नवीन लेखन...

लाचार, मुर्दाड की दिशाहीन ?

जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्‍यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्‍यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्‍यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!

एखादी वर्तुळाकार वस्तू स्वत:भोवती फिरत असताना त्या वस्तूच्या परिघावर वेगाची गती जितकी तीऋण असते तितकी ती वस्तूच्या केंद्राजवळ नसते. अगदी केंद्रबिंदूवर तर ती गती शून्यच असते. हा नियम भौतिक असला तरी मानवी मनाशीसुद्धा त्याचा कुठेतरी संबंध असलाच पाहिजे, अन्यथा ज्या वेगाने पृथ्वीच्या पाठीवर भौतिक बदल घडून येत आहेत त्याच वेगाने मनुष्याचे अंतरंगसुद्धा बदललेले असते, परंतु तसे झालेले नाही. आमची बौद्धिक प्रगती २१ व्या शतकाचा मान वाढविणारी असली तरी आमची मानसिकता मात्र आम्ही अद्यापही १६ व्या शतकातच जगत असल्याचे स्पष्ट करणारी आहे. खून, दरोडे, लूटपाट, धार्मिक-जातीय हिंसा, पशुलाही लाजवेल असे क्रूर गुन्हे, कमालीची स्वार्थलोलुपता, प्रचंड भ्रष्टाचार आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे हे सगळं सहन करणारी जनतेची सोशिकवृत्ती हे सिद्ध करते, की आमच्या भौतिक बदलाचा प्रचंड वेग केवळ परिघापुरताच मर्यादित राहिला आहे. या वेगाचा किंचितही परिणाम केंद्रस्थानी असलेल्या मनुष्याच्या मनोवृत्तीवर झालेला नाही. किमान आपल्या देशात तरी असेच चित्र आहे. राजा म्हणजे ईश्वराचा अवतार, राजात ईश्वरी अंश असतो, त्यामुळे तो कधीच चुकत नाही, तो म्हणेल तीच पूर्वदिशा. या पहिल्या-दुसर्‍या शतकातल्या मानसिकतेतून भारतीय जनमानस आज २१ व्या शतकातही बाहेर पडू शकलेले नाही. आता राजाची जागा लोकनियुक्त सरकारने घेतली असली तरी प्रजेला “नागरिक” बनता आलेले नाही. एका सार्वभौम आणि लोकशाही शासनपद्धती असलेल्या देशात आजही कुणाची तरी गुलामी स्वीकारणारी “प्रजावृत्ती” कायम आहे.

लोकशाहीत प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र, सार्वभौम असतो. सरकार ही यंत्रणा केवळ व्यवस्थेचा एक भाग आहे. सरकार म्हणजे राजा किंवा मालक नव्हे; परंतु स्वत:च्या स्वातंत्र्याची, अधिकाराची जाणीव असलेला नागरिक बनणे भारतीय लोकांना जमलेले नाही. पूर्वी राजा म्हणेल ती पूर्वदिशा असायची, आज सरकार म्हणेल त्यावर मान डोलावली जाते. लोकशाहीने प्रदान केलेल्या स्वत:च्या हक्कांबाबत सर्वसामान्य माणूस इतका उदासीन आहे, की आपल्यावर अन्याय होतो याचीही त्याला जाणीव नाही. सध्या राज्यात विजेचे भारनियमन सुरू आहे. या विजेचा तुटवडा कशामुळे निर्माण झाला, पूर्वी मुबलक असणारी वीज आताच कशी पाहुण्यासारखी येत-जात राहते, हा प्रश्न कोणाला पडत नाही. सरकार सांगते, विजेचा तुटवडा आहे आणि त्यामुळेच भारनियमन करावे लागत आहे आणि आम्ही मुकाटपणे सरकारचे म्हणणे समजून घेतो. सरकारला जाब विचारायला कुणी तयार नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत, परंतु कुणाला त्याचे सोयरसुतक नाही. शेतकर्‍यांना आत्महत्या का करावी लागते, हा प्रश्न कुणाला पडत नाही. कालपरवापर्यंत देशवासीयांच्या पोटाची भूक सहज भागविणारा शेतकरी आज अचानक उपाशीपोटी का मरायला लागला, याचा जाब सरकारला विचारायची गरज कुणाला वाटत नाही. सरकार सांगते, आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आहे म्हणून शेतकर्‍यांना शेतमालाचा योग्य भाव मिळत नाही आणि आम्ही सरकारची ही बनवाबनवी खुशाल खपवून घेतो. राज्यात दुष्काळ पडला आहे, अर्धा महाराष्ट्र पिण्याच्या पाण्यासाठी तरसतो आहे तरी जनता पेटून उठत नाही. शेकडो सिंचन प्रकल्प अपूर्ण का राहिले, जनतेच्या निढळाचा पैसा या प्रकल्पासाठी वापरला गेला, तो प्रचंड पैसा शेवटी गेला कुठे, याचा जाब विचारायला कुणी तयार नाही. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, सार्वजनिक सुविधांचा पत्ताच नाही, रस्त्यावर खांब आहेत परंतु त्यावरचे दिवे जळत नाही, सार्वजनिक प्रसाधन गृहांची अवस्था तर अतिशय भयंकर आहे. दवाखाने आहेत तर डॉक्टर नाही, पाण्याच्या टाक्या आहेत, परंतु पाणी नाही. कार्यालये आहेत, परंतु कर्मचारी गायब आहेत. शाळा आहेत, परंतु गुरुजन वर्ग भलत्याच कामात गुंतलेले आहेत. खरेतर ही यादी खूप लांबवता येईल. समस्यांची कमतरता नाही. प्रत्येक माणसामागे एक या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या दूर करणार कोण? शासन-प्रशासनाची ही जबाबदारी त्यांच्या लक्षात कोण आणून देणार? एकाही प्रश्नावर जनतेला पेटून उठावेसे वाटत नाही का? सरकार करते ते योग्यच आहे, आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे, या मुर्दाड मानसिकतेतून जनता कधीच बाहेर पडणार नाही का?

एखाद्या तीर्थयात्रेला, एखाद्या महाराजांच्या प्रवचनाला हजारोंनी गर्दी करणारे नळाला पाणी नाही, वीज नाही, आरोग्यसुविधा नाही म्हणून संबंधित अधिकार्‍याच्या किंवा जनप्रतिनिधींच्या घरावर कधी मोर्चा नेत नाहीत. आपणच कराच्या रूपाने दिलेल्या पैशाचा अपहार करणार्‍यांना कोणी खडसावून जाब विचारत नाही. जनता मुर्दाड झाली आहे की लाचार? तसे पाहिले तर लोक मुर्दाड आहेत असे म्हणता येणार नाही. लोक केवळ पेटूनच उठत नाहीत, तर रस्त्यात येईल ते पेटवतसुद्धा सुटतात, परंतु त्यांचे हे पेटणे आणि पेटविणे त्यांच्या हक्कासाठी नसते. कुणी एखादा वेडा एखाद्या पुतळ्याची विटंबना करतो, कुणीतरी एखादा अर्धवट कुणाच्या तरी जातीय भावना दुखवणारे वक्तव्य करतो, कुणाची तरी कोणत्या तरी रंगावरची श्रद्धा दुखविली जाते आणि क्षणार्धात बेभान जमाव हिंसक बनून रस्त्यावर उतरतो. जाळपोळीला, लुटमारीला ऊत येतो. मुर्दाड माणसं हे करू शकत नाही. त्यामुळे जनता मुर्दाड आहे असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. फक्त पेटून कशासाठी उठायचे याची जाणीव जनतेला नाही. आपल्या चिल्ल्यापिल्यांना पोटभर जेवायला मिळत नाही म्हणून कोणी पेटून उठत नाही. त्याचवेळी जर त्याच्या श्रद्धास्थानाचा कोणी अपमान केला तर मात्र हाच उपाशी माणूस हाती दगड घेऊन रस्त्यावर येतो. ही कसली जागरूकता? हा कसला जिवंतपणा? भावनात्मक मुद्यावर मरायला-मारायला उठणारा माणूस सरकारच्या, जनप्रतिनिधीच्या, सरकारी नोकरशाहीच्या प्रचंड अन्यायाला मात्र मूकपणे सामोरा जातो, हे विपरीत चित्र दुर्दैवीच म्हणायला पाहिजे. सत्संगात अध्यात्मिक सुखासाठी गर्दी करणार्‍याला अध्यात्मिक सुखाचा पाया असलेल्या प्राथमिक भौतिक गरजांची जाणीवही नसावी, कुणाच्यातरी अन्यायामुळे या गरजांना आपण पारखे होत आहोत, आपला नैसर्गिक आणि न्यायोचित हक्क डावलला जात आहे, हे कळू नये इतके लोकं मूढ का झाले आहेत?

जनतेने आपल्याविरुद्ध बंड करून उठू नये म्हणून सरकार नेहमीच जनतेची दिशाभूल करीत असते. ही दिशाभूल आम्हाला समजत असतानादेखील आम्ही सरकारच्या धूळफेकीकडे दुर्लक्ष करीत असू तर ही आमची लाचारीच म्हणायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पुरविणे विद्यमान शासनप्रणालीत सरकारचे कर्तव्य आहे. सरकार आपले कर्तव्य पार पाडीत नसेल तर सरकारला जाब विचारणे आपले कर्तव्य आहे, परंतु इथे तर परिस्थिती अशी आहे, की अन्न-पाण्यापेक्षा आम्हाला मंदीर-मशीद मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. आरोग्य -शिक्षणापेक्षा एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला कोणाचे नाव द्यावे, यावर अधिक रणकंदन होते. आम्हालाच आमच्या हक्कांची जाणीव नसेल तर सरकारने तरी कर्तव्याची जाणीव का बाळगावी? शेवटी जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्‍यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्‍यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्‍यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!

जुने प्रहार वाचण्याकरिता:फेसबुकवर प्रकाश पोहरे टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: prakash.pgp@gmail.com
Mobile No. ९१-९८२२५९३९२१

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..