नवीन लेखन...

काव्य जन्माची कथा – मधु मागसी माझ्या सख्या, परि

कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे…

आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली….

काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती….

तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, ‘मधु मागसी माझ्या …”

मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

जो काव्यमधु तू मागत आहेस त्याचे कित्येक मधुघट रिते होऊन घरी पडून आहेत ज्याकडे बघायला आता फुरसत राहिली नाही. आता मात्र नव्याने हे मधुघट माझ्याकडे सहजतेने निर्मिले जावेत अशी माझी शारीरिक अवस्था राहिलेली नाही अशी दिनवाणी कबुली या कवितेच्या सुरुवातीस कवींनी दिली आहे.

जेंव्हा माझी गात्रे शिथिल नव्हती, स्मृती सक्षम होत्या अन शरीर साथ देत होते तेंव्हा माझ्या मनातली फुलपाखरे हा काव्यमधु अगदी लीलया निर्मित होती. अगदी कमळाच्या विशाल द्रोणी भरून मी हा शब्दरस तुझ्या स्वाधीन करत होतो. तेंव्हा मला साधनांची कमतरता भासत नव्हती. मनातली उर्मी दाटून आली की ती शब्दबद्ध व्हायची पण आता तशी परिस्थिती उरली नाही. तुला देण्याजोगे माझ्याकडे काही नुरले तरी माझी पूर्वीची ही काव्यसेवा ध्यानात घेऊन तू आता माझ्यावर रागावू नकोस. तू मला माफ कर अन माझ्यावर थोडासा दयाभाव दाखव अशी विनंती कवी आपल्या ‘त्या’ मित्रास करतात.

माझा हा अखेरचा प्रवास सुरु आहे, हा प्रवास कधी अन कसा संपेल हे मलाही माहिती नाही. मात्र शेवटच्या काळात मला त्या परमात्म्याचे परमेश्वराचे आराधन करायचे आहे. त्याचे स्तवन करायचे आहे, त्याच्या पूजनासाठी माझ्या प्रतिभेचे उरले सुरले चार शब्द मी जपून ठेवले आहेत, या भावनेचे अगदी हळवे वर्णन करताना भा.रा.तांबेंनी जो उपमा अलंकार वापरला आहे तो अगदी अद्भुत अन विलक्षण परिणामकारी असा आहे. ते म्हणतात की दुधाच्या नैवेदयाची एकच वाटी माझ्या गाठी आहे अन देवपुजेस्तव एकच काटेरी फुलझाड (कोरांटी) मी कसेबसे माझ्या अंगणी तग धरून राखिली आहे ! उरले सुरले काव्यस्फुरण फक्त प्रभूचरणी अर्पण करण्यासाठी राखून ठेवल्याने आता तुला देण्यासाठी माझ्याकडे मधुघट राहिले नाहीत याची मला खूप खंत वाटते आहे असे कवी इथे सुचवतात.

आपल्या मित्रास किंवा आपल्या रसिक वाचक- चाहत्यांना आपल्याकडून काय लिहिले जावे याची मर्मभेदी जाणीव तांबेंना आहे. युवा मनाची स्पंदने ज्या प्रेमभावनेत कैद असतात, ती प्रेमभावना युवामनाची भाषा असते अन त्यांचे श्वास हीच त्यांची कुजबुज असते. प्रतिभावंत साहित्यिक या श्वासांना शब्दात परावर्तित करतात अन या कुजबुजीला कवितेचे प्रारूप मिळवून देतात. हे प्रेमकाव्य आपल्या नवनावोन्मेशशाली प्रतिभासामर्थ्याने कवी जिवंत करतात अन वाचक त्या काव्यास आपल्या हृदयात अढळ स्थान देतात. याहीपुढे जाऊन काहींना जगण्याचे ध्येय हवे असते तर काहींना जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असतो त्यासाठी ते अविरतपणे संसारसुखाचे मर्म शोधत असतात. कवी मात्र फुलांचे परागकणदेखील न दुखावता त्यातून अलगद मधुर मधुकण शोषून घ्यावे इतक्या सहजतेने जीवनातील मर्म हलकेच समोर मांडत जातात. त्यातला अर्थ बघून आपण दिग्मूढ होऊन हरखून जातो. कवी म्हणतात की आता अशा भावना, असे विचार शब्दबद्ध करावे इतके भान माझ्याकडे उरले नाही. माझ्या अंगी तितके बळही राहिले नाही.तेंव्हा तू त्याविषयीची आर्जवे मला करू नकोस !

शेवटच्या कडव्यात कवी अगदी आर्ततेने ह्रदयाला पीळ पडतील अशा शब्दात आपली व्यथा मांडतात. ‘आता अंतःकाळ जवळ आला आहे, ज्याप्रमाणे पूर्वेस रम्य प्रभातीस उगवलेला सूर्य निरव सांजेला मावळतो हा निसर्गनियम आहे त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकास मृत्यू अटळ असतो. या निसर्ग नियमास आपण कसे अपवाद असू शकू ? आता माझा श्वाससूर्य ढळणार आहे, ही सांजवेळ मला काहीशी कातरवेळ वाटते आहे अन त्यामुळे थोडीशी घबराट देखील माझ्या मनात दाटून आली आहे असे प्रामाणिक कथन ते इथे करतात. अशा या बिकट प्रसंगी काव्यमधुचे स्फुरण होईल तरी कसे असा सवाल कारतानाच ते म्हणतात की आता माझे चित्त कशातच गुरफटले नसून माझे नेत्र केवळ आणि केवळ पैलतीरावरच्या आत्मीय ज्योतीत लीन झाले आहेत. तेंव्हा माझ्या सख्या आता मला तू ह्या काव्यमधुचा आग्रह करू नकोस असे म्हणत म्हणत साश्रूपूर्ण शब्दांची ओंजळ ते आपल्या मित्राच्या ओंजळीत रिती करतात.

कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या जर्जर माणसाने मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे.

— संगीत.. या WhatsApp ग्रुपवरुन.. 

 

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

5 Comments on काव्य जन्माची कथा – मधु मागसी माझ्या सख्या, परि

  1. खुपच सुंदर विवेचन आणि माहिती. आपल्याला कवी कडुन काय अपेक्षा आहेत ते किती सहजपणे सांगुन मोकळे होतो, पण कवीचे हळवे मन शेवट पर्यंत रसिकांचे मनोरंजन करण्यात मग्न राहते व न झाल्यास खंत बाळगते.

  2. ‘मधू मागशि माझ्या सख्या’या कवितेनं या आठवड्यात मला घायाळ केलं !कवितेची सुरुवात मनाला खात जाते आणि शेवट तर सारं काही संपलं असं भाववून जातो.’लागले नेत्र हे पैलतिरी ‘ ही ओळ तर पार नखशिखांत हादरवून टाकते.खरोखरच भा.रा.तांबे यांच्या प्रतिभेची उत्तुंग भरारी अनुभवता आली.कविता कैक वेळा वाचली अन् कैकदा ऐकली .लता मंगेशकर यांच्या आवाजात ही कविता जेव्हा गीत बनली तेव्हा किती उंची खूपच वाढली.कितीदातरी ही उंची अनुभवली आणि कैक वेळा डोळ्यातून पाणी ठिबकलं !

  3. एवढे साहित्य मराठीत आहे की त्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडावेत. थोर ते कवि आणि थोर ते संगीतकार

  4. फारच सुंदर! काव्य जन्माची कथा वाचुन अधिकच भर पडली या गाण्याच्या प्रेमात. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..