नवीन लेखन...

नोव्हेंबर ३० : डॉनचे पदार्पण





३० नोव्हेंबर १९२८ रोजी ब्रिस्बेनमधील एग्झिबिशन ग्राऊंडवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे डोनल्ड ब्रॅडमन यांनी कसोटीपदार्पण केले. पहिल्या डावात ४० चेंडूंमध्ये १८ आणि दुसर्‍या डावात पाच चेंडूंवर १ धाव काढून ते बाद झाले. सरासरी साडेनऊ ! मात्र पुढच्याच कसोटी सामन्यात मेलबर्नमध्ये त्यांनी ७९आणि ११२ धावांच्या खेळ्या केल्या आणि आपली सरासरी पन्नासच्या पलीकडे नेली.

१८, १, ७९, ११२ अशा प्रारंभानंतर त्यांनी लागोपाठच्या डावांमध्ये ४०, ५८, १२३, नाबाद ३७, ८, १३१, २५४, १, ३३४, १४ आणि २३२ अशा खेळ्या केल्या. नवव्या कसोटीनंतर, कारकिर्दीत प्रथमच त्यांची पारंपरिक सरासरी १०० च्या पलीकडे गेली आणि त्यानंतर त्यांनी खेळलेल्या ४३ कसोट्यांमधून ती कधीही ८९ च्या खाली उतरली नाही !

आधी एकदा सांगितल्याप्रमाणे सर डॉन ब्रॅडमन यांची कसोटी सरासरी १०० एवढी होती असे दाखविण्याचा प्रयत्न एकदा झालेला आहे. चार्ल्स डेविस या सांख्यिकीतज्ज्ञाने ऑगस्ट २००८ मध्ये आपल्याला डॉन ब्रॅडमन यांनी काढलेल्या पण नोंदल्या न गेलेल्या ४ धावांबद्दल एक ‘टॅन्टलायजिंग क्लू’ मिळाली असल्याचे म्हटले होते. १९२८-२९ च्या हंगामात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचवा सामना डेविस यांनी यासंदर्भात उल्लेखिला आहे. ही कसोटी आठ दिवस चालली होती. मेलबर्नमधील हा सामना ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून जिंकला होता. ब्रॅडमन आणि जॅक रायडर खेळत असताना मारला गेलेला एक चौकार प्रश्नांकित केला गेला आहे. तो चर्चिण्यापूर्वी धावपुस्तिकेवर एक नजर टाकावीच लागेल…

धावपुस्तिकेत फलंदाजाच्या नावासमोर त्याने केलेल्या धावा नोंदविल्या जातात. जसे क्रिस गेल ४, ०, २, १…यावरून फलंदाजाने सामना केलेले एकूण चेंडू कळतात पण कोणत्या गोलंदाजाच्या चेंडूंवर त्या धावा निघाल्या हे कळत नाही. आता हे समजणे शक्य झालेले आहे.

धावपुस्तिकेत फलंदाजीनंतर खाली गोलंदाजीची जागा असते. गोलंदाजाचे नाव आणि त्याच्यासमोर चौकटी असतात

१, २, ३, ४, … अशा. गोलंदाज जितके चेंडू टाकतो त्या सर्वांवर निघालेल्या धावांची नोंद त्या-त्या चौकटीत केली जाते.


आता मूळ प्रश्नाकडे…बिल फर्ग्युसन नावाच्या धावनोंदकाने (स्कोअरर) प्रस्तुत सामन्यात बनविलेले स्कोअरकार्ड उपलब्ध आहे आणि त्यात गोलंदाजीच्या विभागात मॅरिस टेटच्या पस्तिसाव्या षटकात एक चौकार मारला गेला अशी नोंद आहे. फलंदाजीच्या विभागात तो जॅक रायडरच्या नावावर आहे. हा चौकार नोंदण्यात गडबड झाली असल्याची दाट शंका चार्ल्स डेविसला आहे. एकतर हा चौकार रायडरनेच दुसर्‍या कोणत्या तरी षटकात मारलेला असावा किंवा मारला गेलेलाच नसावा (मग ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला असे होत नाही), किंवा हा चौकार ब्रॅडमनने मारलेला असावा. ‘जस्ट परहॅप्स’ असे डेविस म्हणतो.

त्यानंतर मात्र ह्या शंकेची फारशी चर्चा झालेली नाही. मुळात (याआधी चर्चिल्याप्रमाणे) फलंदाजाची सरासरी काढताना पारंपरिक पद्धतीत नाबाद डावांमधील धावा मोजणे पण नाबाद डाव न मोजणे असा विचित्र शिरस्ता असल्याने सरासरीला सरासरीपेक्षा अधिक भाव देण्याची गरजही नाही.

ब्रॅडमनचे कसोटी पदार्पण आणि त्यांची सरासरी १०० असू शकते असे दर्शविण्याचा एक प्रयत्न झाला होता त्याचा तपशील


ब्रॅडमनचे कसोटी पदार्पण आणि त्यांची सरासरी १०० असू शकते असे दर्शविण्याचा एक प्रयत्न झाला होता त्याचा तपशील

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..