संत एकनाथांचे अभंग, स्वरूप व समीक्षा (पुस्तक परिचय)
लेखक : डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे
प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी `संत एकनाथांचे अभंग, स्वरूप समीक्षा हा ग्रंथ लिहून मराठी संतसाहित्याच्या समीक्षेतील एक रिकामी जागा भरून काढण्याचे श्रेय अभ्यासाने प्राप्त केले आहे. रिकामी जागा भरली असे म्हणण्याचे कारण असे आहे, की अनेक अभ्यासकांनी नाथांच्या विविध साहित्यांवर साक्षेपी लिखाण केले आहे. प्रा. पुरोहित यांनी श्रीधरीटीका व एकनाथी भागवत यांचा तुलनात्मक अभ्यास केला. श्री. रं. कुलकर्णी यांनी `नाथांचा भागवतधर्म’ असा प्रबंध सादर केला. डॉ. व. स. जोशी यांनी भावार्थ रामायणावर प्रबंध लिहून विद्यावाचस्पती ही मानाची पदवी मिळविली. याशिवाय मराठी वाङ्मयाच्या इतिहासकारांनी त्यांच्या वाङ्मयावर व कार्यावर सकस चर्चा केली. इतके होऊनही नाथांच्या अभंग वाङ्मयाच्या वाटेला कोणी गेले नाही आणि हे धाडस डॉ. पाखमोडे यांनी केले व ते समर्थपणे पार पाडले. नागपूर विद्यापीठाला पीएचडीसाठी सादर केलेला हा ग्रंथच आज आपणासमोर नेटक्या अवस्थेत आला आहे.
डॉ. महोदयांनी ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात नाथांच्या चरित्रातील आणि नाथांशी संबंधित अनेक घटनांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. त्यात नाथांचा जन्मशक, नाथांचा नातू महाकवी मुक्तेश्वर पैठण सोडून तेरवाडला का गेला, याची संभाव्य कारणे नाथांच्या वठार शाखेचा ऊहापोह करून त्यातील ग्राह्याग्राह्यतेची साधार चर्चा केली आहे. यातील आनंदाची गोष्ट अशी आहे, की नाथांच्या या शाखेचे वंशज आज पुण्यात मुक्काम करून आहेत. या शाखेसंबंधी व्यक्त झालेली सर्व अनुकूल व प्रतिकूल मते त्यांनी एकत्रित करून छापली आहेत. महिपती, केशव व जगदानंद हे नाथांचे तीन प्राचीन चरित्रकार असून त्यांनी विठ्ठल, केशव व श्रीखंड्या यांचे उल्लेख
केले आहेत; पण काही आधुनिक अभ्यासक त्यांच्याकडे शंकित मुद्रेने पाहतात; परंतु हे पुरुष काल्पनिक नसून
खरोखरीच होते, याचा वाङ्मयीन पुरावाही डॉ. पाखमोडे यांनी उपलब्ध करून दिला आहे. अभ्यासकांनी त्याचा विचार करावा असे वाटते.
नाथांनी अभंगांची रचना करताना कोणकोणत्या मुद्रा वापरल्या? गाथेत येणाऱया मुद्रांचे सर्व अभंग त्यांचे आहेत काय? अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांची चर्चा ग्रंथात आढळते. गावबाने नाथांचे भावार्थ रामायण पूर्ण केले; पण मुद्रा मात्र एकाजनार्दन हीच वापरली. त्यामुळे डॉ. पाखमोडे यांची शंका विचारांना प्रवृत्त करणारी आहे, हे मान्य करावे लागते. तसेच नाथांनी कोणत्या काळात कोणते अभंग लिहिले असावेत, हे ठरविणेही दुरापास्त आहे; पण काही मुद्रांच्या आधारे डॉक्टरांनी अशी संगती लावण्याचा एक उपक्रम केला आहे.
श्री निवृत्तीनाथांच्या स्तुतीपर अभंगांची रचना त्यांच्या मते चतुःश्लोकी भागवताच्या रचनेपूर्वी झाली असावी. कारण चतुःश्लोकी भागवत हा त्यांचा पहिला ग्रंथ असून त्याचा काळ शके १४७५-७६ असा आहे. म्हणजे त्याच्यापूर्वी काही महिने या स्तुतीपर अभंगांची रचना केली. रचनांच्या कालाचा शोध हे संभवनीय सत्य ठरणार असले, तरी ते संभवनीय आहे, हे विसरून चालणार नाही. गोंधळेकर व गोडबोले यांनी सन १८९३ मध्ये एकनाथांच्या अभंगांची पहिली गाथा प्रकाशित केली. सन १८९३ पासून पुढे प्रकाशित झालेल्या नाथांच्या सर्व गाथांसंबंधी लेखकाने घेतलेला आढावा संतसाहित्याच्या प्रकाशनाचा एक लघुइतिहास ठरावा इतका मोलाचा आहे. त्यात मूळ संहिता, पाठांतरित संहिता, त्यामुळे होणारे पाठभेद, त्यातून स्वाभाविकपणे निर्माण झालेली टीपांची, अर्थाची पद्धत आणि मूळ संहितेकडे जाणारी संपादकांची तळमळ दिसून येते. याच काळात पाठसंशोधनाच्या क्षेत्रात अद्भुत कार्य करणाऱया डॉ. रा. गो. भांडारकर यांचा कळत नकळत कसा उपयोग झाला, हे सांगताना लेखकांनी चौकसदृष्टी दाखवून दिली. अभंगाची समीक्षा न्याहाळत असताना त्या समीक्षेला आधारभूत ठरणाऱया वर्गीकरणाकडे पाहावे लागते. तुकाराम तात्या संपादित गाथेत अभंगांचे वर्गीकरण 89 भागांत केले आहे. हेच या गाथेचे समीक्षेच्या दृष्टीने मोठे वैशिष्ट्य आहे. अभंगांचे वर्गीकरण जितके अधिक तितके आकलनाला अभंग सोपे ठरतात. डॉ. पाखमोडे यांचा सारा भर वर्गीकरणाद्वारे अभंग समजावून सांगण्याकडे आहे.
त्यांचे एकेका वर्गीकरणावरील लिखाण म्हणजे एकेक लघुनिबंध ठरावा असे आहे. हे सारे खरे असले तरी लेखक महाशयांनी नाथांचा गाथा सोडून थोडे बाहेर यायला पाहिजे, असे नम्रतेने सुचवावेसे वाटते. नाथांपूर्वी ज्ञानदेव, नामदेव यांसारखे मोठे कवी होऊन गेले आहेत. नाथांचे भागवत वाचताना तर पदोपदी ज्ञानदेवांची आठवण होते. हाच प्रकार त्यांनी नाथांच्या अभंगातून स्पष्ट करून दाखविला असता तर पुढच्या पिढ्यांचा रस्ता अधिक उजळून निघाला असता; पण तरीही डॉ. पाखमोडे यांनी जे कार्य केले आहे ते कमी मोलाचे निश्चित नाही.
ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची या ग्रंथाला लाभलेली विवेचक प्रस्तावना ही ग्रंथाची उंची वाढविणारी आहे.
संत एकनाथांचे अभंग, स्वरूप व समीक्षा
लेखक : डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे,
विजय प्रकाशन, नागपूर : ४४००१२
पाने : २६०,
किंमत : रुपये २६०/-
—
Leave a Reply