रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल

काश्मीर खोर्‍यात ‘१९९०’ची पुनरावृत्ती ?

अजूनही आठ जिल्ह्यांत संचारबंदी लागू असलेल्या हिंसाग्रस्त जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे तीव्र पडसाद सोमवारी राजधानीतही उमटले. किश्तवाड हिंसाचारावरून जम्मू-काश्मीरचे गृहराज्यमंत्री सज्जाद किचलू यांनी राजीनामा दिला. किचलूंवर दंगल भडकावल्याचा आरोप होता.आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारात तीनजण ठार, ६८ दुकाने, सात हॉटेल आणि ३५ वाहने जाळली गेली.कश्मीरी पंडीताना खोर्‍यातून हद्दपार करण्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे.
पद्धतशीर योजना आखून हजारो कश्मिरी पंडितांना यापूर्वीच राज्याबाहेर पळवून लावले गेले. शेकडो पंडितांची हत्या केली गेली. ‘तुमच्या मुली-बाळं आणि मालमत्ता इथेच सोडून चालते व्हा’, असे फर्मान सोडणारी पोस्टर्स कश्मिरी पंडितांच्या घरांवर चिटकवली गेली. अब्रूच्या भयाने कश्मिरी पंडित आपले सर्वस्व सोडून आज निर्वासितांच्या छावण्यांमध्ये विपन्नावस्थेत लाचारीचे जिणे जगत आहेत. सुमारे दोन लाख पंडितांपैकी केवळ आठशे कश्मिरी पंडितांची कुटुंबे तेथे उरली आहेत. कश्मिरी पंडितांना राज्यातून बेदखल केल्यानंतर आता जम्मू व आसपासच्या जिल्ह्यांतील हिंदूंना ‘टार्गेट’ करण्याचा कट कश्मिरी फ़ुटीर वाद्यानी आखलेला दिसतो.
संसदेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत केंद्र सरकारला घेरलं. ‘किश्तवाडमध्ये किमान आठ तास दंगल सुरू होती. यावेळी तिथे अराजक माजल्याची स्थीती निर्माण झाली होती. लोकं मदतीची याचना करत असताना तेथील प्रशासन मात्र, निमूटपणे बघत होतं, या दंगलीमागे पाक पुरस्कृत फुटिर गटांचा हात असावा. सरकारनं दंगलखोरांविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी पक्षानी संसदेत केली.
गृहमंत्र्यांचे उत्तर
राज्य मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. त्याच वेळी १९९०ची पुनरावृत्ती होऊ न देण्याची ग्वाही देशाचे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी संसदेत दिली. आम्ही जबरदस्तीचे पलायन आणि पुनर्वसन घडू देणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले. १९९० मध्ये खोर्‍यातील काश्मिरी पंडितांना तेथून स्थलांतरण करण्यास भाग पाडले होते.पी. चिदंबरम यांनी राष्ट्रविरोधी घोषणांमुळेच दंगल भडकल्याचे मान्य केले. याउलट मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अशा घोषणा तर २०-२२ वर्षांपासून सुरू असल्याचे सांगत यात ‘नवे काय?’ असा प्रश्न केला.
ईदचा जुलूस निघाला तेव्हा भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. स्थानिक लोकांनी विरोध केल्यानंतर या भागात दंगल भडकली. सकाळी साडेदहा वाजता हिंसाचार सुरू झाला. तातडीने दुपारपर्यंत लष्कराला या भागात पाचारण करण्यात आले. मात्र लष्कराने सायंकाळी आठ तासा नंतर ध्वजसंचलन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटलीना किश्तवाडला जाण्यास बंदी घातली. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनाही मज्जाव करण्यात आला. उद्या पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री किश्तवाडच्या भेटीसाठी निघाले तर अब्दुल्ला यांचे सरकार त्यांनाही रोखणार काय? सरकार राष्ट्रद्रोह्यांना रान मोकळे सोडत असून देशभक्तांनाच मज्जाव करीत आहे.
किश्तवाड दंगल
जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ९ ऑगस्ट रोजी म्हणजे ईदच्या दिवशी ‘जुम्म्या’चा नमाज पढून मशिदीबाहेर पडलेल्या जमावाने अचानक हिंदू धर्मीयांच्या घरादारांवर हल्ले सुरू केले. जमावाने अख्खे किश्तवाड शहर पेटवले. हिंदू व्यापार्‍यांची दुकाने पेटवण्यात आली. शेकडो घरे आणि हॉटेल्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत मुस्लिमांचा जमाव हिंदूंवर तुटून पडला. किश्तवाडमधील या हिंसाचारात तीन जण मरण पावल्याचे तेथील सरकार सांगत असले तरी घातलेला धुमाकूळ पाहता मृतांचा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.
शहर लष्कराच्या ताब्यात दिल्यामुळे शांतता पसरली असली तरी समाजातील दोन गटातला धुमसता असंतोष कधीही उफाळून येऊ शकतो आणि पुन्हा दंगल पेटू शकते. या राज्यामध्ये सुरक्षा जवानांच्या विरोधातली निदर्शने, निदर्शकांवर होणारा लाठीमार, गोळीबार आदी प्रकार सुरूच असतात. या वेळी दंगलखोरांनी पोलिसांची शत्रे चोरलेली आहेत. जम्मू भागात लोकांना अतिरेक्यांपासून स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी ग्राम सुरक्षा समिती स्थापलेल्या आहेत आणि या समितीच्या सदस्यांना बंदुका देण्यात आलेल्या आहेत. या बंदुका जुन्या बनावटीच्या म्हणजे पॉइंट ३०३ च्या आहेत. परंतु किश्तवाडच्या दंगलीमध्ये जमावाने परस्परांवर गोळीबार केलेला आहे आणि त्यासाठी १२ बोअरच्या बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या दिसत आहेत. याचा अर्थ ग्राम सुरक्षा समितीच्या आणि या चोरलेल्या बंदुकांचा वापर दंगल करणार्‍या जमावांनी केलेला आहे. काल हुरियत कॉन्फरन्सच्या एका गटाने किश्तवाड दंगलीच्या निषेधार्थ काश्मीर खोर्‍यात बंदचे आवाहन केले. दुसर्‍या बाजूला जम्मू भागात आम जनतेने बंद केला आहे. दोन्ही भागांत बंद पाळण्यात आल्यामुळे पूर्ण राज्यातच तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दंगल ही पूर्वनियोजित असण्याची शक्यता
रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे असे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला म्हणाले, दंगलीच्या आदल्या दिवशी शस्त्रास्त्रांचे एक दुकान लुटण्यात आले होते. त्यामुळे शक्यता आहे, की ही दंगल पूर्वनियोजित होते. लष्कराला पाचारण करताच सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी राज्यात २००८ सारखे वातावरण तयार करण्याचा प्रय़त्न करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, शांततेसाठी प्रयत्न करावेत. दंगलीच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांचा अहवाल येणे जरूरीचे आहे. यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.
नियंत्रण रेषेवर घुसखोरी आणि गोळीबार करणार्‍या पाकिस्तानने आज जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड येथील दंगलीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. किश्तवाड दंगलीतील हिंसा आणि हुर्रियत नेत्यांना झालेल्या अटकेबद्दल पाकिस्तानला चिंता वाटते आहे. किश्तवाडमधील दंगलीनंतर जातीय तणावाच्या अफवा पसरून जम्मू-कश्मीरातील वातावरण अधिक बिघडू नये यासाठी राज्य सरकारने इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.मात्र उमर अब्दुल्ला ट्विटर सोशल मिडीया मधुन आपल्याला सोयिसकर अफ़वा मात्र पसरवत होते.
जम्मू, राजौरीसह सात जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू
किश्तवाडमधील हिंदूंची घरेदारे पेटवून घडवलेल्या भीषण दंगलीचे लोण संपूर्ण जम्मू-उधमपुरमध्ये पसरले. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. रस्त्यावर उतरलेल्या आक्रमक टोळक्याबरोबरच पोलीस आणि राखीव दलाच्या जवानांशीही ठिकठिकाणी चकमकी झडल्या. जबाबाचे पडसाद जम्मू विभागातील गावागावांत उमटले. दंगलीचा हा भडका संपूर्ण राज्यात पसरू लागल्यामुळे जम्मू, राजौरीसह एकंदर आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फ़ुटिरवाद्यांनी भारतविरोधी घोषणा देत किश्तवाडमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर त्याचे पडसाद जम्मू विभागातील हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये उमटले. जम्मूमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे. किश्तवाडमधील दंगलीला आता प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावांत रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिल्यामुळे पोलीस आणि जम्मू-कश्मीर सरकारची भंबेरी उडाली. दंगलीच्या निषेधार्थ आंदोलने करण्यासाठी अनेक ठिकाणी जमाव संचारबंदी झुगारून मैदानात उतरले व ठिकठिकाणी आक्रमक निदर्शने सुरू झाली.
त्यामुळे आधीच संचारबंदी लागू केलेल्या जम्मू आणि राजौरी जिल्ह्यात आता लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. उधमपूर, संबा, कथुआ, भदेरवाह, दोडा इथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कथुआ, संबा, रियासी, कटरा, उधमपूर, चेनानी, पूंछ, विजयपूर, अखनूर, सुंदरबनी, कालाकोट, नौसेरा, आर.एस. पुरा, रामनगर या भागांमध्ये कडकडीत बंद होता. जम्मू शहरात अब्दुल्ला सरकारविरोधात जोरदार नारेबाजी करीत रस्त्यावर जागोजागी जळते टायर टाकले होते. तर राजौरी, रामबन आणि दोडा या भागांत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
काय करावे
किश्तवाडचा हिंसाचार हा केवळ एका भागातील हिंसाचार म्हणून पाहिला तर फार चिंतेचा विषय नाही. पण, तीन दिवसांत तीन वेळा पाकिस्तानकडून संघर्षविरामाचे उल्लंघन होणे, चीनने सातत्याने कुरापती काढणे, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी भारतावर हल्ल्याच्या योजना लाहोरच्या मैदानात जाहीरपणे सांगितल्या जाणे, हे विषय एकत्रितपणे अभ्यासले, तर किश्तवाड दंगल फार मोठ्या चिंतेचा हा विषय आहे. ही घटनांची मालिका स्थानिक पातळीवर ठरविली गेलेली नाही, याचाही यातून खुलासा व्हावा. किश्तवाड हे संपूर्ण भारतावरचे संकट आहे. आपल्या सभोवताली होणार्‍या घडामोडींपासून सुद्धा आता सावध असले पाहिजे.
आधी पाकिस्तानी लष्कराच्या आगळिकीमुळे आणि आता जम्मूमधील हिंसाचाराच्या घटनांमुळे कश्मीर अशांत आहे. जम्मूतील हिंसाचारामागे हात असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळातील एका सहकार्‍यावर व्हावा आणि त्याने राजीनामा द्यावा हे धक्कादायकच आहे. काश्मीरचे गृहराज्यमंत्री सज्जाद अहमद किचलू यांनी दिलेला राजीनामा तडकाफडकी स्वीकारण्यात आल्याने त्यांच्याविषयीच्या संशयाला बळ येते.
किश्तवाड दंगलीत जम्मू-काश्मीर सरकारमधील उच्चपदस्थ अधिकार्‍यांचा हात असण्याची शक्यता आहे.
दंगलग्रस्तांना मदतीची गरज असताना तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोईस्कर डोळेझाक केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या दंगलीत शेकडो दुकाने, घरे यांना आग लावण्यात आली. अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्याची गरज आहे. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. दंगल पीडितांना आवश्यक मदत मिळायला हवी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संयुक्तपणे काम करून त्वरित काबूत आणावी अन्यथा तेथील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे.
काश्मिरी नागरिकांना हळूहळू देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हा दीर्घकालीन उपाय असला, तरी तोच एकमेव प्रभावी मार्ग आहे. हिंसाचाराला कंटाळून जम्मू-काश्मीरचा सामान्य नागरिकही देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटाचालीत सहभागी होत असल्याचे दृश्य अलीकडे निर्माण झाले होते. त्यामुळे काश्मीर थोडे शांत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत पुन्हा हिंसाचार वाढला आहे. २००९ साली युनोच्या एका समितीने केलेल्या पाहणीत पाकव्याप्त काश्मीरच्या तुलनेत भारताच्या ताब्यातील काश्मिरातील लोक कितीतरी पटीने सुखी आणि सुरक्षित आहेत, असा अहवाल सादर केला होता.
शत्रूशी एकवेळ लढताही येईल. पण, आपल्या लोकशाही प्रणालीत शिरलेल्या पाक हस्तकांशी लढेणे सोपे नाही. काश्मीरची प्रगती होणे अथवा हा भूभाग शांत असणे पाकिस्तानला परवडणारे नाही ; म्हणूनच निमित्त मिळताच पाकिस्तानी घुसखोर खोर्‍यातील शांतीच्या दहशतवादाची आग लावून देतात. जम्मूतील हिंसाचार हाही त्याच कटाचा एक भाग आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 285 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…