नवीन लेखन...

यतीन कार्येकर ते औरंगजेब : एक अद्भूत प्रवास

यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी. यतीन हा माझा मामेभाऊ. आम्ही एकत्र वाढलो. अंगणात एकत्र लगोरी खेळताना अचूक नेम धरणारे त्याचे हिरवेगार मिश्किल डोळे; पहाता पहाता भारतातल्या सर्व राजेरजवाड्यांना थरकापवून सोडणार्‍या आलमगीर औरंगजेबाचे वेधक, भेदक, संहारक डोळे झाले? हा अद्भूत प्रवास कसा घडला? हे देणे आलं कुठून? त्यानं हे अभिनयाचं शिखर गाठलं कसं? या सार्‍या प्रश्नांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

यतीन म्हणतो की, अभिनयाचं बाळकडू मिळालं ते आईकडून. त्याची आई डॉ. ज्योत्स्ना कार्येकर म्हणजे मराठी रंगभूमीच्या मागील चाळीस वर्षांच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या कामेरकर भगिनींपैकी एक. सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे यांचा तो सख्खा भाचा. १९७२ सालापासून म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षापासून यतीन रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट अशा माध्यमांशी जोडला गेला होता. पंडित सत्यदेव दुबे, जयदेव हट्टंगडी, कमलाकर सारंग, रत्नाकर मतकरी, सई परांजपे, विनायक चासकर यासारख्या रंगकर्मींचे यतीनवर तेव्हापासून संस्कार झालेले होते. त्यामुळे त्याच्या अभिनयातले बारकावे, कंगोरे घासून पुसून तयार झालेले होते. मकरंद देशपांडे, आशुतोष गोवारीकर हे त्याचे तेव्हापासूनचे दोस्त. त्याने आजवर दोन हजारांहून अधिक एपिसोड्स झालेले आहेत, तर त्याने साठाहून अधिक चित्रपट नमूद आहेत.

मे २००८ च्या एका दुपारी बेटीया सिरिअलच्या सेटवर यतीनचा मोबाईल वाजला. त्याच्या जवळच्या मित्राचा- नितीन देसाईचा फोन होता तो. यतीन म्हणतो, “नितीननं मला आदेशच दिला, की तो महाराष्ट्राचे नव्हे तर भारतवर्षाचे दैवत असणार्‍या छत्रपती शिवाजीराजांवर तो एक महामालिका करतोय व त्या मालिकेत तू (यतीन) औरंगजेब करतोयस! मला काही बोलण्याची त्याने संधीच ठेवली नव्हती. त्याला हिंदी व मराठीत सर्वत्र ओळखला जाणारा, उत्तम अभिनय करू शकणारा, स्टार व्हॅल्यू असणारा अभिनेता हवा होता. तो त्याला माझ्यात सापडला. मी अर्थातच नकार देणे शक्य नव्हते. कारण औरंगजेब हा माझ्या कुतुहलाचा कायम विषय होता, तुझ्या घरातच कर्जतला १९७४ च्या सुमारास (आपण चौथीत असताना) महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी काढलेले उद्गार माझ्या लक्ष्यात होते. ते म्हणाले होते – अरे, शिवचरित्र लिहिण्यापूर्वी मला आधी औरंगजेब समजला पाहिजे; तेव्हापासून औरंगजेबानं मनात घर केलेलं. मी तसा चांगला वाचक नाही. मी खूप हळू वाचतो. वेळही फारसा नसतो. पण सत्तरीच्या दशकापासून मी औरंगजेबासंबंधी खूप वाचलंय. सेतुमाधवराव पगडी, त्र्यं. शं. शेजवलकरांची इतिहासाची पुस्तके, बाबासाहेबांचं राजा शिवछत्रपति, रणजित देसाईंचं श्रीमान योगी, जदुनाथ सरकारांचं औरंगजेब, ना सं इनामदारांची शहेनशहा ही कादंबरी मी वाचत आलो होतो. माझा औरंगजेबावरचा विचार चालू होताच. त्यात पुन्हा नितीन देसाईनं या मालिकेचं दिग्दर्शन माझा जुना मित्र हेम्या(हेमंत) देवधर आणि विजय राणे करणार असं सांगितलं. शिवाय अविनाश नारकर, मृणाल कुलकर्णी हे मालिकेतले सारे सहकलाकार माझे अगदी जवळचे मित्र. त्यामुळे अर्थात मजा येणार होती. अमोल सोबत मी कधी काम केलं नव्हतं, पण तो एक चांगला अभिनेता आहे हे मला ठाऊक होतं; आणि या सार्‍यातून मराठीतील एक महा नव्हे तर महान मालिका घडणअर आहे यची मला आतून जाणीव झाली.

औरंगजेबाची तयारी तू कशी केलीस, यावर उत्तर देत असताना यतीन म्हणाला की, “आधी सांगितलेली सर्व पुस्तकं पुन्हा वाचायची ठरवली. पण फारसा वेळ नव्हता. माझी मैत्रीण कीर्ति देघटकला मी फोन करून ती पुस्तकं मला पुन्हा समजावून द्यायला सांगितलं. ती माझी चांगली टीकाकार आहे. तिनं मला श्रीमान योगी, माझ्या वहिनीनं – शिवानी कराडकरनं पाठवलेलं शहेनशहा, तू धाडलेलं औरंगजेब हे सारं पुन्हा एकदा मला समजावून दिलं. मी इंटरनेटवर औरंगजेब शोधला, त्याची छायाचित्रं पाहिली. भूषण तेलंग औरंगजेबाच्या एकूण अस्तित्वाविषयी मला म्हणाला की ओसामा बिन लादेन पाहिला की औरंगजेब मनात उभा राहतो. मला औरंगजेबाचं असणं दिसलं. भूमिकेविषयी चर्चा करताना हेम्यानं औरंगजेब क्रूर, कपटी आणि अत्यंत धूर्त आहे, त्याचा कावेबाजपणा समजून घ्यायला हवा व तो तुझ्या देहबोलीतून दिसायला हवा. विजय राणेनं औरंगजेबाच्या स्वभावातला बेरकीपणा, त्याची सत्ताकांक्षा यावर प्रकाशझोत टाकला. मला इनामदारांच्या शहेनशहा कादंबरीतील औरंगजेबाचं माणूसपण अधिक भावलं. आपल्या महाराष्ट््राच्या दृष्टीने औरंगजेब हा तर सर्वात मोठा खलनायक. महाराजांना त्याच्या स्वराज्य स्थापनेतला मोठा अडसर म्हणजे आलमगीर! मला औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेतून त्याच्यातील माणूस दाखवायचा होता. तो क्रूर, सत्तालोलुप होता; पण त्याच्यावर मोगल घराण्यातील दग्याफटक्याचे संस्कारच होते ना! एक बाबर सोडला तर कोणत्या मोगल सम्राटाला दिल्लीच सत्ता स्वकीयांना ठार मारल्याशिवाय मिळाली? छत्रपतींची भव्यदिव्य व्यक्तिरेखा उभी राहण्यासाठी औरंगजेबही तेवढ्याच तोलामोलाने उभा रहायला हवा होता; कारण आलमगीराच्या उत्तुंगतेवर मात करण्याची महानता छत्रपतींकडे होती हे मी ध्यानात घेतले. औरंगजेब क्रूर, कपटी, धूर्त, बेरकी, सत्तालोलुप तर होताच पण तो एवढे सारे विशेष असणारा माणूस होता. तो अत्यंत धर्मनिष्ठ होता. रितसर कुराण वाचून त्याच्या तो प्रती नकलून काढत असे व त्या तो विकत असे. तो टोप्या विणून त्या विकी. त्या पैशातून मिळणार्‍या रकमेवर तो गुजारा करी, कारण त्याचीराहणी अत्यंत साधी होती. स्वतःच्या कमाईवर स्वतःच्या राज्यात स्वतः कर भरणारा तो कदाचित एकमेव राज्यकर्ता असेल! जगावं कसं हे तो कुराणातून शिकला व तसंच तो जगला. हे फार कमी जणांना जमतं. मला ही गोष्ट आवडली. औरंगजेबाच्या मनात त्याच्या मुलींबद्दल ममत्व होतं. तो त्यांना कधीही दुखावत नसे. मिर्झा राजांनी दिल्लीचं तख्त मिळवून द्यायला त्याला खूप मदत केली होती ही गोष्ट तो कधीच विसरला नाही. मला तर अनेकदा शंका वाटते की, आर्ग्र्याहून शिवाजीराजे पळून गेल्यावर औरंगजेबाच्या ताव्ड़ीत ते कसे सापडले नाहीत? की मिर्झा राजांचा शब्द व शिवाजीराजांची राजपूत पार्श्वभूमी यामुळे तशी हिंमत तो करू शकला नाही? आग्र्याहून महाराजांनी पळून जाणे ही घटना आलमगीराच्याच नव्हे तर एकूण मोगल सत्तेच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना आहे! यानंतरच मोगल सत्तेचा अपकर्ष सुरू झाला. विजय व हेमूनं माझ्या हे लक्ष्यात आणून दिलं की, औरंगजेबाची राजवट ही सर्वात मोठी मोगल कारकीर्द होती, मला जाणवलं की म्हणूनच या काळात मोगलांचा अपकर्ष सुरू झाला. औरंगजेब सत्तापातळीवर विकृत आहे.सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जाण्याची त्याची तयारी आहे, त्याच्या वर्तनातील विकृतीत ही सुसंगती आहे. औरंगजेबाच्या संपूर्ण आयुष्यातील परिवर्तन मला दाखवायचं होतं. ही प्रचंड मोठी भूमिका मला पेलायची होती.

यावेळी सेटवरच्या काही आठवणी यतीन सांगतो- “जोधा अकबरच्या सेटवरच या मालिकेतील आग्र्याच्या दरबारातील शूटिंग झालं होतं. राजा शिवछत्रपती मालिकेतील माझा पहिला शॉट दिवाणे-आम मध्ये शूट झाला. जोधा अकबरसारख्या मोठ्या इतिहासपटाचं निर्माण माझ्या दोस्तानं- आशुतोषनं केलं होतं, त्याच चित्रपटासारखं भव्यदिव्य स्वप्न माझ्या मित्रांनी नितीन देसाई, हेमू, विजयनं पाहिलं व तिथंच निर्माण केलं. पहिला शॉट देताना माझ्या मनात मोठं समाधान होतं. औरंगजेब साकारायचा, तोही दोस्तांसोबत. सारा अद्भूत प्रवासच आहे हा! कीर्ति देघटकचा १० वर्षांचा मुलगा रित्विक हा एकदा शूटिंग पहायला आला होता. तो माझी प्रत्येक भूमिका पाहतो. नेहमी जीन्सच्या पँटीतल्या यतीनचं रूपांतर वेशभूषा, मेक अप झाल्यावर औरंगजेबात कसं होतं, हे तो बारकाईनं पहात होता. दाढी लावून टच अप झाल्यावर मी पगडी चढवल्यावर तो पटकन म्हणाला पुस्तकातला औरंगजेब समोर आला! माझ्यातल्या अभिनेत्याला फार समाधान मिळालं. (या मालिकेतील भूमिकांचं मोठं यश नीता लुल्ला आणि तिच्या कपडेपटाला, आमच्या मेकअपला आहे, हे विसरून चालणार नाही). प्रत्येक शॉटपूर्वी हेम्या किंवा विजय मला त्यविषयी अपेक्षा सांगतात, कॅमेरामन निर्मल किंवायोगेश जानी स्थलावकाश सांगतात. लाईट, कॅमेरा, अॅक्शन झाल्यावर मी अबिनय करतो. संवाद उच्चारतो. पण एक गुपीत सांगतो, मला खरं तर अभिनेता व्हायचं नव्हतं! मला व्हायचं होतं कॅमेरामन. मी नेहमी विविध प्रकारच्या कॅमेर्‍यांचा अभ्यास करतो आणि त्याच्या कक्षेप्रमाणे अभिनय करतो. आता हेच बघ, राजा शिवछत्रपतीचं शूटिंग रेड आय् कॅमेरा वापरून होतं. यात फिल्म नसते, सरळ संगणकावर डिजिटल टेक्नॉलॉजीनं रेकॉर्डिंग केलं जातं. डिजिटल असल्यानं अभिनयाचे सर्व बारकावे त्यात दाखवता येतात. अशा वेळी माझ्या मनात कॅमेरामन जागा होतो व मी त्यानुरप अभिनय करतो. परवाचीच गोष्ट आठव शिवाजी आग्र्याहून पळून गेल्यानंतरचा प्रसंग विजय चित्रित करत होता. फौलादसिंगासकट सगळ्यांना औरंगजेब क्रोधित होऊन हाकलून देतो.

माझ्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. औरंगजेब (यतीन) रामसिंगला बोट दाखवून थांबण्याचा आादेश देतो व जोवर सिवा जिंदा या मुर्दा सापडत नाही तोवर दरबारात न येण्याची आज्ञा देतो. या प्रसंगाची तालीम झाली, एक टेक झाला, आता फायनल टेकची वेळ झाली. अखेरीस कॅमेरा क्लोज अप घेत औरंगजेबच्या चेहर्‍यावर स्थिरावला. औरंगजेबाच्या चेहर्‍यावर राग, शिवाजीच्या पळून जाण्याची व्यथा, इतिहासाच्या पानांवर या प्रसंगाची नोंद होणार .याची जाणीव तर उमटलीच पण त्याचबरोबर असहाय्य अगतिक षंढत्वाची वेदनाही हिरव्यागार डोळ्यांतून प्रगट झाली अन् सर्कन औरंगजेबाच्या खदिरांगारासारखी आग ओकणार्‍या लालबुंद नेत्रकडांमधून अश्रूंचा एक टपोरा थेंब ओघळला आणि तो औरंगजेबाच्या गालावरून सरकत ओठांवर विरला. औरंगजेबाचं सारं अस्तित्व यतीननं उभं केलं. शॉट संपताच क्षणी यतीनचं अभिनंदन करायला सारे धावले. खरा कलावंत, प्रसंगाला अशी उंची देतो, “यतीनसरांनी त्यावेळी ग्लिसरीन घातलं नव्हतं – विजय राणे नंतर म्हणाले

यतीननं साकारलेल्या औरंगजेबाविषयी दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी – “आमच्या मनातल्या औरंगजेबाला यतीननं खूप उंच दिली, हा एक असा कलाकार आहे की, त्याच्या गुणवत्तेला खरा न्याय कधी मिळालाच नाही. यापुढे पडद्यावरचा औरंगजेब म्हणजे यतीन अशीच प्रतिमा तयार होईल; अशी दाद दिली. यतीन नम्रतेनं या भूमिकचं श्रेय दिग्दर्शकांना- हेमंत देवधर व विजय राणे आणि नितीन देसाई यांना देतो.

कीर्ति देघटक ही यतीनच्या संपूर्ण कारकिर्दीची साक्षीदार. तिनं यतीनचा औरंगजेब त्याच्या आजवरच्या सर्व भूमिकांत अव्वल असल्याचं सांगितलं. १ ते १० या गुणांकनात तिनं या भूमिकेला ९ गुण बहाल केले. कीर्तिने यतीनच्या अभिनयातील विविधता दाखवताना त्याने एकाच वेळी किती वेगवेगळे रोल केले हे दाखवले. जेव्हा तो शांतीमधला ६० वर्षांचा कामेश महादेवन करत होता त्याच चट्टान मालिकेत विशीतला विशालराजही करत होता. तशीच स्थिती औरंगजेबाच्या वेळी आली होती. एकाच वेळी बेटीया मधला सूर्यकांत गरोडिया, स्वर्ग मधला सत्यनारायण त्रिपाठी करता करता तो एक झोका नियतीचा मधील अक्कादा ही स्त्रीभूमिकाही निभावत होता आणि दुसर्‍या बाजूला ऐतिहासिक महामालिकेतला औरंगजेबही साकारत होता. हे लक्ष्यात आणून दिल्यावर यतीन यावेळी हसून म्हणाला, अक्कादासाठी मला माझं २० किलोने वजन कमी करावं लागलं होतं, पण त्याचा फायदा मला खंगत जाणार्‍या औरंगजेबाच्या देहबोलीसाठी झाला.

या मालिकेतील औरंगजेबाच्या भूमिकेच्या यशाबाबत यतीननं श्रेय निर्माता नितीन देसाई व दिग्दर्शक द्वय हेमंत देवधर आणि विजय राणे यांना दिलं. “ही मालिका करताना माझे पप्पा डॉ शरद कार्येकर यांना मी अभिनेता म्हणून आनंद देऊ शकलो, आज पप्पा हयात नाहीत पण दूरवर आकाशातून ते ही मालिका पहात असतील यात मला शंका नाही“, यतीन भावपूर्वकतेनं म्हणाला.

— नितीन आरेकर

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..