नवीन लेखन...

रणथंबोरच्या रानात – प्रवासवर्णन नव्हे

 

रणथंबोरच्या रानात (पुस्तक परिचय)लेखकः – दीपक दलाल

दीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले

यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते.

या लघुकांदबरीतील घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. काही रणथंबोरच्या रानात, काही दिल्लीत, तर काही राजस्थानातील एका संस्थानातील खेड्यात. या लघुकांदबरीची एकूण बारा प्रकरणे असून, लेखकाने प्रत्येक प्रकरणाला सूचक नाव दिले आहे. यातील कथा दोन पातळ्यांवर वाटचाल करते. काही प्रकरणांमध्ये रणथंबोरच्या अभयारण्यातील प्राणीजीवन वर्णन केले आहे, तर काहीत वन्यप्राण्यांवर प्रेम करणाऱया निसर्गप्रेमी मंडळींनी त्या प्राण्यांच्या बचावासाठी केलेले प्रयत्न याचे वर्णन आहे.

पूर्वकडील देशात वाघांच्या कातडीला आणि औषधांमध्ये वापरण्यात येणाऱया त्यांच्या हाडांना चांगली मागणी आहे. अशा गोष्टींचा व्यापार करणारे लोक खेडुतांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून, वाघांची हत्या घडवून आणतात. रणथंबोरच्या रानातही अशा हत्या घडवल्या जातात. ते पाहून `वाईल्ड लाईफ सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचे पदाधिकारी श्री. सिंगसाहेब अस्वस्थ झाले आहेत. ते आणि अभयारण्याचे प्रमुख श्री. रवी रेड्डी या हत्या थोपविण्याचा प्रयत्न करत असतात. सिंगसाहेबांचा निवासी शाळेत शिकणारा मुलगा विक्रम, त्याचा मित्र आदित्य आणि मैत्रीण आरती हे कळत नकळत या कामात त्यांना सहकार्य कसे करतात, त्यासंदर्भातील हकीगत येथे सांगितली. पहिल्याच प्रकरणात एका वाघिणीने दोन बछड्यांना दिलेला जन्म, त्यांचे पालनपोषण, त्या बछड्यांच्या क्रीडा, त्यांचे परस्परांवरील प्रेम, त्यांनी केलेली पहिली शिकार, वनअधिकाऱयांनी त्यांचे केलेले नामकरण याचे वर्णन आहे. त्यांनी नराचे `चेंगिज’ तर मादीचे `पद्मिनी’ असे नाव ठेवले

आहे. नंतरच्या काही प्रकरणांमध्ये चेंगिजवर लक्ष केंद्रित करून त्याची स्वभाववैशिष्ट्ये, त्याने केलेल्या शिकारी, सापळ्यात सापडून त्याचे जखमी होणे, वनाधिकाऱयांनी त्याला बेशुद्ध करून त्याच्यावर इलाज करणे, शिकारचोरांनी त्याला ठार करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातून निसर्गप्रेमींनी त्याची सुटका करणे, अशी घटनांची एक मालिकाच रेखाटली आहे. या घटना वर्णन करत असताना रानातील निसर्ग, वन्यजीवन यांची पार्श्वभूमी वर्णन करून सुरेख वातावरणनिमिती केली आहे. या लघुकांदबरीत अनेक चित्तथरारक घटना आल्या आहेत. सुट्टीत दिल्लीला आलेल्या आदित्यला-विक्रमच्या वडिलांकडून सिंगसाहेबांकडून देसाई आणि शंकरचंद या शिकारचोरांची आणि वाघाच्या कातडीचा व हाडांचा व्यापार करणाऱयांची माहिती मिळते. सिंगसाह
ेबांचा ड्रायव्हर सुखराम-अगोदर शंकरचंदकडे नोकरीत करत असतो. त्याच्या मदतीने आदित्य रात्रीच्या वेळी शंकरचंदच्या दिल्लीतल्या मोहिनीमहालात घुसतो आणि चोरट्या व्यापारासंबंधीची माहिती असलेली त्याची डायरी पळवतो. परगावी गेलेला शंकरचंद अचानक परतल्यामुळे, त्याची चांगलीच धावपळ होते; पण मोठ्या युक्तीने तो स्वतची सुटका करून घेतो. त्याच्या बुटांचा माग काढीत शंकरचंदची माणसे आदित्यच्या घरी पोचतात आणि त्याचे अपहरण करतात. त्याचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासी शाळेतील मैत्रिणीने- आरतीने सुखराम ड्रायव्हरच्या सहकार्याने अपहरणकर्त्यांचा केलला पाठलगा, त्यामध्ये तिच्यावर आलेली संकटे, राजस्थानी खेडुतकन्या सीता हिने तिला केलेली मदत, तिचे रणथंबोर अभयारण्यात पोचणे, विक्रम आणि अरण्यप्रमुख रेड्डी यांना घडलेल्या घटनांची माहिती देणे आणि सर्वांनी शिकारचोरांचीच शिकार करून, त्यांना शासन करणे अशा गतिमान घटना इथे वर्णन केल्या आहेत. मुखपृष्ठावरील वाघाचे रंगीत आकर्षक चित्र आणि आतील काळीपांढरी आठ दहा चित्रे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेली असून, ती पुस्तकाचे सौंदर्य वाढतात. ही साहसकथा कुमार वाचकांना तर आवडेलच; पण प्रौढ वन्यप्रेमींनाही आकर्षित करून घेण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये आहे.

रणथंबोरच्या रानात लेखकः – दीपक दलाल,

अनुवाद- श्री. पु. गोखलेअस्मिता प्रकाशन-पुणे.

पाने- १४७,

किंमत- रुपये १०० /-


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..