नवीन लेखन...

जैसें डोळ्यां अंजन भेटे-१

ज्ञानेश्वर जनांची माउली होते. अज्ञानाच्या अंधारात पिचणा-या समाजाबद्दल त्यांना अतीव करुणा होती. ज्ञानेश्वरी समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीच लिहिली गेली. तेहेतीस कोटी देवांना भजणा-या या सूर्याच्या पुत्रांकडून माउलींनी कदाचित अवास्तव अपेक्षा केल्या असतील. कारण आज ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरच्या आठशे वर्षांत विठ्ठलाव्यतिरिक्त इतर देवतांना न भजणारा त्यांचा भक्त दिवा घेऊन शोधावा लागेल.

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अर्थहीन ओव्या लिहिल्या असे म्हणणारा मराठी माणूसही दिवा घेऊनच शोधावा लागेल. माऊलींच्या शब्दांवर आम्ही निस्सीम श्रद्धा ठेवतो. पण आचरण मात्र तसे करत नाही. स्वत:ला सोयीचे तसेच वागतो.

तेराव्या “ क्षेत्राक्षेत्रज्ञविभागयोग” या अध्यायात माउलींनी अनेक देवतांना भजणा-या भक्ताची तुलना वेश्येशी केली आहे. येथे संदिग्ध असे काहीच नाही. सारे काही सूर्यप्रकाशात असल्यासारखे स्पष्ट आहे.

ते म्हणतात

कुणबट कुळवाडी| तैसा आन आन देव मांडी|

आदिलाची परवडी| करी तया ||८१२||

कुणबट आणि कुळवाडी म्हणजे सामान्य माणूस, अनेक देव आणून देव्हा-यात मांडतो. या नव्या देवांच्यापायी तो देव्हा-यातील जुन्या देवांना विसरतो.

तया गुरुमार्गा टेंकें| जयाचा सुगरवा देखे|

तरी तयाचा मंत्र शिके| येरु नेघे ||८१३||

देव्हा-यातील देव कमी की काय? तो नवनवीन गुरुंच्याही शोधात राहतो. ज्या गुरुचा भौतिक थाटमाट मोठा त्याला हा भुलतो. त्याचा निरर्थक जरी असेल तरी कानमंत्र घेतो.

त्या गुरूची पात्रता, त्याचे ज्ञान, त्याचे चारित्र्या यांना हा महत्त्व देत नाही. याला दिसते ते गुरुचे भरजरी रत्नजडीत ऐश्वर्य. या थाटमाटाने त्याचे डोळे इतके दिपतात की तो इतरांकडे ढुंकूनही बघत नाही.

प्राणिजातेंसीं निष्ठुरु| स्थावरीं बहु भरु|

तेवींचि नाहीं एकसरु| निर्वाहो जया ||८१४||

याच्या मनात सजीव प्राण्यांबद्दल दयाभाव क्वचितच उपजतो. पण सगळा जीव असतो तो संपत्तीत. आणि या कारणे हा कधीच एका मार्गांने चालत नाही. सतत चंचलता हा याचा गुण. याच्या वर्तनाचा अंदाज बांधणे अशक्यच.

माझी मूर्ति निफजवी| ते घराचे कोनीं बैसवी|

आपण देवो देवी| यात्रे जाय ||८१५||

ऐहिक सुख समृद्धीसाठी, मृत्युनंतर स्वर्गप्राप्तीसाठी सत्कर्मे करणे याच्या तत्वात बसत नाही. पण हा याची फेड घराच्या कोप-यात माझी मूर्ती बसवून करतो. पण माझ्यावर पूर्ण विश्वास मात्र नसतो. कदाचित ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या न्यायाने मला घराच्या कोप-यातच बसवून हा देवदेवांच्या यात्रा करत बसतो.

नित्य आराधन माझें| काजीं कुळदैवता भजे|

पर्वविशेषें कीजे| पूजा आना ||८१६||

रोज सकाळी लवकर उठतो. श्राद्धेन स्नान करतो. ताजे पाणी आणतो. तासनतास माझी पूजा करतो. कुलादेवातांचेही रीतीरिवाज प्रथेप्रमाणे पाळतो. शुभ मुहुर्तांवर दुस-या देवतांची मोठी पूजा घालतो.

माझें अधिष्ठान घरीं| आणि वोवसे आनाचे करी|

पितृकार्यावसरीं| पितरांचा होय ||८१७||

मी याच्या देवघरात शांतपणे बसून असता हा आदरातिथ्य मात्र दुसर-यांचेच करतो. पितरपाठात पितरांचे सर्व विधी अगदी डोळ्यात तेल घालून बिनचूक पार पाडतो. जसा काही हा एकटाच वंशज त्या पितरांचा.

एकादशीच्या दिवशीं| जेतुला पाडु आम्हांसी|

तेतुलाचि नागांसी| पंचमीच्या दिवशीं ||८१८||

चौथ मोटकी पाहे| आणि गणेशाचाचि होये|

चावदसी म्हणे माये| तुझाचि वो दुर्गे ||८१९||

ज्या प्रेमाने एकादशीला माझी पूजा करतो, उपवास करतो त्याच श्रद्धेने नागपंचमीला नागांना भजतो. चतुर्थीला तो गणेशाचा उपवास करतो तर चतुर्दशीला याला दुर्गेचा उपवास असतो. माझ्यासहित सगळ्या देवतांशी हा सारखाच एकनिष्ठ असतो.

नित्य नैमित्तिकें कर्में सांडी| मग बैसे नवचंडी|

आदित्यवारीं वाढी| बहिरवां पात्रीं ||८२०||

पाठीं सोमवार पावे| आणि बेलेंसी लिंगा धांवे|

ऐसा एकलाचि आघवे| जोगावी जो ||८२१||

या सा-या देवदेवामध्ये गुंतल्यामुळे तो त्याची नेहमीची कामेही करीत नाही. त्यातच नवरात्र बसले की बघायलाच नको. यावर कडी म्हणजे रविवारी बहिरोबाची आराधना व सोमवारी शंकराची. हा एकटाच अशी अनेक दैवते भजत असतो.

ऐसा अखंड भजन करी| उगा नोहे क्षणभरी|

अवघेन गांवद्वारीं| अहेव जैसी ||८२२||

ऐसेनि जो भक्तु| देखसी सैरा धांवतु|

जाण अज्ञानाचा मूर्तु| अवतार तो ||८२३||

असा हा एकही क्षण न गमावता सतत कोणा ना कोणाचे पूजन-अर्चन करत असतो. हा इतक्या सा-या देवतांशी एकनिष्ठ असतो की याची तुलना फक्त सा-या गावाला खुश ठेवणा-या व या खुश ठेवण्याच्या बदल्यात काही मागणा-या वेश्येशी करता येईल. असा अनेक देवतांची सकाम भक्ती करणारा वेडापिसा अस्वस्थ भक्त जर तुम्हां दिसलाच तर तो अज्ञानाचा मूर्त पुतळा आहे हे ओळखा.

या ओव्या वाचायच्या. आदराने वाचायच्या. फक्त वाचायच्याच……..

बोला पुंडलिक वरदे……………………………………………..

— श्री.राजेंद्र गंगाधर चौरे

1 Comment on जैसें डोळ्यां अंजन भेटे-१

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..