नवीन लेखन...

मेघमल्हार. . .

१९८९ च्या आषाढाचा पाऊस धुँवाधार कोसळत होता. झाडपाल्यांना उभा आडवा झोडपत होता. कर्जतजवळच्या आंजपच्या गावातून कशेळे मार्गे मी मोटारसायकल हाणत कर्जतच्या दिशेने निघालो होतो. आकाशात वीजा कडाडत होत्या. कशेळे गावापासून आंजप गाव चार किलोमीटर दूर. रस्ता सुंदर वळणा वळणांचा. सपाट मैदान, पश्चिमेकडे माथेरानचा डोंगर, पूर्वेला भीमाशंकर, मध्ये काळाशार रस्ता, नुकताच बनवलेला. सगळीकडे हिरव्या रंगाची मखमली पखरण! वारा मोटारसायकलीला हेलपाटत होता. पण पावसात भिजायची गंमत होती.
माझी मोटारसायकल मी कशेळे गावातून कर्जतच्या दिशेने वळवली. नाशिक-मुरबाड-कर्जत-चौक असा तो रस्ता. तसा राज्यरस्ता, पण त्याची पूर्ण आबाळ झाली होती. उंच उंच झाडं (आज यावर कोणाचा विश्वास बसणार नाही), नागमोडी विळखे घेत जाणारा सुस्त रस्ता. रस्त्याच्या अवती भोवती आजच्यासारखी फार्म हाऊसेसची गर्दी नव्हती. त्यामुळे जंगलच जंगल! अचानक एका वळणावर एक पांढरीशुभ्र आलिशान गाडी उभी असलेली दिसली, (बहुधा मर्सिडीज असावी). ड्रायव्हरच्या बाजूच्या काचा उघड्या होत्या, वायपर सुरू होता, पण ड्रायव्हर कुठेच दिसत नव्हता. मी अचंबित!
मोटारसायकल बाजूला उभी केली, म्हटलं काय प्रकार आहे ते पाहू या. चेहर्‍यावरचं पाणी पुसून मी इकडेतिकडे पहात उभा राहिलो. पाऊस कोसळतच होता. ओढे नाले खळाळत वहात होते. जवळून एक पायवाट खालच्या अंगास उतरत होती, लाल पाणी घेऊन सजत होती. आणि दुरून एक परिचित असा भारदस्त गायनाचा आवाज आला. दणदणीत आवाजात कोणीतरी ताना, मात्रा, पलटे घेत मल्हाराचे सूर आळवत होता. आवाजाच्या दिशेने मी झपाटल्यासारखा खेचला गेलो.
समोरच्या पायवाटेवर थोडंसं पुढे एक आंब्याचं डेरेदार झाड होतं. झाडाभोवती एक नैसर्गिक पार तयार झालेला होता. आणि त्या पारावर बसून कोसळत्या पर्जन्यधारा अंगावर घेत एक भरभक्कम व्यक्तिमत्व गात बसलं होतं. स्तंभित होऊन मी पहात उभा राहिलो. स्वतःच्या अंतर्मनातील नादब्रह्माच्या गाभार्‍यातील तानपुर्‍याच्या तारा छेडत मल्हार आळवित होते पंडित भीमसेन जोशी!!
पूर्वेस सह्याद्रीचे उंच कडे, दाट झाडी, कोसळता पाऊस, कडाडत्या वीजा आणि विश्वब्रह्माच्या विराट रूपात एकरूप झालेले स्वरब्रह्म भीमसेन जोशी!!
आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!!

— नितीन आरेकर
कर्जत-रायगड

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

1 Comment on मेघमल्हार. . .

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..