सांग दर्पणा

’सांग दर्पणा कशी मी दिसते?’

आजवर अनेक तरुणींनी भिंतीवरच्या किंवा हातातल्या आरशाला हा सवाल केला असेल. साजशृंगार करण्यासाठी स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही आरशाचा आधार लाभलेला आहे. अर्थात आरशाचे उपयोग तेवढ्यापुरतेच मर्यादित आहेत, असं मानण्याचं मात्र कारण नाही.

अनेक उपकरणांमध्ये, औद्योगिक उत्पादनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आरशांचा वापर करण्यात येतो. आपल्या नेहमीच्या व्यवहारातलीच उदाहरणं द्यायची तर चित्रविचित्र आणि सतत बदलत्या रचनाबंधांनी भुलवणार्‍या कॅलिडोस्कोपमध्ये, मोटारगाडीमध्ये चालकाला वाहन चालवणं सोपं जावं यासाठी, दूरवरच्या तारका, ग्रहमाला यांचं दर्शन घेण्यासाठी बांधण्यात आलेल्या दुर्बिणींमध्ये तर दुसर्‍या टोकाला अतिसूक्ष्म जीवांची पाहणी करण्यासाठी वापरायच्या सूक्ष्मदर्शकांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या आरशांचा वापर होताना आपण नेहमीच पाहतो. समुद्राच्या पाण्याखाली लपूनछपून वावरणार्‍या पाणबुड्यांना पाण्याच्या वर होणार्‍या घडामोडींचं निरीक्षण करायचं असेल तर असेच आरसे वापरून ते दृश्य दाखवणार्‍या पेरिस्कोपचीच गरज लागते. शरीराला छेद न देता त्याच्या आत असलेल्या अवयवांकडे जवळून नजर टाकण्यासाठी, प्रसंगी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एन्डोस्कोपीचं तंत्र वापरलं जातं. त्यासाठी लागणारं उपकरण आरशांविना बांधणं अशक्यच झालं असतं. एवढंच कशाला पण गावातल्या जत्रेत आपलीच चमत्कारिक प्रतिबिंब दाखवून आपल्याला रिझवून, हसवून सोडण्यासाठी आरसेमहालच कामी येतो.

उद्या जर काही कारणांनी आरसे नाहीसे झाले तर आपलं घडीघडीला अडून बसेल. पण अतिपरिचयादवज्ञा तसाच काहीसा प्रकार आरशांबाबतही होतो. ही आरशाची किमया कशी साध्य झाली आणि त्याचे वेगवेगळे वापर कसे शक्य झाले, याविषयीची आपली माहिती मात्र त्या आरशांवर आपल्या श्वासोच्छ्वासाची वाफ सोडल्यावर अंधुक होणार्‍या प्रतिबिंबासारखी धूसरच राहिली आहे. गेली जवळजवळ सात हजार वर्षं आपली साथ करणार्‍या आणि आपलं आयुष्य उजळवून टाकणार्‍या या आरशांचा इतिहासही त्या कॅलिडोस्कोपमधल्या आकृतीबंधांइतकाच रंजक आहे.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…