नवीन लेखन...

मैत्र आत्म्याला भिडणारे (फ्रेंडशिप डे विशेष)

कोणाचे तरी कोठे तरी मैत्रीचे नाते जुळते. बऱ्याच वेळा मैत्री व्यक्तीसापेक्ष असते. पण तसा विचार केला तर आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यास त्या क्षेत्राशीही मैत्रीचे बंध निर्माण होतात. मग अशा मैत्रीला काय नाव द्याल ? कशी असेल त्याची अनुभूती ? जाणून घ्यायचेय ? नेमके हेच प्रश्न समोर ठेवून आम्ही बोलते केले

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि प्रकाश आमटे यांना…


मानवी नातेसंबंधातील महत्त्वाचा धागा म्हणजे मैत्री. मैत्रीला अनेक पदर असतात. तशी कोणाची कोणाशीही मैत्री जुळते. जीवनात अनेक मित्र भेटतात. त्यातील काहींशी तर अगदीच घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतात. मैत्री हा साहित्यिकांचाही आवडीचा विषय आहे. मुख्य म्हणजे आपापल्या क्षेत्राशी चांगली मैत्री प्रस्थापिक करणारेही आहेत. त्यांच्या दृष्टीने मैत्री कशी असू शकते हे ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने जाणून घेणे उचित ठरेल.

अशीच शब्दांच्या मैत्रीत रमलेले कवी म्हणजे प्रवीण दवणे. आपल्या या अनोख्या मैत्रीविषयी ते सांगतात, ‘मैत्र या शब्दात मी आणि त्र या दोन अक्षरांचा समावेश आहे. त्र म्हणून दूर सारणे. स्वत:तील अहंकार दूर आपण कोणत्याही कलेत विरघळतो तेव्हा जीवन सुफल होते. मैत्रीत कुठलीही बांधिलकी, अहंकार असता कामा नये. शिवाय ती निरपेक्ष असावी असे लौकीकार्थाने वाटते. कोणत्याही अपेक्षेपोटी केलेली मैत्री अधिक काळ टिकू शकत नाहीत. कारण अशी मैत्री अपेक्षाभंगाचे दु:ख पचवू शकत नाही. कळत्या वयात मालकी हक्काच्या भावनेने निर्माण झालेली मैत्री पुढे त्या वयाच्या रंगात रंगत जाते. अशी मैत्री उत्सव म्हणून ठीक वाटते. पण, पुढे वाटचाल करताना असे परिचयाचे चार क्षण म्हणजे मैत्री नव्हे हे लक्षात येऊ लागते. वास्तविक मैत्री ही एक साधना आहे, ती तपश्चर्या आहे. ही तपश्चर्या करताना सत्त्वपरीक्षेचे अनेक क्षण येतात. त्यातून अनेकदा मैत्री हुलकावणी देते. अशा वेळी तुमची खरी परीक्षा असते. त्यात तुम्ही उतरलात तर आयुष्यात मैत्रीचे बंध कधी निसटत नाहीत.

या पार्श्वभूमीवर माझी लहानपणापासून शब्दांशी मैत्री जुळली. प्रत्येकाच्या तळहातावरील रेषा त्याच्या भवितव्याविषयी संकेत देत असतात. कोणाला धनप्राप्ती होणार असते, कोणाला परदेशयोग येणार असतो. तसा माझ्या तळहातावर शब्दमैत्रीयोग असावा अशी माझी श्रध्दा आहे. आजवर अनेक महान कलावंत, कवी, महापुरूषांच्या शब्दांशी जवळीक साधता आली. त्यातील आशय मला नेहमीच मोहून गेला. टरफलाच्या आत दाणा असतो. मग टरफल म्हणजे दाणा नव्हे हे खरे तसे शब्द म्हणजे सर्वस्व नव्हे. त्या शब्दांचा आशयही तितकाच महत्त्वाचा असतो. मला भेटणाऱ्या ज्येष्ठ, श्रेष्ठ व्यक्ती ओंजळीत शब्द घेऊन येतात. भा. रा. तांबे, केशवसूत, बालकवी त्यांच्या नंतर कुसुमाग्रज, बोरकर, इंदिरा संत, आरती प्रभू अशी शब्दांचा दीपोत्सव करणारी मांदियाळी आली आणि त्यांनी माझे सामान्यपण अक्षरश: उजळवले. मला आनंदाभिमुख केले. एक चांगला मित्र मिळाला तर तो तुम्हाला अनेक उत्तम मित्रांच्या बेटांवर नेतो. तसे या श्रेष्ठ कवींनी मला इतर अनेकांच्या बेटांवर नेले. त्यातून माझ्यात कविता उमलू लागली.

या कवितेचे बोट धरून आपल्याला विश्वाचे दर्शन घडवले जाईल याची त्यावेळी कल्पना नव्हती. पण परदेशीची आमंत्रणे आली. तेथे बोलायला शब्दच मदतीला आले. असे आहे या मैत्रीचे नाते. त्यामुळे मी शब्दापुढे नेहमीच नि:शब्द आणि कृतज्ञ असतो. या शब्द नावाच्या मित्राने मला आजवर भरभरून दिले आहे. त्याने मला अन्य कोणा माणसावर अवलंबून राहून दु:खी होण्याची संधी दिली नाही. कोणी माझी स्तुती करो, मला पुरस्कार मिळोत, काही सन्मान हातातून निसटून जावोत या सार्‍या प्रसंगात माझ्यातील स्थितप्रज्ञता कायम असते. ती स्थितप्रज्ञता माझ्यातून कोणी काढू शकत नाही. माझ्यासार’या शब्दगायकाला एक तंबोरा मिळाला आहे. त्यामुळे गेली जवळजवळ साडेतीन तप ही मैफिल सुरू आहे. मला शब्द स्फुरत गेले पण त्याकडेही मी नम्रपणे पाहिले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत एकनाथ यांच्या शब्दांसमोर मी कायम नतमस्तक होत असतो. आता इतक्या वेळा ‘दासबोध’ वाचून झाला. परत काय वाचायचा असा प्रश्न कधीच पडत नाही. कायम वाचन सुरू असते. मित्राला रोज भेटावे लागते तसेच हे आहे. शब्दांच्या दिव्यात शब्दांनी तेल घालावे. मग शब्दच आपल्याला प्रकाश देतात याचा मला वेळोवेळी अनुभव आला आहे.

फ्रेंडशिप डे अर्थात मैत्र दिन एका दिवसापरता साजरा केला जाणे उचित नाही. तसे तर मैत्री ही आयुष्यभराची असते. तो कधी तरी साजरा होणारा आणि तात्पुरता सोहळा नसतो. मैत्री करताना साधना आणि समर्पणाची तयारी हवी. दिन साजरा करणे हे उत्सवी निमित्त असते. सर्वसाधारणपणे आपण कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने करतो. पण नंतर केवळ दिवे उजळत बसत नाही तर कार्यक्रम करतो. तशी मैत्री हे केवळ उत्सवी रुप न राहता ती निभावली पाहिजे. माझी शब्दांशी असलेली मैत्री आजवर अशीच निभावली आहे. त्यामुळे शब्द कधी तरी प्रसाद देतात याचा मला प्रत्यय आला आहे.अभिनेत्री मृणाल कुलकर्णीनेही मैत्रीविषयीच्या आपल्या भावना दिलखुलासपणे व्यक्त केल्या. ती म्हणाली, ‘माझी अभिनयाशी आपणहून मैत्री झाली. त्या मैत्रीसाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. खरे तर अशी मैत्री व्हावी हे नियतीच्याच मनात होते, असे म्हणावे लागेल. मैत्रीमध्ये निरपेक्ष प्रेम असायला हवे. कारण मैत्रीच्या वाटचालीत सगळ्या प्रकारचे क्षण येत असतात. अबोला, रुसवा, भांडणे अशा विविध क्षणांना सामोरे जावे लागते. पण, तो जो बॉण्ड असतो तो इतर कोणत्याच नात्यात आढळून येत नाही. मी अत्यंत जवळच्या बालपणच्या मित्राबरोबर विवाहबद्ध झाले. आमच्या नात्यातील मैत्री आजवर टिकवून ठेवता आली हे भाग्य समजते. असे झाले तरच जीवन अधिक आनंददायी होते. नवरा-बायकोत मैत्रीचे नाते असेल तर नात्याचा गोडवा अधिक वाढेल. दिखावूपणातील मैत्री टिकून राहत नाही, हेही खरे. मैत्रीचेही वेगवेगळे मार्ग आहेत. काहीजण रोज भेटतात. काहींना एक फोनही पुरेसा असतो. काही वेळा शेजारी राहणार्‍यांचीही मैत्री जुळू शकत नाही. पण, दूरदेशी राहणार्‍यांची मैत्रीचे अतूट बंध निर्माण होतात. थोडक्यात, कोणाची कोणाशी मैत्री प्रस्थापित होईल हे सांगता येत नाही. पण, केवळ मैत्री असून उपयोग नाही तर एकमेकांची मनेही जुळायला हवीत. मुख्य म्हणजे त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास हवा. आपला आनंद त्याला स्वत:चा वाटावा तसेच आपल्या दु:खाने त्यानेही सद्गतीत व्हावे, हे झाले मैत्रीच्या नात्याचे वेगळेपण. अर्थात, ही नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. जाणीवपूर्वक नाती सांभाळावी लागतात. आपण एखाद्या रोपाला पाणी घालतो, त्याच्या बुंध्याशी चांगली माती टाकतो. त्याला ऊन देतो तसेच प्रसंगी त्याची पानेही कापून टाकतो. अर्थात हे सारे झाडाच्या जोमदार वाढीसाठीच सुरू असते. तसेच मैत्रीचेही आहे. मैत्रीत अशी असंख्य व्यवधाने सांभाळावी लागतात. एकमेकांचा इगो दूर ठेवावा लागतो. शिवाय, निरपेक्ष वृत्तीही अंगिकारावी लागते. या सार्‍यातून टिकते, फुलते ती खरी मैत्री ! मग हे मैत्रीचे बंध वरचेवर अधिक घट्ट होऊ लागतात.

निसर्गावर विशेषत: प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करणारे प्रकाश आमटे आपल्या या अनोख्या मैत्रीविषयी म्हणाले, ‘माझी या प्राण्यांशी केवळ मैत्री आहे असे म्हणता येत नाही तर ते आता कुटुंबातील सदस्य झाले आहेत. तशी मैत्री कोणाचीही कोणाशीही होऊ शकते. आजवर माझे मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी या दोघांशीही घनिष्ठ संबंध आले. वन्य प्राण्यांचा तर विशेष लळा लागला. अलीकडे वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरू लागल्याने चिता व्यक्त केली जात आहे. पण, त्यांचे नैसर्गिक खाद्य मानवाकडून झपाट्याने कमी केले जात आहे. अशा परिस्थितीत ते खाद्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येणे साहजिक आहे. पण, म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्याकडून हल्ला केला जाईलच असे म्हणता येत नाही. याचे कारण वन्य प्राण्यांकडून मानवी वस्तीवर हल्ला करण्यात आल्याची पूर्वीपासून आजवर कोठेही नोंद आढळत नाही. त्रास दिला नाही तर ते काही करत नाहीत. उलट ते चांगले मित्र बनू शकतात हे माझ्या उदाहरणावरुन लक्षात येईल. विशेष म्हणजे या वन्य प्राण्यांच्या तुमच्याकडून अधिक अपेक्षा नसतात. दैनंदिन गरजा सांभाळल्या तर ते तुम्हाला कसलाही त्रास देत नाहीत. उलट संकटसमयी त्यांच्यासारखा जिवलग मित्र नाही. आजवर मी या प्राण्यांना कधीच धाक दाखवला नाही. त्यामुळे तेही माझ्याशी तितक्याच खेळीमेळीने वागतात. मैत्रीतील प्रेमात किती ताकद असते हेच यावरुन दिसून येते.

— अद्वैत फिचर्स आणि मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..