नवीन लेखन...

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले असे मानले जाते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.
तेव्हा बिजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता हा भाऊबिजेच्या सण आहे. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भाऊबीजे निमित्त
स्त्रियांचा सण हा जिव्हाळयाचा विषय आहे. मग त्यात भाऊ-बहिणांच्या नात्यात या भाऊबीज या सणांचे महत्त्व किती आहे हे सांगावयास नको. दिवाळी हा सण इतर सणांपेक्षा मोठा मानला जातो, याचे कारण चार दिवस आणि प्रत्येक नात्यांशी जोडणारी रिती-परंपरा मग स्त्रीचा भाऊ, बहीण, पती यांसाठी भाऊबीज, पाडवा यासारखे दिवस राखूनच ठेवले आहेत. भाऊ-बहिणीच्या नात्यावर खूप लिखाण झाले आहे. मग स्त्री आपले दु:ख सांगताना भक्कम पाठीशी उभा राहणारा भाऊ डोळयासमोर ठेवून ओव्या रचते.

बहिणीला भाऊ एक तरी तो असावा ।
चोळीचा एक खण, एका रातीचा विसावा

किंवा

भाऊ तुझा घोडा आस्मानीचा तारा ।
बहिणीच्या गावा जाता लागेना ऊन वारा ॥
शंभर माझं गोतं एक नाही गं कामाचं ।
भाऊ राजसाचं मला भूषाण रामाचं ॥
भाऊची वाट पहाते मी कालच्या धरून ।
शाळा दिवस गं बाई गेल्या सावल्या विरून ॥

अशा प्रकारे भावाविषयीचे प्रेम स्त्री ओवीमधून व्यक्त करते. मग सख्खा भाऊ जरी नशिबात नसला तरी चुलत भावाला ती सख्ख्या भावापेक्षा वेगळं स्थान देत नाही.

चुलत भावाला नका म्हणू वंगाळ
इचार करा जरा एका राशीचं जोंधळ

अशा प्रकारे प्रत्येक सणाला ती भावाची वाट पाहात असते. श्रावण महिना सुरू होतो आणि सणांची रेलचेल सुरू होते.

पंचमीच्या सणाला बंधू आल्याती न्यायला ।
जाऊ काय जी म्हायारी पंचमी खेळाया ॥

पूर्वी एकत्र कुटुंबव्यवस्था असल्याने कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असे. दळणवळणाची सोय नसे, मग बैलगाडीचा वापर होई. मग बहिणीला सासरी आणण्यासाठी भाऊ निघे, त्यालाच मु-हाळी येणे किंवा मुराळी येणे असे म्हणत. मग त्यालाच मुराळी एखादी व्यक्ती यायची तिला सन्मानाने माहेरी घेऊन जात आणि पुन्हा सासरी पाठविताना तिच्यासोबत गोड पक्वान्न देऊन पाठवणी करीत असत.

मु-हाळया माझा दादा घोडं बांधवा जाईल ।
सोय-याला रामराम मग भेटावं बाईला ।
दस-या दिवाळीचं मूळ येईल नेमाचं ।
भाऊरायाचं घोडं दारी येईल टेमाचं ॥

दसरा दिवाळीच्या सणाला हमखास भाऊ येणार याची खात्री बहिणीला असते. म्हणूनच तिला सणांची आस लागते. पूर्वी मुराळी या शब्दाबरोबर ‘मूळ’ हाही शब्द प्रचलित होता. दिवाळी हा सण साजरा करताना गरीब-श्रीमंत असा भेद केला जात नाही. दीप लावून प्रकाशमय होणारा काळ दिवाळीचा सर्वात मोठा सण मानला जातो. बहिणीला अगदी खात्री असते की काहीही झाले तरी दिवाळीला भाऊ आपल्याकडे येणार. मग तिची त्या भावालाही गोडधोड पदार्थ करण्यासाठी धावपळ सुरू होते. भावासाठी सजावट सुद्धा ती करते.

दिवाळीच्या दिशी झुंबराची गं आरास ।
न्हाई कुणाची आगत मला बंधुजी परास॥
दिवाळीच्या दिशी पाट रांगोळ्याची शोभा ।
बंधुजी पावना माझ्या देव्हा-याम्होरं उभा ॥
चांदिच्या कंदिलाला सये सोन्याचे गं वात ।
बंधूला झाली रात कुण्या गावच्या मळयात ॥
दिवाळीच्या दिशी उटणं गुलालाचं ।
भाऊ भाऊ राजसांचं गोर अंग मुलायम ॥
दिवाळीच्या दिशी दारी सजवीन मोर ।
लाडके माझे बंधू ववाळीन
गं भास्कर ॥

अशा रीतीने आतुरतेने वाट पाहणा-या बहिणीकडे भाऊ येतो तेव्हा तिला त्याच्यासाठी काय काय करू असे होते. मग ती भावाला आवडणा-या पक्वान्नासाठी लगबग सुरू करते.

भाऊबीज केली मी बुंदीच्या गोळ्याची ।
बांधवाच्या हाती माझ्या धुलंड तोढायची ॥
भाऊबीजे दिशी ठिवलं दुधाचं आदायान ।
भाऊरायासाठी केलं पोळीचं जेवायन ॥
पाची पक्वान्नं ताट वर बासुंदी आणि पुरी ।
भाऊबीजेच्या फराळाला बोलाविले नरहरी ॥
गहू पोळीयाला डाळ दळिते भज्याला ।
जेवण करीते मी माझ्या बंधू राजाला ॥
भावाला भाऊबीज करीते करंज्याची ।
बंधुजीच्या हाती नथनी सरजाची ॥

ज्या बहिणीला भाऊ नाही, पण तिने गुरुभाऊ मानला असेल तर त्यासंबधी सुद्धा ती आपले मन मोकळे करते ती म्हणते,

सख्ख्या भावा परीस गुरुभावाला माया मोठी ।
लाडक्या भैनीसाठी चोळी घेऊन येतो भेटी ॥
सख्ख्या भावापरिस गुरुभाऊ गं आगळा ।
पाची प्रकाराचं ताट नको जेऊस वेगळा ॥

वाट पाहूनही भाऊ आला नाही तर ती नाराज होते आणि म्हणते

दिवाळी सणादेशी बंधू माझा गं आला न्हाई ।
सांगावा आला बाई जोड ठुशीचा झाला न्हाई ॥

अशा रितीने बहीण भावाचं आदरातिथ्य करते आणि त्याला औक्षण करताना भाऊ आपल्याला काही नाही तरी साडी-चोळी देऊन आदर करेल अशी इच्छा व्यक्त करते. लग्न करून सासरी गेलेल्या स्त्रीला आपल्या माहेरचा मोठेपणा नेहमीच असतो.

भाऊबीजे दिवशी भाऊ आले पुण्याहून ।
आज भाऊबीज ओवाळीते दुणाऊन॥
राम-लक्ष्मण तुम्ही बसा एका ओळी ।
दिवाळीची मला द्यावी साडी-चोळी ॥
भावाची भाऊबीज बाई जरीची पगडी ।
माझ्यासाठी ओवाळणी चंदेरी आणी साडी ॥
दिवाळी दस-याची चोळी फाटून झाली चिंधी ।
नटव्या बंधुजींनी मला ओताला दिली जोडी ॥

भावाविषयीची आत्मीयता तिच्या ठायी सतत जाणवते. चोळी पातळ हे तर क्षणभंगूर आहे. परंतु संसारात सुद्धा भाऊ पदोपदी बहिणीला मदत करतो. पण तोच भाऊ बहिणीकडे आला नाही तर नाराज होऊन मनातील खंतपण बोलून दाखविते,

भाऊबीज केली नाही कुणाला कळू दिली ।
बंधूरायानं मला पोकळी नेसविली ॥
संपाक रांधते मी पुरणपोळीला तवा ।
माझा गं बंधूराज नड सांगते जवा तवा ॥

अशा प्रकारे भाऊ, बहीण, भावजय अशा नात्याविषयीच्या ओव्या खूपच अस्तित्वात आहेत. याशिवाय स्त्रीला आपले अंतर्मन मोकळे करण्यासाठी पांडुरंग, रुक्मिणी, पंढरपूर म्हणजेच पंढरपूर हे माहेर आणि पांडुरंग आणि रुक्मिणी माता-पिता अर्थी अनेक ओव्या रचल्या आहेत. स्त्रीचे सर्व आयुष्यच बहुधा माहेराशी बांधलेले असते. स्वाभाविकच सासर-माहेरच्या माणसांभोवती भिरभिरणारे मनच गीतरूप घेते.

आईविषयीची कृतज्ञता आणि भावांचे प्रेम अनेक वाटांनी व्यक्त होते. स्त्रीचे पुरुषसापेक्ष अस्तित्व आणि तज्जन्य वेदनेच्या अनंत परी लोकजीवनात आजही विद्यमान आहेत. तथाकथित शिक्षित उच्चस्तरीय समाजाचे मनही वेगळे नाही, यातूनच कवितेचा जन्म झाला असे म्हणता येईल. मनात दाटलेले सुख, दु:ख, खंत एखाद्या कवितेद्वारे ओठावर येणं हे नसर्गिक आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2346 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..