, पुष्पगुच्छ इ. सगळी कामे योग्य वेळेवर होत होती. कोणत्याही कार्यक्रमाचे निम्मे यश कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यावर असते. त्याप्रमाणे बरोबर ८.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमच्या ॲकॅडमीच्या लहान मुलांनी एक गाणे सादर केले. मग स्वर-मंचच्या तरुण कलाकारांनी गणेशस्तवन गायले. याचे संगीत संयोजन माझा विद्यार्थी संगीतकार विकी अडसुळे याने केले. नंतर स्वर – मंचच्या बालकलाकारांनी मला मंचावर आणले. सर्व विद्यार्थ्यांतर्फे माझा सत्कार करण्यात आला. यानंतर माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही गाणी सादर केल्यानंतर सर्व मान्यवरांना स्टेजवर आमंत्रित करण्यात आले खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष सुभाष काळे, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, संगीतकार कौशल इनामदार, गायिका रंजना जोगळेकर, निवेदिका वासंती वर्तक, सिनेनिर्माते किरण नाकती, माझे मुख्याध्यापक अशोक चिटणीस, आनंद विश्व गुरुकुलचे प्रदीप ढवळ, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले, वरिष्ठ वन अधिकारी अर्जुन म्हसेपाटील, नगरसेवक संजय सोनार या मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार संजय केळकर, खासदार राजन विचारे आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी आपले विचार थोडक्यात मांडले. “अनिरुद्धसारख्या कसलेल्या कलाकाराबरोबर काम करताना मला खूप काही शिकता आले.” कौशल म्हणाला. या भागाचे सूत्रसंचालन नरेन्द्र बेडेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे निवेदन साधना कारंडे – जोशी यांनी केले यानंतर मी गाण्याचा कार्यक्रम सुरू केला. रसिकांच्या अनेक फर्माईशी या ‘फर्माईश’ कार्यक्रमात मी पुऱ्या केल्या. अकरा वाजून वीस मिनिटांनी माझा एक हजारावा कार्यक्रम पूर्ण झाला.

काय वाटले मला एक हजार कार्यक्रम पूर्ण केल्यावर? आनंद तर झालाच. पण अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली. ‘मुक्काम पोस्ट एक हजार’ या प्रोजेक्टवर सतत तीस वर्षे मी काम कसे करू शकलो? याचे श्रेय फक्त उत्तम आयोजनाला देता येईल का? फक्त गाण्याच्या रियाजाला देता येईल का? आयोजक आणि प्रायोजकांना देता येईल का? रसिक प्रेक्षकांना देता येईल का?

मला वाटले की याचे श्रेय या सर्वांनाच द्यावे लागेल. या प्रत्येक प्रश्नासाठी माझ्याकडे उत्तर नव्हते. पण माझ्याकडे रिझल्ट होता. एक हजार कार्यक्रम मी पूर्ण केले होते.

कार्यक्रम पूर्ण करून ग्रीन रुमच्या आरशासमोर मी उभा राहिलो. पहातो तो आरशात मला १३ ऑगस्ट १९८६ चा पहिला जाहीर कार्यक्रम गाणारा अनिरुद्ध दिसला. त्याच्या चेहऱ्यावर भविष्याबद्दलची एक उत्सुकता होती. तर माझ्या चेहऱ्यावर एक हजार कार्यक्रम पूर्ण केल्याचे समाधान होते. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, तर माझ्या डोळ्यात उत्तरे होती. त्याच्या चेहऱ्यावर गाण्याच्या क्षेत्रात आपल्याला कशी वाटचाल करता येईल याची काळजी होती, तर माझ्या चेहऱ्यावर ती वाटचाल पूर्ण केल्याचा आत्मविश्वास होता. एक कार्यक्रम करून त्याने प्रवासाची सुरुवात केली होती, तर ‘मी मुक्काम पोस्ट एक हजार’च्या अंतिम टप्प्यावर उभा होतो.

पण काही गोष्टी मात्र आमच्यात अगदी सारख्या होत्या. आम्हा दोघांची श्रीदत्तगुरुंवर आणि श्रीगजाननावर गाढ श्रद्धा होती. गाण्यावर आणि विशेषतः गझलवर दोघांचेही निस्सीम प्रेम होते. गुरुजनांबद्दल दोघांच्याही मनात नितांत आदर होता. नवीन शिकण्याची दोघांनाही आवड होती. काही बाबतीत मात्र तो अनिरुद्ध फारच श्रीमंत होता. त्याच्याकडे मार्गदर्शन करायला त्याचे वडील आणि दोन्ही गुरू होते. मी मात्र त्या सर्वांनाच गमावले होते. त्याच्याकडे ‘मुक्काम पोस्ट एक हजार’ सारखी महत्त्वाकांक्षी योजना तयार होती. माझ्या हातात काहीच नव्हते.

कार्यक्रम करून आम्ही दोघेही थकलो होतो. पहिल्या आणि एक हजाराव्या कार्यक्रमाचा ताण सारखाच होता. ‘मग काय? आता घरी जाऊन आराम करणार?’ आम्ही एकमेकांना प्रश्न विचारला. आम्ही दोघेही हसलो. कारण याबाबतीत आमचे एकमत होते. दोघांनाही हे पक्के ठाऊक होते की घरी गेल्यावर भाऊ म्हणणार, ‘एक हजार कार्यक्रम पूर्ण झाले म्हणून फार खूष होऊन जाऊ नकोस. पुढील कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात कर.’

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..