नवीन लेखन...

व्यासंगाने घडविलेली प्रगल्भ काव्ययात्रा



`श्री राम शेवाळकर यांनी करुन दिलेला पुस्तक परिचय

डॉ. स. रा. गाडगीळ हे एक व्यासंगवेडे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे अवघे आयुष्य शालेय व महाविद्यालयीन

स्तरावर अध्यापन करण्यात व्यतीत झाले. निर्वाहाची सक्ती म्हणून नव्हे; पण व्यासंग ही गाडगीळांची वृत्तीच आहे. अध्यापन विषय झालेले पुस्तक, ते लिहिणारा लेखक, तो वाङ्मयप्रकार यांचा सर्वांगीण अभ्यास करून त्या कोंदणात ते विशिष्ट पुस्तक बसवण्याची त्यांची सवय होती.

गाडगीळांना खरी आवड नाट्य व संगीत या दोन कलांची होती. देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या `लोकायत’ या ग्रंथात मांडलेल्या दृष्टिकोनामुळे प्राचीन संचिताकडे पाहण्याचे नवे डोळे लाभल्याचा आनंद त्यांना मिळाला व त्या प्रकाशात संस्कृती किंवा साहित्यक्षेत्रातील वर्षानुवर्षांपासून उलगडता न आलेली प्रस्थापित गूढे त्यांच्या विचक्षणेला खुणावू लागली. परिणामी, गाडगीळांच्या विवेचनामध्ये नव्हे, तर लेखनामध्येही एक नवे अवसान आले. त्यांचे बहुतेक मूल्यवान व मूल्यगर्भ लेखन विश्रांत वयातच झाले आहे. ते आरंभापासूनच वाम विचारसरणीचे आहेत. त्यामुळे भावनानिरपेक्ष चिकित्सक बुद्धी त्यांच्याजवळ होतीच. पां. वा. गाडगीळ यांच्या `द्रव्योपनिषद’च्या अनुवादामध्ये डॉ. स. रा. गाडगीळांचाही सहयोग होता. देवीप्रसादांच्या `लोकायत’चा मराठीमध्ये ग्रंथरूपाने पहिला परिचय गाडगीळांनीच करून दिला. खुद्द ज्ञानेश्वरांना प्रेरक ठरलेल्या तत्कालीन सामाजिक वास्तवाचा व त्याच्या सृजनशील मनावर होणाऱया परिणामांचा शोध त्यांनी घेतला. इंदिरा संतांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून निवडणुकीच्या राजकारणामुळे वंचित राहावे लागले. यामुळे व्यथित होऊन गाडगीळांनी इंदिराबाईंच्या समग्र काव्यविश्वाचा सामर्थ्यपट उलगडून दाखवणारा आपला अभ्यास एका स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने सादर केला व तात्कालिक महत्त्वाच्या संमेलनाध्यपदापेक्षा इंदिराबाईंचे काव्यवैभव श्रेष्ठ असल्याचा निर्वाळ त्यात मांडला. गाडगीळांचा शोकात्म वाङ्मयाची चिकित्सा करणारा अभ्यास तर मराठी समीक्षा विचारात अतिशय

महत्त्वाचा ठरला आहे.

आता `मराठी काव्याचे मानदंड’ अधोरेखित करणारे नवे विवेचन घेऊन मराठी अभ्यासकांसमोर ते आले आहेत. गाडगीळ आता नव्वदीच्या घरात आहेत. वैचारिक व कौटुंबिक जीवनातले अत्यंत दुर्धर आघात पचवून, त्यांची एवढीशीही झळ ज्वलंत ज्ञाननिष्ठेला लागू न देण्याची काळजी घेत अपराजित वृत्तीने ते शतायुषी वाटचाल करीत आहेत. पहिल्या खंडात त्यांनी जुन्या कवींचा परामर्श घेतला असून, त्यात ज्ञानेश्वर, नामदेव, समकालीन संत कवी, एकनाथ, तुकाराम आणि केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज आणि तांबे अशा जवळजवळ बारा सारस्वतभूषणांची काव्ययात्रा घडवून आणली आहे, तर दुसऱया खंडात कविवर्य अनिल, कांत, कुसुमाग्रज, मर्ढेकर, विंदा करंदीकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, इंदिरा संत या आठ कवींचा काव्यविर्मश शब्दांकित केला आहे. या नावांवरून गाडगीळप्रणीत मानदंडाचे निकष आपल्या ध्यानी येतात. मराठी काव्याच्या आशयात ब्रीदाचा व अभिव्यक्ती परिवर्तन घडवून आणणाऱया प्रतिभाधर्माचा शोध गाडगीळांना घ्यायचा आहे. यात रामदास, बी कवी व स्वा. सावरकर यांचाही अंतर्भाव असणे आवश्यक असल्याचे काही अभ्यासकांना वाटणे शक्य आहे.

तुकारामांवर लिहिताना द्वैताद्वैताबद्दलच्या गाडगीळांच्या कल्पना धूसर आहेत, असे वाटते. त्या पुरेशा स्पष्ट नाहीत आणि आपल्या अशा कल्पनांसाठी `अद्वैताची वाणी। नाही ऐकत मी कानी’ अशी खुद्द तुकारामांचीच साक्ष त्यांनी काढली आहे. अद्वैत आणि चिद्विलासवाद या संकल्पनांबद्दलही त्यांनी मतभेद नोंदविला आहे. तरी पण तत्त्वज्ञानविषयक या मदभेदाला महत्त्व देण्याची गरज नाही. कारण गाडगीळ काव्यावर लिहीत आहेत, हे विसरून चालणार नाही. तुकारामानंतर तंतकाव्याचाही ओझरता परामर्श घेतला असता तर चांगले झाले असते. कारण शाहिरी कविता ही खऱया अर्थाने स्वयंभू मराठी कविता आहे.

दुसऱया खंडातील आठही कवी अर्वाचीन आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी प्रचलित मराठी काव्यावर पृथगात्म प्रतिभेचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे मराठी कवितेला वेगळे वळण मिळवून देण्यातही याच कवींचा प्रभाव प्रेरक ठरला आहे. अभिव्यक्तीच्या क्षेत्राला अनिलांचा मुक्तछंदाचा प्रवेश हा ओघावेगळा सामाजिक आशय व्यक्त करण्याच्या दृष्टीने पूरक ठरला आहे. आरंभीचे सांकेतिकतेपासून अलिप्त असणारे प्रीतीगुंजन करणारे त्यांचे काव्य `प्रीति तुझी माझी नाही निराळेपणाची। जगातल्या सुखदुःखी मिळालेपणाची’ असे व्यापक होत होत विश्वाच्या क्षितिजांना स्पर्श करू लागले.

या मानदंडात गाडगीळांनी कविवर्य कांत व शरच्चंद्र मुक्तीबोध यांचाही समावेश केला. ही त्यांच्या उदार काव्यदृष्टीची एका आशादायक चुणूक आहे. कांत मूळचे मराठवाड्यातील असल्यामुळे व त्यांचे बव्हंशी आयुष्य निजामशाहीत गेल्यामुळे महाराष्ट>ाला त्यांच्या प्रतिभेचा पुरेसा परिचय नव्हता. कविता उपेक्षित व्हायला प्रादेशिक दूरस्थपण किंवा तुटलेपणसुद्धा कसे कारणीभूत होते ते ना. घ. देशपांडे, भा. रा. लोवलेकर, बी. रघुनाथ या उदाहरणांवरून लक्षात येते.

विसाव्या शतकातल्या ज्या नव्या विचारदृष्टीने युगावर प्रभाव टाकला, त्यातील मार्क्सचे योगदान फार मोठे आहे. त्याचा प्रभाव ओघानेच संवेदनशील मनांवर आणि काव्यांवर पडणे स्वाभाविक होते. अशा वेगळ्या वाटेने जाणाऱया कवितेचा सशक्त प्रणेता म्हणून मुक्तीबोधांचे नाव घ्यावे लागेल. मुक्तीबोधांनी निसर्गाच्या व त्याच्या माध्यमातून प्रेमाच्याही कविता लिहिल्या आहेत. आशय व अभिव्यक्ती या दोन्ही बाबतीत मर्ढेकर व मुक्तीबोध यांचा वारसा काव्यनिष्ठ भूमिकेतून विंदा करंदीकरांच्या प्रतिभेने अधिक उज्जवल केला. त्यांच्या विज्ञान कविता, बालगीते, तालचित्रे, यंत्रयुगाचे स्तोत्र आणि विशेषत त्यांची अष्टदर्शने यामुळे मराठी कवितेला विविध समर्थ आयाम प्राप्त झाले, हे कृतज्ञपणे मान्य केले पाहिजे.

ज्ञानेश्वरांपासून नारायण सुर्व्यांपर्यंतच्या मराठी कवितेतील षोडष कलांचा अभ्यास सादर करताना डॉ. गाडगीळांना केवढा विशाल व्यासंग करावा लागला असेल? या लेखांमधले त्यांचे विवेचन व त्यांची विशेषत निरीक्षणे त्यांच्या वेगळ्या चिंतनाने वजनदार झाली आहेत.

या मानदंडांची संख्या ठरविण्याचे, निकष निश्चित करण्याचे कवींची निवड करण्याचे त्यांचे स्वातंत्र्य

मान्य करून या निवडीमागे असलेली त्यांची निश्चित दृष्टीही विचारार्ह असल्याचे लक्षात घ्यावे लागेल.

केवशसुत, अनिल, कांत, कुसुमाग्रज, मर्ढेकर, मुक्तीबोध, करंदीकर, सुर्वे यांना या विराट आटोपात अग्रस्थान मिळणे अपेक्षितच होते; पण त्याचबरोबर बालकवी, गोविंदाग्रज, तांबे, इंदिरा संत यांनाही त्यांच्या विवेचनामध्ये मानाचे स्थान मिळणे खऱया रसिकाला निश्चितच स्वागतार्ह वाटेल. स्वत लेखकाची बांधिलकी कोणतीही असो, कोणाच्याही काव्यकृतीला निखळ काव्यकृती म्हणूनच सामोरे जाण्याची आपली वृत्ती त्यांनी निरभ्र ठेवली आहे, हे महत्त्वाचे आहे.

`


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..