नवीन लेखन...

फॉन्टफ्रिडमची १८ वर्षे…

आजचा दिवस खरंच खास आहे. आपल्या `मराठीसृष्टी’चं हे २५ वं वर्ष. पंचविशीत आलेली `मराठीसृष्टी’ आपल्या पसंतीला उतरलेय याचा खास आनंद साजरा करताना आपले सगळ्यांचे आभार मानणे हे तर अत्यावश्यक आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच ही वाटचाल शक्य झाली.

आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम‘ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय. या सॉफ्टवेअरच्या यशात `लोकसत्ता’ या दैनिकाचा, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमूहाचा, लोकसत्ताचे तत्कालिन संपादक श्री अरुण टिकेकर आणि लोकसत्ताचे तत्कालिन ब्रॅंड मॅनेजर श्री विजय कडू, आणि त्यांचे सहकारी श्री वडके यांचा प्रचंड हातभार आहे.

कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा उपक्रमाच्या आयुष्यात काही महत्त्वाचे टप्पे असतात. १८ वर्षे, २५ वर्षे… हे दोन टप्पे तसेच महत्त्वाचे… केवळ त्यामुळेच आज याची आठवण येते.

खरंतर “लोकसत्ता फॉन्टफ्रिडम”च्या आधी हे सॉफ्टवेअर १९९५ पासून `फॉन्टफ्रिडम’ या नावाने बाजारात उपलब्ध होतं. त्यालाही छान प्रतिसाद होता. म्हणजे `फॉन्टफ्रिडम’च्या अगदी पहिल्या आवृत्तीचं हे २५ वं वर्ष आहे हासुद्धा एक महत्त्वाचा भाग.

मधल्या काळात `मराठीसृष्टी’  च्या माध्यमातून `फॉन्टफ्रिडम‘ या सॉफ्टवेअरमध्ये बरेच बदल घडवले गेले. अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या… आणि हे सॉफ्टवेअर अजुनही लोकांच्या मनात राज्य करतच आहे.

ओंकार जोशी यांच्या सहभागाने `गमभन’ हे युनिकोड सॉफ्टवेअरसुद्धा यामध्ये अंतर्भूत झाले. मिलेनियम सारखे लिगसी फॉन्टस वापरतानाच, त्याच सॉफ्टवेअरमध्ये युनिकोड फॉन्ट वापरण्याची सोय देणारे हे पहिलेच सॉफ्टवेअर.

ज्यावेळी कोणत्याही मराठी सॉफ्टवेअरची किंमत किमान १५०० रुपये होती त्यावेळी फक्त २९९ रुपयात एखादे सर्वसमावेशक सॉफ्टवेअर लोकांपर्यंत पोहोचवण्याची हिंमत केवळ `लोकसत्ता’मुळे आणि त्यातही `लोकसत्ता’चे त्यावेळचे ब्रॅंड मॅनेजर श्री विजय कडू यांच्यामुळे मिळाली.

याचसंदर्भातली एक मजेदार आठवण. जेव्हा अशा प्रकारचे सॉफ्टवेअर `लोकसत्ता वाचक स्नेहाधिकार योजने’तून लोकांपर्यंत न्यायचे ठरले तेव्हा सहाजिकच प्रश्न आला की याची किती प्रती संपतील.. एकूण सवलत योजना ३ महिन्यांसाठी होती. पहिले काही आठवडे मार्केटचा अंदाज घेऊ म्हणजे मग ठरवता येईल असेच सर्वांचे मत पडले… जाहिरातीची जबाबदारी `लोकसत्ता’ने घेतली होती. त्याकाळी `वाचक स्नेहाधिकार योजने’ला प्रचंड प्रतिसाद मिळत असे. त्या प्रतिसादावरुन असा अंदाज केला की सवलत योजनेच्या काळात साधारणपणे २००० प्रति संपतील.

सॉफ्टवेअरचं लॉन्चिंग होतं दसर्‍याच्या दिवशी. कार्यक्रम होता पुण्यात… आणि प्रमुख पाहुणे होते तेव्हाचे शिक्षणमंत्री श्री रामकृष्ण मोरे… लॉंन्चिंग पर्यंत काही बुकींग घ्यायची म्हणून पहिली जाहिरात एक आठवडा आधी केली. तीसुद्धा `लोकसत्ता – लोकरंग पुरवणी’च्या पहिल्या पानावर.. कार्यक्रमापर्यंत ३०० सीडी तयार ठेवायच्या अशा अंदाजाने सगळं नियोजन होतं.

पण पहिल्याच जाहिरातील इतका प्रतिसाद मिळाला की त्या एकाच जाहिरातीवर अक्षरशः ८०० सीडींचं बुकिंग झालं… म्हणजे सॉफ्टवेअर लॉंच झाल्याबरोबर या ८०० जणांना सीडी पाठवणं गरजेचं होतं.  सीडी बनवणं तेव्हाच्या काळी आजच्याइतकं साधं सोपं नव्हतं.

मग काय.. अक्षरशः युद्धपातळीवर सगळी कामं सुरु झाली… कार्यक्रमाच्या आधल्या दिवसापर्यंत ऑफिसमधली मुलं, घरची मंडळी, मित्र वगैरे सगळे सीडी बनवायच्या कामात आकंठ बुडाले आणि एकदाच्या सगळ्या सीडी बनल्या, पुण्याला गेल्या, कार्यक्रम छानपैकी पार पडला…

आणि त्यानंतर त्या सॉफ्टवेअरने इतिहास घडवला. लोकसत्ताच्या ऑफिससमोर रांगा… माझ्या ऑफिसचा पत्ता विचारत ठाणे स्टेशनपासून येणारी मंडळी… लोकसत्ताच्या विक्रेत्यांकडून मिळणारा प्रतिसाद.. यातून अक्षरशः हजारोंच्या संख्येने सीडी विकल्या…

त्यावेळी सॉफ्टवेअरला कोणतेही लॉक ठेवले नव्हते… त्यामुळे त्याची सहाजिकच मोठ्या प्रमाणात कॉपीसुद्धा झाली. पण म्हणतात ना.. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.. लॉक नसल्याने ज्यांनी कॉपी केलेलं सॉफ्टवेअर वापरलं त्यांच्यातले अनेकजण सॉफ्टवेअर विकत घ्यायला आले. ते तर या सॉफ्टवेअरवर इतके खुश होते की अनेकांनी मित्र-नातेवाईकांना  दिवाळी भेट देण्यासाठी या सीडी खरेदी केल्या.

फक्त २९९ रुपयात एवढ्या सगळ्या सुविधा देणारं आणि वापरायला अत्यंत सोपा किबोर्ड असणारं हे सॉफ्टवेअर. आज आपण जो फोनेटिक किबोर्ड वापरतो त्यापेक्षाही कितीतरी पटींनी सोपा असलेला, शास्त्रशुद्धपणे बनवलेला, १५ मिनिटात शिकता येणारा `इंग्लिश फोनेटिक’ हा किबोर्ड आणि तब्बल ५० फॉन्टस हे सॉफ्टवेअरचं वैशिष्ट्य.

त्यानंतरच्या काळात याच्या ७-८ नवनवीन आवृत्ती, वेगवेगळ्या सुधारणांसहित बाजारात आल्या. लोकसत्ताबरोबरचं ब्रॅंडिंग कॉन्ट्रॅक्ट २००५ मध्ये संपलं. पण अजूनही, राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्या कानाकोपर्‍यातून अनेक मराठी लोक हे सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी संपर्क करतात. व्यावसायिक उत्पादने तर सर्वच बनवतात. मात्र व्यवसाय करता करता समाजाला जे हवय ते त्यांना परवडणार्‍या किमतीत देण्याचा आनंद वेगळाच असतो… आज इतक्या वर्षांनंतर सगळीकडे बाववाढ झालेली असतानाही `फॉन्टफ्रिडम’ची किंमत आहे फक्त ५०० रुपये. म्हणजे १८ वर्षात दुपटीपेक्षाही कमी वाढ.. आणि सुविधांमध्ये अनेकपटींनी वाढ….

सतत काहितरी नवीन देण्याच्या ध्यासातून अनेक सुविधा मराठीसृष्टीवर उपलब्ध केल्या गेल्या. आणि आता या सर्व सुविधांना एका समान धाग्यामध्ये बांधून एक नवा मंच तमाम मराठी बांधवांसाठी खुला होत आहे.

आज, २०१९ च्या विजयादशमीच्या निमित्ताने `मराठीसृष्टी’ सादर करत आहे एक अत्याधुनिक सुविधांनी भरलेला `लेखन मंच’. मराठीतील संगणकीय लेखनासाठी जे जे काही आवश्यक असेल ते सगळं या एकाच मंचावर उपलब्ध झालंय.. मग ते साधं टायपिंग असू दे, की स्पेलचेकर, मजकूर नटवायचे विविध फॉन्ट असू दे की इतर काही… यादी बरीच मोठी आहे. सगळी इकडेच वाचण्यापेक्षा ती देणार्‍या खास पानावर ती जरुर वाचा.

`मराठीसृष्टी’ने आणखी एक मोठा प्रकल्प हातात घेतलाय.. तो म्हणजे “Mission1M”.

“1 M” म्हणजे “One Aim”…  म्हणजेच `एकच लक्ष’…

“1 M म्हणजे “One Million” म्हणजेच `एक दशलक्ष’….

या प्रकल्पांतर्गत आमचं ध्येय आहे मराठी भाषेत विविध विषयांवरील 1 Million म्हणजेच १ दशलक्ष पाने उपलब्ध करणे. यात अभ्यासपूर्ण लेखनाबरोबरच साहित्य, ज्ञान, मनोरंजन या सगळ्याच विषयांतील मजकूर उपलब्ध होईल.

आतापर्यंत `मराठीसृष्टी’ने कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान न कधी मागितलेय, ना कधी सरकारने दिलंय….

हा प्रकल्प `मराठी माणसांचा, मराठी माणसांसाठी’ आहे. `मराठीसृष्टी’ हे सुसंवादाचं माध्यम आहे. हा संपूर्ण प्रकल्प कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय पूर्ण करायचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प लोकसहभागातून उभा करायचा आहे. यासाठी  आपल्या सर्वांना या प्रकल्पात सहभागी होण्याचं आवाहन आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती www.mission1m.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे…

आतापुरते एवढेच… पुन्हा भेटूया.. नियमित संवादासह !

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..