नवीन लेखन...

…आणि चष्मा लागला

प्रसंग पहिला- स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले.

प्रसंग दुसरा- बसस्टॉपवर उभा राहून मी ज्या बसची वाट बघत उभा आहे त्या नंबराच्या तीन बस गेल्या तरी मला पत्ताही नाही.

प्रसंग तिसरा- नाटक बघायला गेल्यावर रंगमंचावर फक्त धडांचीच हालचाल चालू झाली आहे असे मला वाटू लागले.
कुठलेतरी तीन प्रसंग पाहून सम्राट (हा शब्द मी पाचवीत असताना सरमाट असा उच्चारायचो. खरं म्हणजे अशोकाशी माझे काहीही वैर नसताना सम्राटासाठी मला खूप मार खावा लागला आहे. असो!) अशोकाने सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला आणि तो खुशाल जंगलात निघून गेला.

अशोकाची जीवनावरची वासना उडाली होती, पण मला तसे काही वाटले नाही. पण वरच्या तीन प्रसंगाने आपल्या दोन्ही डोळयांनी आपल्याला दगा दिलाय एवढे मी समजलो. वास्तविक त्याच्याप्रमाणे ऐश्वर्याचा त्याग करायला माझ्याकडे काहीच नव्हते. निराश होउुन कुठल्यातरी जंगलात जायचे म्हटले तर जवळ एखादे घनदाट जंगलही नव्हते. येउुर, उपवन वगैरे भागात जाउु शकलो असतो पण तिकडे बिबटयाचा वावर असल्याचे वारंवार पेपरात छापून येत असल्याने मी तो विचार तात्काळ मनातून काढून टाकला.

एवढे सगळे समजल्यावर चष्मा बनवणे क्रमप्राप्तच होते. त्याच संध्याकाळी एका चष्मेवाल्याच्या दुकानात गेलो.

“या शेट.” डोळयांवर चष्मा नसल्यामुळे की काय मी पाठीमागून कोण शेट येतोय ते बघितलं. कोणीच नव्हता. म्हणजे मीच शेट!

“काय पाहिजे?”
“चष्मा बनवून घ्यायचाय.”
“नाव काय?”
“कुणाचं.”
“चष्म्याचं … आपलं तुमचं.”

मी नाव सांगितलं. त्याने डोळे तपासणीची फी घेतली आणि मागच्या बाजूला जायला सांगितलं. मागच्या बाजूला डोळे तपासायला एक सुंदर मुलगी होती. तिला बघून दिन्याही डोळे तपासून घेउु काय म्हणत होता. दिन्याला बाहेरच बसवून ती मला एका छोटया खोलीत घेउुन गेली. आत गेल्यावर तिने बल्ब घालवून पहिल्यांदा अंधार केला. आणि काहीबाही प्रश्न विचारले. एखाद्या डिटेक्टीवसारखी बॅटरी आणि भिंग घेउुन माझ्या डोळयांची तपासणी चालली होती. तिचा एसीतला थंड हात माझ्या डोळयाला लागल्यावर माझ्या नाकातून ड्रॅगनसारख्या गरम वाफा आल्याचा माझा मला भास झाला. माझ्या हातून उगाचच काही पाप होउु देउु नकोस अशी मी देवाकडे प्रार्थना केली.

मग बिनकाचेचा पानबुडीसारखा एक चष्मा मला देण्यात आला. सगळ्या जगाचे चकचकीत चष्मे असताना असा प्राचीन काळचा चष्मा घालून हिंडायचे की काय म्हणून मी टेंशनमध्ये आलो होतो. ह्यात नंबर तपासायच्या काचा टाकायच्या असतात हे मला नंतर समजले.

“आरशात बघा आणि वाचा.” मी भलत्याच दिशेला बघायला लागलो कारण आवाज कुठून आला ते मला कळले नाही.
“अहो तिकडे कुठे बघताय? आरसा समोर आहे.” मी पहिल्यांदा आवाज कुठून आलाय ते बघायला पाठीमागे बघितले.
मला बावळट समजून मग तिने स्वच्छ लाईट लावून कुठे बघायचे ते दाखवले. समोरच्या डब्यात दिसणारी एबीसीडी मागे वळून बघितल्यावर दिसत नव्हती. काय प्रकार चालला आहे ते मला कळत नव्हते.

त्या पानबुडीवाल्या चष्म्यात काचा टाकून माझ्या डाव्या डोळयाचा नंबर निघाला पण उजव्या डोळ्याचे जमेना. उजव्या डोळयाने मला पहिली आणि मोठयात मोठी ओळही दिसत नव्हती. तीन अक्षरांपैकी मी मधल्या अक्षरावर लक्ष केंद्रित केल्यावर मला बाजूची दोन अक्षरे दिसायची. तीही पुसट. मधले अक्षर दिसायचेच नाही. तिच्या टेबलावर असलेल्या तीन ट्रे मधल्या होत्या नव्हत्या तेवढया सगळया काचा टाकून झाल्या तरीही माझ्या उजव्या डोळयाच्या नंबराचा थांग पत्ता लागेना. मग वैतागून तिने दुसर्‍या स्पेशालिस्ट डॉक्टरांचा पत्ता दिला आणि त्यांना जाउुन भेटायला सांगितले. मी गेल्यावर सुटकेचा टाकलेला नि:श्वास मला स्पष्ट ऐकू आला. माझे कान मात्र जाम शार्प आहेत. एवढे सगळे होउुन बाहेर पडतोय की नाही तोपर्यंत दिन्या आत काय झाले हे ऐकायला उत्सूक होता. विषेश काही झाले नाही हे समजल्यावर तो कमालीचा निराश झाला.

स्पेशालिस्टकडे जाणे म्हणजे इंटरव्युव्हसारखा वॉक इन प्रकार नव्हता. अपॉईंटमेंटशिवाय प्रवेश नव्हता म्हणून वेळ घेतली. ठरलेल्या वेळी तिथे जाउुन बघतो तर रेल्वेपास काढायला असते तशी रांग. जरासे आत वाकून बघितले तर सगळे चष्मे घातलेले लोक. सगळयांचेच डोळे त्याचदिवशी फुटणार! माझ्या नशीबी नवग्रहांबरोबर रांग हा एक ग्रह चिकटलेला आहे. कुठेही गेलो तर एकदम एंट्री वगैरे भानगड नाही. रांग लावायचीच!

दोन तासांनी नंबर आल्यावर मी आत गेलो. त्यांनी डोळयांवरचा चष्मा काढून मला बघितले. कशाला कोण जाणे, बाजुलाच एक पाच फुट उंचीचा आरसा होता त्यांनी मला आरशाकडे तोंड करून बसायला सांगितल्यावर डोळयांवर चष्मा नसतानाही माझे आरशात जे काही प्रतिबिंब दिसले, त्यावरून मी केसांवरून हात वगैरे फिरवून केस नीट करून घेतले. सवय!

मग स्पेशालिस्ट डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासणी करून माझ्या दोन डोळ्यांचे दोन वेगवेगळे नंबर माझ्या हातावर ठेवले आणि त्या नंबरचा चष्मा तयार झाल्यावर माझ्याकडून तपासून घ्या अशी तंबी दिली. इथेही उजव्या डोळ्याने डॉक्टरांना परेशान केले पण त्यांनीही चिकाटी न सोडता त्याचा ढोबळ मानाने नंबर काढला.

दोन दिवसांनी तयार झालेला चष्मा पुन्हा त्यांच्याकडे जाउुन तपासून घेतला. चष्म्यालाही भिंगाने तपासतात हे माझ्यासाठी नवीनच होते. त्यांनी तो चष्मा वापरण्यासाठी मला परवानगी दिली आणि तेव्हापासून तो माझ्या डोळ्यांना कायमचा चिकटला. त्यानंतर अनेक चष्मे आले आणि गेले. डोळ्यांचे नंबर कमी जास्त झाले. पण नाकावर मात्र एका चष्म्याची कायमची सोय झाली.

©विजय माने, ठाणे

http://vijaymane.blog

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..